मोदी सरकार सत्तेत आल्यापासून भारतात रोज उजाडणारा दिवस मावळेपर्यंत ‘ऐतिहासिक’ झालेला असतो. त्यानंतर रात्र होते. मग पहाट. ती परत नव्या ‘ऐतिहासिक’ दिवसाला जन्म देते. तो दिवस पूर्वेकडून उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीनं दिवसभर ‘गोदी मीडिया’वर वैशाखातल्या प्रखर प्रकाशासारखा तापत राहतो. सरतेशेवटी दिवसभर तावूनसुलाखून तो ‘ऐतिहासिक’ म्हणून आकार घेतो. असं म्हणतात की, शुद्ध सोन्याचा दागिना घडवता येत नाही, त्यात थोडीशी भेसळ करावी लागते. तसंच काहीसं मोदी सरकार पुरस्कृत ‘ऐतिहासिक दिवसां’चंही होतं. काही दिवस पुरेशी ‘ऐतिहासिकता’ निर्माण करण्यात कमी पडतात. पण तो दोष मोदी सरकारचा नसून त्यांच्या पूर्णपणे अंकित असलेल्या ‘गोदी मीडिया’चा आहे. कोल्ह्याला सिंहाचा मुखवटा चढवता येऊ शकतो, पण त्यात सिंहाचे सामर्थ्य, त्याची शक्ती, झेप, आवाका भरता येत नाही. त्यामुळे एखाद्या दिवसाला ‘ऐतिहासिक’ म्हणून घडवण्यात ते कमी पडतात.
गेली सहा वर्षं मोदी सरकार सतत, रोजच्या रोज आपल्या कारकिर्दीतला प्रत्येक दिवस ऐतिहासिक व्हावा यासाठी प्रयत्न करतंय. सहा वर्षं उलटून गेल्यानंतरही त्यात फारसा खंड पडलेला नाही. म्हणजे आतापर्यंत या सरकारने दोन हजारांहून अधिक दिवसांना ‘ऐतिहासिक’ म्हणून घडवण्याचं काम केलं आहे. (ही काय खायची गोष्ट आहे का? पण नतद्रष्ट लोकांना मोदी सरकारचं कौतुकच नाही! तर ते असो.) त्यातले काही दिवस हे ‘सुपरडुपर ऐतिहासिक’, काही ‘नुसतेच सुपर ऐतिहासिक’, काही ‘पाऊण सुपर ऐतिहासिक’, काही ‘अर्धे सुपर ऐतिहासिक,’ काही ‘पाव सुपर ऐतिहासिक’ म्हणून मान्यता पावले आहेत. या दिवसांचा रोजचा ‘इव्हेंट’ सोहळा ‘गोदी मीडिया’वरून साजरा केला जातो. त्यामुळे लाखो भारतीयांना त्याचा घरबसल्या ‘याचि देही, याची डोळा’ लाभ घेता येतो.
अर्थात काही चिमूटभर लोक यात खोट काढण्याचा प्रयत्न करतीलच. कारण आपल्या देशात लोकशाही आहे. लोकशाहीत सगळ्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य असतं. सत्ताधाऱ्यांना ‘करून दाखवण्याचं’ स्वातंत्र्य असतं आणि सत्ताधाऱ्यांच्या टीकाकारांना ‘बोलून दाखवण्याचं’. गेल्या ७० वर्षांत जे काँग्रेस सरकारला ‘करून दाखवता’ आलं नाही, ते मोदी सरकारनं गेल्या सहा वर्षांत ‘करून दाखवलं’ आहे. त्याचप्रमाणे गेल्या ७० वर्षांत जे सत्ताधाऱ्यांच्या टीकाकारांना ‘बोलून दाखवता’ आलं नाही, ते गेल्या सहा वर्षांत ‘बोलून दाखवलं’ आहे. तरीही या देशात मोदी सरकारच्या काळात लोकशाही धोक्यात आली आहे, अशी ओरड काही कर्मदरिद्री लोक करतात. ते अशी ओरड करू शकतात, यातूनच या देशात लोकशाहीची मागच्या ७० वर्षांपेक्षाही अधिक चांगल्या प्रकारे जपणूक होतेय, याचाच पुरावा मिळतो!
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya
..................................................................................................................................................................
असो, तर आपला मूळ विषय ‘ऐतिहासिक दिवसां’बद्दलचा आहे. त्यामुळे त्याकडे वेळ न घालवता काळजीपूर्वक वळू. खरं तर विचारपूर्वक, नियोजनपूर्वक वळू. कारण मोदी सरकार कुठलाही विषय पुढे आणते किंवा मागे नेते, ते विचारपूर्वक, नियोजनपूर्वकच. त्यामुळे तोच कित्ता आपणही गिरवू. तर मुद्दा आहे ‘ऐतिहासिक’तेचा.
आपल्याकडे लोकशाहीच्या वैभवशाली परंपरेमुळे डावा इतिहास, मधला इतिहास, अधला-मधला इतिहास, खालचा इतिहास, वरचा इतिहास, बाजूचा इतिहास, झोपलेला इतिहास, जागा केलेला इतिहास, गाळलेला इतिहास, पाळलेला इतिहास, सरळ इतिहास, वाकडा इतिहास, खरा इतिहास, खोटा इतिहास, सरकारी इतिहास, बिनसरकारी इतिहास, अशा ‘इतिहासलेखना’च्या अनेक पद्धती प्रचलित झालेल्या आहेत. (कुणाला या यादीत ‘उजवा इतिहास’ ही शाखा नोंदवलेली नाही, असा प्रश्न पडेल. त्यांच्यासाठी खुलासा – पूर्वी हेटाळणी केलेली जाणारी ही इतिहासलेखनाची शाखा गेल्या सहा वर्षांत विशेष मान्यता पावली असून आता ती ‘खरा इतिहास’ या नावाने ओळखली जाते आहे!)
‘खरा इतिहास’ ही इतिहासलेखनाची शाखा वगळता बाकी सगळ्या शाखांमध्ये काही ना काही उणिवा आहेत. ‘डावा इतिहास’, ‘बिनसरकारी इतिहास’ वगैरे शाखांमध्ये तर भयंकरच उणिवा होत्या. पण इतिहासात उणिवा ठेवून त्या जोरावर दुकानदारी करता येते, हे लक्षात आल्यानं या शाखांतल्या काही (खरं म्हणजे बहुतेक) इतिहासकारांनी आपापली दुकानदारी चालवली. गेल्या ७० वर्षांतल्या काँग्रेसी सरकारच्या निकम्मेपणामुळे या इतिहासकारांचं फावलं. कारण काँग्रेसी सरकारने ‘सरकारी अर्थात अधिकृत इतिहास’लेखनाला हातच घातला नाही. आणि बिनसरकारी इतिहासलेखनाला उत्तेजनही दिलं नाही. त्यामुळे ‘नि:पक्ष इतिहास’, ‘सत्य इतिहास’ या इतिहासलेखनाच्या शाखा बळकटच होऊ शकल्या नाहीत. त्यांच्या कमकुवतपणामुळे ‘खरा इतिहास’ या इतिहासलेखन शाखेचीही कुचंबणा होत राहिली. अगदीच खरं सांगायचं तर ही शाखाच दुर्लक्षिली गेली.
पण सहा वर्षांपूर्वी विचारपूर्वक, नियोजनपूर्वक मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं. त्याने ‘सरकारी अर्थात अधिकृत इतिहास’, ‘नि:पक्ष इतिहास’, ‘सत्य इतिहास’, ‘खरा इतिहास’ या इतिहासलेखनाच्या शाखांना उत्तेजन दिलं, सरकारी अनुदान दिलं आणि त्यावर सरकारी मान्यताप्राप्त इतिहासकारांना नेमलं. त्यामुळे गेल्या सहा वर्षांत आपल्याला इतिहासाची केवढी मोठी आणि किती थोर परंपरा आहे, याची जाणीव भारतीयांना झाली. रोज भारतात उगवणारा दिवस ‘ऐतिहासिक’ ठरू लागला, तो मोदी सरकार आणि ‘गोदी मीडिया’च्या कृपेनं. त्यातून भारतीय इतिहासाची गौरवशाली परंपरा पुन्हा एकदा लखलखीत केली गेली. इतिहासाच्या या गौरवशाली वारश्याची पुन्हा ओळख करून दिल्यामुळे पाच वर्षांनंतर भारतीयांनी मोदी सरकारला आधीच्या पेक्षाही जास्त मतांनी निवडून दिलं.
मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये तर इतिहासाचे सारे कानेकोपरे घासूनपुसून लखलखीत केले जात आहेत. इतिहासाचं रोज एक पान सोनेरी अक्षरांत लिहिलं जात आहे. त्यामुळे हे दिवस बावणकशी सोन्यासारखी ‘ऐतिहासिक’तेची पताका खांद्यावर घेऊन उगवत आहेत. ते उगवतात पूर्वेकडून, त्यामुळे चिनी मिचमिच्या डोळ्यांत त्याच्या तेजाची किरणं आरपार घुसून त्याला भेदरून टाकतात, तर पश्चिमेला मावळतीसाठी गेल्यावर त्याच्या लाल-केसरी ज्वाला पाकड्यांना सळो की पळो करून टाकतात. त्यामुळे तर त्याची भारतात पूर्वीसारखे दहशतवादी हल्ले करण्याची शामत होत नाही. घडत्या ‘ऐतिहासिक’ दिवसाचं मार्गक्रमण पश्चिमेच्या दिशेनं सुरू झालं की, चिनी मिचमिच्या डोळ्यांमध्ये लालसा जागू लागते. पण त्यांचा असा काही बंदोबस्त मोदी सरकारने चालवला आहे की, विचारू सोय नाही. त्यामुळे चिनी मिचमिचे डोळे लवकरच कायमस्वरूपी ‘डिम’ होणार आहेत.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : राममंदिराच्या निर्माणाचं श्रेय इतिहासात कुणाच्या नावावर जमा होईल?
..................................................................................................................................................................
असो, तर आपला मूळ विषय ‘ऐतिहासिक दिवसां’बद्दलचा आहे. त्याकडे वळू या, काळजीपूर्वक, नियोजनपूर्वक.
आजचा दिवस भारताच्या आजवरच्या इतिहासातला ‘सुपरडुपर ऐतिहासिक’ दिवस आहे. संपूर्ण देशाच्या दृष्टीनं ‘अभूतपूर्व’ असा दिवस आहे. भारताला उज्ज्वल भविष्याकडे घेऊन जाणारा कालातीत दिवस आहे. संपूर्ण देशवासियांचं जनमानस अभिमानानं भरून टाकणारा आणि ‘छाती ५६ इंची करणारा’ गौरवशाली दिवस आहे. गेल्या ७० वर्षांतल्या अनेक भडभुंज्या कल्पनांना चूड लावणारा आहे. आजचा दिवस उज्ज्वल भारताची गौरवशाली परंपरा सुरू करणारा दिवस म्हणून इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवला जाणार आहे.
हा दिवस आहे ५ ऑगस्ट २०२०. गतवर्षी याच दिवशी असाच एक ऐतिहासिक भीमपराक्रम मोदी सरकारने घडवला. त्याचीही भारताच्या गौरवशाली इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यात आली आहे. ती म्हणजे जम्मू-काश्मीरपासून लडाख वेगळा काढून त्याला केंद्रशासित राज्य म्हणून दर्जा दिला गेला. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवून हे राज्यही केंद्रशासित राज्य म्हणून घोषित करण्यात आलं. त्याला आज बरोबर ३६५ दिवस पूर्ण झाले. मधल्या ३६४ दिवसांची ‘ऐतिहासिकता’ही सांगता येण्यासारखी आहे. पण त्यांत वेळ न घालवता आजच्या दिवसाच्या ऐतिहासिकतेकडे काळजीपूर्वक, नियोजनपूर्वक वळू या.
तर आज अयोध्यानगरीत दुपारी ठीक बारा वाजून पंधरा मिनिटं आणि पंधरा सेकंदांनी राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. गेल्या अनेक वर्षांचं भारतीयांचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अयोध्येत प्रभूरामचंद्रांचा जन्म झाला, अशी कोट्यवधी हिंदू भारतीयांची श्रद्धा आहे. ते स्थान ‘रामजन्मभूमी’ म्हणून ओळखलं जातं. हजारो वर्षांपासून ही श्रद्धा भारतीयांच्या मनात वसलेली आहे. अयोध्यानगरीतल्या त्या स्थानावर कुश-लव यांनी आपल्या पित्याचं त्याच्या मृत्युपश्चात भव्य स्मारक मंदिररूपानं उभं केलं होतं. एवढी मोठी श्रद्धेय भूमी असलेली ही जागा नंतरच्या काळात मात्र काहीशी झाकोळली गेली. हिंदूसम्राट विक्रमादित्याने या श्रद्धेय स्थानाविषयी भारतीयांची भावना लक्षात घेऊन त्या मंदिराचा जीर्णाद्धार केला. तेव्हापासून ‘रामजन्मभूमी’ अजूनच श्रद्धेय बनली.
पण नंतरच्या काळात भारतीयांच्या या श्रद्धेय स्थानावर बाबराची वक्रदृष्टी पडली. त्याने २३ मार्च १५२८ रोजी मीरबाकीला अयोध्येतील राममंदिर उदध्वस्त करायला सांगितलं. तेव्हा हिंदूवीरांनी त्याचा कडवा प्रतिकार केला. ते हिंदूवीर किती होते? एक लक्ष त्र्याहत्तर हजार. इतक्या साहसी हिंदूवीरांशी लढा देणं सोपं नव्हतं. मीरबाकीकडे होतं सव्वा लाख सैन्य. पण त्याने काव्याने एकेका हिंदूवीराला शौर्यमृत्यू देत शेवटी राममंदिरावर तोफा डागल्या. उदध्वस्त मंदिराच्या साहित्यातूनच बाबराच्या आदेशाबरहुकूम त्या जागी मशीद बांधण्यात आली. तिचं नाव बाबरी मशिद.
श्रद्धेय हिंदूंच्या मर्मस्थानावर आघात करणारा हा इतिहासातला बहुधा पहिला एकमेव ‘काळाकुट्ट दिवस’ असावा. याच बाबराने १५२६मध्ये दिल्लीचा बादशहा इब्राहिम लोदीचं साम्राज्य नष्ट केलं, तसेच राजपुतान्यातील राणा संगाचंही साम्राज्य नष्ट केलं, आणि मंगोल अर्थात मुघल साम्राज्याची भारतात मुहूतमेढ रोवली. बाबरानंतर दिल्लीवर हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान, औरंगजेब, बहादूरशहा जफर या मोगल बादशहांनी सत्ता गाजवली. शेवटी ब्रिटिशांच्या कृपेनं भारतातील मुघल साम्राज्याचा अंत घडवला गेला.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
ब्रिटिशांच्या काळात दोन वेळा रामजन्मभूमी चर्चेत आली. पहिल्यांदा १८५३ साली. तेव्हा या जागेवरून धार्मिक हिंसा झाल्याची पहिली नोंद झाली. त्यानंतर १८५९मध्ये ब्रिटिशांना हिंदू व मुस्लीम या दोन्ही धर्मांची प्रार्थनास्थळं वेगळी करण्यासाठी कुंपण बांधलं. वास्तूचं आतील सभागृह मुस्लिमांना तर बाहेरील आवार हिंदूंना वापरण्याची परवानगी देण्यात आली. नंतर ब्रिटिशांच्याच कृपेनं १९४७ भारत स्वतंत्र देश म्हणून जगाच्या पाठीवर पुढे आला. पुढे अवघ्या दोन वर्षांनी (१९४९) पुन्हा रामजन्मभूमी चर्चेत आली. मशिदीमध्ये प्रभूरामचंद्राची मूर्ती सापडली. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. शेवटी प्रकरण न्यायालयात गेलं. सरकारानं जागा वादग्रस्त घोषित करून तिला टाळं ठोकलं. तदनंतर हिंदूंनी बराच काळ वाट पाहिली. पण काही घडलं नाही. तेव्हा १९८४ साली राममंदिर उभारणीसाठी विश्व हिंदू परिषदेनं समिती स्थापन केली. तिचं भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी नेतृत्व केलं. त्यानंतर १९८६ साली वादग्रस्त म्हणून घोषित केलेल्या या जागेचं टाळं काढून हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी जिल्हा न्यायालयाने दिली. एकदा टाळं उघडल्यावर विहिंपला हुरूप आला. त्यांनी १९८९मध्ये मशिदीला लागून असलेल्या जमिनीवर राममंदिराचा पाया घातला.
त्यानंतर लालकृष्ण आडवाणींनी या सगळ्या प्रकरणाला निर्णायक वळण दिलं. त्यांनी राममंदिरासाठीचं आंदोलन सुरू करण्यासाठी २५ सप्टेंबर १९९० रोजी सोमनाथहून रथयात्रा काढली. ती ३० ऑक्टोबर १९९० रोजी अयोध्येत पोहचणार होती. योगायोग असा की, या रथयात्रेचं संयोजन नरेंद्र मोदी यांच्याकडे होतं. या रथयात्रेनं देशभरातील हिंदू जनमानस खळबळून काढलं. पुढच्याच वर्षी उत्तर प्रदेशात भाजप सत्तेवर आला. त्यानंतर तो ‘ऐतिहासिक दिवस’ उगवला. कुठला? ६ डिसेंबर १९९२. त्या दिवशी देशभरातले हिंदू धर्माभिमानी तरुण अयोध्येत जमले. त्यांनी आपल्या प्राण्यांची बाजी लावून बाबरी मशिद जमीनदोस्त करून रामजन्मभूमीची मुक्तता केली. (असं सांगतात की, १५९८पासून इतिहासाची काळीकभिन्न भिंत भेदून रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी जवळपास ७६ वेळा हिंदूवीरांनी प्रयत्न केले. तीन लक्ष एकावन्न हजार एकशे एक हिंदूवीरांनी रामजन्मभूमीच्या मुक्ततेसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. पण अखेर त्यांनी यश मिळवलंच.)
इतिहासातला हा पहिला ‘सुपर ऐतिहासिक’ दिवस.
तत्पूर्वी जेमतेम वर्षभरापूर्वी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत रामजन्मभूमीच्या दर्शनासाठी आले होते. तेव्हाच त्यांनी जमलेल्या पत्रकारांना सांगितलं होतं की, जेव्हा राममंदिराचं बांधकाम सुरू होईल तेव्हा मी पुन्हा येईन. तेव्हापासून नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत पाऊल ठेवलं नव्हतं. दरम्यान त्यांनी राखेतून गुजरात उभा केला. सध्या सरदार सरोवरात उभ्या असलेल्या सरदार पटेलांच्या पुतळ्याइतकी गुजरातची मान उंच केली आणि त्यानंतरच ते दिल्लीच्या दिशेनं निघाले. पाहता पाहता २०१४ साली त्यांनी दिल्लीही काबीज केली. तेव्हापासून दिल्लीचाही लौकिक जगात दुमदुमतो आहे.
पण मोदींचं एक स्वप्न होतं. ते होतं राममंदिराचं. त्याच्याशिवाय दिल्लीच्या या अनभिषिक्त सम्राटाला झोप लागत नव्हती. पण काही नतद्रष्ट लोकांनी राममंदिराच्या वाटेत कायद्याच्या शिळा मांडून ठेवल्या होत्या. मोदी दिल्लीचे सम्राट असले तरी, ते काही हनुमान नव्हेत वाटेतल्या शिळा उपसून फेकायला! शेवटी त्या शिळा सर्वोच्च न्यायालयानेच बाजूला केल्या. मोदींचं काम अजूनच सोपं झालं. तेव्हापासून रात्रंदिवस मोदींनी ध्यास घेतला तो राममंदिराचा. त्यासाठी त्यांनी वर्षभरापूर्वीच ५ ऑगस्ट २०२० या ऐतिहासिक दिवसाचा मुहूर्तही ठरवला होता.
पण डिसेंबर महिन्यातच चिनी मिचमिच्या डोळ्यांनी भानगड करून मोदींच्या स्वप्नात खोडा घालायचा असं ठरवलं. कारण क्षी जिनपिंग यांच्या ‘चायना ड्रीम’पेक्षा मोदींचं ‘राममंदिरा’चं स्वप्न मोठं झालं होतं. आणि मुख्य म्हणजे दृष्टीपथात आलं होतं. त्यामुळे त्यांनी करोना नामक बिमारी जन्माला घातली. या बिमारीने भारतासह जगभर थैमान घातलं. गेले चारेक महिने जगाला त्राहीमाम करून सोडलं. भारताला तर खूपच. म्हणून काही लोक त्याला गंमतीनं ‘बाबराचं भूत’ असंही म्हणतात.
या भूतानं गेल्या काही दिवसांपासून भारताला आपल्या कचाट्यात घ्यायला सुरुवात केली आहे. पण मोदी सरकारने त्यापासून स्वत:ला अलगदपणे सोडवून घेण्यात यश मिळवलं आहे. ‘गोदी मीडिया’ची साथ असल्यानं मोदी सरकारची अनेक कामं सोपी होतात. करोनापासून सोडवणूक करून घेण्यातही ‘गोदी मीडिया’ची साथ मिळाल्यानं मोदी सरकार सहीसलामत बाहेर पडलं. त्या वाचलेल्या वेळेत या सरकारनं एकमतानं ठरवलं की, काहीही झालं, अगदी जग उलटंपालटं झालं तरी ५ ऑगस्ट २०२०चा दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटं आणि पंधरा सेकंदांचा मुहूर्त गाठायचाच. त्यासाठी या सरकारने रात्रंदिवस मेहनत केली. दरम्यान करोना काही शांत बसलेला नव्हता. त्यानं राममंदिराच्या मुख्य पुजाऱ्याला आणि बारा-पंधरा सुरक्षारक्षकांवर आपलं जाळं फेकलं. त्यानंतर अमित शहा, येडियुरप्पा, धर्मेंद्र प्रधान… तरीही मोदी सरकार आपल्या निर्णयापासून तसूभरही मागे हटलं नाही.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya
..................................................................................................................................................................
आणि शेवटी आज तो दिवस उगवला. दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटं आणि पंधरा सेकंदांनी अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा सुरू होऊन पारला. देशभरातल्या नागरिकांनी जीवाचा कान करून आणि डोळ्यांचे द्रोण करून ‘याचि देही, याची डोळा’ हा सोहळा टीव्ही, मोबाईल, टॅब, लॅपटॉप यांवर पाहिला, कोट्यवधी भारतीय धन्य झाले! आता जग भारताच्या या भीमपराक्रमानं दिपून जाणार. जगाचे डोळे भारताच्या वैभवशाली पराक्रमाने दिपलेले असतानाच या दिवसाची इतिहासाच्या पानांवर सुवर्णक्षरात नोंद होईल…
त्याच वेळी आपल्या घरात बसून आपल्याला राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला न बोलावल्याबद्दल दु:खद अंत:करणानं लालकृष्ण अडवाणी नावाचे एक ज्येष्ठ भाजपनेते मनाशीच पण हळू आवाजात म्हणाले असतील – ‘याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड न व्हावा?’ पण ती त्यांची वैयक्तिक खंत असेल. सबंध देशात गोडधोडाचं जेवण केलं गेलेलं असेल… सबंध देश ‘याजसाठीं केला होता अट्टहास । शेवटचा दिस गोड व्हावा’ या स्वप्नपूर्तीच्या आनंदात न्हाऊन निघालेला असेल…
ते जम्मू-काश्मीरबद्दल कोण बोलतंय तिकडे? धरा रे त्यांना, किंवा मग नजरकैदेत टाका, नाहीतर त्यांच्या घरावर सीबीआयचे छापा मारा, नाहीतर असं करा, त्यांच्यावर आयटी सेलचे जहांबाज पहारेकरी सोडा….
चला रे, बघता काय, सामील व्हा…
बाबर आपला काका नव्हता, औरंगजेब मामा नव्हता… प्रभूरामचंद्र आपले आदर्श पुरुषोत्तम आहेत… त्यांच्या भव्य मंदिराचं आज भूमिपूजन झालं…. इतका ‘सुपरडुपर ऐतिहासिक दिवस’ येत्या दहा हजार वर्षांच्या इतिहासात पुन्हा येणार नाही.
एकदा का राममंदिर बांधून झालं की, या देशात ‘रामराज्य अवतरणार’ आहे…
हो, तेच रामराज्य जे साक्षात प्रभूरामचंद्रांनी निर्माण केलं होतं… नंतरच्या काळात म. गांधींनी त्या ‘रामराज्या’चा पुरस्कार केला होता…
स्वप्न पाहणं चांगलंच असतं, पण ती सत्यात उतरवणं जास्त चांगलं असतं. कारण त्यामुळेच ‘इतिहास’ निर्माण होतो. आजचा दिवस ‘सुपरडुपर ऐतिहासिक दिवस’ ठरणार आहे, तो आज अयोध्येत घडणाऱ्या ‘इतिहासा’मुळे!
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Thu , 13 August 2020
Priyadarshan Bhaware,
विकास म्हणजे काय ते कोण समजावून सांगणार?तुम्ही सांगणार का? वाचायला आवडेल. बघा प्रयत्न करून.
आपला नम्र,
गामा पैलवान
Girish Khare
Wed , 05 August 2020
उगी उगी.
Priyadarshan Bhaware
Wed , 05 August 2020
लोकांना विकास म्हणजे काय हे अजूनही कळत नाही. भक्तांची संख्या वाढली की हे असेच होणार. मंदिर उभारणीमुळे सर्व प्रश्नांची उकल होणार का हे येणारा काळच ठरवेल.