टिळक फासिस्ट का झाले नसते?
पडघम - देशकारण
ग. त्र्यं. माडखोलकर
  • लोकमान्य टिळक
  • Sat , 01 August 2020
  • पडघम देशकारण लोकमान्य बाळ गंगाधर टिळक Lokmanya Bal Gangadhar Tilak लोकमान्य टिळक Lokmanya Tilak न. चिं. केळकर N. C. Kelkar फॅसिझम Fascism कम्युनिझम Communism हिटलर Hitler मुसोलिनी Mussolini

आज लोकमान्य टिळकांच्या स्मृतिशताब्दीची सांगता. अलीकडच्या काळात टिळकांचे काहीसे म. गांधींसारखे झाले आहे. त्यांचे समर्थक अतिशय दुबळे आणि अल्पसंख्य झाले आहेत, तर त्यांचे विरोधक मात्र सामर्थ्यवान आणि बहुसंख्य होत चालले आहेत. ‘कुठल्याही महापुरुषाचा पराभव त्याचे अनुयायीच जास्त प्रमाणात करतात’ असे म्हणतात. ते गांधींप्रमाणे टिळकांच्या बाबतीतही दिसून येते. १ ऑगस्ट १९२० रोजी टिळकांचे निधन झाले. त्यानंतर तब्बल १५ वर्षांनी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या व्याख्यानात टिळकांचे सहकारी व ‘केसरी’चे संपादक न. चिं. केळकर यांनी ‘टिळकांना कम्युनिझमपेक्षा फासिझम अधिक पसंत पडला असता’, असा शेवटी निष्कर्ष काढला होता. त्याच्या आदल्या वर्षी ‘मराठा’चे संपादक त्र्यं. वि. पर्वते यांनी ‘टिळकांनी सोशॅलिझमचा पुरस्कार केला असता’, असा निष्कर्ष मांडून दाखवला होता. या दोन्हींच्या अनुषंगाने ज्येष्ठ पत्रकार ग. त्र्यं. माडखोलकर यांनी ‘मौज’ साप्ताहिकाच्या १९३६ सालच्या दिवाळी अंकात ‘टिळक फासिस्ट का झाले नसते?’ असा सविस्तर लेख लिहिला. नंतर तो माडखोलकरांच्या ‘स्वैरविचार’ (१९३८) या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला. या पुस्तकातून तो लेख येथे साभार पुनर्मुद्रित करत आहोत…

..................................................................................................................................................................

गेल्या टिळक पुण्यतिथीला ‘लो. टिळक आज असते तर?’ या विषयावर विस्तृत व्याख्यान देऊन श्री. न. चिं. केळकर यांनी शेवटी असा निष्कर्ष काढला आहे की, “संस्कृती, स्वभाव व तत्त्वज्ञान या तीनही दृष्टींनी कम्युनिझमपेक्षा फासिझम टिळकांना अधिक पसंत पडला असता.” तात्यासाहेबांचे हे भाषण वाचून मला एका चमत्कारिक योगायोगाची आठवण झाली. तो योगायोग असा की, गेल्या वर्षी १ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘सह्याद्रि’ मासिकाच्या ‘टिळक अंका’त, त्या वेळी ‘मराठा’ पत्राचे संपादक असलेले, माझे मित्र श्री. त्र्यं. वि. पर्वते यांनी, केळकरांच्या सामान्यत: विरुद्ध दिशेने प्रतिपादन करून, टिळक आज जर हयात असते, तर त्यांनी सोशॅलिस्ट मतांचा अंगिकार केला असता, असे सयुक्तिक अनुमान काढले होते, व त्याला आधार खुद्द केळकरांनीच सोशॅलिझमविषयी वेळोवेळी दर्शवलेल्या अनुकूलतेचा दिला होता. पण, दैवाची उपरोधप्रियता अशी विचित्र की, आज स्वत: तात्यासाहेबच, टिळक फासिस्ट झाले असते असे आग्रहपूर्वक म्हणत असून, श्री. भोपटकर प्रभृति राष्ट्रीय पक्षाचे काही प्रमुख कार्यकर्ते फासिस्ट धर्तीची भाषणेही करत आहेत.

हिंदुस्थानात फासिस्ट पक्ष अद्याप रीतसर स्थापन झालेला नाही. पण, तो निर्माण करण्याची पूर्वतयारी सध्या प्रच्छन्न रीतीने चालू असून, राष्ट्रीय पक्षाचे काही कार्यकर्ते त्यात सामील होतील, अशीही चिन्हे दिसत आहेत. त्या दृष्टीने श्री. तात्यासाहेब केळकर यांच्या या घोषणेचे महत्त्व फार आहे. म्हणून त्या घोषणेची तात्त्विक आणि व्यावहारिक अशा दोन्ही दृष्टींनी मी प्रस्तुत लेखात थोडी चर्चा करणार आहे.

आपल्या या भाषणात श्री. केळकर यांनी, टिळक फासिस्ट झाले असते या अनुमानाच्या पुष्ट्यर्थ, टिळकांच्या स्वभावाचा आधार प्रामुख्याने दिला आहे. टिळक आणि केळकर यांचे घनिष्ट साहचर्य लक्षात घेता या आधारावर आक्षेप घेणे खचित धाडसाचेच ठरेल. पण, तत्त्वज्ञानाच्या बाबतीत आपले अनुमान जसे केळकरांना, गीतारहस्यांतील नीत्शेच्या तत्त्वज्ञानाविषयीच्या अनुकूल उल्लेखांकडे अंगुलिनिर्देश करून, थोडेबहुत सजवले आहे, तसा काहीच प्रयत्न त्यांनी टिळकांच्या स्वभावाच्या बाबतीत केलेला नसल्यामुळे, केवळ एक आप्तवाक्य यापलीकडे त्याला जास्त महत्त्व देता येत नाही. कडवेपणा आणि लढाऊपणा हे टिळकांचे दोन गुणविशेष लक्षात घेऊनच जर केळकर त्यांना फासिस्ट म्हणावयाला तयार झाले असतील, तर ते त्यांचे अनुमान अगदीच ठिसूळ आहे, असे म्हणावे लागेल. कारण या दोन्ही गुणात साम्यवादाचा पुरस्कर्ता लेनिन हा टिळकांना खास हार गेला नसता. लेनिनची एक सहचारिणी व्हेरा इवानोव्ना हिने, लेनिन व त्याचा सहकारी प्लेचानॉफ यांची तुलना करताना, लेनिनजवळ एकदा असे उदगार काढले होते की, “प्लेचानॉफ हा शिकारी कुत्रा आहे. तो प्रतिपक्षाला लोळवतो, पण अखेर सोडून देतो. उलटू तू मात्र बुलडॉग आहेस. तू अगदी नरडीचा घोट घेतोस.” (Plechanof is a grey hound. But you are a bulldog you have a deadly bite.) व्हेरा इवानोव्नाचे हे उदगार ऐकून लेनिन अगदी खूश झाला; व मला वाटते, टिळकांनीही हे उदगार यथार्थतेने लागू पडतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

उलट मी असे म्हणेन की, टिळक हे लेनिनपेक्षा जास्त लोकमतानुवर्ती म्हणजे पर्यायाने कमी कडवे होते. लेनिनने मतभेद असा कधी कोणाचा सहन केलाच नाही, व त्याचे अनुयायी ही असहिष्णुता प्रसंगी कोणत्या अमानुष थराला जाऊ देतात, याचा प्रत्यय रशियात नुकत्याच झालेल्या अघोर हत्याकांडावरून आता सर्व जगाला येऊन चुकला आहे. उलट केळकरांसारखा पुष्कळदा उघड मतविरोध व्यक्त करणारा सहकारी टिळकांना जन्मभर चालू शकला, यापरते त्यांच्या सहिष्णुतेचे आणखी दुसरे कोणते प्रत्यंतर हवे?

शिवाय, आपल्या आत्यंतिक आणि एकांतिक मतांची सक्ती बहुजनसमाजावर करण्याच्या बाबतींत लेनिनने जो कडवेपणा आणि करडेपणा दाखवला, तोही टिळकांच्या हातून कधी घडला असता, असे वाटत नाही. हिंदु तत्त्वज्ञानाचा एक प्रमुख विशेष जो परमतसहिष्णुता तो टिळकांच्याही ठिकाणी भरपूर होता; व एक राजकीय पारतंत्र्याचा प्रश्न सोडला, तर टिळक हे इतर बाबतींत, लोकांच्या राहणींत राज्यसत्तेने हात घालू नये, असेच म्हणणारे प्राय: होते. टिळकांच्या राजकीय नेतृत्वाचे वैशिष्ट्य लोकांना आपल्याबरोबर घेऊन जाण्याच्या त्यांच्या धोरणात आहे; व लोकमताचा कल आणि कुवत लक्षात घेऊनच त्यांनी जन्मभर त्या धोरणाने चळवळ केली. महात्मा गांधींनी त्यांच्याविषयी असे म्हटले आहे की, “बहुमताच्या सत्तेवरील त्यांचा उत्कट विश्वास पाहून मला पुष्कळदा भीती वाटत असे.” (He believed in the rule of majority with an intensity that fairly frightened me.) आणि ते काही खोटे नाही. अशा स्थितीत स्वभाव, संस्कृती आणि तत्त्वज्ञान या तीनही दृष्टींनी टिळकांना फासिस्टांची हुकूमशाही आवडली असती, असे म्हणणे कितपत योग्य होईल?

पण टिळक आज फासिस्ट झाले नसते, असे जे मला निश्चयाने वाटते, ते या त्यांच्या व्यक्तिगत विशेषांमुळे नव्हे, तर तात्त्विक आणि व्यावहारिक अशा सबळ कारणांमुळे. फासिझम हा काही केवळ एक हंगामी राजकीय पक्ष नाही. कम्युनिझमप्रमाणेच फासिझम हेसुद्धा एक तत्त्वज्ञान असून, त्या तत्त्वज्ञानानुसार समाज आणि राज्य यांच्या घटना बदलण्याचे प्रयत्न त्याच्या प्रवर्तकांकडून आज चालू आहेत. स्पेनमध्ये सध्या चालू असलेली यादवी हा त्या प्रयत्नांचाच एक परिणाम होय. तेव्हा फासिझमचे हे व्यापक आणि तात्त्विक स्वरूप लक्षात घेऊनच, टिळक फासिस्ट झाले असते की नाही, या प्रश्नाचा विचार केला पाहिजे.

फासिझमचा पहिला विशेष किंवा तिच्या सर्व तत्त्वज्ञानाचा पाया नागरिकस्वातंत्र्याचा लोप हा आहे. नागरिकांना मतस्वातंत्र्य किंवा आचारस्वातंत्र्य असू देणे किंवा न देणे हा राज्यसत्तेच्या खुशीचा प्रश्न आहे, नागरिकांच्या हक्काचा नव्हे, हे फासिझमचे मूलभूत तत्त्व आहे. उदारमतवादापासून तो साम्यवादापर्यंत राजकारणात जी जी मते गेल्या दोनशे वर्षांत उदय पावली, त्या त्या सर्वांचा पाया नागरिकत्वाचे मौलिक हक्क हा असून, त्या हक्कांच्या कल्पनेतून आणि ते मिळवण्यासाठी लोकांना सत्ताधारी वर्गाविरुद्ध वेळोवेळी कराव्या लागलेल्या झगड्यांतूनच खरोखरी या साऱ्या मतांचा विकास झालेला आहे. पण, फासिझम कोणत्याही प्रकारच्या मतभेदाला वाव द्यावयाला तयार नसून, त्याच्या अमलबजावणीला मुळी नागरिकस्वातंत्र्याच्या अपहारापासून प्रारंभ होतो.

कम्युनिझमसुद्धा नागरिकस्वातंत्र्याचा अपहार करतो, असे रशियाकडे बोट दाखवून म्हणता येईल; व ते एका अर्थाने खरेही आहे. पण ती संक्रमणावस्थेतील अपवादात्मक स्थिती होय, हे लक्षात घेतले पाहिजे. रशियात मतस्वातंत्र्यावर आज घातली गेलेली बंधने ही तात्कालिक असून, वर्गयुद्ध संपून वर्गविहीन समाज निर्माण होताच ती दूर केली जातील, अशी ग्वाही खुद्द रशियन क्रांतीच्या प्रवर्तकांनी दिलेली आढळते. (These restrictions are regarded as a temporary expedient, which will be abandoned at the termination of the claas struggle.)

अर्थात अनियंत्रित राज्यपद्धती हा फासिझमचा आत्मा आहे; व अशी राज्यपद्धती फक्त अत्याचाराच्या जोरावरच टिकू शकते. मुसोलिनीने व्यक्तिगत अत्याचार हे निंद्य मानले आहेत, ही गोष्ट खरी. पण फासिस्ट तत्त्वज्ञान किंवा राज्यघटना यांच्या प्रचारासाठी किंवा धारणेसाठी केलेले अत्याचार मात्र तो नीतीविहीन मानतो. (Such violence is holy and highly moral). युरोपातील झोटिंगांच्या मागे लोकमताचे पाठबळ असते, असे केळकरांनी आपल्या प्रस्तुत व्याख्यानांत म्हटलेले आहे. पण हे त्यांचे विधान बरोबर नाही.

राष्ट्राच्या आयुष्यात पराभूत मनोवृत्तीचा असा एक क्षण येतो की, त्या आत्यंतिक निरोशेच्या क्षणाचा फायदा घेऊन धाडसी झोटिंग पुढे सरसावतात; दिङमूढ झालेल्या समाजाला धडाडीने आशेचा जाज्वल्य किरण दाखवून दिपवतात; व त्याच्या त्या मोहविवशतेचा फायदा घेऊन स्वत:च्या एकतंत्री सत्तेचे खोगीर त्याच्या पाठीवर कायमचे लादतात!

निवडणुकीच्या रूपाने लोकमताचा कौल घेण्याची त्यांची पद्धती आततायी भक्तासारखी असते. तो भक्त कौल घेण्यासाठी देवीच्या अंगाला कळे लावतो व त्याबरोबरच तिला दरडावून असे म्हणतो की, “सटवे, माझ्या मनाजोगा कौल दे; नाहीतर तुझ्या डोक्यात धोंडा घालीन!” आणि, त्या कपाळमोक्षाच्या धाकाने जरी नव्हे, तरी देवीचे वस्त्र खुबीने हलवल्यामुळे त्याला मनासारखा कौल मिळतोही. तसेच झोटिंगांच्या कारकिर्दीतील निवडणुकीचेही असते.

मॅटेओटी खुनाच्या प्रकरणानंतर १९२८ सालच्या मे महिन्यात निवडणुकीचा जो नवा कायदा मुसोलनिनीने इटॅलिअन चेंबरकडून मंजूर करवून घेतला, तो झोटिंगशाहीच्या मागे असलेल्या लोकमताच्या पाठबळावर मोठा विदारक प्रकाश पाडतो. या कायद्याविषयी बोलताना मुसोलिनीने चेंबरमधील आपल्या भाषणात असे उदगार काढले होते की, “ज्या चेंबरने हा कायदा मंजूर केला, ते जर ऐंशी टक्के फासिस्ट असेल, तर या कायद्यानुसार जे चेंबर पुढील वर्षी निवडून येईल ते शंभर टक्के फासिस्ट राहील!”

अशा प्रकारची हुकूमशाही म्हटली म्हणजे तीत लोकमत ही चीज उरूच शकत नाही. नागरिकांना राजसत्तेचे अंशभागी करण्याची कल्पनासुद्धा फासिस्टांना मान्य नाही. फासिस्टांमधील मूठभर निवडक लोकांच्या हाती राजसत्ता रहावयाची व या सत्ताधारी वर्गाचे नेतृत्व फासिस्ट तत्त्वज्ञानाचा केवळ पुतळाच अशा एका व्यक्तीकडे असावयाचे. म्हणजे सत्तेचे अतिरिक्त आणि अनियंत्रित केंद्रीकरण व ते कायम ठेवण्यासाठी पवित्र मानलेल्या आवश्यक अत्याचारांची परंपरा असे फासिस्ट राजनीतीचे स्वरूप आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

फासिझमच्या या अंतर्गत स्वरूपापेक्षाही तिचे बहिर्गत स्वरूप, मानवजातीच्या कल्याणाच्या दृष्टीने, अधिक अनर्थावह आहे. ‘राष्ट्र हा पृथ्वीवरील परमेश्वर होय (The State is God on earth)’ असे जर्मन तत्त्ववेत्ता हेगेल याने म्हटले आहे. राज्य किंवा राष्ट्र यांच्याविषयीची फासिस्टांची भावना किंवा निष्ठा व्यक्त करावयाला अधिक समर्पक शब्द क्वचितच सापडतील. ही भावना जिथे प्रबळ आहे, तिथे स्वत:चे राज्य, राष्ट्र किंवा जाती यांच्या संवर्धनासाठी इतरांवर अतिक्रमण करण्याची इच्छा व्हावी किंवा आवश्यकता भासावी, हे क्रमप्राप्त नाही काय?

जातिविषयक किंवा राष्ट्रविषयक दुरभिमानाचा आततायी अतिरेक जो फासिस्ट राज्यनीतीत दिसून येतो, त्याचा उगम राज्य किंवा राष्ट्र यांच्याकडे पाहण्याच्या त्यांच्या या दृष्टीकोनात आहे. या विचारसरणीची आंतरराष्ट्रीय राजकारणातील परिणती साहजिकच अत्यंत अत्याचारी अशा साम्राज्यशाहीत होते.

रोमन साम्राज्याच्या पुनरुज्जीवनाच्या मुसोलिनीच्या वल्गना किंवा जर्मन जातीच्या श्रेष्ठत्वाचा हिटलरचा दिमाख हे या विचारप्रणालीचे जगाच्या प्रत्यही अनुभवाला येणारे उद्रेक असून, नुकत्याच होऊन गेलेल्या हबसाण युद्धांत तिचे आसुरी स्वरूप मानवजातीला प्रत्यक्ष पहावयाला मिळाले. फासिझम माणसाला माणूस म्हणून जगू देणार नाही; - विशिष्ट राष्ट्राचा घटक, त्याच्या भरभराटीचे एक साधन म्हणूनच जगू देईल.

सारांश, फासिझम म्हणजे राष्ट्रीय बाबतींत अरेरावी आणि आंतरराष्ट्रीय बाबतीत साम्राज्यशाही असे तिचे अंतर्बाह्य आततायी स्वरूप आहे. रोमेन रोलंड यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाझी पंथाविषयी असे म्हटले आहे की, “त्याची उभारणी राष्ट्रीय अहंतेच्या तत्त्वज्ञानावर आणि अत्याचारी विजिगीषेवर झाली आहे. इतर लोकांना जिंकून, चिरडून टाकून व त्यांच्यावर हुकमत गाजवूनच हा पंथ जगू शकेल.” (Which is based on an ideology of national vanity and achievement by force, which can only subsist by dominating and by crushing and by conquering other peoples.) हे त्याचे उदगार फासिझमलाही लागू पडतात.

अशा तऱ्हेचे हे आततायी तत्त्वज्ञान टिळकांना पसंत पडले असते काय? प्रथम धोरण या दृष्टीने विचार करू. ब्रिटिश साम्राज्यशाहीचे जगातील दुर्बळ राष्ट्रांना व विशेषत: हिंदुस्थानाला भोगावे लागत असलेले दुष्परिणाम टिळकांना प्रत्यक्ष दिसत होते. ब्रिटिश साम्राज्यशाही ही वस्तुत: फासिस्ट नाही; भांडवलप्रधान आहे. तरीसुद्धा सत्ता आणि संपत्ती यांचे तिच्या ठिकाणी झालेले केंद्रीकरण जगाला व विशेषत: त्यातील दुर्बळ राष्ट्रांना किती अपायकारक झाले आहे, याची जाणीव टिळकांना होती.

..................................................................................................................................................................

हेही वाचा : फॅसिझम हा संसदीय लोकशाहीचा शत्रू असतो! - नरहर कुरुंदकर

..................................................................................................................................................................

फासिझम म्हणजे भांडवलशाही आणि साम्राज्यशाही यांचे लष्करी कायद्याच्या पायावर झालेले संघटन. फासिस्ट राज्यपद्धतीत जरी कामगारांना काही सवलती सनदेच्या रूपाने दिलेल्या असल्या तरी उद्योगधंद्याच्या नियंत्रणाचे सर्वाधिकार मालकवर्गाच्या मुठीत असणे हे जे भांडवलशाहीचे मुख्य तत्त्व, ते या राज्यपद्धतीतही अबाधित ठेवले आहे. (The direction and management is vested solely and unequivocally in the amployer.) भांडवलशाही आणि साम्राज्यशाही यांनी स्वकियांना निर्दयपणे राबवून घेतल्याशिवाय व परकियांना अमानुषपणे पिळून काढल्याशिवाय जगणेच मुळी शक्य नाही. अत्याचार हे त्याचे साधन आणि अतिक्रमण हा त्यांचा स्वभाव आहे. या दोन्ही शाह्यांकडून होत असलेला हिंदुस्थानचा पद्धतशीर रक्तशोष धडधडीत दिसत असता, त्यांच्या तावडीतून त्याला सोडवण्यासाठी झगडत असलेल्या टिळकांनी त्या शाह्यांचे अस्तित्व चिरकाल टिकवण्यासाठी उदयाला आलेल्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला असता, ही कल्पनाच मुळी सहन होत नाही.

उलट, साम्राज्यशाहीला प्रतिकार करण्यासाठी उत्पन्न झालेली एक प्रभावी शक्ती या दृष्टीने टिळकांनी राजकीय धोरण म्हणून काही एका मर्यादेपर्यंत तरी कम्युनिझमचा पुरस्कार केला असता, हीच गोष्ट अधिक सयुक्तिक वाटते. किंबहुना, १९०५-६ सालापासून व विशेषत: १९१७-१८ सालानंतर टिळकांनी ब्रिटिश स्वतंत्र मजूर पक्षाशी सूत्र ठेवण्याच्या धोरणाचा जो अवलंब केला होता, तो लक्षात घेतला असता, त्यांनी, राजकीय डावपेच म्हणून का होईना, कम्युनिझमचा पुरस्कार केला असता, असे अनुमान काढणेच अधिक समर्पक ठरेल.

तत्त्वज्ञान या दृष्टीने विचार केला, तरीही टिळकांना फासिझम पटला नसता, असेच म्हणावे लागते. टिळकांनी आमरण उपदेशिलेले आणि आचरलेले भगवतगीतेतील तत्त्वज्ञान हे स्वकियांच्या आणि परकियांच्या पिळवणुकीच्या आसुरी कल्पनांवर उभारलेले आहे, असे मानणे म्हणजे त्या तत्त्वज्ञानाचा विपर्यास करणेच होय. भगवतगीतेतील कर्मयोग म्हणजे काही फासिस्टांची हडेलहप्पी नव्हे. समाजातील बुद्धिमान वर्गाच्या हाती राज्यसत्ता राहावी, अशा मताचे टिळक होते असे जरी मानले, तरीसुद्धा ते फासिस्ट झाले असते, असे वाटत नाही. ज्या तत्त्वज्ञानात बुद्धीला कोणत्याही प्रकारचे स्वातंत्र्य नाही, स्वतंत्र कर्तृत्वाला कोणत्याही प्रकारचा वाव नाही व ज्यात मनुष्यत्व हे केवळ समाजयंत्राचे एक घटक एवढ्यापुरतेच शिल्लक राहते, त्या मानवी बुद्धीच्या प्रगतीविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार टिळकांनी केला असता, ही गोष्ट शक्य कशी मानावी?

टिळक प्रवृत्तीधर्मी होते आणि परिस्थितीने त्यांना युयुत्सु बनवले होते, हे खरे. पण, म्हणून त्यांनी पिळवणुकीच्या अमानुष तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला असता, असे म्हणणे अन्यायाचे होईल. प्रवृत्तीधर्म आणि युयुत्सुता हे जे फासिझमचे विशेष, त्यांवर मोहित होऊनच जर टिळक फासिस्ट झाले  असते, असे श्री. केळकर यांचे म्हणणे असेल, तर मला त्यावर एवढेच सांगावयाचे आहे की, हे विशेष फासिझम आणि कम्युनिझम या दोहोंनाही समान आहेत. फरक इतकाच की, फासिझमचा प्रवृत्तीधर्म हा पिळवणुकीच्या तत्त्वावर व कम्युनिझमचा समतेच्या तत्त्वावर उभारलेला आहे; व फासिझमची युयुत्सुता ही विशिष्ट राष्ट्राच्या फायद्यासाठी जगावर वर्चस्व जागवण्याकरता उद्युक्त झाली आहे, तर कम्युनिझमची युयुत्सुता ही स्वत:च्या विशिष्ट तत्त्वज्ञानाचा प्रसार करून जगातील विषमता नाहीशी करण्यासाठी प्रवृत्त झाली आहे. प्रवृत्तीधर्म आणि युयुत्सुता हे फक्त दोनच विशेष लक्षात घेऊन जर टिळकांच्या धोरणाविषयी अनुमान करावयाचे असेल, तर टिळक कम्युनिस्ट झाले असते असे तरी का म्हणू नये?

सारांश, धोरण किंवा तत्त्वज्ञान यापैकी कोणत्याही दृष्टीने विचार केला, तरी टिळक फासिस्ट झाले असते, हे श्री. केळकर यांचे विधान ग्राह्य वाटत नाही.

उलट, फासिझम आणि कम्युनिझम यांचा तुलनात्मक दृष्टीने विचार केला असता, टिळकांना कम्युनिझम जरी कदाचित नव्हे, तरी त्याचा सौम्य प्रकार सोशॅलिझम तो मात्र बव्हंशी मान्य झाला असता, असे वाटते. नफेबाजीचा नायनाट, उद्योगधंद्याचे राष्ट्रीयीकरण आणि व्यक्तिमात्राला मताधिकार या कम्युनिझममधील तीन तत्त्वांना टिळकांची निरपवाद संमती खास मिळाली असती. साम्यवादाची त्यांना न पटण्यासारखी बाजू म्हणजे, श्री. केळकर यांनी आपल्या व्याख्यानात दर्शवल्याप्रमाणे, त्याच्या तत्त्वज्ञानाचा सामाजिक भाग. धर्मसंस्था आणि कुटुंबसंस्था यांच्या विनाशासंबंधीचा साम्यवाद्यांचा आग्रह त्यांना कधीही पसंत पडला नसता, हे उघड आहे. पण, धर्मसंस्थेच्या विनाशाच्या मुद्द्यावर कम्युनिझमचा जसा भर आहे, तसा सोशॅलिझमचा नाही, हे एक; व दुसरे असे की, कुटुंबसंस्थेच्या बाबतीत तर खुद्द कम्युनिझमचे धोरणही वाटते तितके प्रतिकूल नाही. ‘मास्को डायलॉग्ज’मध्ये सॉक्रोटोव्हने असे स्पष्टच सांगितले आहे की, “आम्ही कुटुंबसंस्थेच्या विरुद्ध नाही. पण, तिचे स्तोम माजवण्याला मात्र आम्ही प्रतिकूल असून, नवीन पिढीच्या सामाजिक शिक्षणाला तिचा अडथळा झाल्यास तो मात्र आम्ही चालू देणार नाही.” (We are not against family life and the home, but we are against making a fetish of it and do not permit it to become a handicap to the social education of new generation.)

खुद्द फासिझमनेसुद्धा शिक्षणपासून लग्नापर्यंत साऱ्या वैयक्तिक बाबतीत हात घालून कुटुंबसंस्थेचे स्वातंत्र्य एका परीने मर्यादित केलेले नाही काय? एखाद्या विचारप्रणालीच्या सामाजिक बाजूविषयी टिळकांचे धोरण काय राहिले असते, याविषयी अनुमान करताना ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, हिंदुस्थानच्या राजकीय भवितव्याचा विचार टिळकांनी जसा जिव्हाळ्याने केला होता, तसा त्याच्या सामाजिक पुनर्घटनेचा विचार त्यांनी केला नव्हता; व त्यांच्या मनाची एकंदर प्रगमनशील वृत्ती लक्षात घेता त्यांना या बाबतीत संशयाचा फायदा देणेच अधिक इष्ट होईल.

टिळकांना कदाचित अजिबात वर्गविहीन (Classless society) समाजघटनेचे तत्त्व अव्यवहार्य वाटले असते. कारण निसर्गनिर्मित विषमतेवर त्यांनी ‘गीतारहस्यां’त बराच भर दिलेला आढळतो. पण व्यक्तिमात्राला समान संधी, समान मताधिकार, उत्पादनाच्या साधनांचे राष्ट्रीयीकरण आणि भगवदगीतेतील आसुरी संपत्तीची लक्षणे जिला हुबेहूब लागू पडतात त्या भांडवलशाहीचा उच्छेद या समाजसत्तावादांतील चार गोष्टी त्यांना मान्य झाल्या असत्या, याबद्दल मात्र मुळीच शंका वाटत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

किंबहुना, टिळकांच्या मतांत १९०१ सालापासून होत गेलेली उत्क्रांती व आपल्या आयुष्याच्या अखेरीच्या काळात आंतरराष्ट्रीय चळवळीला त्यांनी दिलेले महत्त्व लक्षात घेतले असता, टिळकांनी कम्युनिझममधील काही तत्त्वे हिंदी परिस्थितीला लागू करून स्वत:चा विशिष्ट असा साम्यवाद निर्माण केला असता, असे म्हणावयाला जागा आहे.

परंतु टिळक कम्युनिस्ट झाले नसते असे जरी क्षणमात्र धरून चालले, तरी एवढी गोष्ट गोष्ट निश्चित की, ते फासिस्ट मात्र कधीही झाले नसते. फासिस्ट होण्यात त्यांना राजकीयदृष्ट्या कोणता लाभ होता? त्यांच्या ३० वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यांत संपन्न वर्गाच्या अत्युच्च श्रेणीतील लोक केव्हाही त्यांच्या वाऱ्यालासुद्धा उभे राहिले नाहीत; व ‘तेल्या-तांबोल्यांचा पुढारी’ ही प्रतिपक्षाने दिलेली शिवी त्यांनी, भृगुऋषीच्या लत्तालांछनाप्रमाणे, मोठ्या अभिमानाने आपल्या राजकीय कार्यक्रमाचे बीद्रवाक्य म्हणून आमरण मिरवली. स्वातंत्र्याचा लढा जसजसा निकराला येईल, तसतसे समाजांतील सारे विशिष्ट हितसंबंधवाले वर्ग परकीय सत्तेच्या झेंड्याखाली स्वार्थबुद्धीने उभे राहतील, हे काय टिळकांना कळत नव्हते? तेव्हा, त्या संपन्न वर्गाची मिरासदारी व पर्यायाने पारतंत्र्य कायम ठेवण्याला मदत करमाऱ्या फासिझमचा पुरस्कार टिळकांनी कधीच केला नसता, हे उघड आहे.

उलट, परकीय राजसत्ता आणि तिचे पाठीराखे मिरासदार या दोघांच्याही नावाने, ‘इंद्राय तक्षकाय स्वाहा’ या न्यायानुसार, त्यांनी उदक सोडले असते, हेच जास्त स्वाभाविक वाटते. कारण, राजकीय पुढारी या नात्याने टिळकांचे स्थान बहुजनसमाजात, तेल्यातांबोळ्यात होते; मिरासदार संपन्न वर्गांत नव्हते. अशा स्थितीत, टिळक आज हयात असते तर ते फासिस्ट झाले असते, असे म्हणणे अन्यायाचे होणार नाही काय?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......