अजूनकाही
भैय्यालाल भोतमांगे. एखाद्या कथा, कादंबरी किंवा चित्रपटात ठरवून एखाद्या व्यक्तिरेखेचं नाव - पटकन तोंडात बसेल असं आकर्षक - ठेवावं तसं हे नाव.
पुन्हा प्रत्यक्ष पाहिलं असतं तर ७०च्या दशकातील एक्सपिरिमेंटल सिनेमा किंवा ८०च्या दशकातील बच्चनच्या अँटी हिरो कालखंडातलं एखादं पात्र वाटावं असा उंच, शिडशिडीत, घोटीव काळ्या मातीसारखा वर्ण आणि त्या सर्वांतून उठून दिसणारे भेदक डोळे.
दुर्दैव असं की, उभ्या महाराष्ट्रानं हे डोळे जेव्हापासून परिचयाचे झाले तेव्हापासून नि:शब्द आग ओकतानाच पाहिले. दहा वर्षं हा माणूस नजरेनंच बोलत राहिला. न्याय मागत राहिला, पण कमनशिबी ठरला! ‘दुर्दैव’, ‘कमनशीब’ अशा शब्दांना हद्दपार करत मानवमुक्तीच्या नव्या संवेदनेनं, म्हणजेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनं बुद्धाला शरण गेलेल्या पूर्वीश्रमीच्या अस्पृश्य जातीतील या कुटुंबानं आपल्या परीनं उत्थानाचा एक मार्ग धरला होता. भैय्यालालकडे वाट्यानं आलेली एक एकर जमीन होती. घर, तीन मुलं, पत्नी असा चौकोनी संसार होता. कुठल्याही आंबेडकरी बापाप्रमाणे मुलामुलींनी शिकावं या इच्छेनं भैय्यालाल स्वत:च्या व इतरांच्या शेतात राबत होता. पण २९ सप्टेंबर २००६च्या रात्री एखाद्या हिंदी चित्रपटात शोभावा असा सामूहिक घाला या कुटुंबावर घालण्यात आला. आई, मुलगी, मुलगा यांनी बेदम मारहाण, यात दोन मुलींपैकी एक मुलगी अंध, पण तिचं नाव रोशन! आईसह मुलींना विवस्र करून सामूहिक बलात्कार, मुलाचेही लैंगिक हाल. नंतर सर्वांच्या शरीराचे तुकडे करून, ते बैलगाडीत भरून काही किलोमीटर अंतरावरील नाल्यात फेकून देण्यात आले.
हल्ला जवळपास गावानंच केला होता. अशा आणि एवढ्या मोठ्या सामूहिक हल्ल्यातून मग १५-२० जणांवर आरोप ठेवले जातात. आठ-दहा जणांना शिक्षा मिळते. इथंही तेच झालंय. अंतिम निकाल अजून लागायचाय. पण घटनेच्या वेळी शेतात असलेल्या की, शेतात पळून गेल्यामुळे वाचलेला एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार काळाच्या पडद्याआड गेल्यानं, न्याय आता काहीही मिळाला तरी तो देणार कोणाला?
दहा वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेला ‘दलितांवरील अत्याचार’ असं लेबल लागल्यानं तो जेसिकासारखा पंचतारांकित चर्चेचा विषय बनला नाही की, सिनेमाचा विषय झाला नाही. (सिनेमाचा विषय झाला, पण पुन्हा दलित निर्मिती, दलित दिग्दर्शक आणि सुमार निर्मिती, स्वत: भैय्यालाल या चित्रपटावर नाराज होते. पण जिथं मूळ अन्यायाबद्दलच न्यायाचा पत्ता नाही, तिथं या न्यायाला कोण भीक घालतो?)
खैरलांजीत सामूहिक बलात्कार, तोही एक, दोन नाही तर तीन स्त्रियांवर. आज ‘पाशवी’ हा शब्द जणू कोपर्डीनंतर जन्माला असं मानलं जातंय. पण भावाला बांधून त्याच्यासमोर आई-बहिणींवर बलात्कार करताना, मान खाली घालणाऱ्या मुलाची मान केस धरून धरून वर केली जात होती, डोळे उघडे ठेवायची सक्ती केली गेली. या कृतीला ‘पाशवी’च्या आसपास जाणारा शब्द आहे? जमाव क्रूर व विकृत झाला होता. त्यामुळे त्याने क्रूरतेची व विकृतीची हद्द गाठली.
या हत्याकांडाची अनेक कारणं सांगण्यात येतात. त्यात भैय्यालालची पत्नी सुरेखा हिचे गावातील एक नातेवाईक जो दलितच पण सावकारी करतो, त्याच्याशी अनैतिक संबंध. त्याच्या पैशाच्या व्यवहारातील एका घटनेत न्यायालयात साक्ष देणार म्हणून सुरेखा सलत होती. त्यातच भैय्यालालच्या शेतातून रस्ता काढायचा पंचायतीचा घाट आणि त्याला या कुटुंबाचा विरोध. अजून एक अफलातून कारण. भैय्यालालची दहावीतली मुलगी, प्रियंका सायकलवरून भर बाजारातून शाळेत जाते, याचा वरच्या जातीतल्या लोकांना आलेला राग. ‘म्हारडी माजलीत!’ हाच तो परवलीचा शब्द या संपूर्ण हत्याकांडामागे होता. नाकी डोळी नीटस आणि ठाशीव आई-मुलीवर नजर असणाऱ्यांना तर ही संधीच मिळाली. पण कोपर्डी घटनेनंतर जसे लाखाचे मोर्चे निघाले, तसे निघाले नाहीत की, या मोर्चेकरांनी कोपर्डी शेजारी खैरलांजी लिहिलं नाही की, कोपर्डीच्या कुटुंबासमवेत भैय्यालालला सोबत घेतलं नाही.
खैरलांजीनंतर सामूहिक बलात्कारानं दिल्ली हादरली. निर्भया नावाचं प्रतीक बनलं, चॅनली चर्चा, फ्लॅश उडाले, मेणबत्त्या जळाल्या, संसद रात्रभर जागली, कायद्याचा किस पाडला गेला. ऐतिहासिक वगैरे विशेषणं लावली गेली.
मग शक्ती मिल कंपाउंड घडलं. दिल्लीसोबत मुंबई हादरली. विरोधी पक्षांनी भयभीत आईच्या जाहिराती करत, ‘कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र?’, असा सवाल तत्कालिन सरकारला केला.
हे सगळं सर्वस्व लुटल्या गेलेल्या भैय्यालाल शासनानं दिलेली शिपायची नोकरी करून, संध्याकाळी शासनानेच दिलेल्या घरात येऊन ऐकत, पाहत, वाचत असेल तेव्हा त्याला काय वाटत असेल? आम्हाला ‘घायल’ सनी देओलच आजही आठवतो, ‘काला पत्थर’मधला दिलजला अमिताभही आठवतो. निर्भया, कोपर्डी, जेसिका आठवतात. आठवत नाहीत फक्त भैय्यालाल, सुरेखा, प्रियंका, रोशन आणि सुधीर!
कारण प्रकरण ‘दलित अत्याचार’ व बलात्काराचं असलं तरी आरोप जवळपास ४० जणांच्या समूहावर होता. त्यात सुरुवातीलाच सुरेखाच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानं दलित नेते दोन पावलं मागे गेले. पुढे प्राथमिक तपास, वैद्यकीय दाखले देणारेही दलितच होते. त्यांनीही हे प्रकरण ‘तसलं’ म्हणून झाकपाक केली. त्यामुळे दलित संघटना, नेते संभ्रमात होते. आजही खैरलांजी हा उच्चार होतो, पण तेवढाच! पुढे काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी हा प्रश्न धसास लावण्यासाठी पुढाकार घेतला. बातम्या झाल्या. या दरम्यानच यावर चित्रपट करायची कल्पना पुढे आली. ती प्रक्रिया काही कारणांनी लांबली (तो एक स्वतंत्रच विषय आहे.). पुढे आमदार नीतीन राऊत मंत्री झाले आणि खैरलांजी त्यांना अडचणीची ठरू लागली!
आ. नीतीन राऊत रात्रीत टेबलाच्या पलीकडे गेल्यानं त्यांची अडचण समजून घेता येते. पण पहिल्यापासूनच टेबलाच्या पलीकडे असलेले संवेदनशील, सामान्य माणसाचा चेहरा असलेले तत्कालिन गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी तर एका टप्प्यावर हा प्रश्न नक्षलवादाशीच जोडून टाकला! उठता बसता ग्यानबा-तुकारामाच्या जोडीनं फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या आघाडी सरकारनं एक सरकारी नोकरीचा व घराचा तुकडा भैय्यालालकडे फेकला. एरव्ही अशी मोठी घटना घडली की, चहूबाजूंनी होणारा ‘उज्ज्वल निकम, उज्ज्वल निकम’ असा घोशाही या प्रकरणात ऐकू आला नाही!
तसं पाहिलं तर खैरलांजी हे गेल्या दशकातलं सर्वांत बिभत्स, हिन, क्रूर व विकृत हत्याकांड आहे. पण आरोपपत्रात अॅट्रॉसिटीचं कलम नाहीच. वर भरीस भर म्हणून मध्यंतरी या गावाला शासनानं तंटामुक्त गाव म्हणून गौरवलं! खालच्या न्यायालयात आठ जणांना झालेली फाशी वरच्या न्यायालयात जन्मठेपेत बदलली गेली! आम्हाला सलमान जामिनावर सुटला तर कोण राग येतो! याकूब मेननं दयेचा अर्ज केला तर संतापाचा अतिरेक होतो. जेसिका, शक्ती मिल, निर्भया, कोपर्डीच्या वेळची आमची सामूहिक संवेदना, जागर, राग, संताप; राज्यकर्ते, न्यायालये यांना धारेवर धरणारी समाजमाध्यमं एकदाही भैय्यालालच्या मागे का नाही उभी राहिली? का यावर ‘त्यांच्याच समाजाची माणसं पुढे आली नाही तर आम्ही काय करणार?’, असा बेशरम सवालच आम्ही करणार? दमलेल्या बाबाची कहाणी ऐकून, नाकाला रुमाल लावणाऱ्यांनी या अंतर्बाह्य जळालेल्या बाबाची कहाणी कधी तरी ऐकायचा प्रयत्न केलाय? का, ते काय ते, दलितबिलित, आपल्याला कुठं काय कळतं, तिकडे गावखेड्यात होतं बाई?
दलितांवर तर गावातले मराठे अत्याचार करतात आणि तुम्ही ब्राह्मणांना आणि त्यांच्या देवदेवतांना शिव्या का घालता, म्हणणारे रेशीम बागेतून प्रशिक्षित आणि वनवासी कल्याणात शबरी-वाल्मिकी असली नावं वापरून समरसता शोधू पाहणारे कोपर्डी खैरलांजीनंतर कुठे असतात? कारण जेसिका, निर्भया घडलं तेव्हा भागवत म्हणाले बलात्कार ‘इंडिया’त होतात, ‘भारतात’ नाही. खैरलांजी ‘इंडिया’त बसतं का भागवत? रेशीम बागेपासून फार दूर नाही. सिंधू नदीची स्वप्नं पाहणाऱ्यांना पायाखालची खैरलांजी दिसत नाही. वर अशा जिवंत आया-बहिणींची विटंबना होत असताना नकाशाला बाईचं रूप देऊन वर मुकूट घालून ‘भारतमाता’ वगैरे भंपक प्रतिमा तयार करून त्यावरून ‘देशप्रेमी’ नि ‘राष्ट्रप्रेमी’ ठरवता? कसली समरसता करता? मराठे अत्याचार करतात ना, मग लावा त्यांना अॅट्रॉसिटी. आहे धमक? कशी असणार! कारण पूर्वी सत्तेत असताना तो कायदाच भंगारात काढायचं काम जोशीबुवांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही करत होतात. आता मांडी बदलली तरी पळी पंचपात्र तीच!
भैय्यालालला एकदा एकानं विचारलं, ‘काय वाटतं तुम्हाला, हे जे खटले, निकाल लागताहेत त्यावर?’ शांतपणे ते एवढेच म्हणाले, ‘ऐकेकाला फाडून काढावंसं वाटतंय’. पण हा उच्चार त्यानं मनातच ठेवला. न्याय मिळणार नाही आणि मिळाला तरी सिनेमातल्या दृश्याप्रमाणे फोटोफ्रेम की कबरीसमोर ठेवून मूकरुदन करायचं? दहा वर्षांत भैय्यालालला झोप लागली असेल? त्याच्या डोळ्यासमोरून ती चित्रं पुसली गेली असतील? त्याला कुणी मानसोपचाराची मदत केली?
त्याची प्रियंका कविता करायची! म्हणजे तिचं मन काय असेल? तिला लगडून अंध रोशन काही वाचायचा प्रयत्न करत असेल. दोन बहिणींवर पुरुषी रुबाब दाखवणाऱ्या सुधीरला सुरेखा कशी दटावत असेल आणि हे सर्व चौकटीबाहेर बसून बघणारा मनातून, डोळ्यातून हसणारा बीडी फुकत असेल बत्तीच्या टायमाला?
अशा असंख्य आठवणी घेऊन परवा भैय्यालाल भोतमांगे गेला. सर्वोच्च न्यायालयाला एक तारीख उधार देऊन गेला. फाशीवरून जन्मठेपेवर आलेल्यांना कदाचित चौदा वर्षांचा दिलासा देऊन गेला. बायकोची बदनामी, मुलांची स्वप्नं काळजात कोरून गेला. भैय्यालाल गेली दहा वर्षं एक जळता निखारा गिळून जगत होता. परवा चिता पेटली असेल. नंतर राख साचली असेल. राख सावडायला कुणी गेलंच असेल तर त्याला तो जळता निखारा परवाही जळतानाच दिसला असेल!
लेखक प्रसिद्ध नाटककार व पटकथाकार आहेत.
writingwala@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
mangesh shinde
Thu , 02 February 2017
"दोन मुलींपैकी एक मुलगी अंध, पण तिचं नाव रोशन!" हा उल्लेख वास्तवाचा विपर्यास करणारा आहे. रोशन हे भोतमांगे कुटुंबातील मुलाचं नाव होतं. लेखातील ही चूक मुद्रणदोष म्हणूनही खपवता येणारी नाही. उल्लेख ज्या पद्धतीनं केला आहे, आणि पुढेही असाच उल्लेख केला आहे, त्यावरून पवार यांची अपुरी माहिती दिसते आहे. केवळ आवेशाने अशा गंभीर प्रकरणांमध्ये स्वतःच्या लेखकत्वाला चमक आणणे धोकादायक आहे. याऐवजी वाचकांच्या संवेदना जाग्या होतील असे संयमी लेखन पवार यांनी पूर्वसुरींकडून शिकावे, अशी नम्र याचना. ही याचना मान्य नसल्यास किमान वास्तव तरी योग्य तथ्यांना धरून लिहावे.