अजूनकाही
‘अर्थसूत्र : प्राचीन भारतीय आर्थिक विचारांची पूर्वपीठिका’ या सतीश देवधर यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेल्या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच प्रकाशित झाला आहे. सुनिधी पब्लिशर्सतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचा मराठी अनुवाद मंजूषा मुसमाडे यांनी केला आहे. या पुस्तकातील ‘विषयप्रवेश’ या पहिल्या प्रकरणाची ही झलक...
..................................................................................................................................................................
‘इतिहासाशिवाय विज्ञान म्हणजे जणू स्मृती नसलेला माणूस होय.’ - मायकेल रुस
अर्थशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी असताना एरिक रोल यांचा ‘अ हिस्टरी ऑफ इकॉनॉमिक थॉट’ (१९७३) हा ग्रंथ आमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. या ग्रंथाचा प्रमुख भर व्यापारवादी, निसर्गवादी आणि अभिजात अर्थतज्ज्ञांवर होता. त्यासह जुना करार आणि प्लेटो व अॅरिस्टॉटल यांसारख्या ग्रीक लेखकांचाही संदर्भ होता. मात्र यामध्ये भारतीय आर्थिक विचार, वर्तन किंवा विचारवंताचा कोणताही संदर्भ नव्हता. यामुळे एक भारतीय विद्यार्थी म्हणून माझी थोडी निराशा झाली. ‘बहुतेक संदर्भ देण्याजोगे कुणी नसेलच’ किंवा मला तसे वाटले असेल.
भारतीय उपखंडातील इतर अर्थ तज्ज्ञांप्रमाणेच नोबेल विजेते अमर्त्य सेन आणि मोहंमद युनुस हे समकालीन ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आहेत. परंतु, आपण जसजसा भूतकाळाचा विचार करत जाऊ तसतसे या उपखंडाचे अर्थशास्त्रातील योगदान नसल्यातच जमा आहे असे आपल्या लक्षात येईल. ज्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या आगमनापासूनच्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या इतिहासाचा अभ्यास केला आहे, त्यांना दादाभाई नौरोजी, न्या. म. गो. रानडे आणि भीमराव रामजी आंबेडकर ही नावे माहीत असतात. पण आपली माहिती तिथवरच सीमित असते.
विशाखादत्ताच्या ‘मुद्राराक्षस’ या संस्कृत नाटकामुळे (अभ्यंकर आणि अभ्यंकर, १९१६) आपल्याला कौटिल्य या प्रमुख पात्राविषयी माहिती मिळते. कौटिल्य हा चंद्रगुप्त मौर्याच्या कारकिर्दीतील प्रधानमंत्री होता. तथापि, जवाहरलाल नेहरू यांनी अहमनगरच्या तुरुंगात लिहिलेले ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ (१९४६) हे पुस्तक वाचल्यानंतर कौटिल्य हा केवळ नाटकातील काल्पनिक नायक नसून ‘इतिहासा’चा अविभाज्य भाग आहे, असे आपल्या लक्षात येते. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात भारतात वास्तव्य असलेला कौटिल्य म्हणजे महत्त्वपूर्ण ऐतिहासिक व्यक्ती होती. नेहरूंचे उपरोक्त पुस्तक प्रकाशित होण्याच्या काही दशके पूर्वी कौटिल्य ही एक ऐतिहासिक व्यक्ती असल्याचा ठोस पुरावा निदर्शनास आला होता. त्यामुळे ही धारणा बदलणे शक्य झाले. हा पुरावा म्हणजे तामिळनाडूमधील तंजावूर इथे सापडलेले कौटिल्याच्या ‘अर्थशास्त्रा’चे प्राचीन हस्तलिखित.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf
..................................................................................................................................................................
नेहरूंच्या पुस्तकात कौटिल्याला ‘भारताचा मॅकियाव्हेली’ असे संबोधले आहे. सोळाव्या शतकातील मॅकियाव्हेली या इटालियअन मुत्सद्दयाला ‘द प्रिन्स’ (मॅरिअट, २०१४) हा राजकीय ग्रंथ लिहिला होता. केलेली आहे. तथापि, १९६५ पासून क्रमाने प्रकाशित झालेले आर. पी. कांगले यांचे अर्थशास्त्राचे समावेशक त्रिखंडात्मक लेखन, त्याचा अनुवाद आणि अर्थशास्त्रावरील भाष्य वाचल्यानंतर कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ म्हणजे केवळ प्रधानमंत्र्याने विकसित केलेली राजकीय व्यूहरचना आणि मुत्सद्दीपणाचे उदाहरण नाही हे स्पष्ट होते. वस्तुतः, मॅकियाव्हेलीलाच ‘युरोपचा कौटिल्य’ म्हटले गेले पाहिजे. याचे कारण असे की, मॅकिव्हेलीने ‘द प्रिन्स’ हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी जवळजवळ दोन हजार वर्षांपूर्वी कौटिल्याने उपरोक्त राजकीय ग्रंथ लिहिला होता. शिवाय, ‘द प्रिन्स’मध्ये उल्लेख नसलेल्या, शासनाच्या बाजारपेठ, श्रमिक आणि इतर अनेक आर्थिक आयामांचा अर्थशास्त्रात समावेश होता. प्रस्तुत ग्रंथामध्ये अर्थातच या विषयांना स्पर्श केला जाईल.
या संदर्भात, आपल्याला माहिती असावी अशी आणखी एक रोचक बाब म्हणजे, ‘अर्थशास्त्र’ हा ग्रंथ कौटिल्याच्या पूर्वसुरींनी नमूद केलेल्या काही कल्पनांवर आणि काही वैदिक संहितांचे एकत्रीकरण आणि सुधारणा यातून साकारला आहे असे ‘अर्थशास्त्रा’त खुद्द कौटिल्याने नमूद केले आहे. त्यामुळेच मला इतर प्राचीन संस्कृत साहित्यातील आर्थिक विषयांशी संबंधित माहितीचा धांडोळा घेण्याची प्रेरणा मिळाली. यामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष स्रोतांचा - रामायण आणि महाभारत, वेदासारख्या पवित्र श्रुतीसंहिता, निकाय या बौद्धधम्मातील संहिता आणि काही प्रमाणात स्मृती किंवा कायदेसंहितांचा - समावेश होता.
असे असले तरी, सर्वसाधारणपणे आर्थिक विचारांचा इतिहास आणि विशेषतः आर्थिक विचारांची भारतीय पूर्वपीठिका ज्यांनी अभ्यासली आहे, अशा अनेक आधुनिक संशोधकांच्या लेखनाच्या आधारे मी प्रस्तुत ग्रंथ लिहिला आहे, हे या ग्रंथातून स्पष्ट होईलच. ज्या वाचकांना अर्थशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळणार नाही आणि/किंवा ज्यांना प्राचीन भारतीय आर्थिक विचारांचे घटक, वर्तन आणि संघटनांचा धांडोळा घेण्याची संधी मिळाली नाही, अशा वाचकांसाठी मी मला मिळालेले ज्ञान थोडे संकलित आणि संपादित स्वरूपात प्रस्तुत ग्रंथामध्ये मांडलेले आहे.
माध्यमिक शाळेत आठवी ते दहावीच्या वर्गात संस्कृतचा अभ्यास केलेला असल्यामुळे मला संस्कृत साहित्यातील प्राचीन भारतीय आर्थिक विचारांविषयी जिव्हाळा वाटला आणि त्यावरील अभ्यासाकडे मी आकर्षित झालो. शाळेत संस्कृत शिकत असताना मात्र मला याची जाणीव नव्हती.
आद्य शंकराचार्य या आठव्या शतकातील संत कवी आणि तत्त्वज्ञाच्या आयुष्यातील एक प्रसंग मला आठवतो. एकदा काशीच्या गल्लीतून चालत जात असताना शंकराचार्यांना एक वृद्ध पुरुष पाणिनीच्या व्याकरण नियमांची ‘चर्पट मंजिरी’ घोकताना आढळला. त्या वृद्ध व्यक्तीला असा वेळ घालवताना पाहून आद्य शंकराचार्यांचे मन करुणेने भरून आले. तत्क्षणी जीवनविषयक तत्त्वज्ञानाचे संक्षिप्त व्यावहारिक उदाहरण देणारी काव्यरचना त्यांच्या मुखातून उत्स्फूर्तपणे प्रसवली. काव्यरचनेच्या पहिल्या कडव्यात त्यांनी ‘हे अज्ञानी माणसा ज्ञानाचा शोध घे. परमेश्वराचा शोध (गोविंद) घे. कारण जेव्हा तुझा मृत्यूजवळ येऊन ठेपेल, तेव्हा व्याकरणाचे नियम तुला खचितच वाचवू शकणार नाहीत’ असा उपदेश त्या वृद्ध पुरुषाला केला.
चार दशके लोटल्यानंतर मला असाच काहीसा साक्षात्कार झाला आहे. प्राचीन भारतीय संहितांमधील आर्थिक विचारांचे धागे दोरे समजून घेण्याच्या माझ्या प्रयत्नाविषयी मी समाधानी आहे. सध्या आंतरजाल ही सार्वजनिक उपभोगाची वस्तू झाली आहे. विविध संकेतस्थळांवर अनेक संस्कृत संहिता मोफत उपलब्ध आहेत. संस्कृतचे प्राथमिक ज्ञान असल्यामुळे, आधुनिक लेखकांनी केलेले अनुवाद वाचणे, त्यांचे भाष्य आणि संशोधन वाचणे आणि मूळ लेखनाला पूरक माहिती मिळवणे हा माझ्यासाठी अतिशय समाधानकारक अनुभव होता.
परंतु, इथे एक प्रश्न उपस्थित होतो : मुळात इतिहास का अभ्यासायचा? रुस (१९८७, पृष्ठ ३७८) यांनी नमूद केल्याप्रमाणे, विज्ञानाच्या इतिहासकारांना भूतकाळाचा अर्थ वर्तमानाच्या संदर्भात लावण्याच्या त्यांच्या ‘लहरीपणा’वर होणाऱ्या टीकेची भीती वाटत असते. मला या निसरड्या वाटेची जाणीव आहे. प्रस्तुत ग्रंथात मी प्राचीन लेखनासाठी मार्गदर्शक ठरलेल्या आर्थिक विचारांतील केवळ काही घटकांचाच परामर्श घेतला आहे. असे करत असताना, विज्ञानाच्या इतिहासात जेव्हा फक्त संकल्पनात्मक स्पष्टीकरणे दिली जातात आणि भूतकाळातील साहित्यामधील ऐतिहासिक परिपूर्णतेवर जोर दिला जात नाही, तेव्हा अशा प्रकारची चूक होत नाही, या स्लोन यांच्या (१९८५) मताशी मी सहमत आहे. वस्तुतः, इतिहासाशिवाय विज्ञान म्हणजे जणू स्मृतीशिवाय माणूस होय असे रुस यांचे असे ठाम प्रतिपादन आहे.
अर्थशास्त्राच्या क्षेत्रामध्ये शुम्पिटर यांनी (१९५४, पृष्ठ ३ ते ५) इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला तीन विविध प्रकारे लाभ होऊ शकतो असे मत व्यक्त केले आहे. एक, पाठ्यपुस्तकात इतिहासाची पार्श्वभूमी असल्याशिवाय विद्यार्थ्यांना त्यांच्या आजच्या अभ्यासाची दिशा आणि अर्थ कळणार नाही. दोन, इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्या मनाला नवी उभारी येऊ शकते. आपल्याला यातील वादांची निरर्थकता आणि उपयुक्तता लक्षात येते. तसेच भरकटलेले विचार, व्यर्थ प्रयत्न आणि भविष्यात जोखू नयेत अशा वाटा ध्यानात येतात. तीन, शास्त्रीय इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी मनाच्या कार्यपद्धतीचे आकलन होते.
प्रस्तुत ग्रंथात मी प्राचीन भारतीय अर्थव्यवस्थेचा किंवा आर्थिक विश्लेषणाचा इतिहास नमूद केलेला नाही. प्राचीन भारतीय उपखंडातील लेखनात आढळणाऱ्या आधुनिक आर्थिक विचारांची सूत्रे, वर्तन आणि धोरणांची पूर्वपीठिका मांडली आहे. यातून आपल्याला आपल्या पूर्वजांच्या उद्दिष्टे, कृती आणि दूरदृष्टीबद्दल आकलन होऊ शकते.
आर्थिक विषयांवरील प्राचीन भारतीय साहित्य संचितरूपातील पवित्र व अपौरुषेय विचारांचे मिश्रण आहे, असा सर्वसाधारण समज आहे. प्रस्तुत ग्रंथ म्हणजे हा समज सुधारणारा उपक्रम आहे. त्याबरोबरीने, प्राचीन भारतीय लेखकांनी पुरस्कृत केलेल्या आर्थिक विचार व वर्तनाच्या परिक्षेत्राबाबत भारतीय मनाचे क्षालन करण्याचा हा प्रयत्न आहे.
प्राचीन संहितांचे लेखक आणि त्यातील पात्रे यांचे प्रत्यक्ष किंवा काल्पनिक अस्तित्व सिद्ध करणे, हा माझा उद्देश नसून ऐतिहासिक अस्तित्व सिद्ध झालेल्या प्राचीन संहितांमधील आर्थिक विचारांवरील लेखन निदर्शनास आणणे हा आहे.
वाचक, व्यावसायिक तज्ज्ञ आणि यात रुची असणाऱ्या अर्थतज्ज्ञांसाठी हा ग्रंथ माहितीप्रद ठरेल अशी मी आशा करतो. शिवाय, भविष्यातील प्रगतीसाठी हृद्य ठेवा आणि प्रेरणेचा स्रोत म्हणूनही या ग्रंथाकडे पाहता येईल.
अर्थातच, इथे सावधानतेचा इशाराही द्यायला हवा. शुम्पिटर (१९५४, पृष्ठ ४) यांच्या शब्दांत, ‘आपल्याला अडगळीच्या खोलीत गेल्याचा फायदा होऊ शकतो, मात्र, आपण तेथे दीर्घकाळ मुक्काम केल्यास चित्र वेगळे असू शकेल.’
अखेरीस, प्रस्तुत ग्रंथाच्या व्याप्तीबद्दल मी भाष्य केलेच पाहिजे. भारतीय इतिहासाच्या अखंडतेचा पट अफाट आहे. वेळेची मर्यादा लक्षात घेता, कोणत्याही अभ्यासासाठी अखंडित काळाचे स्वाभाविक दृष्टीने भाग पाडावे लागतात. मी ख्रिस्तपूर्व २५०० वर्षांपूर्वीच्या सरस्वती-सिंधू सभ्यतेपासून, भारताचे सुवर्णयुग मानल्या जाणाऱ्या गुप्त काळ, ते सामान्ययुग सहावे शतक आणि मध्ययुगीन काळाचा पूर्वार्धापर्यंतचा काळ निवडला आहे. सामान्ययुग अकराव्या शतकामध्ये भारतात झालेल्या मध्ययुगीन पाश्चात्य आक्रमणापर्यंतचा असा विस्तृत कालावधी निवडला आहे. आवश्यक तिथे प्रस्तुत विषयाचा सर्वांगीण आवाका मांडण्यासाठी या कालावधीपल्याडचे संदर्भदेखील लक्षात घेतले आहेत.
ग्रंथाच्या ‘अर्थसूत्र : प्राचीन भारतीय आर्थिक विचारांची पूर्वपीठिका’ या शीर्षकातूनही ग्रंथाची व्याप्ती लक्षात येते. संस्कृतमध्ये ‘सूत्र’ म्हणजे ज्यात रत्ने एकत्रपणे ओवलेली असतात असा धागा किंवा दोरा होय. प्राचीन काळी तात्त्विक विचार, तत्त्वे आणि नियम संक्षिप्तपणे सुभाषितांमध्ये व्यक्त केली जात. ती भूर्जपत्रांवर लिहिली जात आणि ही पत्रे धाग्याने एकत्रित शिवली जात असत. अशा प्रकारे, अलंकारिक भाषेत आणि शब्दशः या लेखनाला ‘सूत्रे’ असे म्हटले जाई. उदाहरणार्थ, कौटिल्याचे ‘अर्थशास्त्र’ अशा सूत्रबद्ध शैलीमध्ये लिहिलेले आहे. त्यामुळे, प्रस्तुत ग्रंथ म्हणजे प्राचीन भारतीय आर्थिक विचारघटक एकत्रित गुंफण्याचा प्रयत्न आहे.
तुम्ही हा ग्रंथ वाचायला सुरुवात करण्यापूर्वी, ग्रंथाच्या शेवटी मी दिलेल्या शब्दकोड्यावर एक नजर टाकावी, अशी मी सर्व वाचकांना विनंती करतो. २१ डिसेंबर १९१३च्या (बेलिस, २०१७) ‘न्यू यॉर्क वर्ल्ड’मधील पत्रकार ऑर्थर वायने याने दिलेल्या पहिल्या शब्दकोड्यानंतर अशी शब्दकोडी प्रचलित झाली आहेत. एखाद्या विशिष्ट विषयावरील शब्दकोडी मात्र क्वचितच आढळतात. आर्थिक विचारांच्या प्राचीन भारतीय पूर्वपीठिकेतील काही महत्त्वपूर्ण टप्प्यांचा समावेश असणारे एक शब्दकोडे मी तयार केले आहे. प्रस्तुत ग्रंथ वाचून झाल्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा हे कोडे सोडवू शकता. या अनुभवातून प्रस्तुत ग्रंथाचे मूल्य आणि सीमान्त उपयोगिता लक्षात येऊ शकेल.
..................................................................................................................................................................
‘अर्थसूत्र : प्राचीन भारतीय आर्थिक विचारांची पूर्वपीठिका’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5213/Arthsutra
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Fri , 24 July 2020
नमस्कार सतीश देवधर!
पुस्तकाबद्दल धन्यवाद. हा एक वेगळा प्रयोग दिसतो आहे. तन्निमित्त अभिनंदन व शुभेच्छा !
आपला नम्र,
-गामा पैलवान
जाताजाता : पाहिल्या शब्दकोड्याचा जनक आर्थर याचं आडनाव वायने नसून विन आहे ( संदर्भ : https://www.youtube.com/watch?v=rKL0_U9k5G4 )