अजूनकाही
१९व्या शतकातल्या बंगालमधली गोष्ट सांगणारा ‘बुलबुल’ हा सिनेमा २४ जून २०२० रोजी Netflixवर प्रदर्शित झाला. खूप कमी वेळात या सिनेमाने लोकांची मनं जिंकायला सुरुवात केली आहे. आवर्जून पाहावा आणि त्यावर विचार करावा, असं या सिनेमात काय आहे?
बुलबुल हा एक गाणारा सुंदर पक्षी. कथेतील मुख्य नायिका बुलबुल हीसुद्धा अशीच स्वप्न बघणारी, स्वप्नांत रममाण होणारी, परीकथांना-भयकथांना स्वत:च्या आयुष्याशी जोडून घेणारी अवखळ मुलगी. पण जेव्हा या पक्ष्याचे म्हणजे नायिकेचे पंख कापले जातात तेव्हा? पक्षी उडणं सोडून देतो, पण गाणं सोडू शकतो? नायिका शरीरानं अधू होते, पण ती पेटून उठते. अन्यायाविरुद्ध बंड करते. पण हे वेगळ्या प्रकारचं बंड आहे. ते रहस्यमय, भयचकित करणारं बंड आहे.
बुलबुलच्या बालविवाहानं सिनेमा सुरू होतो. नाती, रूढी, रिवाज न कळणारी छोटी बुलबुल एका मोठ्या हवेलीची ‘बडी बहू’ बनते. तिचा दीर सत्या तिच्याच वयाचा असतो. त्याच्याशी तिची चांगली गट्टी जमते. सत्यासोबत खेळणं, गप्पा मारणं, भुतांच्या कथा ऐकणं यात ते दोघं खूप वेळ घालवतात. इंद्रनील हा बुलबुलपेक्षा वयानं तिप्पट असणारा तिचा नवरा. बुलबुल-सत्या यांच्यामध्ये वाढणारी मैत्री त्याला खुपू लागते. इंद्रनीलला महेंद्र नावाचा मनोरुग्ण छोटा जुळा भाऊ असतो. बिनोदिनी त्याची स्वार्थी पत्नी. ती वयाने मोठी असते. इंद्रनील या मोठ्या दीराकडून तिला गुप्तपणे शारिरीक सुखही मिळत असते. पण वास्तविक ती महेंद्रची पत्नी असल्यामुळे इच्छा असूनही ती हवेलीची मालकीण होऊ शकत नाही. त्यामुळे कुरबुरी करणं हा तिचा स्वभाव बनतो. बुलबुलवर शारिरीक, मानसिक हिंसाचार होतो. तेव्हा तिच्या तपासणीसाठी येणारे डॉ. सुदीप यांच्याशी तिचं मैत्रीचं नातं निर्माण होतं. अशा नात्यांच्या गोतावळ्यात भूतकाळ व वर्तमानकाळ मागेपुढे करत कथा पुढे जाते.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya
..................................................................................................................................................................
ही एकोणिसाव्या शतकातल्या बंगालमधील कथा आहे, पण ती काळसापेक्ष आहे. आजच्या परिस्थितीवरही ती तेवढ्याच ताकदीनं भाष्य करते. कलाकारांचा पेहराव, साड्या, दागिने, राहण्याची पद्धत यातून बंगाली संस्कृतीचं वैभव झळाळून दिसतं. या सिनेमानं बंगाली पौराणिक श्रद्धांना खूप चांगल्या प्रकारे कथेशी जोडून घेतलं आहे.
पण हृदयाला भिडते ती कथा आणि संगीत. दृश्यं तर या सिनेमाला उच्च प्रतीचा दर्जा बहाल करतात. हा सिनेमा लाल आणि मोरपिशी हिरवा रंग अशा दोन रंगांत विभागला गेला आहे. हिरवा रंग निरागसता आणि समृद्धी दाखवतो, तर लाल रंग रौद्र रूप दाखवतो. बुलबुलच्या लग्नापासून अगदी क्लायमॅक्सपर्यंत हिरवा रंग सतत दिसत राहतो. बुलबुल-सत्या यांच्या वाढणाऱ्या मैत्रीला भेदण्यासाठी इंद्रनील जेव्हा सत्याला लंडनला पाठवण्याचा निर्णय घेतो, तेव्हा हिरव्या रंगात हलकशी लाल रंगाची छटा यायला सुरुवात होते. अवघ्या दीड तासात दिग्दर्शकाने इतक्या सुंदर रीतीनं कथा मांडली आहे की, त्याला दाद द्यायला हवी, सलाम करायला हवा.
बुलबुलचा प्रचंड मोठा अपघात होतो, पण ते सत्य हवेलीबाहेर पडू नये म्हणून बिनोदिनी तिची समजूत घालायचा प्रयत्न करते. त्या वेळी प्रत्येक वाक्यात ‘चूप रहना…’ असं ती म्हणते. गेली अनेक वर्षं अशा अनेक घटना, अनेक वेदनांची घडी तळाला शांत ठेवून हा पितृसत्ताक समाज वरकरणी सगळं कसं सुरळीत चालू आहे, असं दाखवत आलाय. हे भयाण वास्तव हे चार शब्द अधोरेखित करतात.
..................................................................................................................................................................
हेही वाचा : अलेक्झांड्रिया ओकासिओ-कॉर्टेझजचे भाषण ही उद्दामपणाला दिलेली सणसणीत चपराक आहे!
..................................................................................................................................................................
आधीची बुलबुल निरागस, प्रामाणिक, अल्लड दाखवली आहे. नंतरच्या बुलबुलमध्ये कोणत्याही व्यक्तीला कुशलतेनं हाताळण्याचा आत्मविश्वास दिसून येतो. तिचं हसून खोट्या गोष्टींना दुर्लक्षित करणं, तिच्यात परिस्थितीनं विकसित केलेली नेणीव दाखवतं.
बुलबुल सत्यावर मैत्रीच्या भावनेनं विश्वास ठेवते, पण तोसुद्धा इंद्रनीलप्रमाणेच डॉ. सुदीपसोबत वाढणाऱ्या मैत्रीवर शंका घेतो, तेव्हा बुलबुल म्हणते ‘तुम सब एक जैसे हो’. पितृसत्ताक पद्धतीची पाळंमुळं सहजपणे खोडली जाऊ शकत नाहीत, हे बुलबुल त्या तिरस्कारानं सांगू पाहते.
या सिनेमात बुलबुल राक्षशिणीच्या भूमिकेत दाखवली आहे. खरं तर ती राक्षस नाही आणि जिवंत माणूसही नाही. पण ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो, त्या त्या ठिकाणी तारणहार ठरणारी ती देवी आहे. लोकशाही असणाऱ्या देशात प्रत्येकाच्या मताला किंमत असते, हे अगदी खरं आहे. पण बलात्कार झाल्यावर, विनयभंग झाल्यावर त्यावर खटले दाखल होतात. निकाल लागेपर्यंत वर्षं जातात. पण हा सिनेमा आहे. त्यामुळे त्यातून असा एक विचार पुढे येतो की, ‘सकारात्मक हुकूमशाही’ असेल तर अन्याय झालेल्या ठिकाणी आणि ती केलेल्या लोकांना त्यांच्या घृणास्पद कृत्याची तात्काळ शिक्षा ठोठावता येऊ शकते.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
गेले अनेक दिवस ‘Nepotism’ (घराणेशाही)वर चर्चा चालू आहे. कलाकारांच्या कलेला व्यासपीठ मिळत नाही. योग्य तो दर्जा दिला जात नाही असं म्हणणाऱ्यांसाठी हा आत्मविश्वास देणारा सिनेमा आहे. नवीन चेहरे आणि कलाकारांच्या अभिनयात दिसणारा खंबीरपणा वाखणण्याजोगा आहे. भयपट म्हणजे एखादा घाणेरडा, भयानक चेहरा, किंकाळ्या, अशीच कल्पना असणाऱ्यांसाठी सूचना – ‘बुलबुल’ तसा नाही. पण समाजातील घाणेरडं वास्तव, खोटे चेहरे आणि अनेक वर्षं दाबून ठेवलेल्या किंकाळ्या जेव्हा रौद्र रूप घेतात, तेव्हा नक्की काय होतं? हे हा सिनेमा दाखवतो. जर थरारक आणि मन:स्थिती भेदरवून टाकणाऱ्या गोष्टींना तुम्ही भयपट म्हणत असाल तर, ‘बुलबुल’ हा भयपट तुम्ही पाहिलाच पाहिजे. कारण तो समाजातल्या क्रूर गोष्टींवर मार्मिकपणे टीका करतो.
कलेनं केवळ सौंदर्यपूर्ण गोष्टींना उपमा देऊन त्यावर चर्चा करू नये, कधीतरी कलेने उत्तरं पण द्यायला हवीत. हा सिनेमा घृणास्पद वास्तवावर, सहनशीलतेवर, अन्यायावर, हिंसाचारावर केवळ चर्चा करत नाही, तर कलात्मकतेनं त्याला उत्तरही देतो. प्रेम, तिरस्कार, भय, रहस्य, असहायता, असुरक्षितता आणि बदला अशा अनेक भावनांनी भरलेला ‘बुलबुल’ समाजातील जाचक वास्तव मांडतो.
..................................................................................................................................................................
लेखिका शरयू जोरकर महाविद्यालयीन विद्यार्थिनी आहेत.
Sharayu.jorkar@gmail.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment