मुरलीधर शिंगोटे : ‘मुंबई नावाच्या विद्यापीठा’त शिकलेला मातब्बर संपादक-मालक
पडघम - माध्यमनामा
रवि आमले
  • मुरलीधर शिंगोटे
  • Thu , 06 August 2020
  • पडघम माध्यमनामा मुरलीधर शिंगोटे Muralidhar Shingote मुंबई चौफेर Mumbai Choufer पुण्यनगरी Punyanagari आपला वार्ताहर Aapla Vartahar

‘मुंबई चौफेर’, ‘पुण्यनगरी’, ‘आपला वार्ताहर’, ‘हिंदमाता’, ‘कर्नाटक मल्ला’ या वर्तमानपत्रांचे मालक-संपाक मुरलीधर शिंगोटे (वय ८४) यांचे आज दुपारी एक वाजता जुन्नर तालुक्यातील उंब्रज या त्यांच्या गावी वृद्धापकाळाने निधन झाले. एका चार पानी सायंदैनिकातून माध्यमसंस्थेचा मोठा वटवृक्ष उभा करणे ही साधी कामगिरी नाही. शिंगोटे यांनी ती करून दाखवली. एका मराठी माणसाने तीन मराठी, एक हिंदी आणि दोन दाक्षिणात्य भाषेतील वृत्तपत्रे काढून ती लोकप्रिय करून दाखवणे, हे यश जितके देदीप्यमान, तितकेच प्रेरणादायीही आहे.

..................................................................................................................................................................

वृत्तपत्राचा संपादक या पदाची एक प्रतिमा असते वाचकांच्या मनात. संपादक म्हणजे बुद्धीचे सागर, विविध विषयांचे माहितगार, धीमंत, अभ्यासू विश्लेषक वगैरे वगैरे… अलीकडे हे असे संपादक दुर्मीळच. अर्थात प्रत्येक काळात ते तसेच होते. तो वेगळा विषय. पण या सगळ्या प्रतिमांना छेद देणारे एक संपादक होते ते म्हणजे मुरलीधर शिंगोटे.

उंच तगडी अंगकाठी, पांढरी खुरटी दाढी, बुशकोट आणि साधी पँट. बोलणे साध्या रांगड्या जुंदरी भाषेतले. वावरणेही तसेच साधे. असे हे संपादकाच्या नेहमीच्या प्रतिमेहून वेगळे असे व्यक्तिमत्त्व. ते फार शिकलेले नव्हते. चौथीतून शाळा सोडली होती त्यांनी. त्यामुळे पुढची पत्रकारितेतील पदवी वगैरे तर खूपच दूरच्या गोष्टी. पण शिक्षण हे नेहमीच शाळा-महाविद्यालयांच्या चार भिंतींत मिळते असे नाही. अनुभव नावाची एक मोठी शाळा असतेच जगात. मुरलीधरबाबा तेथे शिकले होते. कविवर्य नारायण सुर्वे यांच्या शब्दांत सांगायचे तर ‘मुंबई हे त्यांचे विद्यापीठ’ होते. त्या अनुभवजन्य ज्ञानाच्या जोरावरच त्यांनी या मुंबईतून माध्यमांचे एक विश्व निर्माण केले. 

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

ओतूरजवळच्या उंब्रज गावातला त्यांचा जन्म. ते साल होते १९३८. तेव्हा उंब्रज म्हणजे अगदीच आडगाव. त्याच गावातून मुंबईत आलेल्या बुवाशेठ दांगट यांनी साठच्या दशकात मुंबईतील वृत्तपत्र वितरण व्यवसायात चांगलाच जम बसवला होता. चौथीतून शाळा सोडलेल्या मुरलीधरबाबांनी बुवाशेठ यांचे बोट धरले. त्यांच्याकडे ते वृत्तपत्र टाकण्याचे काम करू लागले. शिक्षण कमी असले, तरी अभ्यासाची ओढ दांडगी होती त्यांच्यात. अंगात धाडस होते आणि मनगटात रगही. त्या जोरावर पुढे त्यांनी स्वतःचा वृत्तपत्र वितरण व्यवसाय सुरू केला. तो आजही सुरू आहे. ते त्यांचे पहिले प्रेम. त्यामुळे ते कदाचित पुढेही त्याच विश्वात रमले असते. पण या व्यवसायात त्यांना एक मोठा फटका बसला आणि त्यांचे सगळे आयुष्यच पालटले.

विसाव्या शतकातील ते शेवटचे दशक. तेव्हाच्या एका मोठ्या बहुखपाच्या मराठी दैनिकाचे वितरण शिंगोटे यांच्याकडे होते. ते त्या दैनिकाच्या संपादक-मालकाने अचानक काढून घेतले. शिंगोटे यांच्यावर अक्षरशः आभाळच कोसळले. पदरी अनेक विक्रेती मुले होती. काम कमी झाल्यामुळे त्यांना काढून टाकण्याचा एकच पर्याय आता शिंगोटे यांच्यासमोर होता. तो व्यावहारिकही ठरला असता. पण शिंगोटे हे वारकरी संस्कारातले. आपला तोटा भरून काढण्यासाठी पदरच्या कामगारांच्या घरातली चूल विझवावी, हा व्यवहारवाद काही त्यांना पटेना. त्यांना त्या मुलांना बसून पगार दिला. पण ते किती काळ चालणार? अखेरीस त्यांनी एक निर्णय घेतला. आपणच एक वृत्तपत्र काढायचे आणि त्याचे वितरण करायचे. संकटे सगळ्यांवरच येतात. संकटांना संधी समजणारे थोडेच असतात. शिंगोटे हे त्यातले होते.

वर्तमानपत्र हे सुशिक्षितांचे क्षेत्र. शिंगोटे यांना ते काढण्याचा, चालवण्याचा अणुमात्र अनुभव नव्हता. पण त्यांच्याकडे विकण्याची कला होती आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपला ग्राहक कोण आणि त्याला काय हवे हे ते चांगलेच जाणून होते. यालाच वाचकांची नाडी ओळखणे म्हणतात. यासाठी आज मोठमोठ्या माध्यम समूहांकडे मोठमोठी माणसे असतात. त्यासाठी संगणक आणि त्यातील कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारी सॉफ्टवेअर असतात. मुरलीधर शिंगोटे यांच्याकडे लोकलमध्ये, फलाटांवर वृत्तपत्रे विकण्यातून आलेली शहाणीव होती. त्यातून त्यांनी १९९४ साली ‘मुंबई चौफेर’ हे चार पानी सायंदैनिक सुरू केले. त्यास ‘लंगोटीपत्र’ म्हणून तेव्हाच्या बड्यांनी हिणवले खरे. पण त्याच चार पानांतून त्यांनी आपल्या माध्यमसंस्थेचा वटवृक्ष उभा केला. तीन मराठी दैनिके, एक हिंदी आणि दोन दाक्षिणात्य भाषेतील वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली आणि वाढवली. माध्यमक्षेत्रातील एका मराठी माणसाचे हे यश देदीप्यमानच म्हणावयास हवे.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : इब्राहिम अल्काझी यांच्याविषयी निस्सिम इझिकेल यांनी लिहिलेली कविता

..................................................................................................................................................................

एक संपादक म्हणून त्यांचे योगदान काय, हा प्रश्न आपले मराठी सारस्वत येथे विचारू शकतील. त्यांनी कधीच काही लिहिले नाही. पण आपला वाचक नेमका कोण आणि त्याला काय लिहिलेले भावते हे त्यांना चांगलेच माहीत होते. ते सांगत, की माझा वाचक हा गरीब, मजूर, कामगार, रिक्षावाला, कमी शिक्षित गृहिणी या वर्गातला आहे. जगात काय चाललेय हे त्यालाही समजून घ्यायचे असते. पण ते साध्या भाषेत. राजकारण आणि गुन्हेगारी हे विषय चघळायला त्याला आवडते.

‘सकाळ’चे संस्थापक नानासाहेब परुळेकर यांनी सुरुवातीच्या काळात पुण्यातील वाचकांचे एक सर्वेक्षण केले होते, की त्यांना काय आवडते? त्यातूनही नेमके हेच दोन विषय आघाडीवर आले होते. शिंगोटे यांचा कल मात्र या विषयांतील थरारकता, सनसनाटी याकडे होता. छोट्या, अतिस्थानिक बातम्या यांवर त्यांचा भर होताच, पण त्यांनी फार पूर्वीच्या ‘लोकसत्ता’ने यशस्वी करून दाखवलेले शब्दकोड्यांचे मॉडेलही स्वीकारले होते. मोठमोठी शब्दकोडी आणि त्याबरोबर राशीभविष्य ही आपल्या दैनिकाची बलस्थाने आहेत हे शिंगोटे यांना स्वअभ्यासातून उमगले होते. समाजाच्या खालच्या स्तरातील माणसांची खरी गरज ही रंजन हीच असते. हिंसा आणि भय या आदिम भावनांचे असंस्कारित रूप त्याला मोहवत असते. हे शिंगोटे यांनी जाणले होते. त्यांच्या वृत्तपत्रांच्या यशस्वीतेचे हे गमक होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पण हे एवढेच असून चालत नसते. वितरण हा वृत्तपत्र व्यवसायातील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आणि त्यात वेळेला अतिशय महत्त्व हे सर्वांनाच माहीत असते. पण त्याबाबतीत शिंगोटे यांच्याइतका कटाक्ष अभावानेच आढळतो. अंक बाजारात यायला एका मिनिटाचाही विलंब त्यांना खपत नसे. अशा वेळी मग त्यांच्यातला ‘विक्रेता’ शब्दांचा हंटर घेऊन उभा राही. एरवी आपल्या पत्रकारांवर, कामगारांवर प्रेम करणारा त्यांच्यासारखा मालक-संपादक विरळाच. गेल्या काही वर्षांपासून एकूणच वृत्तपत्रसृष्टी अडचणीत आलेली आहे. करोनाकहराने त्याची गती वाढवली आहे. अशा काळात हा वितरणातील बादशहा आणि एक मातब्बर संस्थापक-संपादक काळाच्या पडद्याआड जाणे हा मराठी वृत्तपत्रविश्वास मोठाच धक्का आहे. त्यांस आदरांजली.

..................................................................................................................................................................

लेखक रवि आमले दै. ‘सकाळ’ (मुंबई)चे निवासी संपादक आहेत.

ravi.amale@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......