प्रियंका गांधी : ‘ना नफा ना तोटा’वाल्या नेत्या
पडघम - राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
टेकचंद सोनवणे
  • प्रियंका गांधी यांची एक भावमुद्रा
  • Tue , 24 January 2017
  • पडघम प्रियंका गांधी Priyanka Gandhi राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Sonia Gandhi भारतीय राष्ट्रीय काँग्रेस Indian National Congress टेकचंद सोनवणे Tekchand Sonawane

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पार्टी व काँग्रेस यांची युती घडवून आणण्यात प्रियंका गांधी यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने त्यांच्या सक्रिय राजकारणाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे भाऊ, राहुल गांधी यांना प्रियंका यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, खुद्द सोनिया गांधी यांना प्रियंका यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आणि प्रियंका यांना राहुल यांच्याकडून असलेल्या अपेक्षा याविषयीचा हा ‘अक्षरनामा दिवाळी २०१६’मधील लेख पुनर्मुद्रित स्वरूपात.

.............................................................................................................................................

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि गांधी परिवार, हे दोन्ही शब्द परस्परावलंबी आहेत. एकाचे अस्तित्व दुसऱ्याशिवाय आणि दुसऱ्याचे अस्तित्व पहिल्याशिवाय शून्य आहे. याच गांधी परिवाराचे विद्यमान नेतृत्व म्हणजे राहुल गांधी. त्यांच्या एकंदर स्थायी गुणदोषवैशिष्ट्यामुळे काँग्रेसचा दोन वर्षांपूर्वी दारुण पराभव झाला, हे विधान समस्तकाँग्रेसजनांना पटणार नाही. पटूच नये. कारण लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांच्या निष्क्रियतेपणात इतरही काही नेत्यांच्या नाकर्तेपणाचा मोठा वाटा आहे. राहिला मुद्दा तो सोनिया गांधी यांचा. तर पुत्रप्रेमापुढे त्या कमालीच्या हतबल आहेत. त्यांची हतबलता पहिल्यांदा २००४ साली समोर आली. जेव्हा त्यांनी त्यांचा हक्काचा (गांधी परिवारातील सर्वांत प्रमुख सदस्यासाठी राखून ठेवण्यात आलेला) अमेठी मतदारसंघ राहुल यांच्यासाठी सोडला. २००४ च्या निवडणुकीच्या धामधुमीत सोनिया यांना महाराष्ट्र काँग्रेसमधील ज्येष्ठ महिला नेत्या भेटल्या. त्या भेटीत त्यांनी सोनिया यांना धाडसानं विचारलंच- ‘’तुम्ही तुमचा मतदारसंघ का सोडता? राहुलजींसाठी आपण अन्य मतदारसंघ शोधू.’’  त्यावर सोनियांचं उत्तर हे भारतीयत्त्व अधोरेखित करणारं आहे. त्या म्हणाल्या-  ‘’अमेठीवर त्याचाच हक्क आहे. कारण तो त्याच्या वडिलांचा मतदारसंघ होता. वडिलांचा वारसदार तोच आहे.’’ सोनिया यांचं हे विधान भूतकाळ-वर्तमान व भविष्यातील नेतृत्त्वाची आखणी करणारं आहे.

असं म्हणतात की, राहुल गांधी यांच्यावर त्यांच्या वडिलांचा सर्वाधिक प्रभाव आहे. पण तो कुठेही जाणवत नाही. राजीव गांधी सामान्य कार्यकर्त्यांवरदेखील असामान्य छाप सोडत, भेटत असत. इथं उलट आहे. असामान्य नेत्यालादेखील सामान्य वागणूक देण्याची विलक्षण हातोटी राहुल यांना आत्मसात आहे. त्यामुळे त्याविषयी न बोललेलंच बरं. प्रियंका गांधी यांच्याविषयी मात्र आदरानं बोललं जातं. त्याचं प्रमुख कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहे.

इंदिराजींची आठवण व्हावी असा प्रियंका यांचा वावर असतो. पण इंदिरा गांधी यांच्यासारखी सहजता त्यांच्यात नाही. कार्यकर्ते तर सोडाच त्या नेत्यांनादेखील भेटण्यास फारशा उत्सुक नसतात. असं असूनही त्यांच्या सक्रियतेच्या बातम्या सातत्याने का येत असतात? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मी दिल्लीत त्यांना एकदा विचारलं होतं की, ‘’तुम्ही दिल्लीला परत जाणार, तुमच्या जागी अमूक-तमूक मुख्यमंत्री होणार अशा बातम्या नियमित कालावधीनंतर आमच्यापर्यंत का पोहोचवल्या जातात?’’ त्यावर चव्हाण म्हणाले होते, ‘’अशा बातम्या पेरण्यात काही नेते तरबेज आहेत. अशी बातमी आली की, किमान महिना दोन महिने तरी नोकरशाही (नवा मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर) निवांत होते. शिवाय त्यांचे समर्थक व पक्षातील माझे विरोधक सुखावतात. काही दिवस त्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारतो. ही राजकारणातील एक मोठी खेळी असते.’’ हे इथंही लागू आहे.

काँग्रेस नेते म्हणतात- प्रियंका गांधी सक्रिय होतील. पण नेमक्या कधी याबद्दल कुणीही सांगत नाही. कारण याचं उत्तर कुणाकडेच नाही. निवडणुकीपुरती ही बातमी सोडायची म्हणजे किमान दहा टक्के कार्यकर्ते तरी सुखावतात. आताही प्रियंका यांच्या सक्रियतेची चर्चा सुरू आहे. प्रियंका यांना पुढे केल्यानंतर भाजपच्या टीकेची धार कमी होते. प्रसारमाध्यमांमध्ये त्यांची प्रतीमा बरी आहे. काँग्रेसमध्ये अद्याप प्रियंका गट नाही. त्यामुळे प्रियंका यांचा प्रचार करण्यास कुणाचीही मनाई नसते. राहुल यांच्याबाबत मात्र उलट आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ‘राहुल गांधी यांची सभा आमच्या मतदारसंघात नको’ म्हणून काँग्रेसच्या उमेदवारांनी स्थानिक पक्षनेत्यांना विनंती केली होती. राहुल यांचा करिष्मा हा असा आहे! त्यासाठी राहुलविरोधी गटाला प्रियंका हव्या आहेत. एकदा का प्रियंका सक्रिय झाल्या की, मग महत्त्वाकांक्षेपुढे कौटुंबिक हिताचा संकोच अपरिहार्य आहे. असे होऊ न देण्याची धडपड सोनिया यांच्यापेक्षाही प्रियंका यांचीच जास्त आहे.

समस्त काँग्रेस परिवाराची इच्छा असूनही प्रियंका कधीही राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार नाहीत. त्यांच्या कुंडलीत असलेला ‘दशम’ ग्रह त्यांना तशी संधी देणार नाही. प्रियंका राजकारणात सक्रिय होण्याचाच अवकाश की, हरयाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेशच्या रिअल इस्टेट क्षेत्रातील अर्थव्यवहार समोर निघालेच म्हणून समजा.

तर प्रियंका यांच्याविषयी. त्या तशा सामान्यच. म्हणजे राजकारणात लागणारी कुटील रणनीती त्यांच्याकडे नाही. त्या उत्तम वक्त्या नाहीत. संघटनेत कुणाशी संवाद नाही. आजही काँग्रेस मुख्यालयात मोतीलाल व्होरा यांचा अपवाद वगळता प्रियंका यांना थेट फोन करण्याचं धाडस कुणीही करत नाही. व्होरा यांची विश्वासार्हता सोनिया-राहुल व प्रियंका यांच्याकडे समकक्ष आहे.

प्रियंका येत्या १२ जानेवारीला ४५ वर्षांच्या होतील. वयाच्या अठरा वर्षांपर्यंत त्या अंगरक्षकांच्या पहाऱ्यात वाढल्या. शाळकरी वयापासूनच त्या अत्यंत कमी बोलणाऱ्या. गांधी आडनावामुळे त्यांचा मित्रपरिवारही एका मर्यादेपलीकडे वाढला नाही. शाळेत असल्यापासूनच रॉबर्ट वड्रा यांच्याशी त्यांची दोस्ती होती. पुढे ही दोस्ती प्रेमात बदलली. तेव्हा मात्र रॉबर्ट यांचा कस लागला. रॉबर्ट यांचा स्वभाव ‘मर्दाना’ (हा शब्द दिल्लीतील लोक रॉबर्ट यांच्याविषयी वापरतात. त्यांच्या ‘मर्दाना’ स्वभावामुळेच प्रियंका त्यांच्यावर भाळल्यात) होता. लहानपणीच्या बुजरेपणामुळे प्रियंका यांनी कधीही आपलं प्रेम व्यक्त केलं नव्हतं. रॉबर्ट यांनी पुढाकार घेतला. लग्नाची बोलणी तुम्हालाच येऊन करावी लागतील, अशी काहीशी लाजरी प्रतिक्रिया प्रियंका यांनी यांना दिली होती. लग्नासाठी पुढाकार रॉबर्ट यांनीच घेतला होता.

प्रियंका यांनी राजकारणात येण्याचा मुळी विचारच केला नव्हता. लहानपणी हरवलेलं पित्याचं छत्र आणि सोनिया गांधी राजकारणात सक्रिय होण्यापूर्वी त्यांची झालेली अनावर कौटुंबिक कोंडी लेक प्रियंकाने जवळून पाहिली होती. सोनिया गांधी काँग्रेसची अपरिहार्य गरज होत्या. ही गरज पुढे इतकी वाढली की, सोनियावजा काँग्रेसचा विचारच केला जाऊ शकत नाही, अशी एक समजूत रूढ झाली. पण सोनिया, त्यानंतर राहुल व सरतेशेवटी प्रियंका गांधी, असा क्रम पक्षात नाही. प्रियंका यांना केवळ उत्तर प्रदेशच्या काही भागातच सक्रिय केलं जाईल. त्यांच्या हाती पक्षनेतृत्वाच धुरा देण्यात येणार नाही. शिवाय त्याचं सक्रिय असणंही मर्यादित असेन. उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका सभा घेतील, प्रचार फेऱ्यांचं नेतृत्त्व करतील.

प्रियंका या चौकटीत काम करणाऱ्या राजकारणी नाहीत. म्हणजे त्यांना ना राजकीय नेत्यांचा टिपिकल पेहराव मान्य आहे, ना प्रचाराची, राजकारणाची पारंपारिक पद्धत. त्यामुळे २०१४ च्या दारुण पराभवानंतर संसदेच्या प्रत्येक सत्रात गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसला त्यांनी समज दिली. त्या थेट बोलल्या त्या राहुल गांधी यांच्याशीच. संसदेत सारखा गोंधळ घातल्यानं जनमानसात काँग्रेस केवळ विरोधाचं राजकारण करतं, अशी प्रतिमा निर्माण होईल, असं त्यांनी राहुल यांना सांगितलं. राहुल आपल्या बहिणीचं ऐकतात. कारण प्रियंका यांची राजकीय महत्त्वाकांक्षा शून्य आहे. त्यांना ना सत्ता हवी आहे, ना पक्षात महत्तम स्थान. हाच त्यांच्या राजकीय नेतृत्वाचा लसावि आहे.

राहुल यांच्यासाठी चांगल्या मार्गदर्शक चाणक्याच्या त्या नेहमीच शोधात असतात. त्यामुळे माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री जयराम रमेश यांच्यावर विश्वास ठेवण्याचा सल्ला त्यांनी राहुल यांना दशकभरापूर्वी दिला होता. राहुल यांनीदेखील तो इमानइतबारे ऐकला. पण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘टाईम्स नाऊ’ला दिलेल्या त्या मुलाखतीनंतर जयराम रमेश यांच्यावर विसंबणं राहुल यांनी कमी केलं. ल्युटन्स झोनमध्ये राहुल यांच्याविषयी अनेक किस्से चघळले जातात. पण ती मुलाखत देण्याचा सल्ला राहुल यांना खुद्द त्यांच्या बहिणीनं (व जयराम रमेश यांनी)  दिला होता, ही प्रियंका यांच्याविषयीची एकमात्र वदंता दिल्लीत ऐकायला मिळते. प्रियंका पत्रकारांच्या चर्चेत डोकावतात त्या अशा अधूनमधूनच. त्याशिवाय महात्मा गांधी जयंती, पुण्यतिथी, इंदिरा-राजीव जयंती-पुण्यतिथीचा अपवाद वगळता राहुल व प्रियंका यांचं एकत्रित छायाचित्र काढण्याची संधीही छायाचित्र पत्रकारांना कमीच मिळते.

लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल यांच्यापर्यंत पोहोचणं आता दिल्लीस्थित (लिहित्या) प्रादेशिक पत्रकारांसाठी फारसं अवघड ऱाहिलेलं नाही. मलाही ही संधी मिळाली होती. यावर्षी १७ जानेवारीला राहुल यांच्या निवासस्थानी आम्हा काही पत्रकारांना बोलावलं होतं. राहुल चांगला तासभर वेळ काढून होते. तेव्हा एका पत्रकाराने त्यांना ‘प्रियंका राजकारणात सक्रिय होणार अथवा नाही’, यावर छेडलं. तेव्हा राहुल म्हणाले होते, ‘हा प्रश्न तुम्ही तिलाच विचारा.’ राहुल यांच्यासमवेतची चर्चा संपली. तेव्हा त्यांच्या निवासस्थानी असलेला त्यांचा एक नजीकचा सहकारी म्हणाला, ‘प्रियंका कधीही काँग्रेसमध्ये संपूर्ण सक्रिय होणार नाहीत. तशी सोनिया यांचीच इच्छा नाही. सध्याच्या पार्श्वभूमीवर तर अजिबात नाही. लक्षात ठेवा. राजकारणात पारंपरिक वासदार मुलगाच असतो!’

रायबरेली व अमेठी या दोन मतदारसंघात प्रियंका यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. म्हणजे त्यांनी माणसं नेमली आहेत. त्यांना नियमित मासिक वेतन देण्यात येतं. कुठे विकासकामं वा विविध योजनांची अंमलबजावणी, अशी काहीही जबाबदारी या माणसांकडे नाही. त्यांचं काम एकच- समाजातल्या सर्व जातिजमातींचे सणवार साजरे होत असताना त्यावर सोनिया-राहुल यांची छाप कशी राहील याची तजवीज करणं. सोनिया-राहुल यांचे प्रतिनिधी म्हणून त्याठिकाणी गरजेनुसार व मागणीनुसार तिथं राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना पाठवायचं. यावर प्रियंका यांचं बारीक लक्ष असतं. त्यामुळे ऐन मोदीलाटेतही प्रियंका तग धरू शकल्या. या दोन्ही मतदारसंघात किमान शंभरेक घरं अशी आहेत, जिथं प्रियंकांचं छायाचित्र इंदिराजींच्या छायाचित्राशेजारी आहे. या घरांमध्ये प्रियंका यांच्या खानपानाच्या सवयींपासून ते त्या मुलांना कशा सांभाळतात याच्याही कहाण्या ऐकायला मिळतात.

मर्यादित प्रभावामुळे प्रियंका यांना काँग्रेसमध्ये सक्रिय केलं जाणार नाही. त्यांच्या हाती उत्तर प्रदेश निवडणुकीची धुरा देतानादेखील हाच विचार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्याभोवती निर्माण झालेलं नेत्यांचं अभेद्य वर्तुळ खुद्द राहुल यांनाही भेदता आलं नाही. त्या वर्तुळात मात्र प्रियंका यांचा निर्धोकपणे वावर असे. राहुल यांचं ज्यांच्याशी बिनसलं त्या साऱ्यांशी प्रियंका यांचा आजही संपर्क असतो. तेही संपर्क ठेवून असतात. कारण त्यांना प्रियंकापासून ना लाभ आहे ना तोटा. अशा ना नफा ना तोटा तत्त्वावरच्या प्रियंका नेत्या आहेत. त्यामुळे त्यांच्याभोवती ना कार्यकर्त्यांचं वर्तुळ आहे, ना समर्थकांची मोठी फळी. 

प्रियंका यांच्याकडे इंदिराजींची छबी आहे, पण त्यांच्यासारखं वक्त्तृत्त्व नाही. ते प्रभावी व्हावं यासाठी त्यांनी कधी प्रयत्नही केला नाही. त्या घर-कुटुंबात रमणाऱ्या आहेत. त्यांनी त्यांच्या खासगी जीवनाची चर्चा कधीही सार्वजनिक केलेली नाही. अगदी रॉबर्ट वड्रा यांच्या काकाने त्यांची सारी जमीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित शाळेला दान दिली, याचीदेखील चर्चा ना भाजपच्या व्यासपीठावर होते ना काँग्रेसच्या व्यासपीठावर. आता या काकांचा संघाशी काय संबंध, त्याची कहाणी स्वतंत्र आहे. पण वड्रा असूनही प्रियंका यांनी आपल्या या चुलत सासऱ्यांशी कधीही संपर्क ठेवला नाही. मात्र उत्तर प्रदेशमधील या चुलत सासऱ्यांशी संबधित साऱ्या माणसांची-संस्थांची नोंद मात्र त्यांनी वेळोवेळी घेतली. त्यात त्यांनी ना सोनिया गांधी यांना सहभागी करून घेतलं ना राहुल यांना. आईच्या प्रकृतीची वाटणारी काळजी व बंधूप्रेमामुळे प्रियंका यांनी घरात सदैव जबाबदारी निभावली. लोकसभा निवडणुकीनंतरच बहुदा जेव्हा अवघा गांधी परिवार परदेश दौऱ्यावर गेला, तेव्हा भाजपसकट काँग्रेसच्या नेत्या-खासदारांनी देखील छुपी-उघड नाराजी व्यक्त केली होती. परंतु आजारी आज्जीला (हिंदीत नानी) आपण भेटण्यासाठी जाणार आहोत, हा कौटुंबिक प्रवास कुणालाही न सांगण्यासाठी घरातच सहमती बनवण्यात प्रियंका यांचा वाटा मोठा होता. त्यामुळे गांधी परिवाराच्या त्या दौऱ्याला भावनिक अनुबंध असतानादेखील आम्ही आमच्याच पक्षाच्या लोकांना मोकळेपणाने सांगू शकलो नाही, अशी खंत आजही तुघलक लेनवरील राहुल यांचे सहकारी व्यक्त करतात. 

.............................................................................................................................................

लेखक टेकचंद सोनवणे बिजिंगस्थित चायना पब्लिक डिप्लोमसी असोसिएशनमध्ये संशोधक पत्रकार आहेत.

stekchand@protonmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......