श्रीचक्रधरांनी सांगितलेला श्रीकृष्ण श्रमप्रतिष्ठा सांगणारा, राजेपण बाजूला सारून गोपाळकाला करणारा, ब्रह्मदेवाला आव्हान देणारा आहे!
पडघम - सांस्कृतिक
हंसराज जाधव
  • श्रीकृष्णाचं एक चित्र
  • Tue , 11 August 2020
  • पडघम सांस्कृतिक कृष्णाष्टमी Krushnashtmi श्रीकृष्ण Shrikrushna चक्रधरChakradhar लीळाचरित्र Leelacharitra

आज कृष्णाष्टमी. त्यानिमित्ताने ‘लीळाचरित्रा’तल्या श्रीकृष्णचरित्राची ही झलक. श्रीचक्रधरांनी सांगितलेलं कृष्णचरित्र भागवत पुराणातल्या चरित्रांपेक्षा वेगळं आहे...

..................................................................................................................................................................

श्रीचक्रधरांनी भागवत पुराणाने सांगितलेले वैदिक परंपरेतले दशावतार नाकारून ‘पंचावतार’ सांगितले. त्यालाच महानुभावपंथीय ‘पंचकृष्ण’ असेही म्हणतात. द्वापारीचे श्रीकृष्ण, सह्याद्रीचे श्रीदत्तात्रेय, द्वारावतीचे श्रीचक्रपाणी, रुद्धिपूरचे श्रीगोविंदप्रभू आणि प्रतिष्ठानचे स्वत: श्रीचक्रधर हे ते पंचावतार. यात वैदिक परंपरेत असलेले आणि पुराणांनी वर्णिलेले द्वापारीचे श्रीकृष्ण आणि सह्याद्रीचे श्रीदत्तात्रेय जर असतील तर मग ‘पंचावतारा’ची स्वतंत्रता ती काय? त्यातले वेगळेपण ते काय?

‘लीळाचरित्र’ हे श्रीचक्रधरांचे चरित्र असताना त्यात इतर अवताराचे चरित्र येणं यामागे संकलनकर्त्या म्हाईंभटाची भूमिका महत्त्वाची आहे. श्रीकृष्ण आणि श्रीदत्तात्रेय पंचावतारापैकीच असल्यामुळे त्यांचे चरित्र यात आले असे म्हणावे, तर श्रीचक्रपाणींचे चरित्र यात आले नाही अन् गोविंदप्रभूंचे चरित्र म्हाईंभटाने स्वतंत्रपणे लिहिले. म्हाईंभट श्रीकृष्णचरित्रही स्वतंत्रपणे लिहू शकले असते. पण त्यांनी तसे न करण्यामागे महत्त्वाचे कारण म्हणजे स्वत: श्रीचक्रधरांनी प्रसंगानुरूप, संदर्भानुरूप श्रीकृष्ण आणि श्रीदत्तात्रेय यांचे चरित्र भक्तांना निरुपण केले. ‘लीळाचरित्रा’तून आलेले हे चरित्र त्रोटक स्वरूपाचे असले तरी ते भागवतापेक्षा निश्चितच वेगळे आहे एवढे नक्की.

महदाइसा वगैरे शिष्या स्वामींसोबत राहत असूनही पुराण ऐकायला नगरात जात. तिथून आल्यावर ‘जी जी: पुराणी ऐकले ते साच जी:’ असे विचारून पुराणातील वर्णनाच्या खरेखोटेपणाची स्वामींकडून खात्री करून घेत. महदाइसेच्या अशा जिज्ञासेतूनच चक्रधरांनी श्रीकृष्णचरित्र उलगडून सांगितले आहे.

श्रीकृष्ण अवतारु तो इश्वर अवतारु

‘द्वापार लीळे’त ‘माहादाइसां दस अवतार नीरोपणें’ ही लीळा आली आहे. ती लीळा अशी, ‘माहादाइसें पूराण आइकौनि आलीं : मग माहादाइसीं पूसीलें : “जी जी दस अवतार ते काइ इश्वरअवतार?” सर्वज्ञें म्हणीतलें : “श्रीकृष्ण अवतारू तो इश्वरअवतारू : एर देवतांचे :”

महादाइसेने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चक्रधरांनी इतर नऊ अवतारांना देवतेचे अवतार म्हणून सांगितले आणि श्रीकृष्ण मात्र ईश्वर अवतार सांगितला. स्वामींनी त्यांच्या तत्त्वज्ञानात ‘जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर’ हे चार स्वतंत्र पदार्थ सांगितले आहेत. म्हणजेच देवता आणि परमेश्वर भिन्नभिन्न आहेत. यातील देवता या ‘नित्यबद्ध’ आहेत, तर ईश्वर हा ‘नित्यमुक्त’ आहे. देवता स्वत:च नित्यबद्ध असल्यामुळे ‘बद्धमुक्त’ असलेल्या जीवाला मोक्ष देण्यास त्या असमर्थ आहेत. आणि म्हणूनच श्रीचक्रधरांनी देवताभक्ती निषिद्ध सांगितली. श्रीकृष्ण हा परमेश्वर अवतार असल्याकारणाने तो जीवाला मुक्त करू शकतो, मोक्ष देऊ शकतो. म्हणून श्रीचक्रधरांनी श्रीकृष्णाला ‘दशावतारा’तून बाजूला केले.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

भागवत व्यासोक्ती, गीता श्रीकृष्णोक्ती  

भागवत म्हणजे श्रीकृष्णचरित्र, परंतु भागवताने रंगवलेला श्रीकृष्ण चक्रधराला आणि पर्यायाने महानुभाव पंथाला मान्य नाही. श्रीकृष्ण आणि त्याने सांगितलेली भगवद्गीता महानुभावांना जीव की प्राण आहेत, परंतु मग श्रीकृष्णचरित्र असलेले भागवत मात्र त्यांना प्रमाण नाही. असे का? यासंदर्भात उत्तरार्धात आलेली एक लीळा मूळातून पाहणे आवश्यक आहे. पैठणला असतानाची ही लीळा आहे. स्वामींना गणपत मढी अवस्थान होते. एके दिवशी महदाइसेने विचारले, ‘जी जी : पुराणीं ऐसें बोलति : जें हें श्रीभागवत आणि भगवतद्गीता श्रीकृष्णें ब्रह्मेयाप्रति निरोपली : हे साच जी?’ सर्वज्ञें म्हणीतलें : ‘बाई : तें तैसें नव्हे : तें तुम्हां एथौनि सांघिजैल : बाइ : गीता श्रीकृष्णोक्ति : एर अवघी व्यासोक्ति : बाइ : परिवारासहीत श्रीकृष्णाचें जें जें चरित्र तें भागवत बोलिजे : आणि नित्यनित्यवस्तुविवेक शमदमादि साधन जें श्रीमुखोक्त ते गीता बोलिजे : बाइ : द्वापरीं आर्जुनाप्रति श्रीकृष्णचक्रवर्ती गीता श्लोकींचि निरुपली : मग कथासंगति ते श्लोकीं व्यासें बांधिली :’ (लीळाचरित्रउत्तरार्ध, ४५३ क)

महदाइसेने स्वभावाप्रमाणे पुराण ऐकून आल्यावर प्रश्न केला. परंतु पुराणाने श्रीभागवत आणि भगवद्गीता कृष्णाने ब्रम्ह्याला सांगितली असे जे म्हटले आहे, ‘बाइ: तें तैसें नव्हे’ असे म्हणत चक्रधरांनी पुराणाचे मत खोटे ठरवले. (जिथे खरे आहे त्यास ‘ते साच’ असेही म्हटले आहे.). श्रीकृष्णाने अर्जुनाप्रति श्लोकबद्ध गीता सांगितली. भागवत हे नंतर व्यासांनी सांगितले. ज्यात श्रीकृष्णाचे परिवारासहित चरित्र आहे. ‘एर अवघी व्यासोक्ती’ या स्वामींच्या विधानावरून त्यांच्या लेखी स्वत: श्रीकृष्णाने सांगितलेल्या भगवद्गीतेला जेवढे महत्त्व आहे, तेवढे भागवताला निश्चितच नाही.

रणांगणावर ऐकलेला गीताउपदेश अर्जुन विसरला!

रणांगणावर, युद्धभूमीवर श्रीकृष्णाने केलेला गीताउपदेश अर्जुन विसरला, ते साहजिक आहे. एवढ्या शस्त्रास्त्रांच्या गदारोळात, धामधुमीत अर्जुन जीवनाविषयीचे तत्त्वज्ञान ऐकण्यास सज्ज झाला हीच मोठी गोष्ट आहे. त्याने ऐकले पण ते त्याच्या लक्षात राहिले नाही. त्याचा संदर्भ चक्रधरांनी दिला आहे. ती लीळा ‘श्रीकृष्णचरित्र’ विभागात संकलित ‘विस्मृतोर्जुनोपदेशें पुनस्मरण कथन’ या शीर्षकाने आली आहे. (लीळा क्र. ३४) सर्वज्ञें म्हणितलें :  ‘श्रीकृष्णचक्रवर्ती अर्जुनासि युद्धसमै निरुरण केलें: तें ते काहीं विसरले : मग एक वेळ बीजें करितां समै : तीहीं श्रीकृष्णचक्रवर्तीतें विनविलें : ‘जी जी : मज जें गोसावीं नीरूपण केलें : तें मी विसरलां जी : तें मज मागौतें गोसावीं नीरूपावें जी :’ मग श्रीकृष्णचक्रवर्ति अठरा अध्ये गीता मागुते निरुपिलें:’

रणांगणावर सांगितलेले गीताज्ञान विसरल्याचे प्रामाणिकपणे कबूल करत ते पुन्हा सांगावे अशी विनंती अर्जुनाने केल्यावर श्रीकृष्णाने परत अठरा अध्याय गीता निरुपण केल्याचे श्रीचक्रधरांनी म्हटले आहे. श्रीचक्रधरांनी केलेला गीता पुन:कथनाचा उल्लेख इतर भागवतादि ग्रंथात कुठे आल्याचे आढळत नाही.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : अर्वाचीन काळात कोट्यवधी भारतीयांच्या मनात ‘रामा’चे नाव कोणी रुजवले असेल तर, ते म. गांधीजींनी!

..................................................................................................................................................................

‘गोपाल’ कृष्णासी श्रीचक्रधरांचे नाते!  

महानुभाव पंथात श्रीकृष्णाचा जयघोष ‘गोपालकृष्ण महाराज की जय’ असा केला जातो. श्रीकृष्णानं कंसवध केला, दैत्य दानव मारले, महाभारत युद्धाचे नेतृत्व केले, या सगळ्या खटपटींपेक्षा त्याने अनेक गोपाळांना सोबत घेऊन गायी-वासरे चारली ही गोष्ट चक्रधरांना अधिक महत्त्वाची वाटते. वृंदावनात गाई चारताना दुपारच्या वेळेत यमुनेच्या काठावर सगळे गोपाळ सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करून ‘गोपाळकाला’ करायचे आणि  सर्वजन मिळून खायचे.

नंदराजाचा मुलगा असूनही कृष्णाने गोपाळांसोबत कसलेच भेद ठेवले नाहीत. सगळे भेद बाजूला सारून सर्वांसोबत वनभोजन करणारा कृष्ण चक्रधरांना अधिक भावतो. स्वत: गायी सांभाळत श्रमाचं महत्त्व सांगणारा उद्यमशील कृष्ण चक्रधरांना महत्त्वाचा वाटतो. श्रीचक्रधर थेट त्या कृष्णासी नातं सांगतात. गायी चारण्याचे काम स्वीकारतात. (नांदेड येथील गोरक्षण लीळा पूर्वार्ध ५५), लिंबगाव जि. नांदेड येथे गोपाळांसोबत रानभेरीचा खेळ खेळतात (पूर्वार्ध ४६). गोपाळचोंढी जि. नांदेड येथे गोपाळांना सहवासाचा आनंद देतात. (पूर्वार्ध ४८) अशा काही लीळांमधून सोबतच्यांना साक्षात श्रीकृष्ण रूपाची अनुभुती देतात. श्रीचक्रधरांची श्रीकृष्ण रूपाशी असलेली ही तादात्म्यता विस्मित करणारी आहे.

गवळणीचे प्रकरण बेदखल

भागवत पुराणांनी श्रीकृष्णाने केलेल्या गवळणीच्या छेडखानी प्रकरण मोठ्या चवीने वर्णिले आहे. दहीदूध मथुरेच्या बाजारी घेऊन जाणाऱ्या गवळणी, त्यांना अडवणारा कृष्ण, यमुनेत स्नान करणाऱ्या गोपिका आणि त्यांचे वस्त्र चोरणारा, आपल्या मधूर पाव्याने गोपिकांना भूलवणारा शृंगारिया कृष्ण आणि त्याच्या खोड्यांनी सुखावणाऱ्या, पण यशोदेकडे त्याची खोटीखोटी तक्रार करणाऱ्या गोपिका या आधारावर श्रीकृष्णाच्या स्वच्छंदीपणाचे, शृंगारभोक्त्याचे अवास्तव रूप भागवताने उभे केले. त्याच्या कृष्णलीला मोठ्या चवीने वर्णिल्या. यावर आधारित ‘गवळण’ हा रचनाप्रकार बहुतेक संतांनी हाताळला. गवळणी प्रसिद्धही झाल्या. संतांनी लिहिलेल्या गवळणी पुढे जेव्हा शाहीरांनी तमाशात आणल्या गेल्या, तेव्हा तर कृष्णचरित्राचा पार ‘तमाशा’च झाला. तमाशातला काय तो बीभत्स कृष्ण! हे सर्व चक्रधरनिरुपित श्रीकृष्णचरित्रात कुठेही दिसत नाही.

महानुभाव साहित्यात गवळणी नाहीत

श्रीचक्रधरांनी घेतलेल्या या भूमिकेचा परिणाम महानुभाव ग्रंथकारांवर होणे साहजिक आहे. मराठीत असतील नसतील तेवढे सारे रचनाप्रकार हाताळणाऱ्या महानुभावांनी ‘गवळण’ हा पद्याचा रचनाप्रकार मात्र हाताळला नाही. महानुभाव साहित्यात ‘श्रीकृष्ण बाळक्रीडा’ नावाच्या अनेक रचना आढळतात. पण गवळणी मात्र लिहिल्या नाहीत.

राधेला स्थान नाही

भारतीय जनमानसावर ठसा उमटवणारे आणखी एक पात्र म्हणजे राधा. ही राधा आली कुठून? भागवतातील तिच्या वर्णनावरून ती एक गवळण दिसते. भारतात राधा-कृष्ण यांच्या जोडभक्तीची एक मोठी परंपराच निर्माण झाली. परंतु महानुभाव पंथात राधेची पूजा केली जात नाही. राधा-कृष्णाची संयुक्त पूजाही आढळत नाही.

महानुभाव तत्त्वज्ञानाच्या या भूमिकेमुळेच राधेविषयीचे एकही काव्य महानुभाव काव्यपरंपरेत दिसत नाही. श्रीकृष्णाने अनेक विवाह केले. जवळपास त्या सगळ्याच विवाहकथेवर महानुभावांनी आख्यानकाव्य लिहिली आहेत. महानुभावांच्या आख्यानकवितेच्या परंपरेत एकट्या श्रीकृष्ण- रुख्मिणी विवाहकथेवर वीस-पंचवीस आख्यानकाव्य उपलब्ध आहेत. असे असताना राधाकृष्ण जोडीवर मात्र एकही काव्य नाही. यावरून राधा हे पात्र महानुभावांनी निकाली काढले, हे स्पष्ट दिसते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

तुळशीविवाह अनैसर्गिक

श्रीकृष्णाचा तुळशीसोबतचा विवाह ही भारतीय परंपरेतली अशीच एक गमंतीदार गोष्ट. श्रीकृष्णाने रुख्मिणी, सत्यभामा यासह आवडत्या आठ राण्यांसोबतचे रितसर विवाह केलेले असताना बंदिवासातल्या सोळा हजार नारी आणि गोकुळातल्या गवळणीसोबतचे संबंधही चर्चिले जातात. एवढे कमी म्हणून की, काय श्रीकृष्णाचा तुळशीसोबतही विवाह लावला जातो. तुळशीसारख्या वनस्पतीसोबतचे श्रीकृष्णाचे लग्न ही गोष्ट किती अनैसर्गिक! पण तेही मोठ्या धुमधडाक्यात सगळीकडे लावले जाते. हे सर्व श्रीचक्रधरांनी नाकारले. म्हणूनच आजही महानुभाव पंथात ‘तुळशीविवाह’ लावला जात नाही.

ब्रह्मदेवाचे गर्वहरण

ब्रह्मदेवाने गाईगोपाळांची केलेली चोरी आणि श्रीकृष्णाने केलेले त्याचे गर्वहरण हा कथाविषय असलेले ‘वछाहरण’ नावाचे आख्यानकाव्य महानुभावांच्या ‘सातीग्रंथा’त समाविष्ट आहे. आपण गाईवासरे, गोपाळ चोरल्याने गोकुळात मोठाच आकांत माजला असेल, रोजच्या वेळेत गोपवासरे घरी परतले नसल्याने गोकूळवासीय धाय मोकलून रडत असतील, असे वाटून ब्रह्मदेव ती गोकूळवाशीयांची पंचाईत पहाण्यासाठी गोकूळात येतो.परंतु तिथे तर सर्वत्र नेहमी सारखा आनंदीआनंद दिसतो. गाईवासरे, गोपाळ आपापल्या घरी आनंदात असल्याचे त्यास पहावयास मिळते. आपण चोरी करूनही गोपाळात हे सर्व कसे? स्वत:ची चूक त्याच्या लक्षात येते. श्रीकृष्णाच्या ईश्वरीशक्तीची जाणीवही त्यास होते. ब्रह्मदेवाचे गर्वहरण होते. या घटनेने ब्रह्मदेव खजील होतो. ‘मी विश्वाचा निर्माता’ हा ब्रह्मदेवाच्या ठायी निर्माण झालेला गर्व यामुळे नाहीसा होतो. ब्रह्मदेवाला भागवताने सृष्टीचा निर्माता म्हटलेले आहे. त्या ब्रह्मदेवालाच आव्हान देणारा श्रीकृष्ण चक्रधरांनी सांगितला आणि तोच पुढे महानुभाव काव्यातूनही आला.

श्रीचक्रधरांनी सांगितलेला श्रीकृष्ण असा श्रमप्रतिष्ठा सांगणारा, आपले राजेपण बाजूला सारून गोपाळात मिसळून गोपाळकाला करणारा, ब्रह्मदेवाला आव्हान देणारा आहे. भागवताने वर्णिलेल्या श्रीकृष्णापेक्षा निश्चितच निराळा आहे.

..................................................................................................................................................................

लेखक हंसराज जाधव पैठणच्या ‘प्रतिष्ठान महाविद्यालया’मध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत.

hansvajirgonkar@gmail.com                                                                                            ..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......