अजूनकाही
२० फेब्रुवारी २०२० – सफाई कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत घेण्यास नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांचा नकार, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे दिले कारण.
३० जून २०२० – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची तक्रार केली पंतप्रधान कार्यालय आणि केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडे.
२५ जुलै २०२० – नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळी सहा वाजता मनपा मुख्यालय आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या शेडला हजेरी लावून कामात कुचराई करणाऱ्या नऊ कर्मचाऱ्यांना केले निलंबित.
या बातम्यांवरून दोन गोष्टी लक्षात आल्याच असतील. एक, सध्या तुकाराम मुंढे हे नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. दोन, ते जातील तिथे निर्भीडपणे काम करून वाद ओढवून घेतात. त्यांच्यासारखे शिस्तप्रिय, कणखर आणि स्पष्टवक्ते अधिकारी जिथे असतात, तिथे ते आपला ठसा उमटवतातच.
पण म्हणून त्यांचे सर्वच निर्णय योग्य असतात असेही नाही. आता हेच पहा ना. २७ जुलै २०२० रोजी त्यांनी त्यांच्या ट्विटर व फेसबुक पेजवर ‘Technology & Governance’ या नावाने एक व्हिडिओ शेअर केला आहे. महानगरपालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाची कशा प्रकारे मदत होते, हे सांगणारा हा व्हिडिओ आहे. काय आहे या व्हिडिओमध्ये?
नागपूर महानगरपालिकेमध्ये जवळपास ८००० सफाई कर्मचारी आहेत. ते वेळेवर कामावर हजर होतात की नाही, काम करतात की नाही, यावर अॅपच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी या कर्मचाऱ्यांना ‘स्मार्ट वॉच’ देण्यात आली आहेत. त्यावरून हे कर्मचारी कुठे आहेत, हे जीपीएस यंत्रणेद्वारे ट्रॅक करता येते. नियोजित वेळेत एखादा कर्मचारी त्याच्या कामावर हजर झालेला नसेल तर त्याला कंट्रोल रूममधून फोन जातो. जे कर्मचारी वेळेवर पोहचत नाहीत वा काम करत नाहीत, त्यांचा पगार कापला जातो. त्याचबरोबर कचऱ्याची गाडी वेळेवर पोहचते की नाही, याचाही ट्रॅक जीपीएस यंत्रणेद्वारे ठेवला जातो.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya
..................................................................................................................................................................
हे सर्व नागपूर शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी केलं जात आहे, असं या व्हिडिओमध्ये मुंढे यांनी सांगितलं आहे. या जवळपास चार मिनिटांच्या व्हिडिओमध्ये मुंढे यांनी या नव्या तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती दिली आहे.
‘स्मार्ट सिटी’कडे वाटचाल करायची असेल किंवा आपलं शहर स्वच्छ, सुंदर ठेवायचं असेल तर आहे त्या यंत्रणा तंत्रज्ञानाचा आधार घेत अधिक सक्षम, तत्पर करणं, हे चांगलंच आहे. त्याला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. मात्र केवळ हेतू चांगला असून भागत नाही.
पण केवळ शिस्त, तत्परता आणि नेमून दिलेले काम होतेय की नाही, याच्या आग्रहातून मूलभूत मानवी मूल्यांवर गदा येत नाही ना, हेही पाहायला हवं. त्यामुळे जोशात काहीतरी चांगलं करण्याच्या प्रयत्नांत भलतंच काहीतरी होऊन बसत नाही ना, हेही पाहायला हवं.
मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ‘स्मार्टवॉच’ आणली. जीपीएसद्वारे सफाई कामगारांना ट्रॅक करणं चालू केलं. थोडक्यात या तंत्रज्ञानाद्वारे सफाई कर्मचाऱ्यांवर निगराणी ठेवली जात आहे. त्याविषयीचा वरील व्हिडिओ पाहिल्यानंतर असं वाटतं की, व्वा, किती छान, आता शहर स्वच्छ व सुंदर होईल! सफाई कामगार कामचुकारपणा करणार नाहीत. तंत्रज्ञान योग्य प्रकारे वापरलं तर त्याचा असाही उपयोग होऊ शकतो. पण… या पणमध्ये बरेच प्रश्न दडलेले आहेत.
आधी आपल्याला सफाई कर्मचाऱ्यांबद्दल थोडंसं जाणून घ्यायला हवं. सफाई कर्मचारी हे आपले आरोग्यदूत आहेत, ते सर्वांत पहिले पर्यावरणवादी आहेत. आपल्या शहरातली सगळी घाण स्वच्छ करणारे हे कर्मचारी कुठे राहतात हे कधी आपण पाहतो का? भल्या सकाळी येऊन आपले गल्लीबोळ झाडणारे, आपल्या इमारतीतला कचरा घेऊन जाणारे हे कर्मचारी कशा अवस्थेत राहतात, हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीतही नसतं.
सफाई कर्मचाऱ्यांना आपण सन्मानानं वागवतो? त्यांच्याशी नीट बोलतो? हे कशाला, ते कचरा उचलतात असतात, त्याचवेळी अनेक जण कचरा आणून टाकत असतात. ते येण्याच्या आधी आपण आपला कचरा आणून ठेवावा, जेणेकरून सफाई कर्मचाऱ्यांना त्रास होणार नाही, याचीही आपल्यापैकी बहुतेकजण काळजी घेत नाहीत.
आपल्या राज्यातील बहुतांश सफाई कर्मचारी हे दलित समाजातून येतात. १९७२च्या दुष्काळात मराठवाड्यातून जे दलित पुणे शहरात आले, त्यातल्या अनेकांनी महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करायला सुरुवात केली. मुंबई-ठाणे या शहरांतील बहुतांश कर्मचारी हे महाराष्ट्र, गुजरात व उत्तर प्रदेशमधील दलित आहेत. हे कर्मचारी राहतात तो भाग जवळपास झोपडपट्टी या नावानं ओळखला जातो. सतत घाणीत काम करावं लागत असल्यामुळे त्यांना व्यसनं लागतात. त्याचे त्यांच्या आरोग्यावर आणि कुटुंबावर विपरीत परिणाम होतात.
सर्वांत कळीचा मुद्दा म्हणजे राज्यातले ४० टक्क्यांच्यावर सफाई कर्मचारी हे कंत्राटी कामगार असतात. या लेखाच्या सुरुवातीची पहिली बातमी हेच सांगते की, नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील ८००० सफाई कर्मचाऱ्यांना आयुक्त मुंढे यांनी कायमस्वरूपी कामावर घेण्यास नकार दिला आहे. का, तर महानगरपालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही म्हणे! परवाच सातारा महानगरपालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांनी पाच महिने पगार नाही म्हणून आंदोलन केलं आहे.
वरच्या व्हिडिओमध्ये सुरुवातीला जी महिला दिसते, तिच्या हातात हातमोजे नाहीत. तिने बहुधा स्वत:चीच जुनी साडी त्यासाठी वापरली आहे. तिला एखादा एप्रन किंवा जाड खादीचा शर्ट महानगरपालिकेनं द्यायला हवा. पण तो दिसत नाहीये. ही स्थिती केवळ या व्हिडिओमध्येच नाहीतर राज्यातल्या जवळपास सगळ्याच सफाई कर्मचाऱ्यांची आहे.
या सफाई कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पिण्याची पाण्याची सोय नसते. सकाळी पाचपासून दुपारपर्यंत ते शहरातील रस्ते झाडतात. त्यांना नाष्टा, जेवण करण्याची सोय नसते. मग काय करतात हे कर्मचारी? तर जिथे कचरा वेगवेगळा करण्याची सोय केलेली असते, तिथेच नाष्टा, जेवण करतात. प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र सोय होऊ शकत नाही, हे मान्य केलं तरी जेवणासाठी टेबल, खुर्ची, पिण्याचे स्वच्छ पाणी या सोयी नक्कीच करता येऊ शकतात.
असो. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे अनेक प्रश्न आहेत. पण आपण मूळ मुद्द्यावर येऊ या. नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना वाटतं की, सफाई कर्मचाऱ्यांनी वेळेत कामावर यायला पाहिजे, नीट काम केलं पाहिजे. बरोबरच आहे. पण त्यासाठी तुम्हीही त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांकडे लक्ष द्यायला हवं की नको?
‘कामचुकारपणा केला म्हणून निलंबित केलं’ हा फॉर्म्युला प्रत्येक वेळी योग्य ठरतोच असं नाही. त्याचे अनेकदा उलटही परिणाम होतात. किंवा त्यातून जो चांगला परिणाम होतो, तो बऱ्याचदा तात्कालिक स्वरूपाचाही असतो. आपल्या कर्मचाऱ्यांकडून चांगल्या प्रकारे काम करून घ्यायचं असेल तर केवल नियमावर बोट ठेवत राहण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधायला हवा. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या कामाचं महत्त्व पटवून द्यायला हवं. त्यांच्या अडी-अडचणी समजून घ्यायला हव्यात. मुंढे यांच्यासारख्या कर्तबगार, कर्तव्यतत्पर प्रशासकीय अधिकाऱ्याने या गोष्टींचाही विचार करायला हवा.
दुसरी गोष्ट कार्यक्षमता वाढवायची असेल तर फक्त त्यात सफाई कर्मचारीच का? महानगरपालिकेत जेवढे कर्मचारी आहेत, त्या सर्वांसाठीच अशी तंत्रज्ञानावर आधारित कार्यप्रणाली अमलात आणली पाहिजे.
आता शेवटचा मुद्दा. केवळ नागपूर महानगरपालिकेतल्याच नाही तर राज्यातल्या सर्वच सफाई कर्मचाऱ्यांसाठी मासिक वा द्वैमासिक ‘मोटिव्हेशन प्रोग्रॅम’ ठेवले पाहिजेत. सफाई कर्मचाऱ्यांचा अनेक समस्या असतात. त्यांच्या निवारणासाठी एखादी हेल्पलाईन असायला हवी. त्यांच्यासाठी अधूनमधून ‘ओरिएंटेशन प्रॉग्रॅम’ आयोजित केले पाहिजेत.
मुंढे हे कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांच्याकडून मानवी मूल्यं पायदळी तुडवली जाऊ नयेत, एवढीच अपेक्षा. ‘स्मार्टवॉच’ हा चांगलाच उपक्रम आहे, त्यामुळे काही कामचुकारांना नक्कीच चाप बसेल आणि इतरांनाही इशारा मिळेल. त्यामुळेच त्याचं स्वागतच आहे, पण अशा योजना तयार करताना त्यांचा सर्वांगानं विचार करायला हवा, संबंधित सर्व बाजू तपासून पाहायला हव्यात. नाहीतर अशा योजनांमधून काही सकारात्मक घडण्याऐवजी आपल्या प्रशासकीय व्यवस्थेचं भकास, उद्विग्न करणारंच चित्र समोर येतं.
मुंढे यांच्या आधीच्या कामाचं, योजनांचं किंवा निर्णयांचं कौतुक करणाऱ्यांनीच त्यांच्या ‘स्मार्ट वॉच’ उपक्रमावर ट्विटरवर टीका केली आहे.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment