‘झुकुनरुअ’ (Zugunruhe) पशू-पक्ष्यांना होतो, पण सर्वच स्थलांतरितांना होतो का?
पडघम - सांस्कृतिक
हर्षवर्धन निमखेडकर
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 27 July 2020
  • पडघम सांस्कृतिक झुकुनरुअ Zugunruhe

शब्दांचे वेध : पुष्प पहिले

माझे मित्र प्रा. सुभाष पाटील आणि राम जगताप यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मी हा एक नवीन उपक्रम सुरू करतो आहे, ‘शब्दांचे वेध’. यात भाषेचे बंधन नाही, जगातल्या कोणत्याही भाषेतल्या आगळ्यावेगळ्या शब्दांवर या स्तंभात थोडक्यात चर्चा केली जाईल. आगळावेगळा शब्द म्हणजे काय? तर असा एखादा शब्द जो मराठीत आहे, पण ज्याला इतर भाषांत पर्यायी शब्द नाहीत. किंवा असा एखाद्या परकीय भाषेतला शब्द, ज्याला मराठीत प्रतिशब्द नाही. किंवा असाही शब्द, जो शब्द सहसा ऐकला जात नाही.

नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये, अशी आपल्याकडे म्हण आहे. पण शब्दांची मुळे आणि कुळे बघायला काहीच हरकत नाही. आणि यात जो बौद्धिक आनंद आहे, त्याचे वर्णन करता येत नाही. शब्दांची व्युत्पत्ती किंवा etymology शोधणे किंवा त्यांचा अभ्यास करणे, हा माझा आवडता छंद आहे.

तर आजचा शब्द आहे, ‘Zugunruhe’. ‘A’ किंवा ‘अ’पासून प्रारंभ करायच्या ऐवजी ‘Z’पासून हा उपक्रम सुरू करू या. हा शब्द मूळ जर्मन भाषेतला असून तिथून तो जसाच्या तसा इंग्रजीत उचलला गेला. इंग्रजी भाषिकांचा हा एक फार मोठा गुण आहे. आपल्याकडे नसलेले शब्द ते सर्रास दुसरीकडून उचलून आणतात आणि कसलाही संकोच किंवा लाज न बाळगता त्याला ते आपलासा करून टाकतात. भारतातल्या विविध भाषांमधून इंग्रजीत गेलेल्या हजारो शब्दांचा एक कोश शंभर वर्षांपूर्वी निघाला होता. त्याचे नाव ‘हॉब्सन-जॉब्सन’ असे आहे. त्यावर नंतर केव्हा तरी लिहीनच. आपली भाषा अधिकाधिक समृद्ध व्हावी हा इंग्रजी भाषिकांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे. युरोपातल्या जवळपास सगळ्या भाषा (लॅटिन - ग्रीकसह); जपानी, चिनी, अफ्रिकन, हिब्रू, अरेबिक, अशा भाषा; ऑस्ट्रेलिया-न्यूझिलंड आणि अमेरिकेतल्या आदिवासी लोकांच्या भाषा, अशा शेकडो स्रोतांद्वारे त्यांनी इंग्रजीला गेल्या चार-पाचशे वर्षांत घडवले आहे, नटवले आहे.

‘Zugunruhe’ या मूळ जर्मन पण आता इंग्रजी झालेल्या शब्दाचा उच्चार ‘झुकुनरुअ’ असा काहीसा करता येईल. जर्मन उच्चार जसेच्या तसे मराठीत करणे जरा अवघड आहे. हा शब्द तुम्हाला साध्या इंग्रजी शब्दकोशांत सापडणार नाही. कारण त्याचा वापर फार खास वेळीच केला जातो. म्हणजे हा एक तांत्रिक शब्द आहे. प्राणीशास्त्राचे, विशेषतः पक्ष्यांचे अभ्यासक हा शब्द जाणतात. याचा शब्दशः अर्थ ‘स्थलांतरणाचे मानसिक दडपण’ असा करता येईल. अनेक पशू-पक्षी दर वर्षी एका जागेहून दुसरीकडे मायग्रेशन म्हणजे स्थलांतरण करतात. सायबेरियातला कडक हिवाळा टाळण्यासाठी तिथले पक्षी भारतातल्या उष्म जागी हजारो मैलांचा हवाई प्रवास करून सातत्याने दर वर्षी येतात. अफ्रिकेत केनिया आणि टांझानियातले नू (gnu किंवा wildebeest), झेब्रा, जिराफ यासारखे प्राणी दर वर्षी लाखोंच्या संख्येत असे स्थलांतरण करतात. प्राणीसंग्रहालयांत पिंजऱ्यात बंद असलेले असे मायग्रेटरी पशू-पक्षीदेखील अगदी याच काळात असेच अस्वस्थ असतात.

शास्त्रज्ञांच्या अभ्यासानुसार स्थलांतरण करण्याची वेळ जवळ आली की, हे असे पशू-पक्षी रेस्टलेस म्हणजे अस्वस्थ होतात. त्यांना आतून काही तरी नैसर्गिक/स्वाभाविक प्रेरणा होऊ लागते. जसजशी ती घटिका जवळ येते, तसतसे ते मानसिक तणावाखाली येऊ लागतात. ते काय फीलिंग म्हणजे भावना असेल, ती त्यांना शब्दांत व्यक्त करता येत नाही, पण त्यांच्या ‘बॉडी लॅंग्वेज’मधून म्हणजे देहबोलीतून ती दिसून येते. आणि मग एक असा क्षण येतो, ज्या वेळी अचानक सारे पाश, बंध तोडून, मागे टाकून, अज्ञाताच्या दिशेने या पशू-पक्षांची झुंड म्हणा, थवा म्हणा, एकसाथ आगेकूच करू लागतो. ही घटिका येईपर्यंत ते ज्या तणावाखाली असतात, तो तणाव म्हणजे ‘Zugunruhe’.

Johann Andreas Naumann या जर्मन शास्त्रज्ञाने १७०७ साली या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला, असे मानले जाते.

हे सारे वाचत असताना मला असे जाणवले की श्वापदांमधली स्थलांतरणाबद्दलची ही जी अस्वस्थता आहे, ती तर मानवातही असते. हे मानवी स्थलांतरण तात्पुरते असू शकते किंवा कायमचे. पण एक जागा सोडून दुसरीकडे जाताना मनात एक प्रकारची हुरहूर असते, दुःख असते, एक अनामिक भीती असते, काही प्रमाणात औत्सुक्य आणि हर्षही असू शकतो. मानवात ही भावना सार्वत्रिक असते, सार्वकालिक असते. काही मानवी स्थलांतरणे सुखाच्या शोधासाठी, चांगल्या भविष्यासाठी केली जातात. काही स्थलांतरणे परिस्थितीला शरण जाऊन नाइलाजाने केलेली असतात. तर काही बाहेरून लादलेली असतात. इंग्रजी अंमलात अंदमान बेटांवर भारताच्या मुख्य भूमीमधून ज्या स्वातंत्र्यसैनिकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी हद्दपार केले गेले होते, ते या तिसऱ्या प्रकारचे स्थलांतरित होते. ‘बायबल’मध्येही स्थलांतरणाची अनेक उदाहरणे आहेत.

सर्वच स्थलांतरितांना ‘Zugunruhe’ होतो का? ‘ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला’ म्हणणाऱ्या सावरकरांना तो नक्कीच झाला होता. आतापर्यंत माहेरी असलेल्या नववधूला सासरी जायची वेळ येते, तेव्हा ती अशीच अस्वस्थ होते. ‘बाबुल मोरा नैहर छूटो ही जाय’ या गीतात हा भाव पटकन दिसून येतो. हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी सुट्टीची आतुरतेने वाट बघत असतो, कारण तो घरी परत जायच्या ओढीने ‘Zugunruheग्रस्त’ झालेला असतो. अशी किती तरी उदाहरणे आपल्या रोजच्या  परिचयाची आहेत.

मग मला प्रश्न पडला की, या ‘Zugunruhe’साठी पर्यायी मराठी शब्द काय असेल? की तयार करावा लागेल. थोडा विचार केल्यावर माझेच मला उत्तर मिळाले. ‘Zugunruhe’साठी मराठीत आधीच एक शब्द तयार आहे. तो म्हणजे ‘वेध लागणे’. ग्रहणाचे वेध नाहीत, तर आपल्याला सुट्ट्यांचे वेध लागतात, प्रवासाचे वेध लागतात, बाहेरून घरी जाण्याचे वेध लागतात, ते वेध. हे वेध लागणे म्हणजे ‘Zugunruhe’ होणे. ‘दाते शब्दकोशा’त ‘वेध’ या शब्दाचे एकूण १८ अर्थ सांगितले आहेत. त्यापैकी अकरावा अर्थ असा आहे - काळजी, निकड, चिंता, घोर, पुढे करावयाच्या गोष्टींचे आधी लागलेले व्यवधान. हे सारे ‘Zugunruhe’च्या अर्थाशी मिळतेजुळते आहेत.

आपली मराठीसुद्धा काही कमी नाही आहे हो, देवा!

आज एवढेच पुरे. आता मला रात्रीच्या जेवणाचे वेध लागले असून कम्प्युटरच्या खोलीतून उशिरा स्थलांतरण केल्यामुळे डायनिंग टेबलवर जर मी वेळेवर पोहचलो नाही तर माझे काय होईल असा ‘Zugunruhe’देखील मला होऊ लागला आहे. तेव्हा इथेच थांबतो.

..................................................................................................................................................................

लेखक हर्षवर्धन निमखेडकर वकील आहेत. वुडहाऊसचे अभ्यासकही.

the.blitheringest.idiot@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vivek Date

Wed , 29 July 2020

https://www.nytimes.com/2020/07/24/magazine/behind-the-cover-climate-migration.html Read this great story on climate migration


Gamma Pailvan

Mon , 27 July 2020

हुरहूर म्हणू की ओढ म्हणू ही गोड, असं काहीसं म्हणता येईल सुकूनरूह बद्दल! यांतला zugun हा शकून वरून आलाय तर ruhe म्हणजे शांत. तर ही नि:शब्द हुरहूर आहे.
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......