अजूनकाही
सध्या राहुल गांधी व्हिडिओजच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तुफान हल्ले चढवत आहेत. त्यामुळे भक्त नाराज होणं स्वाभाविक असलं तरी नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारणारा देशात एकच राजकीय नेता म्हणजे राहुल गांधी आहेत, हे जे समोर येतंय ते आशादायक आहे. मात्र जेव्हा असेच प्रश्न ज्योतिरादित्य शिंदे आणि सचिन पायलट यांनी विचारले, तेव्हा त्यांच्या बाजूनं ठामपणे उभं राहणं राहुल गांधी यांनी टाळलं, ही त्यातील विसंगती आहे, हे विसरता येणार नाही पण, ते असो.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यावर राहुल गांधी यांनी त्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून त्या पदाचा कारभार श्रीमती सोनिया गांधी सांभाळत असल्या तरी काँग्रेस पक्षाचा सध्याचा अपरिहार्य चेहरा राहुल गांधी आहेत, हेच वारंवार समोर येत आहे. आता नुसतं बोलत न राहता पुढे जात, राहुल गांधी यांना पर्याय राहुल गांधी हेच आहेत, हे ओळखून त्यांनी आता पक्षावरची पकड आधी मजबूत करायला हवी. कारण हा पक्ष लोकांपासून दुरावला आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर, बराचसा वृद्धाश्रम झालेला आहे.
त्यातली ही काही नावं आणि त्यांची वयं बघा- अहमद पटेल (७२), मोतीलाल होरा (९२), दिग्विजय सिंग (७३), मल्लिकार्जुन खरगे (७७), ए. के. अंटोनी (७९), अशोक गेहलोत (६९), गुलाम नबी आझाद (७२), कपिल सिब्बल (७१), पी. चिदंबरम (७४). ही मंडळी स्वत:ला पक्षाची ‘समृद्धता’ मानत असले तरी मैदानात उतरून भाजपला टक्कर देण्यातील आणि राहुल गांधी यांना त्यांच्या मनाप्रमाणे पक्ष चालवू न देणारी ही नुसती अडगळ नाही, तर एक प्रमुख अडथळा आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक या आठवड्यात प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
२०१४च्या निवडणुकीत देशातील काही लोकसभा मतदारसंघात रितसर मतदान घेऊन कार्यकर्ते म्हणतील त्याच उमेदवाराला लोकसभेची उमेदवारी देण्याच्या राहुल गांधी यांच्या योजनेची वाट लावणारी हीच ती ‘समृद्ध अडगळ’ आहे, हे विसरता येणार नाही. २०१४ आणि २०१९च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी प्रचारासाठी देश पिंजून काढत असताना आपापले मतदारसंघ सांभाळण्यात मग्न असणारी हीच ती समृद्ध अडगळ आहे. ही अडगळ दूर करून पक्षाला नवं नेतृत्व देण्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी कठोरपणे स्वीकारायला हवी. त्याशिवाय तरुण या पक्षाकडे आकर्षित होणार नाहीत आणि या अडगळीने निर्माण केलेल्या मनसबदार्या संपुष्टात येऊन ताज्या दमाच्या नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही.
काँग्रेसमधील राजकारणात अनेक अंत:प्रवाह असल्याचं जे बोललं जात होतं, त्याचा प्रत्यक्ष अनुभव दिल्लीत वावरताना आला. पंतप्रधानपदाची महत्त्वाकांक्षा बाळगणारे सर्वाधिक नेते काँग्रेस पक्षात आहेत, तसंच परस्परांचे पाय ओढणारी संस्कृती जेवढी काँग्रेस पक्षात फोफावलेली आहे, तेवढी अन्य कोणत्याही पक्षात नाही, पक्षांतर्गत राजकीय बेबंदशाही कशी असते, याचं ते अप्रतिम उदाहरण आहे.
एकीकडे राहुल यांच्याकडे पक्षाची सूत्रे द्यावीत अशी आग्रही मागणी होती, तर त्या मागणीला सोनिया गांधी यांच्या किचन कॅबिनेटचा ठाम विरोध होता. किचन कॅबिनेट म्हणजे अहमद पटेल, मोतीलाल होरा, दिग्विजय सिंग, मल्लिकार्जुन, ए. के. अंटोनी, गुलाम नबी आझाद ही मंडळी. त्यात पुन्हा या सगळ्या मंडळींचे वेगवेगळे गट आणि उपगटही आहेत.
याच दरम्यान राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावं, अशी अनेक आणि विशेषत: पन्नाशीच्या आसपास असणाऱ्या वयोगटातील काँग्रेस नेत्यांची इच्छा होती. मात्र एकदा राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं आणि त्यासाठी पक्षाचं नेतृत्व निर्विवादपणे त्यांच्याकडे सोपवलं की, उमेदवार ठरवणं, निवडणूक लढवणं आणि यानिमित्तानं होणाऱ्या आर्थिक उलाढालीचे निर्णय घेण्याचे सर्व अधिकार हातून जातील आणि आपल्या दुकानदाऱ्या, मनसबदाऱ्या संपुष्टात येतील, हे काँग्रेसमधले बुजुर्ग, बनेल आणि बेरकी अडगळीला समृद्धपणे ठाऊक होतं.
त्यामुळे राहुल गांधी यांच्या हातात सूत्र जावू नयेत, यासाठीही सोनिया गांधी यांचं किचन कॅबिनेट आणि या किचन कॅबिनेटमध्ये नसणारेही अनेक बुजुर्ग नेते एकवटलेले होते. पण गांधी हे नाव नसेल तर निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून नाईलाज होता. म्हणून आणि म्हणूनच राहुल गांधी यांच्या हाती अखेर पक्षाचे आधी उपाध्यक्ष आणि मग अध्यक्ष म्हणून म्हणून सूत्रं देण्यात आलीच...
राहुल गांधी यांची सुरुवातीची एक सर्वांत महत्त्वाची समस्या अशी होती की, त्यांचं बरंचसं बालपण सुरक्षेच्या कारणास्तव परदेशी आणि गोपनीय गेलेलं होतं. अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत स्वत:ची ओळख लपवून राहुल गांधी यांचं शालेय आणि महाविद्यालयीन जीवन गेलं. नंतर राहुल गांधी यांची इच्छा आहे किंवा नाही याचा कोणताही विचार न करता ‘गांधी’ असल्यामुळे त्यांच्याकडे नेतृत्व सोपवण्यात आलं, तेव्हा त्यांचा या देशातील जनतेशी थेट संपर्क नव्हता. नेते-कार्यकर्त्यांशी असावी लागणारी त्यांची नाळ कधी जुळूच शकलेली नव्हती. (आता अलीकडच्या आठ-दहा वर्षांत हे मुद्दे राहुल गांधी यांनी निकालात काढले आहेत!) त्यातच काँग्रेसमधले अंत:प्रवाह म्हणजे दिग्विजय सिंग यांचा एक, मोतीलाल व्होरा यांचा दुसरा, अहमद पटेल यांचा तिसरा, चिदंबरम यांचा चौथा, प्रत्येक राज्याचे पक्षातील राहुलविरोधी बनेल-बेरकी-बनचुक्यांचा पाचवा, शिवाय सोनिया यांच्या किचन कॅबिनेटमधील स्थान गमावण्याची भीती असलेल्या बुजुर्ग असे राहुल यांच्या मार्गातील अनंत अडथळे होते आणि आजही आहेत.
काँग्रेसचे नेते कसे बेरकी आहेत याचा मागे लिहिलेला एक अनुभव पुन्हा सांगतो – दिल्लीत असताना लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत एका ‘बेरक्या’च्या दरबारात काही काळ सामील होण्याची संधी मिळाली. एकीकडे ‘राहुल गांधी आगे बढो’च्या घोषणा देणारे हे बेरके दुसरीकडे राहुल यांचा उल्लेख खाजगीत ‘शहजादे’ असाच करत. डोक्यावर बर्फ, जिभेवर खडीसाखर आणि मनात काय चाललंय, हे समोरच्याला कळू न देण्याचं व्रत धरून दिल्लीत राजकारण केलं जातं, ते व्रत इमाने-इतबारे पाळणारे हे बेरके नेते होते.
दिल्ली दरबारचं पाणी चोवीस तास पिण्याच्या संस्कृतीत आकंठ बुडालेल्या या बुजुर्गांनी उमेदवारी मिळण्याबाबत निश्चिंत रहा असा सल्ला देताना त्यांच्या एका ‘पठ्ठ्या’ला जे हिंदीत सांगितलं, ते असं- ‘नये है, शहजादे अभी काँग्रेस पार्टी में’.
मग एक दीर्घ पॉझ. मग पुढे, ‘काँग्रेस मानो पिझ्झा हैं, समझे?’ पुन्हा एक पॉझ आणि मग विचारणा, ‘पिझ्झा खाते हों ना?’ त्यावर त्या पठ्ठ्याने मान डोलावली.
मग नेते पुढे म्हणाले, ‘पिझ्झा का डिब्बा चौकोनी आवत हैं. हैं क्या नही?”
पुन्हा पठ्ठ्याने मान डोलावली आणि बुझुर्ग नेते पुढे म्हणाले, ‘पिझ्झा का डिब्बा चौकोनी आवत हैं, पर पिझ्झा होता हैं गोल और खाते हैं त्रिकोन में. ठीक से सुनो भय्या, ये अपनी काँग्रेस पार्टी हैं ना, पिझ्झे जैसी है. जल्दी समज में नाही आवत हैं. हमारे बाल सफेद हुए राजनीती में. शहजादे को ये नहीं मालूम...’
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
काँग्रेसमधले बुजुर्ग किती इरसाल आणि तय्यारीचे आहेत याचं हे दर्शन आहे. अशांशी राहुल यांचा सामना ते आधी उपाध्यक्ष आणि मग अध्यक्ष झाले तेव्हा होता आणि अजूनही आहे.
पक्षाला नवसंजीवनी देण्याचं आव्हान राहुल गांधी यांना आज ना उद्या स्वीकारावं लागणारच आहे, कारण त्यांच्या नेतृत्वाशिवाय काँग्रेसला पर्याय नाहीच. त्यात सोनिया गांधी (७३) आजारी आहेत, त्यांच्या सक्रिय असण्यावर बंधनं आलेली आहेत आणि सोनिया गांधी यांचा अपवाद वगळता विद्यमान एकही तरुण किंवा बुजुर्ग नेता राष्ट्रीय तर सोडाच पूर्ण राज्यस्तरीयही मान्यता आणि प्रभावाचा नाही. यापैकी एकाही नेत्याच्या सभेला देशाच्या काना-कोपर्यात हजार लोक येणार नाहीत, मतदारही त्यापैकी एकाच्याही नावावर काँग्रेसला मतदान करणार नाही, अशी या सर्व नेत्यांची ‘अफाट लोकप्रियता’ आहे. हे सर्व मनसबदार म्हणजे ‘आऊट डेटेड चेक्स’ आहेत, हे धनादेश आता कधीही वठणार नाहीत. प्रदीर्घ काळ सत्तेत राहिल्यानं हे नेते ल्युटन्स संस्कृतीचे गुलाम झाले आहेत आणि निरलसपणे पूर्ण झोकून देऊन पक्ष संघटना वाढवण्याचं काम विसरलेले आहेत. त्यामुळे पक्षातील सर्व मनसबदाऱ्या बरखास्त करण्याची कठोर भूमिका घेत स्वत:ची नवी टीम उभारून पक्षाला पुन्हा नावलौकिक आणि सत्ता प्राप्त करण्यासाठी राहुल गांधी यांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.
‘आयुर्विम्याला पर्याय नाही’ अशी एक जाहिरात पूर्वी होती, तसं आत्ताच्या घटकेला काँग्रेसला राहुल गांधी यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही आणि हा पर्याय खुल्या मनानं एकजात सर्व काँग्रेसजनांनी स्वीकारण्याशिवाय दुसरा पर्याय नाही!
..................................................................................................................................................................
लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.
praveen.bardapurkar@gmail.com
भेट द्या - www.praveenbardapurkar.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment