अजूनकाही
भारताची खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाचे शिल्पकार असलेले माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंहराव (जन्म- २८ जून १९२१, मृत्यू- २३ डिसेंबर २००४) यांच्या कार्याचा काँग्रेस अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेला गौरव म्हणजे ‘उशिरा सुचलेलं शहाणपण’ आहे, असंच म्हणावं लागेल.
सुमारे सहा दशकाच्या राजकीय कारकिर्दित नरसिंहराव कायम गांधी घराण्याशी एकनिष्ठ राहिले, तरीही सोनिया गांधी, एकूणच गांधी कुटुंबीयांनी जे वर्तन नरसिंहराव यांच्याशी केलं, ते सुसंस्कृतपणाच्या कोणत्याही निकषावर समर्थनीय ठरणारं नाहीच. नरसिंहराव यांचं निधन झाल्यावर त्यांचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी हैद्राबादला नेण्यापूर्वी नवी दिल्लीतील काँग्रेसच्या मुख्यालयात आणण्यात आलं. त्या दिवशी योगायोगानं मी दिल्लीत होतो. ज्या नागपुरात मी सुमारे अडीच दशकं पत्रकारिता केली, त्या नागपूरलगतच्या रामटेक लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा विजयी झालेल्या या नेत्याचं दर्शन घेण्यासाठी जमा झालेल्या गर्दीत मीही होतो. मात्र काँग्रेस मुख्यालयाचं प्रवेशद्वार उघडण्यास सुरक्षारक्षकांनी ठाम नकार दिला आणि आयुष्यभर काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या नरसिंहराव यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयाच्या प्रवेशद्वारातूनच विमानतळाकडे रवाना झालं. अनेकांच्या मनातील ती सल अद्यापही कायम आहे आणि ती निर्माण करण्यास गांधी कुटुंबीय कारणीभूत आहे, हे उघड गुपित आहे.
पी. व्ही. नरसिंहराव आणि महाराष्ट्रातले शंकरराव चव्हाण हे दोघेही घनिष्ठ स्नेही. काँग्रेसच्या राजकारणात आणि दिल्लीच्या सत्ताकारणात हे दोन्ही नेते प्रदीर्घ काळ सहकारी म्हणून वावरले आणि दोघांच्याही जन्मशताब्दीला याच वर्षात प्रारंभ झालेला आहे, हेही उल्लेखनीय आहे. पंतप्रधान म्हणून नरसिंहराव आणि त्यांचे सहकारी देशाचे गृहमंत्री म्हणून शंकरराव चव्हाण या दोघांच्याही कामाचं नितळ मूल्यमापन बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेनंतर देशात उसळलेल्या हिंसाचारात करपून गेलं, हेही या दोन नेत्यातील साम्यस्थळ आहे.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya
..................................................................................................................................................................
एक पंतप्रधान आणि अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नरसिंहराव यांचं योगदान अतिशय मोलाचं आहे. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पंतप्रधानपदाची सूत्रं नरसिंहराव यांच्याकडे आली. गांधी किंवा/आणि नेहरू आडनाव नसलेलाही कुणी नेता काँग्रेस पक्ष आणि देश समर्थपणे चालवू शकतो, हे नरसिंहराव यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सिद्ध करून दाखवलं.
गांधी आडनावाचा रिमोट कंट्रोल निष्प्रभ ठरवत अत्यंत अस्थिर परिस्थितीत नरसिंहराव यांनी कर्जाच्या खाईत बुडालेल्या देशाला तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने बाहेर काढलं. त्यांनी जर त्या काळत या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाची बीजं रोवली नसती, तर आजच्या डिजिटल युगात प्रवेश करण्यासाठी आपल्या देशाला कदाचित २०३० किंवा २०३५ साल उजाडावं लागलं असतं.
नरसिंहराव यांच्यावर पंतप्रधानाच्या कारकिर्दित आर्थिक गैरव्यवहाराचे अनेक आरोप झाले. मात्र त्यातूनही ते निर्दोष सुटले आणि त्यांचं चारित्र्यही धवलच असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं. पंतप्रधान असलेल्या नरसिंहराव यांना अशा प्रकरणात गुंतवण्याचे जे प्रयत्न त्या काळात झालेत, त्या पार्श्वभूमीवर मुलाच्या शिक्षणासाठी त्यांनी शब्द टाकण्याऐवजी हैद्राबाद येथील बंजारा हिलवरील त्यांची मालमत्ता विकण्याचा पर्याय स्वीकारला होता, हे एका सनदी अधिकाऱ्याने नोंदवून ठेवलेलं निरीक्षण मुळीच दुर्लक्ष करता येण्यासारखं नाही.
गांधी घराण्याशी एकनिष्ठ असणारे नरसिंहराव यांच्या रामटेक लोकसभा उमेदवारी अर्ज दखल करण्याच्या कार्यक्रमाला आम्हा काही पत्रकारांना रणजित देशमुख घेऊन गेले होते. पहिल्याच नजरेत भरला तो त्यांचा विरळ आणि चंदेरी-पांढरे केस असणारा विस्तीर्ण भालप्रदेश, गोरापान वर्ण, दोन्ही गालात काही तरी ठेवल्यावर दिसतो तसा मोठा चेहरा, थोडे जाड आणि लांब ओठ (हेच ओठ नंतर नामवंत व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी नरसिंहराव यांची ओळख म्हणून रूढ केले), बारीक लाल काठाचे स्वच्छ धोतर, सिल्कचा किंचित तांबूस रंगाचा कुर्ता आणि दोन्ही खांद्यावर महावस्त्रासारखे शालसदृश्य वस्त्र. आम्हा पत्रकारांशी बोलतांना रावांनी चक्क मराठीत संवाद साधला; हा एक सुखद धक्का होता.
नंतर अनेकदा त्यांना पाहिले, पण पक्के आठवतात ते राजीव गांधी यांच्या मृत्यूची बातमी आल्यावरचे राव. १९९१च्या लोकसभा निवडणुकांचा मतदानाचा एक टप्पा पार पडलेला होता. धनंजय गोडबोलेसह नागपुरात फिरत असताना कोणी तरी म्हणालं, ‘राव रवी भवनात आहेत’. आम्ही तिकडे धावलो. एव्हाना त्यांचा पडता काळ सुरू झालेला होता. आम्ही पोहोचलो तर चुरगळलेलं धोतर नेसलेले आणि बंडी घातलेले राव एका सोफ्यावर बसलेले होते. शेजारी तांब्याचा तांब्या-फुलपात्र होते. जीव गेल्यागत विजेने प्रकाशलेल्या खोलीत नजरेत भरला तो त्यांचा म्लान चेहरा आणि कपाळावर आठ्यांचे जाळे. दिल्लीला लगेच कसे जाता येईल, यासाठी त्यांची आणि माजी मंत्री रणजित देशमुखांची फोनाफोनी सुरू होती. सरकारी संथ लयीत ऑपरेटर फोन लावून देत होता. ज्यांना दिलीला जाण्यासाठी लगेच विमान मिळत नाही, तो हा माणूस उद्या देशाचा पंतप्रधान होणार असल्याचे विधीलिखीत लिहिले गेलेले आहे, याचा पुसटसाही संकेत मिळालेला नव्हता. त्यानंतर अवघा महिनाभरात रामटेक लोकसभा मतदार संघातील महापुराने मोडून पडलेल्या मोवाडच्या आपदग्रस्तांच्या भेटीसाठी आलेले राव म्हणजे पूर्ण ट्रान्सफर सीन होता!
राव रामटेकला निवडणूक लढवायला आले म्हणून भेट झाली, अन्यथा एखाद्या नागपूरच्या पत्रकाराला त्यांना जवळून पाहण्याची संधी मिळण्याचं कारण नव्हतं. कारण ते दिल्लीत असत. राव म्हणजे बावनकशी ज्ञानी माणूस. चेहऱ्यावर शालीनता कायम मुक्कामाला. कोणताही तोरा नसलेला, अहंकाराचा वारा न लागलेला आणि महत्त्वाचं म्हणजे राजकारणाचा अविभाज्य घटक झालेला सत्तेचा माज त्यांच्या अवतीभवती फिरकण्याचे धारिष्ट्यही दाखवू शकत नसे!
..................................................................................................................................................................
हेही वाचा : ‘हाफ-लॉयन’ : प्रत्येक भारतीयानं कृतज्ञता बाळगावी अशा एका माजी पंतप्रधानाची कहाणी
..................................................................................................................................................................
एक मात्र खरं, त्यांच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज मात्र येत नसे. मुरब्बी राजकारण्याचं हे लक्षण त्यांच्यात ठासून भरलेलं होतं. जन्म तत्कालीन आंध्र प्रदेशातील आणि आताच्या तेलंगणातील करीमनगरचा. शिक्षण हैद्राबाद, नागपूर आणि पुणे येथे झालेलं. तेलगु, मराठी, उर्दू, इंग्रजी, संस्कृत, तमीळ, कन्नड अशा १३ भाषा त्यांना अस्खलित येत. पदवी आणि पेशाने वकील.
स्वातंत्र्य चळवळीतून तावून-सुलाखून निघालेले राव १९६२साली राजकारणात आले. १९६९ साली काँग्रेसमध्ये जी ऐतिहासिक फूट पडली, त्यात ते इंदिरा गांधी (आणि नंतर राजीव गांधी) यांच्या बाजूने ठाम उभे राहिले आणि राष्ट्रीय राजकारणात आले. सगळी महत्त्वाची खाती त्यांनी केंद्रात भूषवली. कमी पण, ठाम बोलणारा, एकाच वेळी अर्थकारण आणि प्रशासन यात गति असणारा, बहुपेडी जातीव्यवस्था असणाऱ्या भारतारख्या देशाची नस ओळखणारा आणि जागतिक परिस्थितीचे भान असणारा नेता, असे राव यांच्याविषयी कौतुकाने बोलले जात असे.
राजीव गांधी यांच्या आकस्मिक हत्येनंतर पंतप्रधानपदाची ‘लढाई’ झाली, अर्थातच विजयी झाले राव. त्यांनी सूत्रे हाती घेतली तेव्हा काँग्रेस पक्ष सभागृहात अल्पमतात आणि राजकारणात भांबावलेला, विस्कळीत झालेला होता. देशाची स्थिती तर अत्यंत भयंकर होती. गंगाजळी आटल्याननं देशाचे सोनं गहाण टाकलेलं होते आणि देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होता. काश्मीर, पंजाब, आसामात अशांतता होती आणि हे कमी की काय म्हणून देशावर ‘मंदीर-मस्जिद’वादाचं गहिरं संकट घोंगावत होतं. जवाहरलाल नेहरू यांच्या परदेश धोरणाचा पाया मजबूत करतानाच पंतप्रधान म्हणून नरसिंहराव यांनी देशाला मुक्त अर्थव्यवस्थेच्या वाटेवर नेण्याचे ठरवलं. त्यासाठी राजकारणात नसलेल्या पण जागतिक ख्याती असलेल्या अर्थतज्ज्ञ मनमोहनसिंग यांच्या हाती अर्थखात्याची सूत्रे सोपवण्याचा धाडसी निर्णय घेतला. या जोडगोळीने आर्थिक पातळीवर जी काही पावले तेव्हा उचलली, त्याची फळं आज आपण चाखतो आहोत.
देशाच्या कोणत्याही पंतप्रधानाला तोवर जे यश आर्थिक क्षेत्रात लाभलेले नव्हते, ते राव यांच्या सरकारनं प्राप्त केलं आणि देशाच्या त्यापुढील वाटचालीला एक ठाम दिशा मिळवून दिली. त्यामुळे जागतिक बाजारपेठ भारताला खुली झाली आणि त्यांचे बहुसंख्य भले (आणि काही वाईट) परिणाम झाले. आर्थिक प्रगती, रोजगारनिर्मिती यांच्या दरात वाढ झाली. लोकांच्या खिशात पैसा खुळखुळू लागला. दरडोई उत्पन वाढलं. त्याच वेळी दुसरीकडे पंजाब, काश्मीर, आसाम ही दहशतवादाने धुसमुसणारी राज्ये शांत करत तेथे निवडणुका घेऊन लोकांच्या हाती सत्ता दिली.
अल्पमतात असलेल्या सरकारचं हे कर्तृत्व डोळे दिपवणारं होतं. राव यांच्या पंतप्रधानपदाच्या याच काळात सरकार टिकवण्यासाठी विश्वासदर्शक मतासाठी लाच, शेअर बाजार हर्षद मेहेता आणि हितेन दलाल यांनी पोखरून टाकणे यासारख्या लांच्छनास्पद घटनाही घडल्या. मंदीर-मस्जिद तणाव टोकाचा वाढला आणि परिणामी बाबरी मस्जिद पाडली जाऊन देश धार्मिक विद्वेषाच्या कड्यावर उभा राहिला; तो आजवर सावरलेला नाही.
राव हे पक्ष आणि सरकार अशा दोन्ही पातळीवर नेतृत्व म्हणून समोर आले. तोवर ‘काँग्रेस आय’मधील ‘आय’ म्हणजे ‘इंदिरा’ होते; राव पक्षाध्यक्ष असताना त्यात ‘Indian National Congress’ म्हणजे ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेस’ असा बदल करण्यात आला. ‘गांधी’ नाव नसले तरी काँग्रेस पक्ष म्हणून जगू शकतो आणि सरकारही अत्यंत सक्षमपणे चालवू शकतो, हा विश्वास नरसिंहराव यांनी केवळ दिलाच नाही तर अशक्य ते शक्य करून दाखवलं! आणि इथंच सगळे बिनसत गेलं.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी पुढील लिंकवरून चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
सोनिया गांधी आणि नरसिंहराव यांच्यातील दुरावा वाढतच गेला. तो वाढवणाऱ्या खूषमस्कऱ्यांची काँग्रेसमध्ये वाणवा कधी नव्हतीच. त्यामुळे दुरावा वाढत गेला. काँग्रेसच्या नेतृत्वाकडून राव यांची उपेक्षा झाली नसती, तर पुढे आंध्र प्रदेशात काँग्रेसचं जे काही पानिपत झालं ते टळलं असतं.
पक्षात सक्रिय झाल्यावर आधी सीताराम केसरी यांना अध्यक्ष करायला लावून सोनिया गांधी आणि त्यांच्या गटाने राव यांचे पंख कापले. नंतर त्यांच्याशी सल्लामसलत बंद केली, मग भेटी-गाठी बंद झाल्या आणि समोरासमोर आल्यावर तोंड फिरवाफिरवी सुरू झाली. त्यानंतर आर्थिक उदारीकरणाचं राव यांचं श्रेय नाकारलं गेलं. त्यांच्या मागे चौकशा लागल्या, खटले दाखल झाले. या सगळ्यातून ते सुटले तरी पक्षानं त्यांना जवळ केलं नाही, इतकी कटुता तीव्र झालेली होती. त्यांच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कारही होऊ दिले गेले नाहीत; इतकी अक्षम्य उपेक्षा वाट्याला आलेला देशाचे ते एकमेव पंतप्रधान आहेत.
निधनानंतर तब्बल १५ वर्षांनी पी.व्ही. नरसिंहराव यांच्या कर्तृत्वाचं गुणगान सोनिया गांधी यांनी केलेलं असलं आणि ते करण्यास त्यांचा प्राप्त परिस्थितीत नाईलाज असला तरी ते गुणगान तोंडदेखलं आहे, हे राजकारणाच्या अभ्यासकांना चांगलं ठाऊक आहे.
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Rajkranti walse
Sat , 01 August 2020
good analysis