अजूनकाही
१) ‘हमरस्ता नाकारताना’ हे सरिता आवाड यांचे आत्मकथन राजहंस प्रकाशन, पुणे यांनी २०१९ साली प्रकाशित केले. दै. ‘लोकसत्ता’च्या १५ डिसेंबर २०१९च्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये सरिता आवाड यांची मामेबहीण अरुंधती देवस्थळे यांची या आत्मकथनावर आक्षेप घेणारी प्रतिक्रिया आली.
https://www.loksatta.com/lokrang-news/hamrasta-nakartana-sarita-awad-book-review-abn-97-2036249/
२) डॉ. विद्युत भागवत यांनी २८ जून २०२०च्या दै. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये प्रा. राम बापट यांची व्यक्तिरेखा रेखाटणारा ‘अस्तित्व आणि पुरोगामित्व’ या नावाचा लेख लिहिला.
https://www.loksatta.com/lokrang-news/ram-bapat-sir-dd70-2199258/
त्यावर बापटसरांच्या भगिनी सुनीता जोशी यांची आक्षेप घेणारी प्रतिक्रिया १२ जुलै २०२०च्या ‘लोकरंग’मध्ये छापून आली.
https://www.loksatta.com/lokrang-news/letter-to-editor-lokrang-padsad-12072020-dd70-2213474/
या दोन्ही प्रतिक्रिया बघितल्यास असे जाणवते की, कुटुंबाचे चिकित्सक समाजशास्त्र विकसित होण्याच्या दृष्टीने त्या काही महत्त्वाचे पेच पुढे आणत आहेत. त्यामुळे स्वतंत्रपणे नोंदवल्या गेलेल्या या दोन प्रतिक्रियांचा एकत्रितपणे विचार करणे गरजेचे वाटते.
या प्रतिक्रिया एकाच समाजशास्त्रीय वास्तवाच्या मुशीतून साकारलेल्या आहेत. त्या विशिष्ट अशा ‘अधिकृत अधिष्ठाना’वरून संबंधित लेखिकांनी (सरिता आवाड आणि विद्युत भागवत) त्यांच्या लिखाणात केलेला ‘सत्याचा विपर्यास’ अधोरेखित करताना दिसतात. या दोन्हीही प्रतिक्रियांचा एकमेकांशी संबंध नसला तरी किंवा त्यांचे संदर्भ निराळे असले तरी त्यांनी स्वीकारलेले ‘अधिकृत अधिष्ठान’ मात्र सारखेच आहे. ते म्हणजे ‘कुटुंब’.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर ‘आम्ही सर्व कुटुंबीय’ हा एकजिनसी शब्दप्रयोग या दोन्हीही प्रतिक्रियांमधील समान दुवा असल्याचे दिसते. या संतापजनक प्रतिक्रिया आश्चर्यकारक नक्कीच नाहीत, कारण कुटुंब नावाच्या ‘उबदार घरट्या’ला दिलेले तडाखे (मग ते कौटुंबिक संघर्ष पुढे आणल्यामुळे असेल किवा ‘कुटुंबाबाहेरील’ व्यक्तीने अधिकारवाणीने केलेल्या मांडणीमुळे असेल) समजण्याची आणि त्याहीपेक्षा पचवण्याची क्षमता आजही आपल्या आधुनिक जीवनशैलीचा भाग बनू शकलेली नाही.
या प्रतिक्रियांच्या निमित्ताने ‘कुटुंब’ किंवा ‘कुटुंबाच्या भावना दुखावल्या जाणे’ या वास्तवाची, त्याला घडवणाऱ्या आणि त्याच्याभोवती उभ्या राहिलेल्या अधिमान्यताप्राप्त चर्चाविश्वाची समाजशास्त्रीय उकल करण्याचा हा एक प्रयत्न आहे.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya
..................................................................................................................................................................
आवाड यांचे आत्मकथन व विद्युत भागवत यांचा लेख यांत मांडली गेलेली ‘सत्ये’ आणि त्यावरील आक्षेपांमधून पुढे आलेली ‘सत्ये’ याची उलटतपासणी करणे, हा या लेखाचा हेतू नाही; तर या प्रतिक्रियांच्या निमित्ताने ‘कुटुंब’ व्यवस्थेसंदर्भातील जे पेच पुढे येत आहेत, त्यांची समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून चर्चा करणे हा उद्देश आहे. सुरुवातीला या प्रतिक्रियांविषयी आणि त्या पुढे आणत असलेल्या नेमक्या पेचांविषयी...
सरिता आवाड, त्यांचे आत्मकथन आणि त्यावरील आक्षेप
पहिली प्रतिक्रिया सरिता आवाड यांच्या ‘हमरस्ता नाकारताना’ या आत्मकथनावर असून ती त्यांची मामेबहीण अरुंधती देवस्थळे यांची आहे. तिचा प्रमुख सूर सरिता अवाड यांनी त्यांच्या आईसोबतच्या नात्याविषयी, त्यातील संघर्षाविषयी केलेल्या चित्रणासंदर्भात आहे. त्यांच्या मते या चित्रणातून आवाड यांनी त्यांच्या आईची (ज्या स्वतः एक सुप्रसिद्ध लेखिका होत्या) ‘मलिन प्रतिमा’ समाजापुढे आणली आहे. त्याविषयीचे आपले आक्षेप नोंदवताना अरुंधती देवस्थळे यांनी सरिता आवाड यांच्याविषयी जी विशेषणे वापरली आहेत - उदा : ‘आयुष्यभर केवळ मनस्तापाच्या डागण्या देत राहिलेली लेक’, ‘आजारी मन असलेली व्यक्ती’ - ती एकप्रकारचा सात्त्विक संताप अधोरेखित करतात. त्याची मुळे एका विशिष्ट दृष्टीकोनात दडलेली आहेत, असे म्हणावे लागेल.
काय आहे हा दृष्टीकोन? कुटुंबाकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टीकोन आई-मुलीच्या किंवा तत्सम पवित्र मानल्या गेलेल्या कौटुंबिक नात्यांमधील संघर्षाच्या चित्रणाला मुळात मान्यताच देत नाही. त्यामुळे अरुंधती देवस्थळे यांनी कुटुंब-सदस्य या नात्याने ‘सत्य’ पुढे आणण्याची घेतलेली प्रातिनिधिक कौटुंबिक जबाबदारी ही याच पारंपरिक दृष्टीकोनाचा वरचष्मा अधोरेखित करते.
मुळात आवाड यांनी ‘हमरस्ता नाकारताना’मधून आईसोबतच्या नात्यातील गुंतागुंत पुढे आणली आहे. ते करत असताना आईचे त्यांच्यातील ‘रुजलेपण’ (त्यांच्यामधल्या वैविध्यपूर्ण आविष्कारासहित) अतिशय नेमकेपणाने मांडले आहे. ते या आत्मकथनाला एका वेगळ्या उंचीवर नेणारे ठरते. ते चित्रण वाचकांना ‘आईची प्रतिमा मलिन करणारे’ खचितच वाटेल! परंतु कुटुंब, कौटुंबिक संघर्ष, कुटुंब-सदस्यांची (आणि तीही मुलीची) बंडखोरी या बाबतच्या पारंपरिक दृष्टिकोनामुळे समताधिष्ठित, परिवर्तनवादी विचारांनी घडलेल्या आणि पुरोगामी चळवळीच्या विचार-व्यवहाराचा भाग बनलेल्या आवाडांनी केलेली चिकित्सा व आत्मपरीक्षणही अरुंधती देवस्थळे यांना कुटुंबाची प्रतिमा मलिन करणारे आणि म्हणून ‘कौटुंबिक मनस्ताप’ देणारे वाटणे साहजिक आहे. त्यांच्या प्रतिक्रियेच्या निमित्ताने कुटुंब व्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित करण्यातल्या अडचणी व धोके अधोरेखित होतात.
विद्युत भागवत, त्यांचा लेख आणि त्यावरील आक्षेप
आता डॉ. विद्युत भागवत यांचा लेख आणि त्यावरील बापटसरांच्या भगिनी सुनीता जोशी यांनी घेतलेला आक्षेप. भागवत या बापटसरांच्या ‘कुटुंब-सदस्य’ नाहीत, त्यामुळे त्यांना दिसलेले आणि मांडावेसे वाटलेले बापटसरांविषयीचे ‘सत्य’ हे त्यांच्या कुटुंबियांना दिसलेल्या ‘अधिकृत सत्याच्या’ जोरावर प्रश्नांकित करणे, हा या प्रतिक्रियेचा सूर असल्याचे दिसते.
एखाद्या व्यक्तीबद्दलचे कुटुंबियांना दिसलेले सत्य हेच अंतिम सत्य मानणे आणि कुटुंबाबाहेरील व्यक्तीने त्या सत्याशी फारकत घेत मांडलेल्या सत्याला विपर्यस्त ठरवणे, हे वास्तवाशी विसंगतही असू शकते. कारण चळवळीतील वा इतर मित्रमंडळींच्या कुटुंबाचा भाग बनत गेलेले बापटसर स्नेही-परिचित-विद्यार्थी यांना वेगळेही दिसू शकतात, ही शक्यता स्वीकारण्याचा मोकळेपणा या प्रतिक्रियेमध्ये फारसा दिसत नाही.
याच्याही मुळाशी कुटुंब-व्यवस्थेचा अवकाश, त्या संबंधीच्या धारणा आणि पारंपरिक मुख्य प्रवाही दृष्टीकोनच आहे, असे म्हणावे लागेल. या निमित्ताने व्यक्तीच्या आयुष्यातील कुटुंबाचे अधिमान्यताप्राप्त स्थान, त्या कुटुंबाचा विस्तार आणि पुनर्मांडणीच्या शक्यता याविषयीचा पेच पुढे आलेला आहे.
एखाद्या लिखाणाविषयी, मांडणीविषयी मतभेद व्यक्त करणे, त्याची चिकित्सा करणे, हे कोणत्याही लोकशाहीवादी विचारविश्वाचे महत्त्वाचे अंग असते. परंतु या दोन्ही प्रतिक्रिया हे आक्षेप/मतभेद नोंदवताना कुटुंब-व्यवस्थेच्या अधिकृत अधिष्ठानाचा आधार घेताना दिसतात. त्याचबरोबर त्यांनी नोंदवलेले मतभेद प्रामुख्याने कुटुंबांविषयीच्या पारंपरिक पार्श्वभूमीतून पुढे आले आहेत. या पार्श्वभूमीवर कुटुंबाविषयीच्या समाजशास्त्रीय विचारांची चर्चा करणे क्रमप्राप्त ठरेल.
कुटुंबाचे समाजशास्त्र : चिकित्सक आकलनाच्या दिशेने
अनेक अभ्यासकांनी कुटुंबाच्या समाजशास्त्रीय विवेचनातील अडथळे अधोरेखित केले आहेत. त्यांच्या मते कुटुंबाचे समाजशास्त्रीय विवेचन करण्यातील सर्वांत मोठी अडचण म्हणजे कुटुंबांविषयीच्या चर्चेचे सामान्यज्ञानातील (common sense) स्थान! दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले तर, कुटुंब नावाची गोष्ट मानवी अस्तित्वाचा इतका अविभाज्य घटक बनली आहे की, त्याविषयी चर्चा करण्यासाठी काही विशिष्ट प्रशिक्षण किंवा कौशल्य गरजेचे आहे, असे कोणाला वाटत नाही. कुटुंब कसे असावे, त्याविषयीच्या धारणा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, आदर्श कुटुंबाची कल्पना, याविषयीच्या चर्चा प्रत्येक जण अधिकारवाणीने करताना दिसतो!
त्याचबरोबर कुटुंब इतके ‘खाजगी’ मानले गेले आहे की, ते समाजशास्त्रीय विवेचनाचा विषय बनणे ही गोष्ट जणू अशक्यप्राय वाटते. प्रसिद्ध स्त्रीवादी कुटुंब अभ्यासक पेट्रीशिया ओबेरॉय म्हणतात त्याप्रमाणे, कुटुंबाच्या चिकित्सक अभ्यासाच्या प्रत्येक प्रयत्नाकडे संशयित नजरेने पाहण्याची वृत्ती आपल्याला दिसते. असे असले तरी कुटुंबाचे समाजशास्त्र मांडण्याचे प्रयत्न झालेले आहेत, पण ते प्रामुख्याने कुटुंबाची रचना, त्यातील बदल, त्यातील विविध व्यवहार यांच्या अभ्यासापुरते मर्यादित राहिल्याचे दिसते.
त्यात चिकित्सक दृष्टीकोनाची भर घातली ती स्त्रीवादी अभ्यासकांनी. ‘जे जे खाजगी ते ते राजकीय’ (personal is political) म्हणत स्त्रीवाद्यांनी कुटुंबाच्या ‘खाजगी’पणाला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. कौटुंबिक हिंसेचा प्रश्न ऐरणीवर आणत कुटुंब व्यवस्थेतले सत्ताकारण त्यांनी पहिल्यांदा अधोरेखित केले.
त्याचबरोबर परिवर्तनवादी चळवळीच्या पार्श्वभूमीवर कुटुंबाच्या पुनर्मांडणीची, जैविक कुटुंब-विस्ताराची, पर्यायी कुटुंब-निर्मितीची, एवढेच नव्हे तर कुटुंबाची अपरिहार्यता प्रश्नांकित करता येण्याच्या शक्यतांची गरज अधोरेखित झाली. अर्थात यासाठीचा सघन वारसा जसा मार्क्स-एंगेल्स यांच्या कुटुंबाविषयीच्या मांडणीत होता, तसा तो महात्मा फुले, पेरियार यांच्या विचारात होता, हे अधोरेखित करावे लागेल.
मार्क्स-एंगेल्स यांनी कुटुंबसंस्थेच्या उगमाचा वेध घेताना कुटुंबाला भांडवलशाही व खाजगी मालमत्तेच्या निर्मितीचे माध्यम मानून त्याची चिकित्सा आरंभली; तर फुले-पेरियार यांनी सामाजिक-आर्थिक रीतीरिवाजांसह कुटुंब पद्धतीची पुनर्रचना करत सत्यशोधक विवाह आणि स्वाभिमान विवाहाच्या माध्यमातून समाजाला ठोस पर्याय दिले.
थोडक्यात कुटुंबाकडे जात-वर्गव्यवस्था शाबूत ठेवण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून बघत त्याविषयीचा चिकित्सक दृष्टिकोन विकसित करण्यामध्ये स्त्रीवाद्यांबरोबरच या विचारधारांचे महत्त्वदेखील अधोरेखित करावे लागेल.
असे असले तरी, हा चिकित्सक दृष्टीकोन केवळ स्त्रीवादी किंवा तत्सम कोणत्याही विचारधारेपुरता मर्यादित न राहता समाजाच्या उन्नतीसाठी अधिक व्यापक आणि सखोल होणे गरजेचे आहे. परंतु कुटुंबाच्या अधिमान्यताप्राप्त जडणघडणीच्या प्रक्रियेकडे हवे तितके चिकित्सकपणे बघितले गेलेले नाही.
कुटुंबाच्या राजकीयकरणाचा विचार व कार्यक्रम कौटुंबिक हिंसाचाराच्या मुद्द्यापुरता मर्यादित राहिल्याचे दिसते. मात्र कुटुंबातील व्यवहार, प्रक्रिया यांचं व्यक्तीदोषाच्या किंवा स्वभावदोषाच्या पलीकडे जाऊन आकलन करण्याकडे फारशी वाटचाल झालेली दिसत नाही.
उदाहरणार्थ, हुंड्याच्या समस्येबाबत बोलताना आपण सहजच ‘बिचारे मुलीचे आई-बाप’ असा शब्दप्रयोग करतो, तो याच मर्यादेचे द्योतक आहे. मुळात ते ‘चांगले’, ‘वाईट’ किंवा ‘बिचारे’ नसतात; ते आई-बाप असतात आणि पुरुषसत्ताक व्यवस्थेचा भाग असतात. मुलीला समान हक्क, अधिकार, शिक्षण, जोडीदाराच्या निवडण्याचे किंवा न निवडण्याचे स्वातंत्र्य देणे, हे पर्याय उपलब्ध असताना ते हुंडा देणे या पर्यायाची निवड करतात.
आवाडांच्या आत्मकथनावरील आणि भागवतांच्या लेखावरील प्रतिक्रियांमधून ध्वनित होणारा ‘कुटुंबाच्या भावना दुखावल्या’चा सूर हा एकप्रकारे चिकित्सेची, प्रश्न उपस्थित करण्याची दारे बंद करणारा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण कौटुंबिकतेला प्रश्नांकित करण्यासाठीचे चिकित्सक चर्चाविश्व आपण म्हणावे तसे विकसित करू शकलेलो नाही.
मात्र हे चिकित्सक चर्चाविश्व विस्तारता येऊ शकते. त्यासाठी कुटुंबाकडे पाहण्याचा पारंपरिक दृष्टीकोन ओलांडून या व्यवस्थेकडे एक समाजशास्त्रीय सत्य म्हणून पाहण्याची गरज आहे.
..................................................................................................................................................................
‘हमरस्ता’ नाकारताना’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5071/Hamrasta-Nakartana
..................................................................................................................................................................
लेखिका मयुरी सामंत समाजशास्त्राच्या अभ्यासक आहेत आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएच.डी. करत आहेत.
samant.mayuri@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Prakash Burte
Wed , 29 July 2020
मयुरी सामंत यांच्या लेखाचे शीर्षक, ‘कुटुंबाच्या भावना’ दुखावतात या एका समाजशास्त्रीय सत्याचा शोध!, आणि प्रस्ताविक अपेक्षा वाढविणारे आहे. यांनी त्यांच्या लेखाची प्रस्तावना करताना कुटुंबाकडे जात-वर्गव्यवस्था शाबूत ठेवण्याचं महत्त्वाचं केंद्र म्हणून बघत त्याविषयीचा चिकित्सक दृष्टिकोन विकसित करण्यामध्ये स्त्रीवाद्यांबरोबरच मार्क्स-एंगेलस यासोबत महात्मा फुले, पेरियार विचारधारांचे महत्त्वदेखील अधोरेखित केले. तसेच, त्यांनी हा चिकित्सक दृष्टीकोन केवळ स्त्रीवादी किंवा तत्सम कोणत्याही विचारधारेपुरता मर्यादित न राहता समाजाच्या उन्नतीसाठी अधिक व्यापक आणि सखोल होणे गरजेचे असल्याचे सांगून 'कुटुंबाच्या अधिमान्यताप्राप्त जडणघडणीच्या प्रक्रियेकडे हवे तितके चिकित्सकपणे बघितले गेलेले नाही', हे निरीक्षणही नोंदवले आहे. या प्रस्तावानेमुळे तीबाबत सहमती असलेल्या वाचकाची अपेक्षा वाढते. परंतु त्या फक्त हुंडा द्यावा लागणाऱ्या मुलीच्या आई-वडिलांची मानसिकताही पुरुषप्रधानतेमधूनच झालेली असल्याचे दाखवून त्यांचा लेखच आवरता घेतला आहे. कदाचित त्याचे कारण कदाचित लेख मोठा होतो हे असू शकेल. तरीही त्यांनी वाढविलेली अपेक्षा पूर्ण करणारा या लेखाचा पुढील भागदेखील आवर्जून लिहावा अशी विनंती करावीशी वाटते. प्रकाश बुरटे