करोनाला हटवणं डिसेंबरपर्यंत तरी जमणार नाही. देश ‘आत्मनिर्भर’ करण्याची आज्ञा झाली आहे, ते विसरू नका.    
पडघम - देशकारण
प्रभाकर देवधर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 03 August 2020
  • पडघम देशकारण करोना व्हायरस Corona Virus कोविड-१९ Covid 19 लॉकडाउन Lockdown महामारी Pandemic

करोनाने आपले जीवन आमूलाग्र बदलवलंय. माणूस घरात जेरबंद आहे. करोनाच्या बातम्या ऐकून कान किटले आहेत आणि मने अस्थिर झाली आहेत. एका अनामिक आणि अंतरिक भीतीने सर्वांची मने ग्रासून गेली आहेत.

घरातले सारे लोक पहिल्यांदाच अनेक महिने, २४ तास एकत्र राहत आहेत, पण ही जवळीक अनेकदा तापदायक होत आहे. पाच महिने होत आले, पण कुणालाच एकांत नाही. नवरा कामावर गेला आणि मुले शिक्षणासाठी बाहेर पडली की, घरातल्या स्त्रीला स्वातंत्र्य असे. पण आता तेही नाही. प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी वेळ लागतो, पण तसा वेळ आता गृहिणींनाच नव्हे तर कुणालाच मिळत नाही. एकमेकांबद्दल कितीही आदर असला किंवा प्रेम असले तरी दिवसातले २४ तास महिनोनमहिने एकत्र राहणे प्रत्येकालाच काहीसे त्रासदायक. जवळीक असली तरी प्रेमिकांना एकांतही आवश्यक. करोनाने असा एकांत हिरवून घेतलाय. पण काही तज्ज्ञ म्हणतात की, देशात जन्मास येणाऱ्या बालकांत मोठी वाढ होणार आहे! 

सवयी व्हायला वेळ लागतो. पण आता या नव्या घरेलू जीवनाची सवय हळूहळू अंगवळणी पडत आहे, करोना निदान डिसेंबरपर्यंत तरी आपले नाक सोडणार नाही. तोवर त्याच्यासोबतच आपल्याला जगावं लागणार आहे.

बहुसंख्य कुटुंबांची घरं लहान. त्यामुळे घरातील मंडळी, विशेषतः तरुण, आपला वेळ घराबाहेर काढत. आता ते शक्य नाही. बाहेर पडलं तर पोलीस हटकतात. त्यामुळे घरात डांबल्याचा ताण केवळ मानसिकच नव्हे तर शारिरिक पातळीवरही परिणाम करू लागला आहे. घरातील वृद्ध मंडळी सुरुवातीला सर्व कुटुंब-सदस्य घरी असल्यानं खुश होती, आता त्यांना त्याचा त्रास होतोय. पूर्वी कुटुंबावर राज्य केलं, आता मुलांच्या राज्यात काही प्रमाणात जाच सहन करावा लागतोय. तरुण मुलामुलींना तर हा एक प्रकारचा तुरुंगवासच वाटतोय. अनेक कारणांसाठी त्यांना ‘आपला’ वेळ हवा, पण आता तो नसल्याने सारेच नाखूष. मग तणातणी वाढते, वाद सुरू होतात... क्वचित हात उठतात!

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

मन रिझवणाऱ्या, प्रसन्न करणाऱ्या नातेवाईकांच्या घरी होणाऱ्या भेटी आता थांबल्या आहेत. मित्रमैत्रिणींच्या भेटीही एकदम बंद झाल्यात. व्हॉटसअ‍ॅपवर संपर्क असला तरी नातेवाईकांची आणि मित्रमैत्रिणींची प्रत्यक्ष भेट मन प्रसन्न करते. त्या थांबल्यात. यावर अॅमेझॉन कंपनीत काम करणाऱ्या एका इस्त्रायली डोकेबाजाने एकटेपणा घालवण्यासाठी काल्पनिक मित्र निर्माण केले. त्यांच्याशी तो गप्पा मारू लागला. हेही करून बघण्यासारखं आहे.        

घराबाहेर पडणं आता पूर्वीसारखं सहज राहिलेलं नाही. बाहेर पाऊल टाकायला गेलो तर मनात भीती दाटून येते. तोंडा-नाकावर मास्क चढवला की, मन:स्थिती बदलते. म्हणतात, जपानी लोकांना मास्कची सवय आहे, पण आपल्यासाठी हे नवीन आहे. त्यामुळे खुल्या हवेतही श्वास रोखल्यासारखं होतं. प्रसारमाध्यमांनीही सर्वांच्या मनात भीती बिंबवली आहे. काही जण म्हणतात- ही भीती अनाठायी आहे. पण विश्वास कोणावर किंवा नेमका कुणाकुणावर ठेवायचा?

मित्र वा मैत्रीण भेटल्यावर हातात हात घेऊन, खांद्यावर हात टाकून गप्पा करणं आता अशक्यच झालंय. जवळच्या मित्रांनाही दुरूनच नमस्कार करावा लागतोय! दुकानात जायचं तर रस्त्यावरील गोलात थांबायचं. हात राखून सारे व्यवहार. सर्वांपासून चार हात दूर. आसपासची इतर मंडळी ते मानत नसली तर गर्दीत हे कसं शक्य आहे? सरकारने कितीही सांगितलं तरी प्रत्यक्षात भाजीपाला खरेदी करताना ते शक्य नाही. टेलिव्हिजनवर भाजी मार्केट पाहिलं की वाटतं, करोना स्वैर फैलावणार. केवढ्या दाटीवाटीनं सामान्य माणसं बिनधास्त वावरत आहेत! ते पाहून धसकाच बसतो!

कुठलीही वस्तू हाताळायची म्हणजे आता मोठा धोका. पूर्वी पाणी सारं धुवून टाकत असे, आता सॅनिटायझर आवश्यक. त्याचा कोट्यवधी रुपयांचा व्यापार प्रचंड फायद्याचा. पण आपण वापरतो तो सॅनिटायझर खरा की बनावट? देव जाणे! आपले व्यापारी फायद्यासाठी काहीही करू शकतात. अनेकांच्या धंद्यांची आता चंगी आहे. त्यात केवळ सॅनिटायझरही पुरेसा नाही. त्यानंतर साबणाने हात धुवा, अगदी घासूनपुसून. हे सारं जीवन आपल्यासाठी नवं आहे, पण चुकीला करोना माफ करत नाही, त्यामुळे त्याचा स्वीकार केल्याशिवाय पर्यायही नाही!

..................................................................................................................................................................

हेही वाचा :  पोर्तुगीज महाकवी लुई वाझ डी केमॉईसचा गोव्यातील पूर्णाकृती पुतळा आधी फोडला गेला, मग हटवला गेला, त्याची गोष्ट

..................................................................................................................................................................

अनेक विद्वान आणि ज्ञानी शास्त्रज्ञ सांगतात की, करोनामुळे मृत्यूचे प्रमाण फक्त दीड-दोन टक्के आहे. देशात रोज टीबीने जास्त लोक मरतात, भूकबळीसुद्धा आजही खूप आहेत. घाबरू नका, करोनाखेरीज इतरही अनेक विषाणूंनी आपलं जीवन धोक्यात येऊ शकतं. तज्ज्ञ सांगतात आणि आपण ऐकतो, पण भीती पाठ सोडत नाही.

खरं तर अनेक लोकांना भीती मृत्यूची नाही. करोनाची लागण झाल्यावर रोग्याची आणि त्यांच्या नातेवाईकांची भीती वाटते. अनेकांची वैद्यकीय सुविधांअभावी परवड होतेय. सल्लागार अनेक - सरकारी आणि निमसरकारी. पण खपत आहेत पोलीस, डॉक्टर, नर्स, वार्डबॉय इत्यादी.

घरातच स्वतःला अलग ठेवायचं की, इस्पितळात भरती व्हायचं? विटाळ पाळणाऱ्या घरात ‘अलग ठेवणं’ जुन्या मंडळींना ठाऊक आहे. अनेक बातम्या वाचल्यामुळे इस्पितळांवर विश्वास नाही. खाजगी रुग्णालयं तर लुटारूच; कित्येक लाख रुपये लुटणार. सरकारी रुग्णालयं बेभरवशाची. नशीब असेल तर चांगली काळजी घेतली जाईल, नाहीतर परवड होणार. काही डॉक्टर आवर्जून सांगतात- दिली जाणारी औषधंच अनेक बळी घेतात. कोणा शिकावू डॉक्टरच्या चुकीमुळे काट्याचा नायटा होणार.

अलग ठेवलेल्या करोनाग्रस्त व्यक्तीच्या मनावर प्रचंड ताण असतो. नशीबवान असाल तर धीर देणारे बरोबर असतात, पण तेही थकलेले, आपल्या कुटुंबापासून दुरावलेले. एकटं असताना नाना विचार छळतात. त्यामुळे जुने आजार बळावतात. काळजी मनाला अधिकच घाबरवते. लोकांपासून चार हात दूर असलो तरी मानसिक ताण येतोच की!

मार्च महिन्यापूर्वी कुणी कल्पनाही केली नसेल की, जुलैमध्ये देश आणि जगसुद्धा करोनाच्या या भयंकर वावटळीत सापडेल, जगरहाटी आमूलाग्र बदलेल. अजून करोनावर इलाज सापडलेला नाही. प्रतिबंधक उपाय म्हणजे लस. ती आणखी पाच-सहा महिने दूर.      

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

ऑफिस आणि कारखाने बंद. नोकऱ्या अनिश्चित, पगार नाहीत. साठवलेले पैसे संपत आले, याची सतावणारी काळजी. सरकारेसुद्धा भांबावलेली. घाबरलेले मुख्यमंत्री बुचकळ्यात. विठ्ठलाकडे गेले, पण मोकळ्या हाती परत आले. पांडुरंगाच्या पाया पडायलाही बिचकले. बरोबर गेलेले युवराज गाभाऱ्यात घुसमटले. आज तरी भविष्य काळंकुट्ट दिसतं आहे.

आता विश्वास ठेवण्यासारखी मंडळी म्हणजे शास्त्रज्ञ. पण तिथंही राजकारण आहे. महाराष्ट्रात विविध लस बनवणारी जगप्रसिद्ध संस्था म्हणजे मुंबईतली हाफकिन इन्स्टिट्यूट. पण तिच्याकडे नतदृष्ट सरकारने पाठ फिरवली. तिला जरूर असलेल्या गोष्टींचा पुरवठा थांबवला. पुण्याची खाजगी सिरम इन्स्टिट्यूटला सरकारने जवळ केलं. मात्र ज्या सरकारी संस्थेनं त्यांना लस बनवण्याचं ज्ञान दिलं, त्या सरकारी हाफकिनला शासनाने खाली ढकललं. काही महिन्यांपूर्वी वाडिया हॉस्पिटलची अशीच विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न झाला. मला वाटतं, या संस्थांच्या अमूल्य जमिनीवर राजकारण्यांची नजर असावी.

मित्रांनो मला वाटतं, करोनाला हटवणं डिसेंबरपर्यंत तरी जमणार नाही. मनाची तयारी ठेवा. तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तींपासून आणि वस्तूंपासून चार हात दूर रहा. जवळ गेलात तर सॅनिटायझर वापरा. सॅनिटायझर बनवणारे आपले धंदेवाईक चीनी उत्पादकांसारखेच असले तरी ‘आपले’च आहेत. देश ‘आत्मनिर्भर’ करण्याची आज्ञा झाली आहे, ते विसरू नका.    

..................................................................................................................................................................

लेखक प्रभाकर देवधर अ‍ॅपलॅब कंपनीचे संस्थापक आणि भारताच्या इलेक्ट्रॉनिक धोरणाचे प्रणेते आहेत.

psdeodhar@aplab.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......