“शरद पोंक्षेंचा खून करायचाय! काय करू?”
सदर - सत्तावर्तन
राजा कांदळकर
  • शरद पोंक्षे आणि ‘हे राम, नथुराम’चं पोस्टर
  • Wed , 25 January 2017
  • सत्तावर्तन राजा कांदळकर Raja Kandalkar शरद पोंक्षे Sharad Ponkshe मी नथुराम गोडसे बोलतोय Mi Nathuram Godse Boltoy हे राम नथुराम Hey Ram Nathuram

परवा मला एक विचित्र स्वप्न पडलं. ते तुमच्याशी शेअर करावं म्हणतो. मला एक माणूस मोबाईलवर फोन करतो. म्हणतो, ‘मला शरद पोंक्षेंचा खून करायचाय! काय करू? बंदूक कोण देईल? कुठून मिळेल?’ मी चरकतो, जाग येते. मोबाईल बघतो तर कुणाचा कॉल नव्हता. आवाज तर ओळखीचा नव्हता फोन करणाऱ्याचा. मग हे असं विचित्र स्वप्न का पडलं? दिवसा घडणाऱ्या घटनांचे विभ्रम की काय?

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’नंतर ‘हे राम नथुराम’ हे नाटक शरद पोंक्षे करताहेत. कोल्हापूर, नागपूर इथं या नाटकाच्या विरोधात चळवळीतले कार्यकर्ते निषेध, आंदोलन करताहेत. नागपूरला तर आंदोलनानंतर या नाटकाला बघायला हजारावर आसनक्षमता असलेल्या वसंतराव देशपांडे सभागृहात फक्त दीडशेच्या आसपास लोक होते. त्यातले निम्मे संरक्षण व्यवस्थेतले कर्मचारीच होते. खुद्द नागपुरात या नाटकाचा फज्जा उडाला. लोकांनी त्याकडे पाठ फिरवली. नागपुरात नथुरामची पुन्हा हार झाली! त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्या. गांधी नावाच्या जादूची चर्चा झाली. व्हॉटसअॅप, फेसबुक अशा सोशल मीडियावर या नाटकाबद्दल उलटसुलट चर्चा सुरू आहे.

धादान्त खोट्या नाटकाचा निषेध होतोय. नथुराम हा गुन्हेगार होता. खून केलेला गुन्हेगार! भारताच्या न्यायालयाने त्याला गुन्हेगार ठरवून फाशी दिलं. या गुन्हेगाराचं समर्थन, त्याच्या हिंसेचं समर्थन वारंवार शरद पोंक्षे विविध नाटकं करून का करताहेत, असा प्रश्न आता तरुण विचारू लागले आहेत. या चर्चाकल्लोळाचा परिणाम म्हणून तर तो फोन आणि ते स्वप्न नसेल?

‘माझ्या क्रूर कृत्याचा उगम हा सहृदयता, दया आणि स्त्रीदाक्षिण्य या आत्यंतिक भावनांमध्ये आहे,’ अशी साद नथुराम या नाटकात घालतो. शरद पोंक्षे अशा आशयाचे संवाद बेंबीच्या देठापासून ओरडत मंचावर फेकतात. नथुरामच्या पापावर पांघरूण घालत क्रूरपणाचं उदात्तीकरण करण्याचा दुर्मानवी प्रयत्न करतात. हे अत्यंत केविलवाणं नाटक आहे. मानवी हृदय असणाऱ्या कुणालाही हे संतापजनक वाटेल. कलाकाराचं वेगळेपण त्याच्या संवेदनशीलतेत असतं. पोंक्षे संवेदनशील आहेत की नाहीत? नथुरामची पुन्हा पुन्हा हार होत असताना शरद पोंक्षे ही नाटकं (की सर्कस?) का रेटत आहेत? तुम्हाला वाटणाऱ्या चांगल्या गोष्टींसाठी खून केला तरी चालेल, असं खुनशी तत्त्वज्ञान पुन्हा पुन्हा का मांडलं जात आहे?

शरद पोंक्षे हा काही कुणी वेडपट, माथेफिरू माणूस नाही. ते शिक्षित आहेत. शिवसेनेच्या नाट्यसेनेचे प्रमुख आहेत. म्हणून ते करत असलेली ही नाटकं गांभीर्यानं घेतली पाहिजेत. त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्याच्या मागच्या शक्तींची चाल बघितली पाहिजे.

‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे तसं प्रचारनाट्य होतं. ते पहायला कंटाळवाणं आहे. त्यात नथुरामची लांबलचक स्वगत आहेत. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची क्षमता नसलेलं ते नाटक राज्यातल्या विविध शहरांत नाट्यगृहात चालवलं गेलं. त्याचे शो विकत घेण्यात आले. काही संस्थांनी घरोघरी तिकिटं विकून पैसा जमा केला. एका गटानं आर्थिक पाठबळ दिल्याने न चालणाऱ्या या नाटकाचे अनेक प्रयोग होऊ शकले. गुन्हेगाराला घरोघर विकलं जाण्याचा हा प्रयोग स्वत:ला सुसंस्कृत (?) म्हणवणाऱ्यांनी केला.

आता पुढची पायरी म्हणून ‘हे राम, नथुराम’चे प्रयोग सुरू आहेत. त्याला विरोध करणारे निवडणुका डोळ्यापुढे ठेवून विरोध करताहेत, असं पोंक्षे सगळीकडे सांगतात. नाटकाला विरोध करणारे राजकारण करत असतील तर पोंक्षे हे नाटक रेटून एक वेगळं राजकारणच करत आहेत, हे समजून घेतलं पाहिजे की नाही?

या राजकारणाला अनेक पदर आहेत. हे राजकारण पुढे रेटणं हा एका मोठ्या ‘राजकीय प्रोजक्ट’चा भाग आहे. अनेक संघटना या प्रकल्पात सामिल आहेत. विचारपूर्वक मोठमोठी माणसं, संस्था या प्रोजेक्टला बळ देत आहेत. नथुरामी प्रवृत्ती जिवंत ठेवायची, खदखदत ठेवायची, स्वत:ला योग्य वाटणाऱ्या हेतूंसाठी माणसं मारणं समर्थनीय आहे, ती मारेकरी माणसं शहिदांच्या दर्जाची आहेत, असं वारंवार खोटारडेपणाने सांगायचं काम ही मंडळी करत आहेत. घृणास्पदरीत्या हे होत आहे.

हे काम वेगवेगळ्या मंचांवरून सुरू आहे. दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी यांचे खून करून उजळमाथ्याने काही लोक, संघटना आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. पानसरे-दाभोलकरांची बदनामी करतात. खून करणारे आमचे सत्शील साधक आहेत, असं हिमतीनं सांगतात. त्यांना ही हिंमत येते कुठून? ती हिंमत पोक्षेंसारखे लोक नाटक करून पुरवण्याचं काम करतात, हे स्पष्ट आहे. हिंसक तत्त्वज्ञानाला उजळ करण्याचाच हा प्रयत्न आहे.

मुळात या अतिरेकी प्रवृती आहेत. सर्व धर्मांत, सर्व देशांत त्या दिसतात. त्या जगभर फोफावत आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प द्वेषाचं तत्त्वज्ञान मांडून विजयी होतात. पाकिस्तानात अतिरेकी गट सरकार आणि गरीब जनतेला वेठीस धरतात. ब्रह्मदेशात रोहिंग्या नागरिकांवर सरकारातले लोक अन्याय करतात. बांगलादेशात अतिरेकी संघटना तरुणांना गुन्हेगारीकडे ओढतात. सिरिया आणि त्याच्या शेजारच्या अन्य देशांत जो हिंसाचार सुरू आहे, तो अशी विद्वेषी लोकांनी मांडलेल्या उच्छेदाचाच परिणाम आहे. युरोपातही बहुतेक देशात विद्वेषी संघटना मूळ धरताहेत. यामागे सामाजिक, आर्थिक कारणं आहेत. मग हफीज सईदची नाटकं आणि पोक्षेंची नाटकं यात भेद तो काय राहतो?

द्वेष की सभ्यता, हिंसा की अहिंसा, युद्ध की बुद्ध, गांधी की नथुराम अशी आता लोकल ते ग्लोबल फाळणी झाली आहे. या फाळणीने अमेरिकेतली अभिनेत्री मेरील स्ट्रीप घायाळ झाली. पुरस्कार स्वीकारण्याचा आनंद ती घेऊन शकली नाही. दुबळ्यांना चेचू पाहणाऱ्या विद्वेषी प्रवृत्तींना तिने नापसंती दर्शवली. माणूस म्हणून आपलं होणारं अध:पतन योग्य नव्हे, तर लाजिरवाणं आणि घातक आहे, हे या संवेदनशील अभिनेत्रीनं जागतिक मंचावरून धाडसानं सांगितलं. ते सांगताना तिला अश्रू अवरेनात.

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुजोरी, द्वेषी राजकारणाविरोधात तीव्र आंदोलनं सुरू आहेत. काळे, गोरे असे सर्ववंशीय तरुण रस्त्यावर उतरत आहेत. त्यांना जगभर पाठिंबा मिळत आहे. आपली बॉलिवुडची ख्यातनाम अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिनंही नुकताच डोनाल्ड ट्रम्पविरोधी आंदोलकांना पाठिंबा दिला. ‘मी अमेरिकेत असते तर आंदोलनात सामिल झाले असते,’ अशी एखाद्या कार्यकर्त्याला शोभेलशी तिची प्रतिक्रिया आहे. विविध क्षेत्रांतले लोक द्वेष की सभ्यता या लढाईत सभ्यतेच्या बाजूने उतरत आहेत. नथुरामी प्रवृत्तीला भारतात, महाराष्ट्रात याच भावनेनं विरोध होतोय. नथुरामच्या खोट्या नाटकालाही राज्यात तरुण कार्यकर्ते याच भावनेनं नापसंती दर्शवत निषेध करत आहेत. प्रियंका तुझी संवेदनशीलता थोडी पोक्षेंनाही दे ग बाई!

व्हॉटसअॅपवर कवी अजय कांडर यांनी एक पोस्ट फॉरवर्ड केली आहे. विनय काटे यांची ती आहे. तिच्यात गांधी नथुरामला प्रेमानं सांगतात, “नथुरामा तुझी अवस्था पाहून खरंच दु:ख वाटतं रे. घड्याळाचे काटे जर उलटे फिरवता आले असते तर तुलाही नेलं असतं माझ्या सोबत आफ्रिकेला, भारत दर्शनाला, इंग्लंडला, नौखालीच्या दंगलीतसुद्धा. दाखवलं असतं तुला या जगातलं द्वेष आणि प्रेमाचं चिरंतन द्वंद्व. ओळख करून दिली असती तुला प्रेमातून निपजणाऱ्या आनंदाची, सुखाची, शांततेची आणि मानवतेची. जी या द्वेषाच्या वणव्याला विझवून टाकायची शाश्वत शक्ती ठेवून असते. कदाचित तुझ्यामधून एखादा विनोबा भावे, एखादा नेल्सन मंडेला, एखादा मार्टिन ल्यूथर किंगसुद्धा निर्माण करू शकलो असतो. पण आता सगळंच तुझ्या आणि माझ्या हाताबाहेर गेलंय. मला अनुसरणं हे नेहमीच खूप अवघड आहे हे मला माहीत आहे. तुला अनुसरणं मात्र आजकाल खूप सोप्पं झालंय…”

शरद पोंक्षे त्याचाच बळी ठरलेत. पुन्हा पुन्हा स्वप्नातला तो फोन कॉलवरचा आवाज माझ्या कानात घुमतोय, ‘पोंक्षेचा खून करायचाय! काय करू?’

लेखक ‘लोकमुद्रा’ या मासिकाचे संपादक आहेत.

rajak2008@gmail.com

Post Comment

Anil Chavan

Thu , 26 January 2017

लेख आवडला ,पोंक्षे सारख्यांचे केविलवाणे पण धूर्त प्रयत्न व्यथित करणारेच आहेत , चिड येते आणि संतापून गांधीवादाचा खुनच होतो . तो आवाज़ माझाच आहे खरच मी मला बंदूक़ द्या बंदूक़ द्या असा बडबडत असतो , हिंसाच ती . बर पोंक्षे सारख्यांची दखल न घेणे , निग्लेक्ट करणे सुध्दा हिंसाच म्हणून लेख योग्यच शिर्षक बाक़ी भरकटलेल माझ्यासारख .


mukesh machkar

Wed , 25 January 2017

लेखाचं शीर्षक अकारण सनसनाटीपणा निर्माण करणारं का आहे? नथुराम, पोंक्षे आणि आपण यांच्यात काही फरक नसेल, तर आलटून पालटून सगळे एकमेकांना गोळ्या घालत राहतील. या सनसनाटीपणाची अक्षरनामाला गरज आहे, असं वाटत नाही.


Omkar Dabhadkar

Wed , 25 January 2017

लोकांना वाचायला खमंग, खरपूर आवडतं म्हणून फक्त क्लिक्स मिळवण्यासाठी असा मथळा देणं scoopwhoop सारख्या वेबसाईट करतात. पण अक्षरनामा सारख्या वेबसाईट वर अश्या मथळ्याचा लेख प्रसिद्ध व्हावा हे शोचनीय आहे. साधशुचितेच्या गमजा करणारे विचारवंत जिथे गोळा झालेत तिथे ही अशी हिंसक भाषा शोभा देत नाही.


ADITYA KORDE

Wed , 25 January 2017

BHARAKATALELA LEKH.....


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......