कटुतेच्या आणि शत्रुत्वाच्या भिंती पाडून आपण शांतीचा पाट वाहू दिला पाहिजे
ग्रंथनामा - झलक
शिमॉन पेरेस
  • शिमॉन पेरेस यांच्या इंग्रजी व मराठी पुस्तकाची मुखपृष्ठे
  • Mon , 10 August 2020
  • ग्रंथनामा झलक शिमॉन पेरेस इस्त्रायल Israel नो रूम फॉर स्मॉल ड्रीम्स No Room for Small Dreams स्वप्नपंखांना आकाश थिटे

शिमॉन पेरेस (१९२३-२०१६) हे नवनिर्मित इस्त्रायलचे पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री आणि अनेक महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री. इस्त्रायलच्या उभारणीत झटणाऱ्या व्यक्तींपैकी एक असलेले आणि सहा दशकांहून अधिक काळ इस्त्रायलला दुर्बलतेकडून सर्वसामर्थ्यवान बनवण्याच्या प्रक्रियेचे शिल्पकार. इस्त्रायला अत्यावश्यक असलेली मजबूत प्रतिबंधक शक्ती देण्यासाठी त्यांनी ‘इस्त्रायली डिफेन्स फोर्स’ आणि संरक्षण उद्योगाची स्थापना केली. इस्त्रायलच्या अणुशक्ती उपक्रम उभारणीत आणि तंत्रज्ञान श्रेष्ठ ‘स्टार्ट-अप राष्ट्र’ बनवण्याच्या क्रांतिकारी कामगिरीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. १९९४ साली इस्त्रायल-पॅलेस्टिनियनांमध्ये शांती प्रस्थापित करण्याच्या अथक प्रयत्नांबद्दल त्यांना नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आले. १९९६मध्ये त्यांनी जगभरात शांतिप्रस्थापनेचे अभिनव उपक्रम विकसित करून ते राबवण्याच्या कार्यावर केंद्रित ‘पेरेस सेंटर फॉर पीस अँड इनोव्हेशन’ची निर्मिती केली.

पेरेसे यांच्या ‘NO ROOM FOR SMALL DREAMS : COURAGE, IMAGINATION AND THE MAKING OF MODERN ISRAEL’ या पुस्तकाचा मेधा आलकरी यांनी ‘स्वप्नपंखांना आकाश थिटे : धैर्य कल्पनाशक्ती आणि नव्या युगाच्या इस्त्रायलची जडणघडण’ या नावाने मराठी अनुवाद केला आहे. ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा काल ऑनलाईन प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तकातील शेवटच्या प्रकरणाचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

२०१६ साली माझ्या पंतप्रधानपदाची कारकीर्द संपून २० वर्षं लोटली. राबिनच्या पश्चात मी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतली, तेव्हा कधी नव्हे तो सगळा देश एकजुटीने उभा होता. जटिल आणि विभाजक समस्यांवर एकमत झाल्यामुळे नव्हे तर राबिनच्या हत्येच्या अत्यंत दुःखदायक सामुदारिक धक्क्यामुळे! राष्ट्रीय दुखवट्याच्या काळात इस्त्रायली जनतेनं आपापसातले मतभेद विसरून, रॅली काढून आपल्या नवीन पंतप्रधानांप्रती आपला पाठिंबा जाहीर केला. लेबर पक्षातल्या बऱ्याच ज्येष्ठ नेत्यांनी लवकर निवडणुका जाहीर करण्याचा सल्ला दिला. कनेसेटमध्ये बहुमत टिकवण्यासाठी आपल्याकडे फारच छोटी खिडकी असल्याचा त्यांचा युक्तिवाद होता. राबिनच्या निधनाआधी सततच्या दहशतवादी हल्ल्यांमुळे यावेळच्या निवडणुकांमध्ये लेबर पार्टीचा दारुण पराभव होईल, असा परंपरागत संकेत मिळत होता. पण आता या राष्ट्रीय एकात्मतेच्या क्षणी माझा विजय पक्का होता आणि त्यामुळे आम्ही सत्तेत राहू शकणार होतो.

मला त्यांच्या युक्तिवादातला राजकीय तर्क समजत होता. हे चित्र तर स्पष्ट आणि खात्रीलायक होतं. परंतु माझ्यासाठी हा निर्णय राजकीय नसून नैतिक होता. या लाटेवर स्वार होण्यासाठी लवकर निवडणुका जाहीर करून राबिनच्या सांडलेल्या रक्तावर मिळालेला विजय मला नको होता. कोणत्याही परिस्थितीत, मग ती राजकीय असो वा इतर, त्याच्या मृत्यूचा उपयोग मी केला नसता. त्याऐवजी मी आमच्या अधुऱ्या स्वप्नाच्या मागे लागलो. शांतिप्रक्रियेमध्ये स्वतःला झोकून दिलं. राबिन माझ्या सोबत नव्हता; परंतु त्याचा आत्मा माझ्या हृदयात विराजमान होता. पॅलेस्टिनियनांबरोबरील वाटाघाटींचा दुसरा टप्पा अजून अपूर्ण होता आणि त्याच दरम्यान माझ्या सूचनाबरहुकूम असाद सरकारशी शांतिप्रस्तावाची बोलणी करण्यासाठी मी उरी सावीरला सिरियाला रवाना केलं होतं. दहशतवाद हा शांतिकरारातील मोठा अडथळा ठरत असल्यामुळे मी शार्म-एल-शेखला एक आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. तिथे जमलेले जागतिक नेते दहशतवादाच्या धोक्यावरील उपायांच्या धोरणांची चर्चा करणार होते. हा काळ माझ्यासाठी कसोटीचा आणि एकलकोंडा होता. माझ्या पक्षातील लोक निवडणुका जाहीर न केल्याच्या माझ्या निर्णयावर नाराज होते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

विरोधी पक्षातील लोक रोज माझ्यावर टीकास्त्र सोडत, मला शांतीदूत म्हणून हिणवत असत आणि लष्करी कारवाईची मागणी करत असत. लष्करी कारवाई करणं म्हणजे शांतिप्रक्रियेचा गळा घोटणं. इकडे ‘हमास’ आणि ‘इस्लामिक जिहाद’ यांचे इस्त्रायली जनतेवरील हल्ले चालूच होते. १९९६च्या सुरुवातीस इस्त्राएलमध्ये एका मागोमाग एक असे पाच भीषण दहशतवादी हल्ले झाले. मागच्यापेक्षा पुढचा अधिक भयानक होता.

बॉम्बस्फोट झाले तो आठवडा हे माझ्या आयुष्यातले सर्वांत वाईट दिवस होते. जेरुसलेमधल्या पहिल्या हल्ल्याच्या स्थळाला भेट दिली, तेव्हा मी एका अर्धवट वितळलेल्या छिन्नविच्छिन्न बससमोर उभा होतो. सिटी लाईन १८ नंबरची ही बस काही तासांपूर्वी रोजच्या प्रवाशांची ने-आण करत होती. आता ती जणू काचा आणि रक्ताने माखलेल्या एका मृत जनावराच्या जळक्या शवासारखी दिसत होती. ते भयानक दृश्य पाहताच मी जागच्या जागीच थिजलो. आजूबाजूला असलेला जमाव माझ्या नावाने शंख करत होता. ‘पेरेस खुनी आहे’ गर्दीतून एक आवाज उठला. लगेच दुसरा ओरडला ‘पेरेस आता तुझी पाळी.’ मी अराफतला सांगितलं की, दहशतवाद शांतिप्रक्रियेचा गळा घोटतो आहे. त्यावर तो मोठ्या मानभावीपणे या कारवाया थांबवण्याची शक्ती आपल्यात नसल्याचा आव आणत असे. “तुम्ही काय पणाला लावताय याची अजून तुम्हाला जाणीव झालेली दिसत नाही.” मी सक्त ताकीद देण्याच्या सुरात त्याला म्हणालो, “जर तुमच्या लोकांना एका शासनाखाली आणलं नाही; तर पॅलेस्टेनियनांना कधीच स्वतःचं राज्य मिळणार नाही.” तरीही बॉम्बस्फोट होतच राहिले. अ‍ॅशकलोनमध्ये एक आत्मघाती हल्ला झाला. दुसरा तेल अवीवमध्ये चाललेल्या पुरीम सणाच्या दिवशी झाला. माझे सुरक्षा कर्मचारी आणि सहकारी यांचा सक्त आक्षेप असूनही मी प्रत्येक दुर्घटनास्थळी गेलो.

मला असं वाटे की, पंतप्रधान म्हणून त्या जागांना भेटी देणं हे माझं कर्तव्य आहे. मी तिथे जात असे, इहलोक सोडून गेलेल्या अभाग्यांसाठी, जखमी झालेल्या देशवासियांसाठी आणि माझ्या देशासाठी; विश्वात कालच्या इतकं आजही त्या देशाचं नाव संवेदनशील देश म्हणून गौरवानं घेतलं जावं म्हणून! माझ्या आयुष्याचा बराच काळ घालवलेल्या तेल अवीवमध्ये, जळलेले, उत्सवाच्या आनंदात रमलेल्या लोकांच्या रक्ताने माखलेले रस्ते पाहिले, तेव्हा मला जाणवलं की माझ्या आशा अजूनही जागृत असल्या तरी या काही दिवसांत शांतीसाठीचं वातावरण वेगाने अस्थिर होत चाललं आहे. पुढच्या मे महिन्यात जेव्हा निवडणुका झाल्या, तेव्हा बेंजामिन नेत्यानाहू विजयी झाले. माझ्यासाठी तो फार दुःखद पराभव होता. तीन दशलक्ष मतांमध्ये फक्त ३० हजार मतांनी ते विजयी झाले. तेवढी मतं लिकुड पार्टीला सत्तेवर येण्यास पुरेशी होती. मी आणि राबिनने एकत्र पाहिलेल्या स्वप्नाचा चुराडा झाला.

पुढील काही वर्षांत शांतिप्रक्रियेत थोडे फार प्रयास झाले; परंतु नवीन परिस्थितीमुळे ते कठीण होत गेले. थोड्या दिवसात ओस्लो कराराचा प्राण काढून घेण्यात आला आणि रूपरेषा तर अडगळीत टाकण्यात आली. तरी त्याचा वारसा चालत राहिला. एका महान महत्त्वाकांक्षेच्या पूर्णत्वास आम्ही पोहोचू शकलो नाही. एक कायमस्वरूपी तोडगा, शेजारी राष्ट्रांमध्ये कायमस्वरूपी शांती. पण हे प्रयत्न एका क्रांतीची सुरुवात होती, एक निश्चित क्षण जो येणाऱ्या महान शांतीचा पाया ठरला. केवळ या प्रयत्नांमुळे आपणांस यशस्वी होऊ शकेल, असा द्विराष्ट्रीय तोडगा मिळाला. पॅलेस्टिनियनांशी झालेल्या वाटाघाटींमुळेच आज आपल्या देशात मोहम्मद अब्बास यांच्या नेतृत्वाखाली चालणारा आणि खऱ्याखुऱ्या शांतीची इच्छा बाळगणारा त्यांचा कॅम्प आहे. ते नसते तर आपल्याकडे नुसता हमास असता. आमच्या वाटाघाटींमुळे भावी कराराची रचना आपण करू शकलो. पॅलेस्टिनियनांनी १९४७ मधल्या सीमेऐवजी १९६७ मधली सीमा विचारात घेतली, हीच मुळी विचारांची क्रांती आहे. ओस्लो करार झाला नसता तर आपण पूर्व शत्रुराष्ट्रांमध्ये आपले दूतावास उघडू शकलो नसतो वा त्यांच्याशी राजनैतिक संबंध प्रस्थापित करू शकलो नसतो; ना कधी जॉर्डनशी शांतिकरार झाला असता. ओस्लो करारामुळे सरकारी गुंतवणुकीचा वापर आपण पाराभूत सुविधांमध्ये आणि सामाजिक प्रकल्पांमध्ये करू शकलो. त्यामुळेच इस्त्राएलची अर्थव्यवस्था मध्यपूर्व देशांत गेली आणि त्यांची इस्त्राएलकडे आली.

त्या अंतर्गत आपण भागीदारीत व्यवसाय सुरू करू शकलो, एकमेकांशी करार करू शकलो आणि उत्पादनक्षमतेत त्याचा आपल्याला फायदा झाला. आमच्या नंतर आलेल्या प्रत्येक सरकारनं, मग भले शांती त्यांची प्राथमिकता नसली तरी, शेवटी आमचा मार्ग अवलंबला ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. दहशतवाद आणि हिंसाचाराच्या दुष्टचक्रातून बाहेर पडायचं असेल तर एक नव्हे दोन राष्ट्रांमध्ये शांती असायला हवी, हे सत्य त्यांनी कबूल केले.

तरीही शांततेच्या भोवती अजूनही शंकेचं वलय आहे. शांती प्रस्थापित होणं शक्य आहे का? आणि मुळात तिची गरज आहे का? असाही प्रश्न काही शंकासुर उभा करतात. पहिल्या प्रश्नाबद्दल माझं मत असं आहे की, शांती नुसतीच शक्य नसून अपरिहार्य आहे. माझ्या मनातील आशावाद हा वैयक्तिक नसून ऐतिहासिक आहे. इतिहास हा जगाच्या उपहासात्मक दृष्टिकोनावर उत्तम उतारा आहे. किती वेळा त्याने आपल्याला चकित केलंय? कितीदा आपल्या स्वप्नांपेक्षा सुंदर असणाऱ्या सत्याच्या जवळ नेलंय?

..................................................................................................................................................................

हेही वाचा : छ. संभाजीराजांची मृत्यूनंतरही त्याच निष्ठेने सेवा करणारे गोविंद गोपाळ गायकवाड कोण होते?

..................................................................................................................................................................

दुसऱ्या महायुद्धानंतर केवळ तीन वर्षांत फ्रान्स, जर्मनी आणि इटली यांच्यात मैत्री होईल असं कुणाला स्वप्नात तरी वाटलं होतं का? किती वेळा तज्ज्ञांनी माझ्या कानांत ओरडून सांगितलं की, जॉर्डन आणि इजिप्तबरोबर शांतता असंभव आहे? पॅलेस्टिनियांमध्ये दहशतवादाविरुद्ध एक मोठा गट तयार होईल, या कल्पनेवर निराशावाद्यांनी कितीदा नकारार्थी मान हलवली?

अशक्य गोष्टींना वास्तव रूप मिळालेलं आपण पुन्हा पुन्हा पाहिलं आहे. एक वेळ अशी होती, की अरब लीगने ‘तीन नकार’ असलेला ‘खार्टू फॉर्म्युला’ अंगीकारला होता : इस्त्राएलबरोबर शांतिकरार नाही, इस्त्रायलला अस्तित्वाचा हक्क द्यायचा नाही आणि इस्त्रायलशी वाटाघाटी करायच्या नाहीत. माझ्या आयुष्यात माझ्याबरोबर काम करणाऱ्या लोकांनी कधी कल्पनाही केली नसेल की, याच अरब लीगने तो खंडित करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी कधीही विचार केला नसेल की, अरब नेते कधी काळी दहशतवादाविरुद्ध आणि शांतीच्या बाजूनं बोलतील आणि तेसुद्धा विदेशात नव्हे तर स्वदेशात किंवा पॅलेस्टिनियन-इस्रायलच्या १९६७च्या सीमा मान्य करतील. शेवटी जाणकारांच्या मनातील शंकांचा विचार न करता शांती हट्टाने, निग्रहपूर्वक आपला मार्ग काढतेच.

मी शांततेच्या अपरिहार्यतेवर इतका विश्वास ठेवतो, कारण मला त्याची आवश्यकता पटली आहे. आवश्यकता कदाचित सर्वांत शक्तिशाली संकल्पना असावी. आमचे आद्य वसाहतकार त्याच आवश्यकतेपोटी स्थिरावले. ती गरजच त्यांना दलदलीतून नंदनवन फुलवण्यासाठीची आणि पडित उजाड जमिनीवर वसाहत बसवण्यासाठीची ऊर्जा ठरली. बेन-गुरिऑनना येऊ घातलेल्या निश्चित युद्धापासून आम्हाला संरक्षण देण्यासाठी आरडीएफ उभारण्याची गरज भासली. डिमोनामधलं अशक्य बांधकाम आणि एंटेबीमधली जोखीम हे सारे निर्णय इस्त्रायली नेतृत्वानं अपरिहार्यतेपोटीच घेतले होते. त्याचप्रमाणे शांतीच्या आवश्यकतेलाच शेवटी शांतीची फळं धरतील. शत्रुत्वाची किंमत फारच जबरदस्त आहे .

माझ्या अंतरात्म्यापासून माझा झायोनिसमच्या सदाचरणावर विश्वास आहे आणि फाळणीयुक्त पॅलेस्टाईनचा युएन ठराव स्वीकारण्याच्या बेन-गुरिऑनच्या ऐतिहासिक निर्णयावरही. आपल्या राष्ट्राचं यहुदीपण टिकवायचं असेल तर आपण आपल्या मूल्यांना चिटकून राहायला हवं आणि आपली मूल्यं मूलतः लोकशाहीची आहेत हे बेन-गुरिऑन यांना त्या काळीही ध्यानात आलं होतं. आपण सारी देवाची मुलं म्हणजे त्याचीच प्रतिमा! या मूलतत्त्वांवर विश्वास ठेवण्यासाठी यहुदी राज्याने लोकशाहीचा स्वीकार केला पाहिजे. लोकशाहीत यहुदी आणि इतर यांच्यामध्ये समता असली पाहिजे. लोकशाहीत नुसतीच समानता अभिप्रेत नाही, तर प्रत्येक नागरिक वेगळा असण्याचा अधिकार आहे. द्विराष्ट्रवादाचा तोडगा स्वीकारणं यावर झायोनिस्ट प्रकल्पाचं भविष्य अवलंबून आहे. आपण हे ध्येय अमान्य केलं तर शेवटी पॅलेस्टेनियन एकराष्ट्रवाद स्वीकारतील. लोकसंख्या शास्त्रामुळे या परिस्थितीत आपल्यासमोर दोनच पर्याय उरतात. एकतर यहुदी बनून राहा नाहीतर लोकशाहीवादी. खरं तर यहुद्यांकरता हा पर्याय उपलब्धच नाही; कारण यहुदी असणं म्हणजेच लोकशाहीवादी असणं. ती त्यांची मूळ स्वभाववृत्ती आहे. लोकशाहीचा त्याग म्हणजे यहुदी मूल्यांचा त्याग. आम्हाला भट्टीत जाळलं आणि विषारी वायूच्या खोलीत डांबलं तेव्हाही आम्ही या मूल्यांचा त्याग केला नव्हता. आम्ही यहुदी म्हणून जगलो, यहुदी म्हणूनच मेलो आणि स्वतंत्र यहुदी राष्ट्राचे नागरिक म्हणूनच उभे ठाकलो. इतिहासाच्या भूमीवर क्षणभराकरता पडलेल्या सावलीसारखे आम्ही जगलो नाही; तर नित्य नूतन प्रारंभ करणारा, ‘टिकून ओलाम’वर नितांत श्रद्धा असणारा आणि योग्य पद्धतीनं एक सुंदर जग बनवणारा देश म्हणूनच जगलो.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : चला, जरा सुशांतसिंग राजपूतच्या चित्रपटातील ‘हिंदू-मुस्लीम मैत्री’ आणि इतर ‘गैरसोयीच्या सत्या’बद्दल बोलूया…

..................................................................................................................................................................

समाजात सकारात्मक बदल घडवून आणू शकणाऱ्या सामान्य जनांच्या क्षमतेवर असलेल्या माझ्या श्रद्धेतून मी १९९६मध्ये मी ‘पेरेस सेंटर फॉर पीस अँड इनोव्हेशन’ या संस्थेची स्थापना केली. व्यापक शांती हे फक्त सरकारचं काम नव्हे; तर दोन राष्ट्रातील जनता, उदा. यहुदी आणि अरब ते कार्य सुलभपणे करू शकते. गेली २० वर्षं शांती शिक्षण, व्यवसायातील भागीदारी, शेती आणि आरोग्यसेवा या माध्यमांतून त्यांच्यातील हे नातं दृढ करण्याचा ध्यास मी घेतला आहे. परंतु कायमस्वरूपी तोडग्याकरिता सरकारचं तर्कशुद्ध ज्ञान आणि विवेकबुद्धीची आवश्यकता आहे, आपल्या आणि शेजाऱ्यांच्याही! इस्त्राएल शांतिप्रयत्नांसाठी समर्थ राष्ट्र आहे, यावर ठाम विश्वास असणारं नेतृत्व हवं आणि अशा सामर्थ्यवान राष्ट्राने केलेला शांतिकरारच आवश्यक आहे. शांतिकरार खोळंबून ठेवण्यात काहीच हशील नाही. तो लांबला तर बिघडण्याची खात्री आहे. आपण विचारात घेतला होता, त्यापेक्षा कितीतरी निकृष्ट दर्जाचा करार असेल आणि प्रथमच इस्त्राएल कमकुवत स्थितीत वाटाघाटींना बसेल.

झायोनिसम शाबूत ठेवण्यासाठी तत्काळ शांतिकरार हा एकमेव मार्ग असला तरी या परिस्थितीत पॅलेस्टेनियनांचं पारडं आपल्यापेक्षा नक्कीच जड असेल. आपण शांती प्रस्थापित करू शकू की नाही हा मुद्दा नसून केव्हा, आणि काय किंमत देऊन? जितका वेळ थांबू तितकी जास्त किंमत आपल्याला मोजावी लागणार आहे. आपला प्रयत्न द्विगुणित करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत शंकाकुशंकांना वाट मोकळी करून देण्याचा धोका आपल्याला परवडणार नाही. इतिहासात गाडी उलट्या दिशेने हाकायची सोय नाही.

शांतिप्राप्ती सुलभ नाही हे माझ्यापेक्षा अधिक कोण सांगू शकेल? परंतु ही प्रक्रिया परत सुरू करण्यापलीकडे तरणोपाय नाही. आपल्या आणि पॅलेस्टेनियनांमधला ‘काल’ विषण्ण करणारा होता; परंतु ‘उद्या’चा उषःकाल आपल्या मुलांसाठी आशेचा किरण घेऊन येईल. शांतिपथावरील आगेकूच इस्त्राएलचं मूळ उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करेल, देशांतर्गत आणि देशाबाहेर शांती आणि सुरक्षेचं कवच असलेला एक आदर्श आणि संपन्न देश!

ओस्लो इथे राबिन आणि अराफतसोबत मी नोबल शांतीपुरस्कार स्वीकारला या घटनेला आता २० वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यानंतर बरेच बदल घडून आले आहेत. परंतु माझा मूलमंत्र मात्र तोच आहे. कोणत्याही देशाला यापुढे मित्र आणि शत्रू असं जगाचं विभाजन करणं परवडणार नाही. आपले शत्रू समान आहेत; गरिबी आणि दुष्काळ, मूलगामी तत्त्व आणि दहशतवाद. या शत्रूंना सीमेचं बंधन नाही आणि झाडून साऱ्या देशांना भेडसावणारा हा प्रश्न आहे. म्हणूनच लवकरात लवकर या कटुतेच्या आणि शत्रुत्वाच्या भिंती पाडून आपण शांतीचा पाट वाहू दिला पाहिजे. एकत्रितपणे या समस्यांना सामोरं जाऊन नव्या युगातील संधींच्या स्वागताला सज्ज राहिलं पाहिजे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

आशावाद आणि भाबडेपणा या दोन समान गोष्टी नव्हेत. मी आशावादी आहे म्हणजे मला कविकल्पनेतल्या प्रेममय शांतीची अपेक्षा आहे असं नव्हे; मला अपेक्षा आहे ती केवळ गरजेपोटी उद्भवलेल्या शांतीची! मी पूर्ण शांतीची कल्पनाही करत नाही; परंतु एक अशी शांती ज्यात शेजारी-शेजारी राहताना कुठे हिंसक कृत्यं घडू नयेत.

येत्या काही वर्षांत शांती प्रक्रियेसाठी सुरू केलेली बोलणी ही सुखांतक नसतीलच, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उलट त्याची सुरुवात अस्पष्ट आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीतून होईल; त्याला हिंसेचे आणि दुःखाचे पदर असतील आणि ती प्रक्रिया वेळखाऊ असेल. चला, आपण सारे पुन्हा एकदा त्या प्रयत्नांना समर्पित होऊया आणि सुखांत हा अंतासाठी ठेवूया. प्रेषितांच्या दृष्टीवर, शांतीच्या उद्देशावर आणि माझ्या प्राणप्रिय देशावर माझी अतूट श्रद्धा आहे. आणि मुख्य म्हणजे सीमेच्या अलीकडे आणि पलीकडे असलेली बहुतांश जनता, विशेषतः तरुणवर्ग उत्सुकतेने शांतीची वाट पाहात आहे. त्यांच्यामुळे गोष्टी ‘अशक्यतेच्या’ पिंजऱ्यातून सुटून ‘अनिश्चिततेच्या’च्या जमिनीवर आल्या आणि आता त्यांच्याच सर्जनशीलतेमुळे आणि उत्कट इच्छेमुळे त्या ‘वास्तवा’च्या आकाशात झेपावणार आहेत. नेत्यांनी अशा तरुणांची निवड केली काय किंवा तरुणांनी नेतृत्व स्वीकारलं काय, आपण सारे अनिवार्यपणे एकाच दिशेने निघालो आहोत. मार्गात अडथळे येतील, परंतु चालण्यायोग्य हा एकमेव मार्ग असेल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......