‘नवी क्षितिजे’कार विश्वास पाटील यांच्या ‘झुंडीचे मानसशास्त्र’ या विचारप्रवर्तक, अतिशय मौलिक अशा पुस्तकाची नवी आवृत्ती ३० जुलै २०२० रोजी साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाच्या उत्तरार्धातील पहिल्या भागातील पहिल्या प्रकरणाचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
१. उठावाचे घोषवाक्य : ‘राष्ट्र संकटात आहे!’
क्रांतिकारी चळवळीत भाग घेतल्यास आपल्या जीवनात आकस्मिक आणि भरघोस बदल होऊ शकेल असे वाटून, चळवळीचा जोर वाढताच अनेक जण तीत भाग घेतात. समाजात बदल घडवून आणण्याचे क्रांतिकारी चळवळ हे एक ठळक साधन आहे, हे याचे कारण.
क्रांतिकारी चळवळीचे हे वैशिष्ट्य सर्वांना माहीत आहे. माहीत नाही ते हे की, असाच बदल धार्मिक आणि राष्ट्रवादी चळवळींमध्येसुद्धा घडून येतो. फार मोठा आणि झपाट्याने बदल घडवून आणायचा असल्यास लोकांमध्ये आवेश संचारावा लागतो. त्यांच्या उत्साहाला उधाण यावे लागते. असा उत्साह आणि आवेश संपत्तीच्या आशेने उत्पन्न होऊ शकतो किंवा चैतन्यपूर्ण व लढाऊ चळवळींच्या दर्शनानेही उत्पन्न होऊ शकतो. आर्थिक भरभराटीची इच्छा हे मनुष्यप्राण्यासाठी फार मोठे प्रेरणादायक आकर्षण आहे. यापैकी केवळ एका प्रेरणेच्या प्रभावामुळेसुद्धा संपूर्ण समाज स्वत:ची भौतिक प्रगती करून घेऊ शकतो. परंतु, ज्या समाजामध्ये वैयक्तिक प्रगतीच्या संधी उपलब्ध नसतात किंवा असल्याच तर अगदी कमी प्रमाणात असतात; तेथील समाजामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी, गतिहीन बनलेल्या समाजाला गती देण्यासाठी, तेथील समाजामध्ये मूलगामी सामाजिक व अन्य बदल घडवून आणण्यासाठी लोकांमध्ये उत्साह निर्माण करावा लागतो. धार्मिक, क्रांतिवादी व राष्ट्रवादी चळवळी यासाठी फार उपयोगी पडतात; कारण विशिष्ट मतप्रणालीच्या बाजूने लोकांच्या मनात आवेश उत्पन्न करण्याचे काम या चळवळी अत्यंत यशस्वीपणे करू शकतात.
पूर्वीच्या काळी धार्मिक चळवळींतून मोठमोठे सामाजिक बदल घडून येत असत. धर्म हे आज रूढीप्रिय भासतात; परंतु एके काळी ते अतिशय गतिशील होते, हे विसरून चालणार नाही. नव्याने उदयास येणारी कोठलीही धार्मिक चळवळ ही फक्त बदल आणि प्रयोगशीलता असते. येथे इस्लाम किंवा ख्रिस्ती धर्माचे उदाहरण देता येईल. इस्लामचा उदय झाला, तेव्हा तत्कालीन समाजामध्ये इस्लामने अनेक नव्या सुधारणा घडवून आणल्या. ख्रिस्ती धर्माने युरोपातील अनेक क्रूर जमातींना सुसंस्कृत बनवले. त्यांच्या चाली-रीतींना नवे वळण दिले. मुस्लिमांकडून जेरुसलेम किंवा आपली पवित्र भूमी परत जिंकून घेण्यासाठी अकरा, बारा व तेराव्या शतकात ख्रिस्ती धर्मीयांनी मुसलमानांविरुद्ध धर्मयुद्धे- क्रूसेड्स चालवली. त्याचा परिणाम म्हणून युरोपमध्ये सुधारणावादाची- रिफॉर्मेशनची चळवळ घडून आली. क्रूसेड्स आणि रिफॉर्मेशन या दोन घटनांमुळे मध्ययुगातला झोपलेला युरोप खडबडून जागा झाला.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf
..................................................................................................................................................................
आधुनिक काळात समाजामध्ये जलद आणि खूप मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणणाऱ्या चळवळींचे स्वरूप कधी क्रांतिवादी, तर कधी राष्ट्रवादी असते. कधी कधी ते संमिश्रही असते. या चळवळींमध्ये लोक मोठ्या संख्येने सामील झालेले असतात. तसे ते झाले नाहीत, तर समाज बदलण्याचे कार्य यशस्वी होत नाही. रशियाचा पीटर द ग्रेट हे याचे उत्तम उदाहरण. अलीकडच्या काळात ज्यांनी आपली चळवळ यशस्वी केली, अशा क्रांतिवादी किंवा राष्ट्रवादी चळवळींच्या म्होरक्यांच्या तोडीस तोड पीटर द ग्रेट होता. या म्होरक्यांपाशी जितकी सत्ता होती, तितकीच पीटर द ग्रेटपाशी होती. त्यांच्याइतकाच तोही निर्दय आणि निष्ठूर होता. स्वत:च्या अंगीकृत कार्यावर जशी, जितकी त्यांची निष्ठा होती, तशी व तितकीच निष्ठा त्याचीसुद्धा आपल्या कार्यावर होती. परंतु, जिथे ते लोक यशस्वी झाले, तिथे पीटर अयशस्वी झाला. रशियाला पाश्चात्य राष्ट्रांच्या पंक्तीत आणावे, ही त्याची महत्त्वाकांक्षा होती; परंतु ते त्याला साधले नाही आणि त्याचे कारण हे की, रशियन लोकांमध्ये त्याला उत्साह उत्पन्न करता आला नाही. कदाचित ही गोष्ट त्याला महत्त्वाची व आवश्यक वाटली नसावी. किंवा महत्त्वाची वाटली तरी ते कसे साध्य करावे, हे त्याला समजले नसावे. पुढे हे काम बोल्शेविकांनी स्वत:च्या अंगावर घेतले नि जिथे पीटर द ग्रेट अयशस्वी झाला, तिथेच ते यशस्वी होऊ शकले. कारण आपल्या बाजूने जनतेची मते कशी पेटवायची, हे त्यांना कळले होते.
फ्रेंच आणि रशियन या दोन्ही क्रांत्यांची परिणती शेवटी राष्ट्रवादी चळवळींमध्ये झाल्याचे दिसून येते. यावरून एक गोष्ट सिद्ध होते. ती ही की- जनतेचा उत्साह जर जागृत करायचा असेल, तर त्याच्यासाठी आधुनिक काळात राष्ट्रवादाच्या घोषणेसारखी उत्तम घोषणा नाही. राष्ट्रवादाच्या आवाहनाचा प्रभाव दीर्घ काळ टिकून राहतो. क्रांतिकारी चळवळींना चालना दिलेल्या जहाल सुधारणांचा प्रयोग यशस्वीपणे शेवटास जावा, असे वाटत असल्यास राष्ट्रवादाच्या भावनेला हात घालणे आवश्यक असते.
आजमितीस जपानमध्ये अभूतपूर्व सुधारणा झाल्याचे आपण पाहतो. ही सुधारणा व प्रगती जपानी राष्ट्रवादाच्या पुनरुज्जीवनाचे वारे जपानी लोकांच्या अंगात शिरले नसते, तर झाली नसती. तीच गोष्ट युरोपमधल्या कित्येक राष्ट्रांचीही आहे. उदाहरणार्थ- जर्मनी. राष्ट्रवादी भावनेच्या फैलावामुळेच तिथे हे घडून आले होते. अतातुर्क केमाल पाशाने जणू एका रात्रीत तुर्कस्तानचा कायापालट घडवून आणला. प्रखर आणि खऱ्याखुऱ्या राष्ट्रवादाच्या उदयामुळेच त्याला हे शक्य झाले. चँग कै शेक यांना जनतेची चळवळ कशी सुरू करतात, याचे जर ज्ञान असते किंवा जपानने चीनवर केलेल्या आक्रमणामुळे चीनमध्ये उसळलेल्या राष्ट्रवादी भावना दीर्घ काळ टिकवून धरण्याइतकी बुद्धी जर त्यांच्यापाशी असती, तर कदाचित चीनचे भाग्यविधाते म्हणून चँग कै शेक हे गृहस्थ अधिकारपदावर गेले असते. परंतु त्यांना ही कला अवगत नव्हती. त्यामुळे ते मागे पडले आणि ज्या मंडळींना लौकिक व व्यावहारिक उद्दिष्टांना पवित्र रंग देण्याची कला साधली होती, त्यांनी त्यांना सहज बाजूला सारले. अमेरिका किंवा ब्रिटन (किंवा अन्य कोणतीही पाश्चात्य लोकशाही राजवट) यांच्यापैकी कोणालाच आशिया खंडातील मागासलेल्या देशांना त्यांच्या मागासलेपणातून बाहेर काढता आले नाही. त्यांची इच्छा असूनसुद्धा ते साधले नाही. याचे एकमेव कारण हे दिसते की, ब्रिटन किंवा अमेरिका हे देश लोकशाही राजवटींचे आहेत आणि लोकशाहीवादी असल्याने जनतेच्या भावनांना आवाहन करून त्यांचा उत्साह जागा करणे त्यांना शक्य नव्हते. कदाचित तशी त्यांची इच्छासुद्धा नसावी. भावनिक आवाहन हा प्रकारच लोकशाही तत्त्वज्ञानाला मुळी वर्ज्य आहे. पाश्चात्य लोकशाही सरकारांनी पौर्वात्य देशांत थोडीबहुत जागृती आणली, नाही असे नाही; परंतु ते बुद्धिपुरस्सर आणि ठरवून केले गेलेले नाही. तो त्या राजवटींचा आनुषंगिक परिणाम आहे. उलट, पौर्वात्यांच्या मनात पाश्चात्य राष्ट्रांनी स्वत:बद्दल एक प्रकारचा द्वेष जागृत केला आहे आणि पौर्वात्य देशांत जी काही चळवळ घडत आहे, तो त्या द्वेषभावनेचा परिणाम आहे. पाश्चात्यांबद्दलच्या द्वेषामुळे पौर्वात्य लोक पेटून उठले होते आणि त्यांच्यात बदल घडून आला होता.
महत्त्वाचा मुद्दा हा की, मनुष्यप्राण्याला नेहमी बदल हवा असतो आणि हा बदल देऊ करणाऱ्यांच्या पाठी तो जातो.
अर्थात, येथे हेसुद्धा सांगायला हवे की- लोकांना स्वत:च्या परिस्थितीत बदल हवा असतो आणि म्हणून लोक जनता चळवळींना पाठिंबा देतात, हे म्हणणे सर्व स्थळी व सर्व काळी सारखेच खरे असते असे नाही. बऱ्याचदा तर बदलाचे आकर्षण आपणाला वाटते तितके तीव्र नसतेसुद्धा. तथापि, असे असले तरी मानवी मनाला वाटणारे बदलाचे आकर्षण विचारात घेऊन जनता चळवळींचा अभ्यास केल्यास तो फुकट जाईल असे नाही. असा अभ्यास केल्यास या चळवळींच्या आंतरिक प्रवाहांवर काही ना काही प्रकाश निश्चितच पडू शकेल. तेव्हा या मुद्द्याचा थोडाबहुत परामर्श आपण घेऊ या.
२. यशस्वी आणि अयशस्वी : एकाच माळेचे मणी
मानवी जीवनावर बाह्य घटकांचा, बाहेरच्या परिस्थितीचा खूप मोठा प्रभाव असतो, असे मानण्याची आपली सर्वसाधारण प्रवृत्ती असते. आपल्या यशाचा आणि अपयशाचा संबंध आपण बाहेरील परिस्थितीशी जोडतो. साहजिकच यशस्वी लोकांना, जीवनात कृतार्थ ठरलेल्यांना बाहेरील परिस्थिती आहे, तशीच कारम टिकून राहावी, असे मनापासून वाटते. त्यांच्या दृष्टीने त्यांना बाह्य जग मित्रासारखे वाटते. याच्या अगदी उलट ज्यांना जीवनात अपयश सहन करावे लागलेले असते, त्यांना तेच जग शत्रुवत् वाटते. वस्तुत: यश वा अपयश खूप मोठ्या प्रमाणात आपल्या व्यक्तिगत गुणांवर आणि क्षमतेवर अवलंबून असते. आमची कार्यक्षमता, उद्योगशीलता, चिकाटी, स्वभावातील धीर-सबुरी, आपला स्वभाव, रंगरूप, व्यक्तिमत्त्व, आरोग्य इत्यादी अनेक गुणांचा भाग त्यात असतो. तथापि, प्रत्येक घटनेचे मूळ बाह्य परिस्थितीत शोधण्याच्या सवयीमुळे आपल्या यशाचेही मूळ आपण बाहेरच शोधतो. थोरो हा अमेरिकन विचारवंत एका ठिकाणी म्हणतो, त्याप्रमाणे- “माणसाचा स्वभाव असा आहे की, त्याला जर काही दुखत-खुपत असेल आणि त्यामुळे त्याला रोजची कामे पूर्ण करता आली नसतील... समजा, त्याच्या पोटात दुखत असेल- तरी त्या पोटदुखीवरचा इलाज म्हणून तो जग सुधारण्यासाठी बाहेर पडेल.”
आयुष्यात ज्यांना अपयश येते त्यांनी आपल्या अपयशासाठी बाहेरच्या जगाला दोष दिला, तर त्यात काहीच नवल नाही. पण खरे नवल हे आहे की- स्वत:चा चाणाक्षपणा, स्वत:ची दूरदृष्टी, चिकाटी, काटकसरीपणा इत्यादी ‘अस्सल गुणांची’ जे बढाई मारतात आणि या गुणांमुळे आम्ही यश मिळवू शकलो असे सांगतात; त्या लोकांनासुद्धा मिळाले ते यश केवळ दैवाने मिळाले, परिस्थिती अनुकूल होती म्हणून मिळाले- असेच मनाच्या आत खोल कुठे तरी वाटत असते. जीवनात सतत यशस्वी झालेल्यांचा स्वत:च्या कर्तृत्वावरचा विश्वासदेखील जेवढ्यास तेवढाच असतो. काय केले म्हणजे यश मिळते, याची त्यांना स्वत:लाही निर्विवाद खात्री नसते. बाहेरचे जग त्यांना नाजूक हातांनी लावून ठेवलेल्या यंत्रासारखे वाटते. त्यामुळे त्या यंत्राला धक्का देण्याची इच्छा त्यांना नसते. सहज धक्का लागला तरी त्या यंत्राचा तोल जाईल नि आपले यश आपल्यापासून काढून घेतले जाईल, असे त्यांना सारखे वाटत असल्याने परिस्थिती जैसे थे ठेवण्यासाठी ते खटपट करतात. सारांश- सामाजिक परिवर्तनाला होणारा विरोध आणि परिवर्तनाचा आग्रह व त्याची तरफदारी या दोन्ही प्रवृत्तींचा उगम एकाच समान समजुतीमध्ये असतो आणि दोन्ही गटांमधली माणसे सारखीच कडवी आणि दुराग्रही असू शकतात.
३. यांना बदल नकोच; त्यांना बदल हवाच!
स्वत:च्या परिस्थितीबद्दल असंतुष्ट किंवा असमाधानी आहे, एवढ्याच एका कारणामुळे कोणीही सामाजिक परिवर्तनासाठी ताबडतोब घराबाहेर पडेल असे नाही. असंतुष्टतेचे रूपांतर जेव्हा प्रखर तिटकाऱ्यात घडून येते, तेव्हाच सामाजिक परिवर्तनाकडे मन धाव घेऊ लागते. याचाच अर्थ- मानसिक असंतुष्टपणाबरोबरच अन्य काही घटकसुद्धा हजर असावे लागतात, तरच चळवळ घडते.
बाह्य परिस्थितीमुळे ज्यांनी मनाने हार खाल्ली आहे, असे लोक परिवर्तनासाठी कधीच पुढे सरसावू शकत नाहीत- मग त्यांची परिस्थिती किती का दैन्याची असेना! आपले जीवन जेव्हा कमालीचे बेभरवशाचे असते आणि त्यामुळे आपण परिस्थितीवर कधीही काबू आणू शकणार नाही, असे आपल्या मनाला जेव्हा वाटत असते; तेव्हा जे थोडेबहुत हातात असते, त्याचा जुगार खेळायला आपण तयार होत नाही. पुढे काय वाढून ठेवले आहे, याचा अंदाज जेव्हा आपण करू शकत नाही, तेव्हा परिचित आणि अनुभवाने सिद्ध झालेलेच आपणाला जास्त भरवशाचे वाटू लागते. यांत्रिक जीवनक्रम हा आपल्या दृष्टीने असुरक्षिततेवरचा असली इलाज असतो. जीवनक्रम यांत्रिक बनल्यामुळे अनपेक्षिततेवर कब्जा मिळवल्याचे समाधान आपणाला मिळू लागते, हा त्याचा आणखी एक फायदा. हा अर्थात आभास असतो. पण आभास तर आभास, मनावरचा ताण तर कमी होतो! मासेमार, भटके लोक, शेतकरी या सर्वांना स्वच्छंदी पंचमहाभूतांशी झगडावे लागते. तीच गोष्ट सर्जनशील कलावंतांची. कलावंतालासुद्धा स्फूर्तिदेवतेवर अवलंबून राहावे लागते. आणि तीच गोष्ट रानावनात राहणाऱ्या रानटी मनुष्याचीसुद्धा. रानटी मनुष्यदेखील आजूबाजूच्या सृष्टीला घाबरत जगत असतो. या सर्वांना प्राप्त परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा बदल नको असतो. त्यांना बदलाची भीती वाटते. एखाद्या सर्वशक्तिमान न्यायाधीशाला तोंड द्यावे, तसे ते जगाला तोंड देत असतात; म्हणजेच पड खाऊन जगत असतात. मासेमार, शेतकरी, भटके लोक, रानटी लोक, सर्जनशील कलावंत यांच्याचप्रमाणे दारिद्रयाने ग्रासलेल्यांनासुद्धा बदल नको असतो. तेसुद्धा बाह्य जगाला भिऊन जगतात. बदलाच्या विचारांना त्यांच्या मनात थारा नसतो. भूक आणि तहान या दोन्ही गोष्टी जेव्हा उंबरठ्यावर ठाण मांडून असतात, तेव्हा हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागण्याइतकी हिंमत कोणाच्याही हृदयात असू शकत नाही. याचा अर्थ, परिस्थितीने गांजलेले आणि ज्यांची परिस्थिती अत्यंत भरभराटीची आहे, असे दोन्ही प्रकारचे लोक सामाजिक परिवर्तनाला मनाने अनुकूल नसतात. उत्तम स्थितीतले आणि अगदी नीच स्थितीतले- दोन्हीही परिस्थितीतील लोकांना ‘जैसे थे’ अवस्था मनापासून प्रिय असते. सामाजिक परिस्थितीत बदल न घडून येण्याची जी कारणे आहेत, त्यांत हे कारण सर्वांत महत्त्वाचे आहे.
मग बदलाच्या बाजूने लढण्यासाठी कोण उतरतात? तर, आपल्या अंगात काही तरी अमोघ शक्ती आहे असा ज्यांचा विश्वास असतो, ते लोक सगळी खबरदारी वाऱ्यावर सोडून मोठ्या प्रमाणावरील सामाजिक बदलासाठी पुढे सरसावतात. फ्रेंच राज्यक्रांतीबद्दल बोलताना द तॉकव्हिल या फ्रेंच विचारवंताने म्हटले आहे की- ज्या पिढीने फ्रेंच राज्यक्रांती घडवून आणली, त्या पिढीचा मानवी विचारशक्तीच्या शक्तिमानेतवर आणि मानवी बुद्धीच्या कर्तबगारीवर प्रगाढ विश्वास होता. स्वत:बद्दलचा इतका अहंकार आणि स्वत:च्या सर्वशक्तिमानतेबद्दलचा इतका गाढ विश्वास मानवजातीला यापूर्वी कधीही वाटला नव्हता. या अतिरिक्त आत्मविश्वासामध्ये सामाजिक बदलाच्या जागतिक भुकेची भर पडली होती आणि त्याचा परिणाम म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती होय. नवे जग निर्माण करायचे, या ईर्ष्येपोटी रशियात ज्यांनी अराजकाला जन्म दिला; ते लेनिन आणि बोल्शेविक पक्षाचे सदस्य या सर्वांचा मार्क्सवादाच्या सर्वशक्तिमानतेवर अंधविश्वास होता.
लेनिन आणि बोल्शेविकांप्रमाणेच जर्मनीच्या नाझींचेही उदाहरण देता येईल. नाझींपाशी अमोघ तत्त्वज्ञान नव्हते, परंतु तत्त्वज्ञानाऐवजी त्यांच्यापाशी अमोघ नेता होता; आणि त्या नेत्याच्या अस्खलनशीलतेवर, त्याच्या कर्तृत्वशक्तीवर त्यांचा आंधळा विश्वास होता. तत्त्वज्ञानावरच्या आंधळ्या विश्वासाची जागा नेत्यावरच्या आंधळ्या विश्वासाने घेतली होती. तसेच नव्या प्रकारच्या तंत्रावरही त्यांचा विश्वास होता. ‘नॅशनल सोशॅलिझम’ने जर्मनीत ज्या झपाट्याने प्रगती केली, त्या झपाट्याचा अर्थ लावायचा तर; आपण शोधून काढलेल्या झटपट हवाई हल्ल्याच्या व झुंजार प्रचाराच्या नव्या तंत्रामुळे आपला देश दुर्भेद्य बनला आहे, हा जर्मन लोकांचा आंधळा विश्वास हिशेबात घ्यावा लागतो. हा विश्वास त्यांच्या अंगात संचारला नसता, तर ज्या जलदगतीने नॅशनल सोशॅलिझमच्या हाती देशाची सत्ता आली, तशी ती कधीच आली नसती.
सारांश- विश्वास किंवा श्रद्धा नसेल, तर या जगात कोठलीच महत्त्वाची गोष्ट घडू शकत नाही. मानवी प्रगती आणि त्या प्रगतीची इच्छा करणारे लोक यांचीच गोष्ट घ्या. मानवी प्रगती घडू शकते, असे मानणारे लोक दुसऱ्या दोन गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवत असतात. एक- ते असे मानतात की, मानवी मन अत्यंत ॠजू आणि सरळ आहे. आणि दोन- विज्ञानाच्या साह्याने या जगात कोठलीही सुधारणा घडवून आणता येणे शक्य आहे. या दोन्हीही विश्वासांना कशाचाही आधार नाही. ‘स्वर्गापर्यंत पोचणारा मनोरा’ बांधू पाहणाऱ्या ‘बायबल’मधल्या जनसमुदायाच्या विश्वासाइतकाच हाही विश्वास उद्धट आणि बिनबुडाचा आहे. बॅबेलचा मनोरा बांधू पाहणाऱ्यांची घमेंड होती की, आमचा बेत तडीस नेणे केवळ आमच्या हाती आहे. कोणीही आमच्या बेताच्या आड येऊ शकणार नाही. प्रगतीची इच्छा करणारेसुद्धा त्याच मार्गाने जात असतात.
..................................................................................................................................................................
‘झुंडीचे मानसशास्त्र’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5212/Zundiche-Manasshastra
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment