वाईट किंवा अपशब्दांची भीती वाटणे म्हणजे ‘कॅकोलोगोफोबिया’.
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 10 August 2020
  • पडघम सांस्कृतिक हर्षवर्धन निमखेडकर Harshawardhan Nimkhedkar कॅकोलोगोफोबिया Kakologophobia अपशब्दभयगंड

शब्दांचे वेध : पुष्प तिसरे

सावधान : या मजकुरात काही अश्लील शिव्यांचा उल्लेख आहे.

उद्धव शेळके यांच्या ‘धग’ या कादंबरीमध्ये ‘माय वो, या भांचोतानं मले मारलं’, असे एक वाक्य आहे. बी.ए.ला मराठी वाङ्‌मय हा विषय शिकताना मला ही कादंबरी अभ्यासाला होती. आमच्या प्राध्यापकांनी ही शिवी असलेले अख्खे पानच शिकवले नाही, हे मला अजूनही आठवते. (नागपुरी असल्यामुळे मला अर्थातच ही शिवी ऐकून माहीत होती.)

पुढे एम.ए. इंग्लिशच्या वर्गात शेक्सपिअरचे ‘किंग लीअर’ हे नाटक शिकताना मात्र याच्या उलट अनुभव आला. दुसऱ्या अंकाच्या दुसऱ्या प्रवेशातले ‘Thou whoreson zed! Thou unnecessary letter!’ हे वाक्य शिकवताना आमच्या सरांनी ‘whoreson’ या विशेषणाचा अर्थ तर सांगितलाच, पण whoreचा उच्चार ‘होअर’ असा होतो आणि तिचा मुलगा म्हणजे शुद्ध मराठीतला ‘रांडलेक’ किंवा ‘रांडेचा’ होतो, हेही सांगितले.

रांडेच्या किंवा रांडेच्च्या ही शिवी मी फार आधीपासून ऐकत आलो आहे. जुन्या मराठी कथा कादंबऱ्यांत ‘शिंच्या’ ही पण खास कोंकणातली शिवी मी वाचली होती. बऱ्याच काळानंतर शोध लागला की, शिंच्या हे ‘शिंदळीच्या’ या शब्दाचे संक्षिप्त रूप असून त्याचाही अर्थ ‘रांडेच्या’ असाच होतो. १९३८च्या ‘दाते शब्दकोशा’त ‘शिंचा’ या शब्दाचा अर्थ सांगताना अशी पुस्ती जोडलेली आहे की, यातला वाईट अर्थ निघून गेलेला आहे.

मागच्या लेखात (पुष्प दुसरे) मी चांगल्या शब्दांविषयी लिहिले होते. आज थोडेसे (तथाकथित) वाईट शब्दांबाबत लिहितो. मी काही खूप वेगळे किंवा नवीन असे काही सांगणार नाही. शिव्या/अपशब्द या विषयावर जगभरच्या भाषाशास्त्रज्ञांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी आधीच भरपूर लिहून ठेवलं आहे. पण मागच्या लेखाला पूरक म्हणून आज हा मजकूर लिहितो आहे.

शिवी दिल्याने देणाऱ्याला एक प्रकारचे आत्मिक(?) समाधान मिळते, असे अनेक लोक म्हणतात. एरवी चार सभ्य वाक्ये आणि पन्नास गुळमुळीत शब्द बोलून जे साध्य होत नाही, ते काम एक किंवा दोन जालीम, जहाल शिव्यांनी होते, असे म्हटल जाते. काही लोक उगीचच, आपण किती मॅनली आहोत, हे दाखवायला शिव्या देतात. शिव्यांमध्ये बॉम्बसारखे स्फोटक द्रव्य (पण शाब्दिक) ठासून भरले असते आणि त्याचा स्फोट होतो, तेव्हा समोरचा, त्याने गेंड्याची कातडी पांघरली नसेल तर घायाळ होऊ शकतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

‘ती फुलराणी’ या नाटकात पुलंनी ‘भ’ या अक्षरापासून सुरू होणाऱ्या मराठी शिव्यांच्या उपयुक्ततेची विनोदी चिकित्सा केली आहे, ती आठवा! कार चालवताना रस्त्यावरच्या बेशिस्त लोकांना आणि बेशिस्त चालकांना उद्देशून ज्याच्या तोंडून शिव्या निघत नाहीत, तो ‘संतमाणूस’ असला पाहिजे.

पण तसे म्हटले तर संतांनीही तथाकथित अपशब्द वापरले असल्याची उदाहरणे आहेत. म्हणजे, आजच्या काळात त्यांना अपशब्द मानले जाते, पण तीन चारशे वर्षांपूर्वी तसे नसावे.

सामान्य जनांच्या दैनंदिन वापरात असलेल्या काही शब्दांना अपशब्द मानून त्यांचे दैनंदिन सभ्य संभाषणातून उच्चाटन करण्याचे कारस्थान तथाकथित संस्कृती रक्षकांनी एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकात केले. त्यामुळे आजही आपण याच दूषित नजरेने या शब्दांकडे बघतो. व्हिक्टोरियन काळातल्या ज्या ‘नीतीमान’ इंग्रजांच्या प्रभावाखाली आपण हे केले, त्यांनी पुढे जाऊन स्वतःची मूल्ये, नीतीविषयक कल्पना बदलल्या. दुसऱ्या महायुद्धानंतर तर संपूर्ण पाश्चात्य जगत बदलून गेले. आपण मात्र आजही लॉर्ड मेकॉलेने १८३३च्या आसपास लिहिलेल्या आणि १८६०मध्ये अंमलात आलेल्या ‘भारतीय दंड संहिते’चा वापर करतो आहोत आणि नीतीमत्तेचे दंडक ठरवतो. अजूनही त्याच जुन्या चाळण्या वापरतो आहोत. आज अमेरिकेचा अध्यक्ष खुलेआम चारचौघात ‘fuck’ या शब्दाचा वापर करतो. आपल्याकडे जर असे काही झाले तर काय होईल?

‘fuck’ या शब्दाला इंग्रजी भाषेत एक व्हर्सटाईल म्हणजे बहुआयामी शब्द मानतात. अनेकानेक अर्थांनी आणि प्रकारे तो वापरला जाऊ शकतो. त्याचा मूळ अर्थ ‘संभोग’ (करणे) असा आहे आणि एके काळी तो बोलीभाषेतला (स्लॅंग) शब्द मानला जात होता. पण कालांतराने आता त्याला इतक्या वेगवेगळ्या अर्थच्छटा प्राप्त झाल्या आहेत की, आता त्याच्यातली बोच नाहीशी झाली आहे. अजूनही सभ्य आणि औपचारिक संभाषणात तो वापरत नाहीत, पण एरवी त्याचा कोणीही केव्हाही वापर करू शकतात.

एखाद्या अपशब्दातली बोच किंवा झोंब (स्टिंग) सतत वापराने किंवा कालांतराने कमी होते, पुढे नाहीशी पण होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे या लेखात आधी उल्लेख केलेले भांचोत/भांचोद/भेंचोद आणि शिंचा, रांडेचा हे शब्द. आज किती मराठी लोक शिंचा किंवा रांडेचा म्हणतात हे माहीत नाही, पण अगदी आता-आतापर्यंत मी ते ऐकले आहेत. नागपूरकडे अशा अजून काही शिव्या सर्रास दिल्या जातात.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ‘झुकुनरुअ’ (Zugunruhe) पशू-पक्ष्यांना होतो, पण सर्वच स्थलांतरितांना होतो का?

..................................................................................................................................................................

पंजाबमध्ये दिवसभरात एकदा तरी ‘भेंचोद’ हा शब्द न वापरता बोलणारे किती लोक असतील? तिथे त्यांच्यासाठी ही शिवी नाहीच आहे. तो फक्त एक उद्गार आहे. ‘अरे वा’, ‘ओहो’, ‘अय्या’, यासारखा हाही एक निरुपद्रवी निरर्थक शब्द बनला आहे त्यांच्यासाठी. घाईघाईत बोलणाऱ्या एखाद्या सरदारजीच्या तोंडून तर तो ‘पेण्चो’ असाच काहीसा ऐकू येतो. इंग्रजीतला ‘arsehole’/‘asshole’ हा शब्द असाच आहे. त्याच्या मूळ अर्थाकडे बघायचे नाही- आज त्याचा एकच अर्थ आहे, तो म्हणजे महामूर्ख, बावळट, बिनडोक (व्यक्ती). एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ जाऊन त्याने मवाळ किंवा निरर्थक रूप धारण करणे, या प्रक्रियेला ‘semantic satiation’ असे शास्त्रीय नाव आहे. यात अपशब्दसुद्धा आलेत.

शिवी द्यावी की नाही, दिली तर कोणती द्यावी हे ज्याचे त्याने ठरवावे. गुन्हेगारांना शिवी न देता पोलीस धाक दाखवू शकतील का? कदाचित नाही. पण बाकीचे लोक तर शिवी न देताही राहू शकतात. अर्थात शिवी ही शिवीच आहे, त्यात जहाल-मवाळ असे भेद कितपत योग्य आहेत? त्याहीपलीकडे मुद्दा हा आहे की कोणता शब्द अपशब्द आहे आणि कोणता नाही, हे कोण ठरवते आणि कसे?

शब्दांना देवाचे रूप मानले जाते हे आपण मागच्या लेखात पाहिले. मग त्यांच्यातल्या काहींना असे हे तथाकथित अपावित्र्य कसे प्राप्त झाले? जागतिक भाषांच्या उगमाविषयी अनेक उपपत्ती, सिद्धांत मांडले गेले आहेत. त्यात जसा ‘बायबल’मधला ‘The Tower of Babel’ (जेनेसिस ११.१९) हा सिद्धांत आहे, त्याच धर्तीचे प्राचीन सिद्धान्त असिरीया, सुमेरिया, मेक्सिको, नेपाळ, बोट्सवाना, टांझानिया, ब्रह्मदेश या देशांत पण प्रचलित होते. अमेरिकेतल्या रेड इंडियन आदिवासींच्या आणि आपल्या देशात आसाममधल्या करबी आणि कुकी जमातीच्या दंतकथांमध्येसुद्धा अशाच धर्तीच्या कथा सापडतात. शास्त्रज्ञांची मते वेगळीच आहेत. पण ते काहीही असले तरी सत्य हेच आहे की, संपूर्ण जगभरात फक्त एकच भाषा बोलली जात नाही आणि प्रत्येकच भाषेत शब्दांची चांगली-वाईट, सभ्य-असभ्य, शिष्ट-अशिष्ट अशी प्रतवारी करण्यात येते.

अपशब्द-शिव्यांचेदेखील अनेक प्रकार आहेत. जहाल-मवाळ असे गुणात्मक भेद वेगळे. याखेरीज त्यांची वर्गवारी केली तर काही अपशब्द मानवी देहाशी संबंधित असतात. यात विशेषकरून स्त्री आणि पुरुषांच्या जननेंद्रियांचा उल्लेख येतो. काही अपशब्द संभोगक्रियेशी संबंधित असतात. काही मल-मूत्र विसर्जनाच्या किंवा पादण्याच्या क्रियेशी संबंधित, तर काही शरीराच्या कुरूपतेवर अथवा एखाद्या व्यंगावर आधारीत असतात. आई, बहीण, पत्नी, मुलगी, अशा नातेसंबंधांवरही काही शिव्या असतात. जगभरच या प्रकारच्या शिव्या जास्त उपयोगात आणल्या जातात. यामागे मानसशास्त्रीय कारणे आहेत. इतर प्रकारच्या शिव्यादेखील भरपूर दिल्या जातात. पण प्राधान्य मिळते ते पहिल्या प्रकाराला.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : ज्याचे शब्द सोन्यासारखे अमूल्य आहेत, जो माणूस सोनेरी शब्दांचा आहे, तो ‘सुभाष’...

..................................................................................................................................................................

इंग्रजी ही एक अत्यंत चैतन्यमयी, सर्जनशील, गतिकीय (डायनॅमिक) भाषा आहे. तिच्यात दर वर्षी हजारो नव्या शब्दांची भर पडत असते. यातले अधिकांश शब्द हे स्लँग म्हणजे अशिष्ट बोलीभाषिक असतात. अनेक जुने शब्द दरवर्षी मोडीतही निघतात. आज कोणी कोणाला ‘होअरसन’ (रांडेचा) अशी शिवी देणार नाही. ते सरळ ‘बास्टर्ड’ म्हणतील. (मुळात आता २१व्या शतकातल्या पाश्चात्य जगात ‘अनौरस संतती’ ही संकल्पनाच कालबाह्य होत चालली आहे.)

गेल्या शतकातल्या इंग्रजी लेखकांमध्ये एकही शिवी न वापरता लिखाण करणारे नेविल शूटसारखे प्रसिद्ध लेखक जसे आहेत, तसेच पानोपानी अपशब्द वापरणारे हॅरॉल्ड रॉबिन्ससारखे लेखक, पण आहेत. पी. जी. वुडहाऊस याला सभ्य प्रकारच्या स्लॅंगचा बादशहा मानतात. त्याने शेकडो असे नवे शब्द तयार केले, जे आज इंग्रजी भाषेचा एक भाग बनले आहेत. पण त्याने कधीही असभ्य स्लॅंग शब्दांचा वापर केला नाही. ‘होअरसन’ (रांडेचा) किंवा ‘बास्टर्ड’ याऐवजी तो ‘रीतसर लग्न न करणाऱ्या आईबापाचे अपत्य’ असा आडवळणाचा शब्दप्रयोग करतो.

मात्र मला सगळ्यात आवडणाऱ्या दोन अत्यंत ‘जहाल, घाण, गलिच्छ’ शिव्या वुडहाऊसच्याच ‘Sam the Sudden’ या पुस्तकात आहेत. लॉर्ड टिलबरी आणि कथानायक सॅम शॉटर यांच्यात कथेच्या शेवटी बेबनाव होतो. टिलबरी सॅमवर आणि त्याच्या मैत्रिणीवर पाळत ठेवत होता, हे सॅमला जेव्हा कळते, तेव्हा सॅम रागाने चवताळतो आणि उद्गारतो – “You so-and-so! You such-and-such!”

(वुडहाऊसने या दोन शिव्यांचे वर्णन ‘verbal dynamite’ असेच केले आहे. त्या ऐकताच उकळत्या पाण्याच्या फवाऱ्याने अंग भाजल्यासारखी टिलबरीची अवस्था झाली.) यातल्या ‘You so-and-so! You such-and-such!’ या ज्या दोन शिव्या आहेत, त्या मला अतिशय आवडतात. गंमत म्हणून एकदा कोणाला तरी त्या देऊन बघायचा माझा इरादा आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

हे शिवीपुराण संपवताना आजच्या आपल्या शब्दाकडे वळतो. सतत किंवा वारंवार शिवी देणारा माणूस शिवराळ असतो. पण एखादीही शिवी कधीच न दिलेला अथवा देणारा माणूस खरच संत किंवा सज्जन असतो का? याबद्दल मी तर काही सांगू शकणार नाही, पण जिला शिव्यांची/अपशब्दांची भीती वाटते अशा व्यक्तीला काय म्हणतात हे मला माहीत आहे. अशी एखादी व्यक्ती तुम्हाला कधी भेटली तर तिला शिवी दिल्याच्या अविर्भावात म्हणा, ‘ए कॅकोलोगोफोबिक्या!’ ‘Kakologophobia’ असणारा माणूस म्हणजे ‘Kakologophobic’.

‘Kakologophobia’ हा इंग्रजी शब्द तीन मूळ ग्रीक शब्दांपासून बनवलेला आहे. κακο किंवा kakos म्हणजे वाईट (bad), λογότυπο किंवा logos म्हणजे शब्द (word), आणि φοβία phobia म्हणजे भय, भीती (fear). वाईट किंवा अपशब्दांची भीती वाटणे म्हणजे ‘कॅकोलोगोफोबिया’. असे लोक भयापोटी शिवी देत नाहीत, वाचत नाहीत, ऐकत नाहीत आणि मनातसुद्धा शिवी येऊ देत नाहीत. अशा लोकांना ‘डिस्कवर’ मासिकातला हा लेख वाचायला दिला पाहिजे, असे मला वाटते.

Worried About Swearing Too Much? Science Says You Shouldn't Be. 

(https://www.discovermagazine.com/health/worried-about-your-foul-mouth-swearing-could-actually-be-good-for-you)

‘Kakologophobia’ या शब्दाला मराठीत तंतोतंत प्रतिशब्द मला सापडला नाही. तुम्हाला माहीत असेल तर सांगा. पण ‘अपशब्दभयगंड’ असे त्याचे सरल भाषांतर होऊ शकते.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......