अर्वाचीन काळात कोट्यवधी भारतीयांच्या मनात ‘रामा’चे नाव कोणी रुजवले असेल तर, ते म. गांधीजींनी!
पडघम - देशकारण
अरुण खोरे
  • म. गांधी आणि प्रभूरामचंद्र
  • Wed , 05 August 2020
  • पडघम देशकारण महात्मा गांधी Mahatma Gandhi श्रीराम Shri Rama अयोध्या Ayodhya राममंदिर Ram Mandir राम जन्मभूमी Ram Janmabhoomi नरेंद्र मोदी Narendra Modi

१.

उत्तर प्रदेशातील रामाची जन्मभूमी असलेल्या अयोध्या शहरात नुकतेच राममंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत झाले. त्यानिमित्ताने देशातील, परदेशातील माध्यमांचे सगळे प्रतिनिधी शरयू नदी किनाऱ्यावर असलेल्या अयोध्यानगरीत जमले आहेत.

रामजन्मभूमीच्या जागेच्या संदर्भातील ऐतिहासिक निवाडा सर्वोच्च न्यायालयाने २०१९च्या नोव्हेंबर महिन्यात दिल्यानंतर यासंबंधी हालचाली सुरू झाल्या. बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी पाडल्यानंतर जे न्यायालयीन खटले सुरू झाले होते, त्याचा एकत्रित विचार करून सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी हा निवाडा जाहीर केला. त्यानंतर आता केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश राज्य सरकार या दोघांनी मिळून या भूमिपूजनाची तयारी सुरू केली होती.

हा प्रसंग ‘जागतिक इव्हेंट’ कसा होईल या दृष्टीने सर्व माध्यमे प्रचंड सक्रिय झाली आहेत. गेले काही दिवस टीव्ही वाहिन्यांवर आणि वृत्तपत्रांमधून जे कव्हरेज सुरू आहे, त्यामुळे १३८ कोटींच्या या खंडप्राय अशा रामाच्या देशात फक्त राममंदिराचे भूमिपूजन हाच विषय सर्वाधिक प्राधान्याचा आहे का, असा प्रश्न लक्षावधी लोकांच्या मनात निश्चितच निर्माण झालेला असेल. त्यावर कोणी बोलणार नाही, कारण रामभक्त आणि त्यातही अयोध्यानगरीचे साधुसंत हे इतके आग्रही आणि उतावळे आहेत की, ज्यामुळे त्यांना सर्वसामान्य भारतीयांच्या मनातील चिंता समजू शकणार नाही.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

अशा वेळी माझ्यासारख्या सामान्य भारतीय पत्रकाराला गांधीजींची आठवण येते. या देशात अर्वाचीन काळात ब्रिटिश सत्तेचा अंमल असताना कोट्यवधी भारतीयांच्या मनात ‘रामा’चे नाव कोणी रुजवले असेल तर ते गांधीजींनी! आणि म्हणूनच फाळणीच्या काळात नवी दिल्लीच्या परिसरात झालेल्या दंगली, भारताच्या पूर्व सीमेवर झालेल्या अनेक अत्याचारांच्या प्रसंगी प्रार्थना सभा घेऊन गांधीजींनी शांतता प्रस्थापित केली होती. या देशातील सर्वसामान्य भारतीयांच्या मनातील रामाला जागं करणारा हा महात्मा होता.

२.

गांधीजींनी आपल्या आत्मचरित्रात अर्थात ‘सत्याचे प्रयोग’ या पुस्तकात ‘सत्य हाच आपला ईश्वर’ असल्याचे प्रतिपादन करताना लहानपणापासून रामायणकथेचा आपल्यावर किती प्रभाव पडला, हे तपशीलवार सांगितले आहे. विशेषत: श्रावण बाळाचे मातृ-पितृ प्रेम याकडे त्यांनी विशेष निर्देश केला आहे. हे सांगत असताना आपल्या छोट्या-मोठ्या चुकांची कबुली द्यायलाही गांधीजी विसरत नाहीत. त्यामुळे या पुस्तकात व्यापक अर्थाने ईश्वराची किंवा रामाची आठवण त्यांना अनेकदा झाली, हे त्यांनी स्वानुभवाने लिहिले आहे.

लहानपणी मोहनदासने राजा हरिश्चंद्र आणि श्रावणाचे आख्यान बघितले होते. हरिश्चंद्राचे आख्यान बघितल्यानंतर आपणही सत्यवादी का होऊ नये, असे त्याच्या मनात आले. गांधीजींनी लिहिले आहे, “हे माझ्या मनात, सृष्टीत हरिश्चंद्र आणि श्रावण आजही जिवंत आहेत, आजसुद्धा मी ती नाटके वाचली तर आजही मला अश्रू येतील असे वाटते.”

याच पुस्तकातील ‘वडिलांचा मृत्यू व माझी नालायकी’, हे प्रकरण प्रत्येकाने वाचावे असे आहे. आपल्याला १५व्या-१६व्या वर्षांपर्यंत फारसे धार्मिक शिक्षण मिळाले नाही, असे सांगणाऱ्या गांधीजींनी आपल्या या पुस्तकात हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लीम, जैन आणि शीख या धर्मांच्या अभ्यासाचे मार्ग कुठल्या ग्रंथांनी खुले झाले, सोपे झाले याचे अनेक तपशील सांगितले आहेत. इंग्लंडला बॅरिस्टरीच्या शिक्षणासाठी गेल्यावर आईने दिलेल्या शपथांचे कसे पालन केले, याचाही उल्लेख त्यांनी ‘सत्याचे प्रयोग’मध्ये केला आहे.

त्यातला एक प्रसंग गांधीजींनी ‘निर्बल के बल राम’ या शीर्षकाच्या एका छोट्या भागात लिहिला आहे. एका बंदरावरील बोटीमध्ये तरुण प्रवाशांचा पत्त्यांचा खेळ सुरू होतो आणि त्यात पुढे काही मोहपाश असतात. तेथे जाईपर्यंत त्यांचा जो मित्र असतो, तो त्यांना म्हणतो, “अरे, तुझ्या अंगात सैतान कसा संचारला! हे तुझं काम नाही. पळून जा!” आपण लज्जित होऊन भानावर आलो. आणि  आईपाशी केलेली प्रतिज्ञा मला आठवली, असे त्यांनी लिहिले आहे.

गांधीजींचे धर्मविषयक वाचन प्रचंड होते. भगवद्गीता, उपनिषद, जुना करार, नवा करार, गौतम बुद्धांचे चरित्र, कुराण आणि अन्य धर्माशी संबंधित असलेली अनेक ग्रंथसंपदा त्यांनी वाचली होती, अभ्यासली होती. टॉलस्टॉय यांच्या ‘द किंगडम ऑफ गॉड इज विदिन यू’, ‘गॉस्पेल इन ब्रीफ’, ‘व्हॉट टू डू?’ या पुस्तकांचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला असे त्यांनी नमूद केले आहे.

केंद्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी प्रदीर्घ काळ काँग्रेसची सरकारे अनेक राज्यांत होती आणि दिल्लीतही. गांधीजींचे तोंडदेखले नाव घेण्यापलीकडे या पक्षांच्या सरकारांनी काहीच केले नाही! शाळेच्या अभ्यासक्रमात गांधीजींचे ‘सत्याचे प्रयोग’ सर्व स्तरांवर अनिवार्य म्हणून समाविष्ट करणे अजिबात अवघड नव्हते. पण ते काँग्रेसनेही केले नाही आणि आता तर भाजपचे सगळेच नेते गांधीजींचा किती वृथा अनुनय करतात, हे सांगण्याची गरज नाही!

..................................................................................................................................................................

हेही वाचा :  राममंदिराच्या निर्माणाचं श्रेय इतिहासात कुणाच्या नावावर जमा होईल?

..................................................................................................................................................................

३.

फाळणी काळात दिल्लीमध्ये, भारताच्या पूर्व सीमेवर आणि पंजाबलगतच्या पश्चिम सीमेवर दंगली उसळल्या होत्या, तेव्हा गांधीजी दिल्लीतील वाल्मिक कॉलनीत मुक्कामाला होते. त्यानंतर काही दिवस कोलकत्ता, बिहार तसेच नोआखली या भागात शांतता प्रस्थापनेसाठी केलेली पदयात्रा  आणि शेवटी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये असताना त्यांची हत्या…

गांधीजींचा हा सगळा शेवटचा कालखंड प्यारेलाल यांनी ‘द लास्ट फेज’ या द्विखंडीय ग्रंथात प्रत्येक दिवसागणिक नोंदलेला आहे. ‘द हिंदू’ या दैनिकाने गांधीजींच्या शेवटच्या दोनशे दिवसांची दैनंदिनी प्रकाशित केली आहे. (From the pages of The Hindu : Mahatma Gandhi- The Last 200 days) साधारणत: १५ जुलै १९४७ ते ३० जानेवारी १९४८ या काळातील गांधीजींची सगळी वाटचाल आपल्याला तपशीलवार पाहायला मिळते. यानिमित्ताने गांधीजींनी जिथे जिथे प्रार्थना सभा घेतल्या, पदयात्रा केल्या, अशा सर्व ठिकाणी त्यांनी जे विचार मांडले, त्याचे चांगले संकलन झाले आहे. या काळात त्यांनी काश्मीरचा दौरा केला. श्रीनगरमधील प्रार्थना सभेला २० हजार लोकांची गर्दी झाली होती.

यातील काही प्रार्थना सभांमधून गांधीजींनी दिवाळी, फटाके, दिवाळीच्या पणत्या आणि आणि रामाचा विजय अशा काही गोष्टींवर भाष्य केले आहे. उद्याच्या राममंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने गांधीजींचे हे विचार आपण समजून घेतले पाहिजेत. पंतप्रधान आणि विविध पक्षांचे नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री या सर्वांनीच गांधीजी संकट काळात काय सांगत होते, याचे भान ठेवले पाहिजे.

आणखी एक गोष्ट सांगायला हवी, ती म्हणजे गांधीजींची  प्रार्थना सभा ही एका धर्माची नव्हती, ती सर्व धर्मांना सामावणारी, सर्व धर्मांच्या श्रद्धांना, उपासना यांना एकरूप करणारी अशी प्रार्थना सभा होती. त्यामुळे त्यांचा राम हा वेगळा होता. गांधीजींचे हे विचार आपण समजून घेतले नाहीत, तर आपण सच्चे भारतीय होऊ शकणार नाही.

..................................................................................................................................................................

हेही वाचा :  आजच्या ‘सुपरडुपर ऐतिहासिक दिवसा’ची संक्षिप्त पूर्वपीठिका

..................................................................................................................................................................

‘रामनाम हे माझे पेनिसिलिन आहे’, असे त्यांनी एकदा त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर सुशीला नायर यांना सांगितले. ईश्वराचा शोध म्हणजे सत्याचा शोध, या भूमिकेतून गांधीजी आपले विचार मांडत होते आणि त्यासाठी सत्यनिष्ठ रामाचे प्रतीक समोर ठेवत होते. उपवासाच्या किंवा उपोषणाच्या काळात ते नेहमीच रामनाम जपत असत. ईश्वराला जवळ आणायचे असेल, त्याचा शोध घ्यायचा असेल तर त्यासाठी मुळात गरज आहे अंतःकरणातील विशुद्धतेची, असे ते वारंवार सांगत.     

४.

‘तुमचे हृदय  हेच देवालय आहे’, असे या प्रार्थना सभांमधून त्यांनी अनेकदा सांगितले. ३१ ऑक्टोबर १९४७ रोजी प्रार्थना सभेत आरंभी दिलीप कुमार रॉय यांनी एक सुंदर भजन म्हटले, ते ऐकून गांधीजी अतिशय खूश झाले. प्रार्थना सभाही निर्विघ्नपणे पार पडली होती.

गांधीजी म्हणाले, “तुमच्या हृदयरूपी देवालयात प्रेमभाव असला पाहिजे. आता तुम्ही भजन ऐकले त्याचा अर्थ असा आहे की, आपले अंत:करण हे देवालय आहे आणि ते तसे समजून आपण त्यात परस्पराभूती प्रेम ठेवले पाहिजे.”

स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काही महिन्यांत फाळणीच्या दंगली शमल्या नव्हत्या. त्यामुळे गांधीजी फिरत होते, संकटग्रस्तांना दिलासा देत होते. प्रार्थना सभेतून शांती-सहिष्णुतेचा संदेश देत होते. नोव्हेंबर १९४७मध्ये दिवाळीच्या दिवसातील एका प्रार्थनासभेत गांधीजींनी उपस्थितांना सांगितले, “आपण दिवाळी का साजरी करतो? कारण रामाने रावणावर विजय प्राप्त केला म्हणून. पण भारतात रामराज्य कुठे आहे? मग आपण दिवाळी का साजरी करायची? ज्यांच्या अंत:करणात राम आहे त्यांनी फार तर ती करावी.”

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

डिसेंबर १९४७मध्ये दिल्ली आणि पानिपत येथील दंगलग्रस्तांच्या छावण्यांना त्यांनी भेट दिली. त्यानंतरच्या प्रार्थना सभेत बोलताना गांधीजींनी हिंदू-मुस्लीम अशा दोन्ही धर्मातील लोकांना सांगितले की, ‘हिंदूंचे रक्षण मुस्लिमांनी करावे आणि मुस्लिमांचे रक्षण हिंदूंनी करावे. असा विश्वास निर्माण झाला तरच या दंगली थांबतील!’ याच सभेत बोलताना गांधीजी शेवटी म्हणाले, ‘आपल्या इथे रामराज्य आणायचे आहे, पण तुमचे सहकार्य नसेल तर ते कसे येईल?’

माझ्यासारखे कोट्यवधी भारतीय राम-कृष्ण यांना मानतात, त्यांची प्रार्थना करतात, पण म्हणून त्यांच्या श्रद्धेचा गैरफायदा राजकीय शक्तींनी, धार्मिक संघटनांनी घेऊ नये, असे नम्र आवाहन आहे.

ताजा कलम : हे लिहिण्यापूर्वी दै. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या संपादकीय पानावरील प्रा. सुहास पळशीकर यांचा ‘AUGUST 5’, हा लेख वाचला आणि खूप चिंतित झालो. भारताचे जुने प्रजासत्ताक मोडीत काढून राममंदिराच्या भूमिपूजनाने बहुसंख्याकांच्या धर्माची द्वाही फिरवणारे नवे प्रजासत्ताक येणार असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे. हा ऐतिहासिक क्षण असेल तर त्याच वेळी काँग्रेससह देशातील सर्व विरोधी पक्षांनी मुक्या प्रेक्षकाची भूमिका बजावली, हेही इतिहासात नमूद होईल; असेही प्रा. पळशीकर यांनी म्हटलं आहे. त्यांचा हा लेख सर्वांनीच आवर्जून वाचावा असा आहे.

..................................................................................................................................................................

लेखक अरुण खोरे ज्येष्ठ पत्रकार आहेत.

arunkhore@hotmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

अभिनेते दादा कोंडके यांच्या शब्दांत सांगायचे, तर महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, संस्कृतीकारण ‘फोकनाडांची फालमफोक’ बनले आहे

भर व्यासपीठावरून आईमाईवरून शिव्या देणे, नेत्यांचे आजारपण, शारीरिक व्यंग यांवरून शेरेबाजी करणे, महिलांविषयीच्या आपल्या मनातील गदळघाण भावनांचे मंचीय प्रदर्शन करणे, ही या योगदानाची काही ठळक उदाहरणे. हे सारे प्रचंड हिंस्त्र आहे, पण त्याहून हिंस्र, त्याहून किळसवाणी आहे- ती या सर्व विकृतीला लोकांतून मिळणारी दाद. भाषणाच्या अखेरीस ‘भारत ‘माता’ की जय’ म्हणणारा एक नेता विरोधकांच्या मातेचा उद्धार करतो. लोक टाळ्या वाजतात. .......

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ मराठी भाषेला राजकारणामुळे का होईना मिळाला, याचा आनंद व्यक्त करताना, वस्तुस्थिती नजरेआड राहू नये...

‘अभिजात भाषा’ हा ‘टॅग’ लावून मराठीत किती घोडदौड करता येणार आहे? मोठी गुंतवणूक कोण करणार? आणि भाषेला उर्जितावस्था कशी आणता येणार? अर्थात, ही परिस्थिती पूर्वीपासून कमी-अधिक फरकाने अशीच आहे. तरीही वाखाणण्यासारखे झालेले काम बरेच जास्त आहे, पण ते लहान लहान बेटांवर झालेले काम आहे. व्यक्तिगत व सार्वजनिक स्तरावरही तशी उदाहरणे निश्चितच आहेत. पण तुकड्या-तुकड्यांमध्ये पाहिले, तर ‘हिरवळ’ आणि समग्रतेने पाहिले (aerial view) तर ‘वाळवंट.......

धोरणाचा ‘फोकस’ बदलून लहान शेतकरी, अगदी लहान उद्योग आणि ग्रामीण रस्ते, सांडपाणी व्यवस्था, शाळा, आरोग्य सुविधा, वीज, स्थानिक बाजारपेठा वगैरे केंद्रस्थानी आल्या पाहिजेत...

महाराष्ट्रात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांपैकी ६० टक्के लोक रोजगारात आहेत. बिहारमध्ये हे प्रमाण ४५ टक्के आहे. यातील महत्त्वाचा फरक महिलांबाबत आहे. बिहारमध्ये महिला रोजगारात मोठ्या प्रमाणात नाहीत. परंतु महाराष्ट्रात जे लोक रोजगारात आहेत आणि बिहारमधील जे लोक रोजगारात आहेत, त्यांच्या रोजगाराच्या स्वरूपात महत्त्वाचे फरक आहेत. ग्रामीण बिहारमधील दारिद्र्य ग्रामीण महाराष्ट्रापेक्षा कमी आहे.......