अजूनकाही
आता ‘पोस्ट बॉक्स ५५५, इन्दौर’ या पत्त्यावर कुणीही पत्रं पाठवू नयेत आणि ‘rahatindoripost@gmail.com’ या आयडीवर कुणीही मेल करू नयेत. गेल्या ४०-५० वर्षांपासून या पत्त्यांवर कितीतरी पत्रं आणि मेल येऊन पडत होती. त्यांना प्रत्युत्तरंही मिळत होती. पण आता तुम्ही हे लक्षात घ्या, आणि तुमचे मित्र, नातेवाईक, चिरपरिचित, आप्त… जे जे कुणी उर्दूप्रेमी असतील, ज्यांना नज़्म, ग़ज़ला वाचायला आवडत असतील, त्या सर्वांना हा निरोप कळवा. किंवा मग असं करा की, तुमचं शेवटचं पत्र किंवा मेल पाठवून ठेवा. कारण तुम्ही पाठवलेली पत्रं अजून काही दिवस तरी नक्की पोहचतील आणि गुगलच्या नियमानुसार अजून काही महिने तरी मेलही पोहचतील, पण तिकडून आता कधीच प्रत्युत्तर येणार नाही. कारण तुम्ही ज्यांच्यासाठी पत्रं वा मेल पाठवाल, ती व्यक्ती आता तिथं राहत नाही. त्या व्यक्तीनं कालच आपला पत्ता बदललाय.
खरं म्हणजे या अशा सांगाव्याचा काही उपयोग नाही, याची कल्पना आहे. अजून कितीतरी दिवस वरील दोन्ही पत्त्यांवर कितीतरी पत्रं व मेल जातच राहतील. कदाचित आधीपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात. त्यातल्या अनेकांना माहीत असेल हे आपलं शेवटचं पत्र असेल, किंवा माहीतही नसेल. तुम्ही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या एखाद्या सत्तरीच्या पुढच्या आजीला किंवा आजोबांना विचारलंत ना की, पं. नेहरू जाऊन इतकी इतकी वर्षं झालीत आणि इंदिरा गांधी जाऊनही अमूक अमूक वर्षं झालीत, तर ती म्हणतील – ‘असं? आम्हाला वाटत होतं की, ती अजून आहेत म्हणून.’ आणि आभाळाकडे पाहत एक हताश उसासा टाकतील. इन्दौरचे जगप्रसिद्ध शायर, ग़ज़लकार, नज़्मनवाज़ डॉ. राहत इन्दौरी यांच्याबाबतीतही काहीसं तसंच होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
सध्याच्या माध्यमांच्या विस्फोटामुळे, सोशल मीडियाच्या प्रस्फोटामुळे आणि टीव्ही चॅनेलांच्या ठणठणाटामुळे राहत इन्दौरी यांचं काल निधन झालं, वयाच्या ७१व्या वर्षी, निमित्त घडलं करोनाचं, ही बातमी भारतभर, जगभर गेली असेलच. सोशल मीडियावर तर श्रद्धांजली आणि ‘RIP, RIP’चा धुवांधार धबधबा कोसळतोय कालपासून. आणि का कोसळू नये!
भारतातल्या अनेकांनी इन्दौरी यांचं ग़ज़ल सादरीकरण प्रत्यक्ष पाहिलं नसेल, पण गेल्या काही वर्षांत फेसबुक-यु-ट्युब-व्हॉटसअॅप यांच्या कृपेमुळे त्यांनी त्यांच्या कितीतरी ग़ज़ला पाहिल्या-ऐकल्या असतील. काहींनी तर कित्येक वेळा, पुन्हा पुन्हा पाहिल्या असतील.
इन्दौरी यांच्या शब्दांची जादूच अशी आहे की, ते एकवेळ ऐकून कधीच समाधान होत नाही. पुन्हा पुन्हा ऐकावेत आणि त्या शब्दांच्या सहवासात गुरफटून जावं, असाच त्यांचा लब्ज-काफ़िला असतो.
‘एक चांगली कविता मिळाली की दिवस संपू दे असे वाटते,’ असं प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकरांनी एके ठिकाणी म्हटलंय. इन्दौरी यांच्या ग़ज़ला वाचताना, ऐकताना खऱ्या रसिकाला तसंच वाटतं.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
राहत इन्दौरी यांचा जन्म १ जानेवारी १९५०चा. उर्दूमध्ये एम.ए. आणि पीएच.डी. केल्यानंतर ते इन्दौर विद्यापीठात उर्दू साहित्याचे प्राध्यापक झाले. ‘शाखें’ या उर्दू त्रैमासिक पत्रिकेचं त्यांनी १० वर्षं संपादन केलं. ५० हून अधिक हिंदी चित्रपट व म्युझिक अल्बमसांठी गीतलेखन केलं. त्यांचे सहा कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. भारतातल्या कितीतरी ग़ज़लगायकांनी त्यांच्या ग़ज़लांना आवाज दिलाय.
गेल्या ४०-५० वर्षांत भारतातील कितीतरी मुशायरे आणि कवीसंमेलनांमध्ये इन्दौरी यांनी आपल्या भारदस्त आवाजात ग़ज़ला सादर केल्या. इतकंच नाही तर अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, मॉरिशस, सौदी अरब, कुवैत, बहारीन, ओमान, पाकिस्तान, बांग्लादेश, नेपाळ अशा अनेक देशांतील मुशायरे आणि कवीसंमेलनांमध्येही सहभाग घेतला.… इत्यादी इत्यादी बरीच माहिती सांगता येईल.
पण राहत इन्दौरी या माणसाची खरी ओळख त्याच्या बायोडाट्यातून होऊ शकत नाही, त्यातून ते नेमके कोण होते, हे समजू शकत नाही.
खरंच कोण होते ते?
तुम्हाला उर्दूला ‘अंगूर की बेटी’ म्हणतात हे माहीत असेलच.
उर्दू शायरीतले शब्द इंद्रधनुष्यासारखे उत्फुल्ल जीवनाचे रंग दाखवतात हेही तुम्ही जाणून असालच.
शब्द किती मोलाचे असतात आणि शब्द कसे तोलून वापरले जातात, हेही तुम्ही थोडंफार ऐकून असालच.
प्रेम कसं व्यक्त करायचं असतं, हे तुम्हाला हिंदी सिनेमामुळे माहीत असू शकतं,
पण प्रेम व्यक्त करण्याची नज़ाकत उर्दू शायरीशिवाय जगात इतर कुणीही शिकवू शकत नाही, हे बहुतेकांना माहीत नसतंच.
जर तुम्ही उर्दू मुशायऱ्यांना गेला नसाल तर शब्दांतून आपलं मन कसं अलवारपणे उलगडून दाखवता येतं, याचं लाइव्ह प्रात्यक्षिक तुम्ही कधी पाहिलेलं नसेल…
जर तुम्ही उर्दू मुशायरा कधी ऐकला नसाल तर तुम्हाला शब्दांतून पेंटिंग कसं उभं राहतं, हेही बघायला मिळालेलं नसेल…
साध्या साध्या शब्दांमध्येही किती ठासून अंगार भरलेला असतो, सामान्य शब्दांमध्येही किती अलवारपणा, नज़ाकत असते, विद्रोहही किती सुसंस्कृत शब्दांत व्यक्त करता येतो, बंडखोरीही किती लोभस वाटू शकते… हे उर्दूभाषा ज्या तरलतेने सांगते, ते तीच सांगू जाणे!
किंवा ‘हे राहत इन्दौरी ज्या तरलतेने सांगतात, ते तेच सांगू जाणे!’
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
शब्द तलवारीसारखेही असू शकतात, शब्द भयानकरीत्या पोळलेल्या मनावर टाकल्या जाणाऱ्या पाण्यासारखे थंडगारही असू शकतात, शब्द ‘ब्र’ उच्चारण्याचे धाडस शिकवतात, शब्द ‘नाही’ म्हणण्याची हिंमत देतात, शब्द मोठेमोठी संस्थानं नेस्तनाबूत करतात, शब्द कठोरांनाही चटोर करतात आणि चटोरांनाही चितचोर करतात…
हे राहत इन्दौरी ज्या मुलायमतेने सांगतात, ते तेच सांगू जाणे!
या शायराला अनुभवायचं असेल तर काय करावं?
काही नाही, तुम्ही राहत इन्दौरी यांचं ग़ज़लवाचन ऐकायला हवं.
आपला अथांग आणि क्षितिजाइतका लांबवर पसरलेला शब्दांचा संसार मागे ठेवून ते कालच आपल्यातून निघून गेलेत, हे खरंय.
पण ते गेलेले नाहीत खरं म्हणजे.
तुम्ही यु-ट्युबवर जाऊन पहा.
‘राहत इन्दौरी’ असा सर्च द्या.
त्यांच्या ग़ज़ल सादरीकरणाचे कितीतरी व्हिडिओ तुमच्या पुढ्यात येऊन उभे राहतील.
त्यातला एकेक व्हिडिओ तुम्ही शांतपणे पहा, ऐका.
तुम्हाला जीवनातली कितीतरी सत्यं समजतील…
जगण्यातली खुमारी समजेल, जगण्यातला अलवारपणा कळेल, नज़ाकत उमगेल…
जगाकडे कसं पाहायचं आणि जग कसं समजून घ्यायचं, याचं सूत्र तुम्हाला सापडेल…
सत्य कसं समजून घ्यायचं आणि असत्य कसं फेकून द्यायचं, याची ‘विद्या’ मिळेल…
सत्तेला शहाणपणा शिकवण्यात अर्थ नसतो, पण तिचा अहंकार उतरवता येतो, याची जाणीव होईल…
लाठ्या-काठ्या-तलवारी घेऊन रस्त्यावर उतरलो म्हणजे क्रांती होते असं नसतं, तर भयाण अंधारात, सोसाट्याच्या वाऱ्यात छोटीशी पणती सांभाळून एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यानेही क्रांतीइतकाच बदल होतो, हे तुमच्या ध्यानात येईल…
संघर्षाशिवायच्या जगण्याला जगणं म्हणत नाहीत आणि चमचेगिरीला ‘वफादारी’ म्हणत नाहीत… हे तुम्हाला पटेलच अगदी…
देशप्रेम इतरांनी शिकवण्याची गोष्ट नसते, ती आपली आपणच समजून घेण्याची गोष्ट असते…
कुठलाही भेदभाव सांगून माणसामाणसांत फूट पाडू पाहणाऱ्यांचं थेट थोबाडच फोडायचं असतं…
प्रेम, साहचर्य, बंधुता याशिवाय कुठलीच गोष्ट स्वीकारायची नसते…
कटुता, द्वेष, तिरस्कार, बदनामी ही ज्यांची शस्त्रं असतात; त्यांना भरबाजारात नग्नच करायचं असतं…
असं कितीतरी…
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
हिंदीतील प्रसिद्ध कवी चंद्रकांत देवताले एकदा म्हणाले होते, ‘कवी कोण असतो? तो अंधारात ‘भाईसाब, आपके पास माचिस है माचिस?’ असं विचारणारा असतो.’
राहत इन्दौरी यांचं एक व्यवच्छेदक लक्षण होतं – त्यांचे शब्द कितीही तलम, मुलायम असले किंवा प्रखर, निर्भीड, बंडखोर, संतप्त असले, तरी त्यांनी कधी सहिष्णुता सोडली नाही, भारतीय संस्कृतीच्या गंगाजमनी परंपरेचेच ते पुरस्कर्ते राहिले शेवटपर्यंत… दारिद्रयात आणि श्रीमंतीतही. वेळ पाहून त्यांच्या भूमिका बदलल्या नाहीत आणि पद पाहून त्यांचं वर्तन बदललं नाही. ‘ब्र’ उच्चारायला तर ते कधी म्हणजे कधीच भ्यायले नाहीत.
म्हणूनच तर त्यांनी म्हटलंय की, ‘सभी का खून है शामील इस मिट्टी में, किसी के बाप का हिन्दुस्तान थोडी है।’
तुम्हाला ‘ब्र’ उच्चारायचाय?
मग तुम्ही राहत इन्दौरी वाचा, पहा, ऐका, अनुभवा…
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Dilip Chirmuley
Thu , 13 August 2020
या माणसाने अटल बिहारी बाजपेयींच्या गुडघ्यांच्या व्यथेबद्दल लिहिले होते या माणसाने लग्नाचं केले नाही तर याला गुडघ्यांचा त्रास का व्हावा?