रा. ना. चव्हाण हे ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या ज्ञानपरंपरेतील ‘विचारनिष्ठा’ असलेलं महत्त्वाचं नाव!
ग्रंथनामा - झलक
सुशील धसकटे
  • ‘विचारशलाका या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 07 August 2020
  • ग्रंथनामा झलक विचारशलाका Vicharshalaka रा. ना. चव्हाण R. N. Chavhan

रा. ना. चव्हाण हे मराठीतील एक विवेकशील, संयमी आणि समन्वयवादी, पण तरीही परखडपणे लिहिणारे अभ्यासक, कार्यकर्ते. त्यांच्या निवडक लेखांचा ‘विचारशलाका’ हा संग्रह रा. ना. चव्हाण प्रतिष्ठा, वाई यांनी नुकताच प्रकाशित केला आहे. या संग्रहाला लिहिलेले हे प्रास्ताविक...

..................................................................................................................................................................

अनेक वर्षं मनात खदखदणारा एक प्रश्न, रा. ना. चव्हाण यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने मांडणं मला अतिशय सयुक्तिक आणि औचित्यपूर्ण वाटतं. म्हणून त्या प्रश्नाच्या अनुरोधानेच प्रास्ताविक करतो.

महाराष्ट्रात विचारांच्या व अभ्यासाच्या क्षेत्रात ‘अ‍ॅकेडेमिशियन असलेले’ आणि ‘अ‍ॅकेडेमिशियन नसलेले’ असे दोन प्रवाह समांतरपणे चालताना दिसतात. रूढार्थाने ‘अ‍ॅकेडेमिशियन’- त्यातही विद्यापीठीय ‘अ‍ॅकेडेमिशियन’ असण्याला महाराष्ट्रात अलीकडे बौद्धिकक्षेत्रात (पूर्वीपेक्षा अधिक) महत्त्व प्राप्त झाले आहे. बहुतांश साहित्यसंस्था, वृत्तपत्रे, नियतकालिके, विद्यापीठे, विद्यार्थी असे समाजातील विविध घटक शिक्षक किंवा प्राध्यापकाने लिहिलेल्या, मांडलेल्या विचारांना डोळे झाकून प्राधान्य देताना वा मान्यता देताना दिसतात. ज्ञानदानाच्या प्रक्रियेतील शिक्षक-प्राध्यापक यांच्यावरील समाजाचा असलेला हा विश्वास वा धारणा पूर्वीपासून चालत आलेली आपण पाहतो.

‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्यांनी लिहिलेल्या वा केलेल्या मांडणीला फार महत्त्व न देणं किंवा त्या व्यक्तीला डावलणं, किंबहुना तिची निर्भर्त्सना करणं, कमी लेखणं, अनुल्लेखाने मारणं, असे ‘बौद्धिक/बुद्धिवादी’ प्रकारही समांतरपणे चालताना दिसतात. शिवाय तथाकथित ‘अ‍ॅकेडेमिशियन’ असलेल्यांना विद्यापीठे, यूजीसी, शासकीय योजनांकडून भरघोस शिष्यवृत्त्या, अनुदाने व सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात, आर्थिक सुबत्ताही असते. त्या तुलनेत ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्यांना सुविधा, शिष्यवृत्त्या, विद्यापीठीय सरंजाम वगैरे यातलं काही नसतं. एका अर्थाने कसल्याच सुविधा वा आर्थिक लाभ नसताना, ‘स्व-कष्ट’, ‘स्व-वेळ’, ‘स्व-खर्च’ करून समाजासाठी ‘व्रत’ आणि ‘जीवननिष्ठा’ म्हणून लिहिणं, हा त्याग शैक्षणिक विश्वात दखल घेण्याजोगा का ठरू नये?

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

यासंबंधाने ‘दासशूद्रांची गुलामगिरी’ या ग्रंथात स्वत: शरद पाटील हे खूप मार्मिकपणे ‘आतलं’ लिहितात, “दिवसा ग्रामीण गोरगरीब व अतिशूद्र यांच्यासाठी लढणे आणि रात्री त्यांच्या देशाचा इतिहास जाणण्यासाठी पुस्तकांशी. मी अ‍ॅकेडेमिशियन नाही. म्हणून अ‍ॅकेडेमिक सोयी अनुपलब्ध. त्यात मी अवैतनिक जीवनदानी कार्यकर्ता. चळवळीसाठी उपासमार, पुस्तके मिळवण्यासाठी अजीजी व खरीदण्यासाठी भीक. सहाफुटी तरुण देह; म्हणून सामान्य भारतीयापेक्षा जास्त भुकेला. एक शूद्र म्हणून जेवढे जाणायचे - नवब्राह्मणी कम्युनिस्ट नेतृत्वाच्या कटाक्षानुसार - त्यापेक्षा जास्त जाणायची हाव. पण, माझ्याविषयी, किंबहुना माझ्या ज्ञानोपासनेविषयी ज्यांना सहानुभूती - त्यातले बहुसंख्य कम्युनिस्टेतर -त्यांच्याकडून पुस्तके वा पैसे वा अन्न वा निवारा. त्यांच्या नावांची यादी मोठी.”

रूढार्थाने ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या अशा अस्सल ज्ञानव्रतींची शासन, सामाजिक संस्था, विद्यापीठे आणि तत्सम शैक्षणिक संस्था यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनास्था-उपेक्षा झालेली दिसून येते. ‘ज्ञाननिर्मिती’कडे पाहण्याची आपली दृष्टी किती हेळसांडपणाची, वरवरची आणि गैरलागू नियमांच्या चौकटीत ठोकून बसवण्याची आणि (आणि म्हणूनच मला ती ‘अशैक्षणिक’ व ‘अनुत्पादक’ ज्ञानिर्मितीचा स्त्रोत वाटते) आहे, हे लक्षात येते.

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकातील जोतीराव फुले यांच्यापासून ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या मंडळींची एक स्वतंत्र व अतिशय समृद्ध परंपरा दाखवता येते. त्यात महर्षी विठ्ठलराव रामजी शिंदे, अनेक वर्षे कष्टून ज्ञानकोश तयार करणारे श्रीधर व्यंकटेश केतकर, सत्यशोधक प्राच्यविद्याविद् शरद पाटील, लोकसाहित्याचे अभ्यासक रा. चिं. ढेरे, किंवा अलीकडेच शिवाजी विद्यापीठाने ज्यांचा ‘तुकारामबावांच्या गाथेचे निरूपण’ हा महत्त्वाचा ग्रंथ प्रकाशित केला ते कोल्हापूरचे मारुती जाधव तळाशीकर गुरुजी यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठश्रेष्ठ मंडळी आहेत. वाईचे सत्यशोधक रा. ना. चव्हाण हे एक याच ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नसलेल्या ज्ञानपरंपरेतील ‘विचारनिष्ठा’ असलेलं महत्त्वाचं नाव!

..................................................................................................................................................................

हेही वाचा : गीतांजलीच्या कविता अगदी साध्या आहेत. कल्पनारम्य विलास नाही. अभासी जीवनाचा स्पर्श नाही. म्हणून ही खरी कविता आहे.

..................................................................................................................................................................

रा. ना. चव्हाण हे तथाकथित ‘अ‍ॅकेडेमिशियन’ नव्हते. मात्र आयुष्यभर त्यांनी फुले आणि शिंदे यांच्या विचारनिष्ठेने महाराष्ट्रीय समाजाला जातपात-पंथधर्म आदींमुळे विलगता येऊ नये म्हणून सतत विचारप्रवण ठेवलं. सतत विचारविवेक दिला. असं असलं तरी रा.नां.च्या संदर्भातही वर उल्लेखिलेला - अ‍ॅकेडेमिशियन नसल्याचा - मुद्दा अनौपचारिक चर्चेत उपस्थित केला जातो. वास्तविक हाही जातिभेदाप्रमाणे किंवा इतर भेदांप्रमाणेच ज्ञानाच्या, अभ्यासाच्या क्षेत्रात सुशिक्षितांकडून केला जाणारा ‘भेद’ वाटतो. हा भेद ओलांडून रा.नां.च्या एकूण विचारकार्याकडे पाहिलं म्हणजे त्यांच्यातील निरलस विचारक, निरलस ज्ञानव्रती, निरलस अभ्यासक आणि निरलस समाजशिक्षक दृष्टीस पडतो.

या संदर्भात सदर पुस्तकात एकेठिकाणी रा.नां.नीच याचे उत्तर दिले आहे, “पुस्तकी पंडित पोथीपुस्तक यातला किडा बनतो व त्याला सामाजिक व्यवहारज्ञान अवघड जाते किंवा तो दूर राहतो. हा प्रकार अपरिहार्य नसला तरी अनिष्टच होय. संत, पंडित नव्हते तरी प्रत्यक्ष जनसंबंध वाढवून त्यांनी सामाजिक अद्वैत सिद्ध केले.”

किंवा,

“शिक्षण व शहाणपण हातात हात घालून कसे पुढे जाईल, हा आजचा प्रश्न आहे.”

असे कितीतरी वर्षांपूर्वीच त्यांनी लिहून ठेवलं आहे. तरल बुद्धिचापल्य आणि भूतकाळ-वर्तमानाचं सूक्ष्म आकलन असल्याशिवाय काळाच्या पुढं जाणारा असा विचार मांडणं अशक्य असतं, याचा प्रत्यय सदर पुस्तकाच्या पानोपानी येतो. 

‘विचारशलाका’ हा रा. ना. चव्हाण यांच्या प्रबोधनात्मक निवडक निबंधांचा संग्रह आहे. शिवछत्रपती, जोतीराव फुले, भाषा-साहित्य-संस्कृती-समाजजीवनापासून ते यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंतचा एक व्यापक विचारांचा पैस या निबंधांत सामावलेला आहे.

या संग्रहातील ‘साहित्य, संस्कृती व समाजजीवन’; ‘वैचारिक समन्वय आणि सामाजिकतेचा विकास’; ‘आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय’; ‘महर्षी कार्ल मार्क्स व फुले’; ‘डॉ. आंबेडकर व एम. एन. रॉय’ आदी निबंध हे लक्षवेधक व अभ्यासाला चालना देणारे, तसेच एकूण भारतीय जीवन कुठे चालले आहे, याचा अभ्यासपूर्ण पडताळा घेणारे आहेत.

सत्यशोधन हा पाया, विचारांची क्षमता, समतोल व व्यापक दृष्टिकोन, समाजाप्रती वाटणारी प्रचंड आस्था व तळमळ, निरपेक्ष भावना, अशा रा.नां.च्या लेखकीय व्यक्तित्वाशी संबंधित अनेक बाबींचा उलगडा ‘विचारशलाका’मधून होतो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

वास्तविक, फळाची अपेक्षा न धरता समाजहितैषी विचार सातत्याने मांडणार्‍या रा.नां.च्या एकूण विचारकार्याची तरुणांच्या दृष्टीने प्रस्तुतता काय, याचा कानोसा घेतल्यास त्यांच्यातील ‘संवादोत्सुक’ तरुणही भेटतो. त्या दृष्टीने पाहता ‘व्यायामप्रिय महात्मा फुले यांचा अल्प परिचय’ हा रा.नां.नी इयत्ता सातवीमध्ये असताना लिहिलेला निबंध (१९३३) महत्त्वाचा आहे. त्यातून जोतीरावांच्या विचारांकडे जाणारा रस्ता दाखवणारा १९ वर्षांचा तरुण ‘रामचंद्र चव्हाण’ भेटतो.

रा.नां.च्या समग्र लेखनातील असे अनेक निबंध किंवा लेख तरुणांशी त्यांची नाळ जुळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे वाटतात. उदा. ‘विकृती नाहीशी करून संस्कृती शुद्ध करणे, हादेखील साहित्याचा उद्देश असावा’, ‘बुद्धीविक्रय बंद होऊन बुद्धिवाद बळावला पाहिजे, बौद्धिक स्वातंत्र्य हेच सर्वश्रेष्ठ आहे’, ‘माणसाला पिळणारे व पिळून घेणारे असे दोन प्रकार राहतील तोपर्यंत तरी मार्क्स व फुले मार्गदर्शक राहतील म्हणजे नेतृत्व करतील,’ इत्यादी इत्यादी या पुस्तकातून अशी शेकडो उदधृते वेचून काढली तर तरुण पिढीसाठी सुविचारांचे नवे पुस्तक होईल. तरुणांशी संवादी असणारे किती तरी विचार रा.ना. सहजगत्या मांडून जातात.

शेवटी, रा.नां.च्या शब्दांचा आधार घेऊन ‘पक्षातीत राहून नि:पक्षपातीपणे विवेक करणारे विवेकवंत फारच दुर्मीळ असतात’ आणि ‘अभ्यास-मनन-चिंतनाद्वारे प्रश्नांचे चालू स्वरूप व पुढील परिणाम यांचे भविष्यकालीन स्वरूप विचारवंत व्यक्त करू शकतात’ हे पाहता रा. ना. चव्हाण यांच्यासारख्या नि:स्पृहपणे विचार मांडणी करणाऱ्या विचारकाच्या विचारांची आजच्या समाजातील दांभिक कोलाहलात किती आवश्यकता आहे, याची खात्रीच पटते.

..................................................................................................................................................................

विचारशलाका - रा. ना. चव्हाण,

रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाई

पाने - १९२, मूल्य - २५० रुपये.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Gamma Pailvan

Fri , 14 August 2020

सुशील धसकटे, लेखाबद्दल धन्यवाद. चव्हाणांचं हे वाक्य महत्त्वाचं वाटलं :

“शिक्षण व शहाणपण हातात हात घालून कसे पुढे जाईल, हा आजचा प्रश्न आहे.”
माझ्या मते हा प्रश्न कधीच सुटणार नाहीये. कारण की वर ज्याला शिक्षण म्हटलंय ते शिक्षण नाहीच्चे मुळी. आपण जे शाळाकॉलेजात शिकतो ते केवळ प्रशिक्षण आहे. कसलं प्रशिक्षण आहे ते बरं?
ते आहे कारकून बनायचं प्रशिक्षण. भले पदवी काहीही असो, विद्यार्थी कारकूनच बनणार. बदल तिकडे पाहिजे.
आपला नम्र,
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......