अजूनकाही
१. प्राप्तिकर विभागाने कर्नाटकाचे एक मंत्री आणि प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये सुमारे १६२ कोटींहून अधिक अघोषित मालमत्ता आढळून आली. या छाप्यात ४१ लाख रुपयांच्या रोख रकमेसह सोने, चांदीचे दागिनेही जप्त करण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात कर्नाटकचे लघुउद्योग मंत्री रमेश जारकिहोळ्ळी आणि प्रदेश महिला काँग्रसेच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गोकाक आणि बेळगावी येथील मालमत्तेवर छापे टाकण्यात आले.
अभिनंदन, आता काही प्रश्न. ४१ लाखांची रोख रक्कम नव्या नोटांमध्ये होती का? तसं असल्यास त्यांनी ती कोणत्या बँकेतून, कशी मिळवली होती? त्या बँकेच्या अधिकाऱ्यांवर-कर्मचाऱ्यांवर कारवाई होईल का?
…………………………………..
२. पाकिस्तानच्या अणुकार्यक्रमाला उत्तर देण्यासाठी १९८५ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी सरकारने हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याची तयारी केली होती. दक्षिण अशियात अणवस्त्र बनवण्याची स्पर्धा सुरू होऊ नये, याकरता अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी दोन्ही देशातील तणाव संपवण्यासाठी एक दूत पाठवण्याची योजना केली होती. भारतातील कडक सुरक्षाव्यवस्थेमुळे भारताच्या अणुकार्यक्रमाची विस्तृत माहिती मिळवणे कठीण गेले होते, असा उल्लेखही सीआयएने नुकत्याच प्रसृत केलेल्या दस्तावेजांत करण्यात आला आहे.
काय सांगता काय? स्वातंत्र्यपूर्व काळातही (म्हणजे २०१४च्या आधी) पाकिस्तानच्या कुरापतींना सज्जड उत्तर देण्यासाठी सज्ज असलेला पंतप्रधान भारताला लाभला होता? शिवाय असल्या तयाऱ्या गुप्त ठेवायच्या असतात, गावभर त्यांचा डांगोरा पिटत फिरायचं नसतं, हेही त्याला कळत होतं? आणि तो काँग्रेसी होता? शिवाय गांधी होता? शिवाय इटलीचा जावई होता? भयंकर अविश्वासार्ह. ही माहिती जारी करण्यात अमेरिकेचा नक्कीच काहीतरी डाव असणार…
…………………………………..
३. हिंदू, बौद्ध किंवा अन्य कोणत्याही धर्मावर टीका केल्यास चालते. पण मुस्लिम धर्मावर टीका केल्यास माझ्याविरोधात फतवा निघतो. कट्टरतावादी संघटना मला ठार मारण्याची धमकी देतात. : प्रख्यात बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन
तस्लिमाबाई, इथे कोणत्याही धर्माच्या माणसाला अगदी फेसबुकवरही हाच अनुभव येतो. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाहीत, त्यांच्यातलं आपल्याला काही कळत नसेल, अशी शंकाही कोणाला येत नाहीत. ज्याअर्थी त्या आपल्याला पटत नाहीत, त्याअर्थी त्या चूक आहेत, असं ठरवून मोकळे होतात लोक. चर्चा-संवादाचा मार्ग सोडून विरोधी विचाराच्या माणसांची हत्या करून टाकण्याची परंपरा इथे गांधींपासून दाभोळकर-कलबुर्गींपर्यंत सशक्त आहे.
…………………………………..
४. फरारी उद्योगपती विजय मल्या यांच्या बुडीत कर्जाप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने आयडीबीआय बँकेच्या माजी अध्यक्षांसह तीन अधिकाऱ्यांना आणि किंगफिशर एअरलाइन्सच्या चार माजी अधिकाऱ्यांना सोमवारी अटक केली. नियम डावलून गैरमार्गाने कर्ज मंजुर केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईबद्दल 'बडे मासे पकडले गेले' म्हणून ढोल पिटले जात आहेत. या सगळ्यांना कामाला लावणारे मल्याभाऊ देशाच्या संसदेत पोहोचले होते आणि बिनबोभाट त्यांना परदेशात जाऊ दिलं गेलं आणि ते अजून जाळ्याबिळ्यात अडकलेले नाहीत, अडकण्याची शक्यताही नाही. मल्ल्याला आणलात, तर त्याला अर्थ. अन्यथा, कोणातरी मिरची, लवंग, लसूणीला पकडून दाऊदच्या साम्राज्याला हादरे देण्याच्या बाता मारण्याइतकंच हे निरर्थक आहे.
…………………………………..
५. संपूर्ण तमिळनाडूत जल्लिकट्टू खेळाला कायमस्वरूपी परवानगी मिळावी, या मागणीसाठी हजारो लोक निदर्शने करत असतानाच तामीळनाडू सरकारने जल्लिकट्टू खेळ या वर्षीसाठी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायद्यातून वगळणारे विधेयक विधानसभेत सोमवारी आवाजी मतदानाने संमत केले.
इतिहासात हा दिवस काळ्या अक्षरांत नोंदवला जाईल, यात शंका नाही. आता सर्व ठिकाणचे बैलबुद्धी लोक आपापल्या परंपरांमधील प्राण्यांच्या छळांचे सोहळे पुनरुज्जीवित करायला निघतील. वर आपण जगद्गुरू वगैरे असल्याचे दंभ मिरवणार. या आचरट चाळ्यांमुळे प्रगत देशांकडून आर्थिक बूच लागलं की घड्याळाचे काटे उलटे फिरवून डबक्यांमध्येच डुबक्या मारत राहण्याची किंमत समजेल… कदाचित.
…………………………………..
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment