अजूनकाही
लेखनाच्या क्षेत्रात विश्वास पाटील हे नाव ऐकले की, मराठी वाचकांना कादंबरीकार विश्वास पाटील आठवतात. कारण मागील तीस वर्षांत, समाजमनाला भिडणाऱ्या विविध विषयांवरील त्यांच्या डझनभर कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत, त्या सर्वच कमी-अधिक प्रमाणात लोकप्रिय झाल्या आहेत. मात्र लेखनाच्या क्षेत्रात तुलनेने छोट्या वर्तुळात माहीत असलेले दुसरे एक विश्वास पाटील (१९३० ते २००२) दोन दशकांपर्यंत होते, त्यांना ‘नवी क्षितिजे’कार असे संबोधले जात असे. त्यांनी १९७० नंतरच्या दोन दशकांत ‘नवी क्षितिजे’ या त्रैमासिकाचे संपादन (नाना जोशी यांच्या साथीने) केले. गहन व गंभीर विषय त्या नियतकालिकातून हाताळले जात असत. त्यातून आणि त्या काळातील काही अन्य नियतकालिकांतून विश्वास पाटील यांनी मोठा आवाका असणारे व दीर्घ पल्ल्याचे म्हणावे असे बरेच वैचारिक लेखन केले. त्यातून आकाराला आलेली डझनभर पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील सर्वांत जास्त लक्षवेधी ठरलेले पुस्तक म्हणजे ‘झुंडीचे मानसशास्त्र’. १९७८ मध्ये ते सर्वप्रथम (जनपद प्रकाशन, मुंबई यांच्याकडून) प्रकाशित झाले. त्याची दुसरी सुधारित व विस्तारित आवृत्ती २०००मध्ये (प्रभात प्रकाशन, मुंबई यांच्याकडून) प्रकाशित झाली. त्याच पुस्तकाची तिसरी आवृत्ती पुढील आठवड्यात साधना प्रकाशनाकडून येत आहे.
‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे मराठी पुस्तक दोन अन्य पुस्तकांवर आधारलेले आहे. त्यातील पहिले ‘द क्राऊड’ हे ल बाँ’ (The Crowd : Le Bon) या फ्रेंच लेखकाचे १९८५ मध्ये मूळ फ्रेंच भाषेत आणि नंतर इंग्लिशमध्ये आलेले पुस्तक. आणि दुसरे, ‘ट्रू बिलिव्हर’ हे एरिक हॉपर’ (True Believer : Eric Hoffer) या अमेरिकन लेखकाचे १९५५ मध्ये आलेले इंग्लिश पुस्तक. या दोन्ही पुस्तकांतील विवेचन, विश्लेषण व भाष्य हे सर्व ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकात आले आहे. पण ‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक त्या दोन्हींचे शब्दश: भाषांतर तर नाहीच, पण अनेक वेगळी उदाहरणे यात घेतली आहेत. याचे कारण त्या दोन पुस्तकांत त्या दोन भिन्न काळातील व त्या दोन भिन्न प्रदेशांतील उदाहरणे जास्त असणे साहजिक होते. आणि ते सर्व जसेच्या तसे मराठी पुस्तकात आणले असते तर, अनेक संदर्भ वाचकांना कळले नसते आणि मग ते पुस्तक अवाचनीय व दुर्बोध झाले असते. ती दोन्ही पुस्तके प्रत्येकी दीडशे पाने इतकी लहान आहेत आणि त्या दोन्हींचा आशय एकत्रितपणे आला आहे, असे मराठी पुस्तकही तीनशे पानांच्या दरम्यानच झालेले आहे.
‘झुंडीचे मानसशास्त्र’ हे पुस्तक कमालीचे गहन, गंभीर व वैचारिक आहे, मात्र ते कमालीचे वाचनीयही आहे. (अर्थातच ज्यांना वैचारिक पुस्तके वाचनाची बऱ्यापैकी सवय आहे त्यांच्यासाठी.) कारण त्याची भाषा आखीव-रेखीव आहे, त्यातील विवेचन सुबोध व प्रवाही आहे. हे पुस्तक सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत जाणे केव्हाही चांगलेच. पण बहुतेक वाचकांकडून तसे घडण्याची शक्यता कमी आहे. याचे कारण त्यातील विभाग, प्रकरणे आणि उप्रकरणे यांची सुटसुटीत रचना आणि त्यांची चटकदार व अर्थवाही शीर्षके, यांच्यामुळे वाचकांना मोह आवरता येत नाही. पुस्तक हातात आल्यावर अधल्या-मधल्या कुठल्या तरी प्रकरणावर किंवा उपप्रकरणावर जावे आणि ते-ते आधी वाचावे असे कुतूहल निर्माण होते. ते शमवण्यासाठी त्या-त्या ठिकाणी वाचायला जावे तर मागची किंवा पुढची पाने खुणावत राहतात.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf
..................................................................................................................................................................
हे पुस्तक हातात आल्यावर पहिला अचंबा वाटत राहतो तो अनुक्रमणिकेवर नजर टाकल्यावर. कारण एका नजरेच्या टप्प्यात ती येतच नाही. अनुक्रमणिकेने या लहानशा पुस्तकाची तब्बल आठ पाने व्यापली आहेत. पुस्तकाचा पूर्वार्ध म्हणजे ‘झुंडी’ (द क्राऊड), यातील सहा विभागांत मिळून १८ प्रकरणे आहेत. उत्तरार्ध म्हणजे ‘सच्च्या अनुयायी’ (ट्रू बिलिव्हर), यात चार विभागांतील १३ प्रकरणांत मिळून १२५ उपप्रकरणे आहेत. शिवाय, सुरुवातीला आटोपशीर प्रास्ताविक आणि शेवटी दीर्घ परिशिष्ट...
वरील सर्वांच्या शीर्षकांवर डोळे फिरवू लागताच आपण विचारांच्या क्षेत्रांतील अभयारण्यात प्रवेश केला आहे, अशी जाणीव होऊ लागते. मग हा सर्व बहुमोल ऐवज आत्मसात करायला बरेच दिवस लागणार, याचा अंदाज येऊ लागतो. पुस्तकाचा प्रारंभ विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या ‘झुंडीत शिरण्यापूर्वी’ या आत्मनिवेदनाने होतो. त्यातून पुस्तकाची पार्श्वभूमीवर कळते. प्रास्ताविकातून विषयाचा गाभा व आवाका याचा थोडासा अंदाज येतो. त्यालाच जोडून ‘सक्रिय व नक्रिय चळवळी’ हा बीजलेख येतो.
आणि मग पुस्तकाचा पूर्वार्ध सुरू होतो- ‘झुंडी’. त्यात सहा विभाग येतात : ‘झुंडीची मानसिकता’, ‘झुंडीची मते आणि श्रद्धा,’ ‘झुंडीच्या भावना आणि धारणा,’ ‘झुंडीचे नेते आणि त्यांच्या 3लृप्त्या’, ‘झुंडीची मते आणि मतपरिवर्तन,’ ‘झुंडीचे वर्गीकरण’. या विभागातील मिळून १८ प्रकरणे काय करतात तर मानवी झुंडींचे आतले आणि बाहेरचे रूप उघडे-नागडे करतात. म्हणजे झुंडी कशाला म्हणायचे, त्या कशा आकार घेतात, त्यांची लक्षणे कोणती, त्यांचे शिक्षण-प्रशिक्षण कसे चालते, त्यांच्या धारणा बळकट कशा होतात, त्यांची कार्यपद्धती कशी चालते, त्यांच्यात फाटाफुटी कशा होतात, त्यांची कर्तबगारी काय असते, त्या किती विध्वंसक काम करतात, त्या कितपत सर्जनशील बनू शकतात, इत्यादी.
त्यानंतर पुस्तकाचा उत्तरार्ध सुरू होतो- ‘सच्चा अनुयायी’. त्यात चार विभाग येतात : ‘जनता चळवळींचे आकर्षण,’ ‘चळवळीतील संभाव्य उमेदवार,’ ‘संघटित कृती आणि आत्मसमर्पणाचे आकर्षण,’ ‘चळवळींचा प्रारंभ व शेवट’. त्यात १२ प्रकरणे येतात. मात्र हा संपूर्ण उत्तरार्ध सलग अशा १२५ उपशीर्षकांमध्ये पक्का बांधलेला आहे. त्यातील कोणतीही पाच-दहा उपशीर्षके समोर ठेवली तरी मनात कल्लोळ सुरू होऊ लागतो. उदाहरण म्हणून ही काही शीर्षके पहा... ‘उठावाचे घोषवाक्य : राष्ट्र संकटात आहे’, ‘यांना बदल नकोच आणि त्यांना बदल हवाच,’ ‘बाबा, हे जग बदलायाचे,’ ‘स्वप्नांचे सौदागर,’ ‘देव/देश/धर्मासाठी प्राण घेतले हाती,’ ‘नाना रंगाढंगाच्या चळवळी,’ ‘उभ्या जगाशी दावा,’ ‘स्वर्ग दोन बोटे दूर,’ ‘सुखाचे बंड,’ ‘राखेतले निखारे,’ ‘कुटुंब म्हणजे चळवळीचा शत्रू’, ‘नाही आसू नाही माया’, ‘उसासे आणि जांभया’, ‘हमसे जो टकरायेगा’, ‘फक्त आपल्या जमातीसाठी’, ‘दुगाण्या झाडण्याचा आनंद’, ‘सुस्त सुखी आणि द्रष्टे दु:खी’, ‘भक्ती मोठी म्हणून कार्य मोठे’, ‘सत्कार्याच्या शोधातला मुसाफिर’, ‘परद्वेष हे आत्मद्वेषाचे दुसरे रूप’, ‘एकछापी माणसं’, ‘पोथी आणि तलवार’, ‘नेत्याला शरण जाणे हेच ध्येय’, ‘भित्री भागुबई बनते शूर शिपाई’, ‘दुर्गुणांना वेड्या उत्साहाची साथ’, ‘चळवळीचे अपंग अनुयायी’, ‘चळवळीला चावी देणारे बुद्धिमंत’, इत्यादी.
हे पुस्तक वाचत जाऊ तसे आपले झुंडीबद्दलचे आकलन वाढत जाते. झुंडीचे अनेक प्रकार व उपप्रकार असू शकतात. चार-सहा माणसांचा गट, शे-दोनशे माणसांचा जमाव आणि काही लाखांचा समूह हे सर्व झुंडीमध्ये येऊ शकतात. या झुंडी वेगवेगळ्या कारणाने आकार घेऊ शकतात. म्हणजे जात, धर्म, प्रांत, भाषा, लिंग, प्रदेश, वर्ग, देव, देश, वंश, विचारधारा, पक्ष, पंथ आणि अस्मिता जागी करता येईल अशा कोणत्याही कारणाने झुंडी आकार घेऊ शकतात. म्हणजे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा विविध प्रकारांत त्यांची वर्गवारी करता येईल. कधी त्या स्थानिक पातळीवर असतील, कधी राष्ट्रीय तर कधी आंतरराष्ट्रीय स्तरावरील. या झुंडी कधी काही मागणी करण्यासाठी असतील, कधी एखादा निर्णय रद्द करण्यासाठी असतील, कधी निषेधासाठी तर कधी सिंहासने उलथवून टाकण्यासाठी. या झुंडी विध्वंसक कृत्ये घडवून आणतील किंवा ती कृत्ये रोखण्यासाठी उपयुक्त ठरतील. बऱ्याच दीर्घकालीन प्रक्रियेतून त्या उदयाला येऊ शकतील किंवा तत्कालीन कारणही त्यासाठी पुरेल. कधी झुंडी नेत्याशिवाय आकाराला येतात, कधी नेता झुंडीला आकार देतो. कधी एखाद्या ठिणगीतून झुंडी अक्राळविक्राळ रूप धारण करतात, तर कधी आता क्रांती होणार, असे वाटत असतानाच झुंडी हवेत विरून जातात.
या झुंडींचे प्रकार बरेच आहेत, मात्र त्यांचे स्वरूप व कार्यक्रम यात परस्परविरोधी व मोठी तफावत असू शकते. त्यासंदर्भात विश्वास पाटील म्हणतात, ‘टोमॅटो आणि काटेरिंगणी ही दोन्ही फळे वर्गीकरणांच्या दृष्टीने एकाच फॅमिलीमधील असतात, पण एक शरीराला तारक आहे, तर दुसरे मारक. मात्र आकार, अंतर्गत रचना वगैरे बाबतींत या दोन्ही फळांमध्ये खूप साम्य आहे.’
तर कोणत्याही प्रकारच्या झुंडी आकाराला यायच्या किंवा आणायच्या असतील तर परिस्थितीचे अतिसुलभीकरण करावे लागते, ‘आपण आणि ते’ अशी सरळ फाळणी करावी लागते, शत्रू ‘आहे त्यापेक्षा’ मोठा करून दाखवावा लागतो, अतिरिेक्त धोका किंवा अवाढव्य स्वप्ने दाखवावी लागतात. झुंडीच्या मनात राग, संताप, द्वेष वाढवत न्यावा लागतो. त्यासाठी चमकदार घोषणा तयार कराव्या लागतात, प्रतीके निर्माण करावी लागतात, नेत्यांचा करिश्मा पुन:पुन्हा अधोरेखित करावा लागतो. अपप्रचारासाठी वेगवेगळी आयुधे वापरावी लागतात, कुजबूज आघाडी चालवावी लागते आणि आणखी बरेच काही...
झुंडी जशा अनेक प्रकारच्या व स्वरूपाच्या असतात, तसेच सच्च्या अनुयायांचेही असते. जात, धर्म, भाषा, प्रांत, लिंग, वंश, वर्ग व तत्सम अस्मितेच्या नावाखाली सच्चे अनुयायी झुंडीत सामील होत असतात. त्यातील काही थोड्या काळासाठी, तर काही दीर्घ काळासाठी. काही विशिष्ट मागणी वा विरोधासाठी तर काही दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी. ते स्वत:चे आयुष्य पणाला लावतात, आत्मबलिदानाला तयार होतात. कधी ते दुसऱ्याचा जीव घ्यायला तयार होतात. विशिष्ट ध्येयासाठी, राष्ट्रासाठी, देवासाठी, धर्मासाठी. कधी हा जन्म व हे जीवन क्षणभंगुर आहे असे मानून, तर कधी परलोकातील जीवन हेच खरे या सांगण्यावर भाळून. त्या प्रक्रियेत ते पीडा सहन करतात, त्यात आनंद मानतात. श्रमसफल्याचे सुख अनुभवतात.
या सच्च्या अनुयायांना नेहमी काही तरी कार्यक्रम लागतो, काही तरी उद्दिष्ट लागते, अन्यथा ते सैरभैर होतात. काळे आणि पांढरे अशी मांडणी त्यांना भावते, जास्त गुंतागुंतीची मांडणी त्यांना विचलित करते. नेत्याने विचार केलेला आहे, आपण श्रद्धा/भक्तिभावाने समर्पित झाले पाहिजे, असे त्यांनी आपल्या मनाला बजावलेले असते. आयुष्य झोकून द्यावे किंवा प्राण पणाला लावावे असा नेता त्यांना हवा असतो. एकाकडून भ्रमनिरास झाला तर ते दुसऱ्या नेत्याच्या मागे जातात, मग तिसऱ्या. एक कार्यक्रम संपला की दुसरा, तिसरा. खूप जास्त अभ्यास किंवा विचार केला तर आपण निष्क्रिय होऊ, आपल्या कृतीची धार बोथट होईल, अशी भीती त्यांच्या सुप्त मनात असते. आणि असे बरेच काही...
असे हे पुस्तक क्रमाक्रमाने किंवा कोणत्याही क्रमाने आपण वाचत गेलो की, आपल्या सभोवतालचे संप्रदाय, संघटना, पक्ष, पंथ, चळवळी, आंदोलने यांच्या संदर्भातील अनुभव, आठवणी, प्रसंग जागे होत राहतात. पूर्वीची निरीक्षणे डोके वर काढतात. या पुस्तकातील काही ना काही विश्लेषण तिथे लागू पडते, याची खात्री वाटू लागते. डोक्यात अधिकाधिक प्रकाश पडू लागतो. किती धूर्तपणाने या झुंडी नियंत्रित केल्या जातात, ती माणसे किती कावेबाज व पाताळयंत्री असतात, हे स्पष्ट होऊ लागते. काही समाजविघातक शक्ती आपण समजत होतो त्यापेक्षा भयानक आहेत, याची जाणीव होऊ लागते. त्या विघातक घटकांपासून स्वत:ला व आप्तस्वकीयांना दूर ठेवले पाहिजे, असे मनोमन ठरवावेसे वाटू लागते. आणि मग चांगले सामाजिक कार्य करणारी माणसे व त्यांच्या चळवळीही मन:चक्षूंसमोर तरंगू लागतात. त्यांच्याकडून कळत-नकळत झालेली फसगत आठवू लागते, भ्रमनिरासाचे कटु प्रसंग पुन्हा समोर उभे ठाकतात आणि मग वेगवेगळे साक्षात्कार होऊ लागतात. ते साक्षात्कार वाढत जातात, तसतसे चांगुलपणाविषयी शंका निर्माण व्हायला लागते. मनात घर करून असलेल्या अनेक लहान-थोरांच्या प्रतिमांना तडे जातात. आणि मग वैफल्याची भावना मनात घर करू लागते.
पण हे पुस्तक वाचून होते आणि काळ जस-जसा पुढे सरकत जातो, तस-तसे सर्व प्रकारच्या झुंडी, चळवळी, आंदोलने यांच्यातील वर्गीकरण मनात आकार घेऊ लागते. सुष्ट आणि दुष्ट किंवा सत् आणि असत् प्रवृत्तींमधील संघर्ष म्हणून आपण त्याकडे पाहू लागतो. तो संघर्ष युगानुयुगे चालू आहे आणि त्यापासून आपली सुटका नाही, तर मग सत् प्रवृत्तींच्या मागे आपली सहानुभूती उभी करायला हवी असाच निर्णय येतो. त्यासाठी शक्य तेवढे योगदान द्यावे असे वाटत राहते, मात्र त्यांच्यात असलेल्या मर्यादांचे भान सुटत नाही, अवास्तव स्वप्ने पडत नाहीत आणि अपेक्षाभंगाचे दु:ख तुलनेने कमी होते. आणि मग वैफल्याची भावना पुढील काळात सामंजस्याच्या मार्गावर येऊ लागते.
‘साधना’ साप्ताहिकाच्या २५ जुलै २०२०च्या अंकातून साभार
..................................................................................................................................................................
‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5212/Zundiche-Manasshastra
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment