आक्रमक, साम्राज्यवादी आणि कुरापतखोर ‘चीन’विषयीची ही २० मराठी पुस्तके वाचलीच पाहिजेत
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
टीम अक्षरनामा
  • ‘चीन’विषयीच्या २० मराठी पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Fri , 24 July 2020
  • ग्रंथनामा शिफारस चीन भारत महासत्ता The Guilty Men of 1962

गेले काही दिवस चीनविषयी भारतात जोरदार चर्चा सुरू आहे. चीनने गलवान खोऱ्यात केलेले आक्रमण, त्याविषयी केंद्र सरकारने दिलेले स्पष्टीकरण, परराष्ट्र मंत्रालयाने केलेला खुलासा आणि ‘चायना बॅन’चे सोशल मीडियावरील नारे… ६२पासून आजवर चीनने अनेकदा भारताच्या कुरापती काढल्या आहेत. २००० सालापासून चीन एक उभरती महासत्ता म्हणून जागतिक पातळीवर पुढे यायला लागला. तेव्हापासून तर चीन अमेरिकेशीही पंगा घेऊ लागला आहे. पूर्वी तिबेट आणि नुकतेच हाँगकाँग त्याने गिळंकृत केले आहे. भारतातल्या पूर्वेकडील काही सीमेलगतच्या राज्यावरही चीन अधूनमधून दावा करत असतोच. चीनचा खोडसाळपणा तर अधूनमधून चालूच असतो. का करतो चीन असे? यातून त्याला काय मिळतं? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला चीनचा गेल्या ७०-७५ वर्षांचा प्रवास समजून घ्यायला हवा.

आधुनिक चीनविषयीचं पहिलं मराठी पुस्तक १९४८ साली प्रकाशित झालं. तिथपासून आजवर मराठीत चीनविषयी अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. त्यातील काही निवडक पुस्तकांचा हा परिचय.

..................................................................................................................................................................

इतिहास-वर्तमान

१) आणि ड्रॅगन जागा झाला – अरुण साधू, राजहंस प्रकाशन, पुणे, १९७२

‘आणि ड्रॅगन जागा झाला’ ही पत्रकार अरुण साधू यांची लेखमाला १५ ऑगस्ट १९६६पासून साप्ताहिक ‘माणूस’च्या अंकात प्रकाशित व्हायला सुरुवात झाली. त्याला निमित्त होतं माओ त्से तुंग यांनी चीनमध्ये केलेली ‘सांस्कृतिक क्रांती’. १९११ साली चीनमधली राजेशाही संपली. त्यानंतरच्या काळात तिथे लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न झाला, पण तो यशस्वी होऊ शकला नाही. १९४८ साली कम्युनिस्टांचा सहा महिन्यांच्या आत नि:पात करण्याची घोषणा करणाऱ्या चँग कै शेक सरकारला १९४९मध्ये चीनमधून परांगदा व्हावे लागले. १९४९साली चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली. माओने कम्युनिस्ट चळवळीत पाडलेली फूट, चीनची भौतिक प्रगती, चीनमधील व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच, अमानुष दडपशाही, भारतावरील आक्रमण, अणवस्त्रांची चाचणी आणि साम्राज्यशाहीचे धोरण, यांमुळे चीनबद्दल जगभर कुतूहल निर्माण झाले होते. जगाच्या, विशेषत: भारताच्या दृष्टीने चीन एक ‘धोकादायक राष्ट्र’ झाले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर चीनमधल्या सांस्कृतिक क्रांतीचे महाभारत अर्थात माओच्या उदयास्ताची समग्र कथा सांगणारी ही लेखमाला प्रकाशित झाली होती. माओ आणि त्यांची क्रांतीची इतकी सविस्तर ओळख करून देणारी ही मराठीतली पहिलीच मालिका. त्यामुळे ती त्या काळी खूप गाजली. नंतर १९७२ साली ती राजहंस प्रकाशनाने पुस्तकरूपात प्रकाशित केली.

२) ड्रॅगन जागा झाल्यावर... - अरुण साधू, राजहंस प्रकाशन, पुणे, २००९

माओच्या सांस्कृतिक क्रांतीनंतर चीन बराच काळ एखाद्या निद्रिस्त ड्रॅगनसारखा निपचित पडून राहिला. तो जागा तो १९७८ साली. डेंग झ्याव पिंग यांच्या आर्थिक सुधारणांच्या परिणामांनी. तेव्हापासून चीनने जगाची झोप उडवायला सुरुवात केली. स्वाभिमानाने सजलेली आणि रक्ताने माखलेली नवी क्रांती चिनीमध्ये घडू लागली होती. साम्यवादी धोरणे धाब्यावर बसवून चीनने प्रगतीची जी शिखरे गाठायला सुरुवात केली, ती साऱ्या जगाला अचंबित करणारी होती. २००० सालानंतर चीन दुसरी महासत्ता म्हणून झपाट्याने पुढे येऊ लागला. चीनच्या या नव्या प्रवासाची कथा या पुस्तकात अरुण साधू यांनी उलगडून दाखवली आहे. ‘आणि ड्रॅगन जागा झाला’चा हा पुढचा भागही पहिल्याइतकाच उत्कंठावर्धक आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/3059/Dragon-jaga-jhalyavar

३) माओ – क्रांतीचे चित्र आणि चरित्र – वि. ग. कानिटकर, इनामदार बंधू प्रकाशन, पुणे, १९७१

अरुण साधू यांची दोन्ही पुस्तकं वाचल्यानंतर माओविषयी आपल्या मनात कुतूहल निर्माण होतं. ‘आणि ड्रॅगन जागा झाला’मधून माओ भेटतोच, पण कानिटकरांच्या या पुस्तकातून तो अधिक एकसलगपणे भेटतो. माओच्या सांस्कृतिक क्रांतीचं स्वरूप, त्यातून जागा झालेला चिनी शेतकरी यांविषयी या पुस्तकात सविस्तर वाचायला मिळतं. माओच्या आधीचा चीन कसा होता, माओच्या काळात तो कसा झाला, का झाला, कशा प्रकारे झाला, या प्रश्नांची उत्तरं या पुस्तकात मिळतात.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/4360/Mao---Krantiche-chitra-ani-charitr

४) आव्हान चीन ड्रॅगनचे – ब्रिगेडियर हेमंत महाजन, नचिकेत ई-बुक्स, नागपूर, ऑक्टोबर २०१३

हे २०१३मध्ये प्रकाशित झालेलं पुस्तक. त्याचे लेखक आहेत ब्रिगेडियर हेमंत महाजन. थोडक्यात हे पुस्तक एका माजी लष्कराधिकाऱ्याच्या नजरेतून लिहिलं गेलेलं आहे. त्यात चीन कसा कुरापतखोर आहे, यावर भर दिलेला आहे. १९६२ साली चीनने भारताचा पराभव केला, त्यात लष्करापेक्षा तत्कालीन नेत्यांची कशी चूक होते, त्या घोडचुकीपासून आपण काही शिकलो का, चीनपुढे आपण सतत गुडघे का टेकतो, पाक-चीनचे भारताशी कसं छुपं युद्ध सुरू आहे, चीन ब्रह्मपुत्रेचं पाणी कसा पळवतोय, चीनमध्ये नवं नेतृत्व सत्तेवर आलं तरी भारताविषयीच्या त्याच्या धोरणात कसा बदल होत नाही, चीनची आक्रमकता कशी दिवसेंदिवस वाढत आहे, याची माहिती देणारं हे पुस्तक आहे. या माहितीला आकडेवारी, चित्र, नकाशे यांची जोड आहे.

५) चीन वेगळ्या झरोक्यातून - अंजली सोमण, प्रफुल्लता प्रकाशन, पुणे, २०१९

हे अगदी अलीकडचं पुस्तक. २०१६मध्ये या पुस्तकातील प्रकरणं ‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकातून क्रमश: प्रकाशित झाली. त्यानंतर ती पुस्तकरूपानं प्रकाशित झाली. वरील तिन्ही पुस्तकं वाचण्याएवढ्या वेळ नसेल किंवा चीनबद्दल खूप सखोल माहिती नको असेल तर या पुस्तकाचा पर्याय अवलंबायला हरकत नाही. यात माओपासूनच्या चीनही धावती ओळख आहे. ‘शांघाय’, ‘चीनचा इतिहास’, ‘माओ त्से तुंग’, ‘सांस्कृतिक क्रांतीनंतर’, ‘चीनमधील स्त्री’, ‘चिनी कुटुंब’, ‘चीनमधील वंश आणि धर्म’, ‘बदललेली नवी पिढी’, ‘चीनमधील गरिबी आणि चीनची सद्यस्थिती’, या १० प्रकरणांच्या शीर्षकातून या पुस्तकाचं स्वरूप पुरेसं स्पष्ट होतं. आटोपशीर असलं तरी हे पुस्तक वाचनीय आहे.

६) ड्रॅगनचे करोनास्त्र - अरविंद व्यं. गोखले आणि वासुदेव कुलकर्णी, श्री गंधर्व-वेद प्रकाशन, पुणे, २०२०.

हे पुस्तक नुकतंच म्हणजे जून २०२०मध्ये प्रकाशित झालं आहे. ‘वूहान विषाणू’ अर्थात करोनाबद्दल माहिती देणारं हे मराठीतलं पहिलं पुस्तक मानलं जातं. जगाला आपल्या पकडीत घेणाऱ्या करोनाचा मूळ विषाणू चीनमधल्या वुहानचा. तो वटवाघळांकडून माणसांत पसरला, असं मानलं जातं. वुहानमधल्या प्रयोगशाळेतून हा विषाणू पसरला किंवा बाजारपेठेतून याबाबत अजूनही मतमतांतरं आहेत. पण सुरुवातीच्या काळात याविषयी चीनमधून येणाऱ्या बातम्यांनी किंवा चीनच्या हवाल्यानं दिल्या जाणाऱ्या बातम्यांनी बराच गोंधळ आणि प्रश्न निर्माण केले. त्यांची समाधानकारक उत्तरं अजूनही मिळालेली नाही. या सगळ्याचा आढावा हे पुस्तक घेतं.

या पुस्तकाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहावा -

१९६२ – भारत-चीन युद्ध

१) माओचे लष्करी आव्हान - दि. वि. गोखले, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई, १९६३

ध्यानीमनी नसताना १९६२मध्ये चीनने भारतावर आक्रमण केलं. तेव्हा दै. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे वृत्तसंपादक दि. वि. गोखले यांनी पहिल्या पानावर ‘माओचे लष्करी आव्हान’ हे सदर लिहायला सुरुवात केली. युद्धशास्त्राचा अभ्यास आणि प्रासादिक लेखनशैली ही दिविंची वैशिष्ट्यं. त्यामुळे त्यांचं हे सदर अल्पावधीतच लोकप्रिय झालं. या सदरातून दिविंनी चीनी लष्कराच्या हालचाली, त्यांची व्यूहरचना, भारतीय सैन्य, त्याची परिस्थिती, भारताचा पराभव, यांचा आढावा घेतला आहे. त्या सदराचं हे पुस्तकरूप. याला पु. ल. देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिली आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे – “गोखले अस्वस्थ झाले आणि त्यांनी आटोकाट परिश्रम करून, इतिहास आणि वर्तमानाचे दाखले देऊन ही लेखमाला लिहिली. ती लिहिताना त्यांचा संयम सुटला नाही. त्यांनी ज्यांवर दोषारोप करायचा, तो पुराव्यानिशी केला. गलिच्छ उखाळ्यापाखाळ्या काढून नुसती वर्तमानपत्री सनसनाटी साधली नाही.” या पुस्तकाबद्दल सांगण्यासाठी इतकं पुरेसं आहे.

२) बासष्टचे गुन्हेगार – दि. रा. मंकेकर, अनुवाद वि. स. वाळिंबे, केसरी प्रकाशन, १९६९

६२च्या चीनसोबतच्या युद्धात भारताचा मानहानीकारक झालेला पराभव हा भारतीयांच्या जिव्हारी लागला. त्यातून या पराभवामागची कारणं शोधण्याचं काम प्रसिद्ध इंग्रजी पत्रकार डी. आर. मंकेकर यांनी केलं. शोधपत्रकारितेतून त्यांच्या जे हाती लागलं त्याविषयी त्यांनी ‘The Guilty Men of 1962’ हे इंग्रजी पुस्तक १९६८मध्ये लिहिलं. त्याचा हा मराठी अनुवाद. हा अनुवाद तत्परतेनं केला गेला असला तरी तो सरस म्हणावा असा आहे. या पुस्तकात मंकेकर यांनी ६२च्या आपल्या राष्ट्रीय मानहानीचा किंवा नामुष्कीचा गुन्हा नेमका कुणाच्या हातून घडला याची निर्भीड आणि वस्तुनिष्ठ चिकित्सा केली आहे. पंतप्रधान पं. नेहरू, संरक्षणमंक्षी कृष्ण मेनन, त्यावेळचे सेनाधिकारी आणि संसदेतील विरोधी पक्षनेते, यांना मंकेकर यांनी दोषी ठरवलं आहे.

३) वालाँग... एका युद्धकैद्याची बखर -  श्याम चव्हाण, राजहंस प्रकाशन, पुणे, १९८८

हे १९६२च्या भारत-चीन युद्धावरील एक वेगळं पुस्तक. या पुस्तकाचे लेखक हे लष्करात लेफ्टनंट कर्नल होते. हे पुस्तक त्यांचं अनुभवकथन आहे. पुस्तकाच्या शीर्षकातूनच त्याचं स्वरूप स्पष्ट होतं. अरुणाचल प्रदेशात घुसखोरी करत चीनने हिमालयाच्या शिखरावरील भारतीय चौक्या नष्ट केल्या. तेव्हा चीनला तिथेच थोपवण्याची जबाबदारी चव्हाण यांच्या तुकडीवर सोपवली जाते. ते चीनला कसं थोपवतात, त्याची कहाणी म्हणजे हे पुस्तक. सैनिक म्हणून चीनशी केलेला निकराचा सामना, पण पदरी आलेलं अपयश, त्यानंतर घ्यावी लागलेली माघार आणि युद्धकैदी म्हणून काढावे लागलेले काही दिवस… या प्रत्यक्ष अनुभवामुळे हे पुस्तक चित्तथरारक झालं आहे.

४) न सांगण्याजोगी गोष्ट : ’६२च्या पराभवाची शोकांतिका - मे. ज. शशिकांत पित्रे, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१५

१९६२च्या चीनसोबत युद्धावरील हे चौथं पुस्तक. वरील तिन्ही पुस्तकं तशी छोटी आणि युद्धानंतर लगेचच प्रकाशित झाली. हे पुस्तक मात्र पाच वर्षांपूर्वी म्हणजे युद्धानंतर जवळपास ५० वर्षानंतर प्रकाशित झालं आहे. जवळपास सव्वाचारशे पानांचं हे पुस्तक मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे यांनी रितसर अभ्यास करून, संशोधन करून लिहिलं आहे. छायाचित्रं, नकाशे, संदर्भग्रंथ यांची जोड असल्यानं हे पुस्तक विश्वसनीय तर झालं आहेच, शिवाय या पुस्तकातून ६२च्या युद्धाचं समग्र चित्र उभं राहतं. या युद्धात काय घडलं, कसं घडलं, का घडलं, या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरं देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. त्यामुळे हे पुस्तक संग्राह्य झालेलं आहे.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/3096/Na-Sanganyajogee-Goshta

प्रवासवर्णने

१) आम्ही पाहिलेला चीन – कुसुम नारगोलकर, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, १९७९

६२च्या युद्धानंतर चीनचं दार भारतासाठी बंद झालं, तब्बल १६ वर्षं. १९७८ साली चीनने ते दारं पहिल्यांदा उघडलं. त्यानंतर काही दिवसांनी सामाजिक कार्यकर्त्या कुसुम नारगोलकर यांनी लोकवर्गणीतून पैसे जमा करून चीनचा दौरा केला. त्या दौऱ्यावर आधारित हे पुस्तक आहे. चीनचा ग्रामीण भाग फिरून पाहिल्यानंतर आणि तेथील समाजवादी समाजजीवन जवळून पाहिल्यानंतर लिहिलेलं हे पुस्तक आहे. ‘गंगेच्या तीरावरून च्चू चियांगच्या तिरावर’, ‘माओच्या जन्मभूमीवरून उड्डाण’, ‘भारताशी नाते जोडणारे धागेदोरे’, ‘पैचिंग : चीनची अर्वाचीन लोकधानी’, ‘साम्यवादी व्यवस्थेबाबत काही प्रश्न’, ‘नागरिक जीवनाचं ओझरतं दर्शन’, ‘भगीरथ प्रयत्नांचा आदर्श – ताचाय’, ‘चिनी साम्यवादी पक्षाचं जन्मस्थान : शांघाय’ आणि ‘‘येन चिंग द चन ठू’ – प्रदीर्घ आणि बिकट मार्ग’ अशा नऊ प्रकरणांत हे पुस्तक विभागलं आहे.

२) माओनंतरचा चीन – माधव गडकरी, श्रीविद्या प्रकाशन, पुणे, १९८१

१९७९साली तत्कालीन परराष्ट्रमंत्री अटलबिहारी वाजपेयी चीनच्या दौऱ्यावर गेले. ६२च्या युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय मंत्री चीनमध्ये गेले होते. त्यांच्यासोबत शिष्टमंडळ होतं. त्यात पत्रकार, उद्योगपती यांचा समावेश होता. त्यात पत्रकार दै. ‘सकाळ’चे संपादक माधव गडकरीही होते. त्या दौऱ्यात त्यांनी जे पाहिलं, अनुभवलं त्यावर हे पुस्तक आधारित आहे. थोडक्यात हे माओनंतरच्या चीनचं एक ओझरतं दर्शन आहे. हे मुख्यत: प्रवासवर्णन असलं तरी गडकरी यांनी चीनविषयक इंग्रजी व मराठी संदर्भग्रंथांचीही जोड आपल्या लेखनाला दिली आहे. शिवाय उद्याचा भारत व चीन कसा असेल याविषयीही थोडक्यात लिहिलं आहे.

३) चीन : एक अपूर्व अनुभव – गंगाधर गाडगीळ, सुरेश एजन्सी, पुणे, १९९३

हे पुस्तक पूर्णपणे साहित्यिक स्वरूपाचं प्रवासवर्णन आहे. नोव्हेंबर १९९१मध्ये गाडगीळ पहिल्यांदा लेखकांच्या प्रतिनिधी मंडळाबरोबर चीनला गेले. त्यानंतरही ते अनेकदा गेले. त्यातून आधी लेखमाला आणि नंतर पुस्तकरूपात हे लेखन अवतरलं. या पुस्तकाबाबत गाडगीळांच्याच शब्दांत सांगायचं तर ‘हे संपूर्णतया कालानुक्रमानं केलेलं धावतं निवेदन नाही. उदाहरणार्थ साहित्य, आर्थिक स्थिती, समाजजीवन इत्यादींबद्दलची प्रवासभर विखुरलेली निवेदनं मी एकत्र केली आहेत. शिवाय या बाबींतल्या अनुभवांची नुसती नोंद न करता त्याचं विश्लेषण करून अन्वयार्थ लावला आहे. सुरुवातीला काही ओळख करून देणाऱ्या व वातावरण निर्माण करणाऱ्या धावत्या नोंदी, नंतर असे अन्वयार्थ लावणारे लेख व अखेर निरनिराळ्या स्थळांचं सौंदर्य, सांसाकृतिक संदर्भ इत्यादींचं चित्रण पुष्कळसं कलात्मकरीत्या करणारे लेख असं या पुस्तकाचं स्वरूप आहे.’

४) ड्रॅगनच्या देशात - वि. वा. भिडे, ब्लू बर्ड (इंडिया) लिमिटेड, पुणे, २००७

हेही प्रवासवर्णनच. पण चीनमध्ये काही महिने राहून, चीनमधील वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देऊन लिहिलेलं हे पुस्तक आहे. यातून चीनच्या ऐतिहासक-सांस्कृतिक वारशाची माहितीही काही प्रमाणात होते.

५) चिनीमाती – मीना प्रभू, मौज प्रकाशन गृह, मुंबई, २००८

चीनवरचं हे अलीकडच्या काळातलं सर्वाधिक वाचलं गेलेलं, निर्मितीच्या दृष्टीनेही सर्वांगसुंदर असलेलं प्रवासवर्णन आहे. मौज प्रकाशन गृहाने या पुस्तकाची केलेली निर्मिती खरोखरच लोभस म्हणावी अशी आहे. बाकी चीनमध्ये फिरताना भाषेपासून येणाऱ्या अडचणी, चीनचा सांस्कृतिक इतिहास, तेथील समाजजीवन, आर्थिक विकास या गोष्टींही ओघात येतात. पण मुख्यत: प्रवासाचे अनुभव असंच या पुस्तकाचं स्वरूप आहे.

चिनी पुस्तकांचे अनुवाद

१) लाइफ अ‍ॅण्ड डेथ इन शांघाय - निएन चंग, अनुवाद निर्मला स्वामी गावणेकर, राजहंस प्रकाशन, पुणे, २००४

१९६६ साली चीनमध्ये माओ त्से तुंग यांच्या नेतृत्वाखाली ‘सांस्कृतिक क्रांती’ झाली. ‘सामान्य माणसांना सतत जागृत ठेवण्यासाठी क्रांतीचे धक्कातंत्र अनुसरले पाहिजे’ या सिद्धान्ताचा आधार घेत ही क्रांती घडवून आणली गेली. या रक्तरंजित क्रांतीत अनेकांची आयुष्यं उदध्वस्त झाली, केली गेली. निएन चंग ही त्यापैकीच एक दुर्दैवी आई. तिची हरवलेली मुलगी तिला शेवटपर्यंत सापडत नाही. रेड गार्ड, स्वार्थी राजकीय नेते आणि सामान्य चिनी नागरिकांचं केविलवाणं जगणं यांचं अतिशय प्रभावी चित्रण करणारं हे पुस्तक जगभर गाजलेलं आहे. मूळ इंग्रजी पुस्तकाइतका मराठी अनुवाद गाजला नसला तरी तो आवर्जून वाचण्यासारखा आहे, हे नक्की.

२) सोल माऊंटन – गाओ झिंगजिआन, मराठी अनुवाद मधु साबणे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०११

गाओ झिंगजिआन हे नोबेल पुरस्कारविजेते चिनी लेखक. अर्थातच चिनीमधून स्थलांतर करावे लागलेले. त्यांच्या ‘लिंगशान’ या मूळ चिनी कादंबरीचा ‘सोल माऊंटन’ या नावानं इंग्रजी अनुवाद झाला. त्याचा हा मराठी अनुवाद. माओच्या सांस्कृतिक क्रांतीमुळे गाओ झिंगजिआन यांना चीनमधून पलायन करावं लागतं. त्या प्रवासातल्या महाभारताची ही कहाणी आहे. नोबेल पुरस्कार समितीने या कादंबरीविषयी म्हटलं आहे की, ‘जागतिक वाङ्मयात अशा अनेक कलाकृती आहेत, ज्यांची तुलना त्यांच्या स्वत:शीच होऊ शकते. अशाच कलाकृतींपैकी ‘सोल माऊंटन’ ही एक कलाकृती आहे.’

३) मुक्त विहंग : चीनच्या तीन कन्या (अनन्वित अत्याचाराच्या व अमानुष राजवटीच्या पार्श्वभूमीवरची हृद्य कहाणी) - युंग चँग, मराठी अनुवाद - डॉ. विजया बापट, मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे, २०१३

ही तीन पिढ्यांची दुर्दैवी गाथा आहे. आजी, आई आणि तिची लेक अशा या तीन पिढ्या. या तीन पिढ्यांच्या जीवनकहाणीच्या माध्यमातून चीनचा राजकीय-सामाजिक इतिहासही नोंदवला गेला आहे. हा इतिहास अधिकृतपणे कुठेही नोंदवला गेलेला नाही. चीनमधल्या जुलमी, अत्याचारी राजवटीविषयी, अमानुष छळाविषयी इंग्रजीमध्ये अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यातली बरीचशी चीनमधून पलायन कराव्या लागलेल्या लेखकांनीच लिहिलेली आहेत. हेही त्यापैकीच एक. या पुस्तकावर चीनमध्ये बंदी आहे. छळ, अत्याचार, हिंसाचार यांच्या सावटाखाली नवनिर्मितीचा आस लागलेल्या, आधुनिकतेची कास धरू पाहणाऱ्या आणि सौंदर्याची आस लागलेल्या स्त्रियांची ही हृद्य कहाणी अंतर्मुख करते.

भारत आणि तीन

१) सुपरपॉवर? : चीन आणि भारत यांच्यातील ससा-कासवाच्या शर्यतीची चित्तथरारक कहाणी – राघव बहल, मराठी अनुवाद - नीता कुलकर्णी, अमेय प्रकाशन, पुणे, २०११

हा ‘Super Power : The Amazing Race Between China's Hare and India's Tortoise’ या २०१० साली प्रकाशित झालेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. हे पुस्तक लिहिलं आहे माध्यमकर्मी, संपादक राघव बहल यांनी. या पुस्तकाची तेव्हा बरीच चर्चा झाली होती. यात भारत आणि चीन या दोन महासत्तापदावर दावा करू पाहणाऱ्या आशियातल्या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास आहे. या दोन्ही देशांच्या क्षमता, त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि त्यांच्यापुढील आव्हानं यांचा आढावा या पुस्तकात वाचायला मिळतो.

२) कथा एका शर्यतीची (लोकशाहीवादी भारत आणि साम्यवादी चीन या दोन देशांनी केलेल्या वाटचालीचा आढावा) – योगिनी वेंगुर्लेकर, राजहंस प्रकाशन, पुणे, २०१९

राघव बहल यांच्या पुस्तकानंतर जवळपास आठ-नऊ वर्षांनी हे तशाच स्वरूपाचं पण स्वतंत्र मराठी पुस्तक अलीकडेच प्रकाशित झालं आहे. बहल यांच्या पुस्तकात भारत-चीन यांच्या आर्थिक प्रगतीवर जास्त भर दिलेला आहे, तर या पुस्तकात राजकीय, सामाजिक, औद्योगिक याही पातळीवर या देशांचा तुलनात्मक अभ्यास आहे. ‘लोकशाहीवादी भारत आणि साम्यवादी चीन या दोन देशांनी केलेल्या वाटचालीचा आढावा’ असं या पुस्तकाचं लांबलचक शीर्षक आहे आणि त्याच्या मुखपृष्ठावर हत्ती (भारताचे प्रतीक) आणि ड्रॅगन (चीनचे प्रतीक) आहेत. यातून या दोन्ही देशांची प्रगती आणि धाव अधोरेखित केली गेली आहे. हे दोन्ही देश प्रगतीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलेले असले तरी त्यांच्या प्रगतीमध्ये महदअंतर आहे. ते नेमकं काय आणि भविष्यात काय होऊ शकतं, याचे विवेचन या पुस्तकात वाचायला मिळतं.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा - https://www.booksnama.com/book/5042/Katha-Eka-Sharayatichi#

… ही झाली चीनविषयीची काही निवडक पुस्तकं. याशिवाय अजूनही काही पुस्तकं आहेत. त्या सगळ्यांची संख्या १००-२००च्या पुढे आहे. ती सगळीच पुस्तकं काही सर्वांनाच वाचता येतील असं नाही. पण चीन समजून घ्यायचा असेल तर किमान ही २० पुस्तकं तरी वाचायलाच हवीत.

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......