अजूनकाही
राजकारणात काय चाललेय कळत नाही. कम्युनिस्ट पक्षात काय घडामोडी चालल्यात समजत नाही. ठरावीक शहरे आणि राज्ये सोडली तर उर्वरित चीनच्या बातम्या कधी बाहेर येत नाहीत. मग उपाय काय? चिनी चित्रपट बघा, साहित्य वाचा! तेही इंग्रजीत अनुवादित झालेले, तेही चीनमधून हद्दपार झालेल्या वा तिथून पलायन केलेल्या लेखकांचेच. चीन भारताच्या हद्दीत असा एकाएकी का घुसला अन नरेंद्र मोदी यांच्या अनेक चिनी भेटीनंतरही तो देश भारताची जमीन बळकावून का बसला, हे कसे समजावून घेणार?
चीन असाच आक्रमक, धोकेबाज व कुटील आहे का? मूळचा तो असा आहे की कम्युनिस्ट चीनच तसा आहे? साम्राज्यवाद भांडवली देशांचा असतो, तसा साम्यवादी देशांचाही, हे जग अनुभवून बसले आहे. त्याचाच नमुना गलवान खोऱ्यात घडलेला हा प्रकार आहे का?
१९६२ ते २०२० या काळात कसा वागला चीन? काही कळायला मार्ग नाही. अमेरिकेशी दोस्ती केल्यावर भांडवली अर्थव्यवस्था स्वीकारून अफाट प्रगती करणारा चीन तसा अन्य भांडवली देशांचा लाडकाच बनला होता.
लोकशाही, स्वातंत्र्य, समाजवाद, दारिद्रय, विषमता यांवरून चीनला टोकणे गेल्या चार दशकांपासून भलतेच कमी झाले होते. आपल्याला स्वस्तात मजूर आणि उत्पादन मिळते आहे ना, मग कशाला चीनचा इतिहास व वर्तमान उकरत बसा, असा संधिसाधू पवित्रा हे बडे देश घेत होते. विस्तारवाद भांडवलशाहीचाही असतो आणि चीन त्याही करता (भारताची बाजारपेठ काबीज करता यावी म्हणून) भारतात घुसला असावा काय?
गेल्या चार दशकांतल्या चीनवर पुस्तके भरपूर आहेत. मात्र त्यात भारत खिजगणतीतही नाही. कोणत्याच अंगाने नाही. हिंदी महासागरात चीनचे तळ उभे राहत आहेत. त्याचा लष्करी हेतू उघड दिसत होता. मात्र भारताव्यतिरिक्त चीनने लढाई कोणाशीही केलेली नाही. भारताला जशी चार-चार लढायांची अनुभूती आहे, तशी चीनला कुठे आहे? तो फक्त अवाढव्य खर्च करून शस्त्रसज्ज आहे एवढेच. त्यामुळे चीनला असे काय झाले की, तो भारताला गाफील ठेवून हद्दीत घुसला? साम्यवाद त्यागून ४० वर्षं उलटल्याने साम्यवादाचा विस्तार चीन करू शकत नाही. कर्ज, निधी, तंत्रज्ञान, यंत्रे, वस्तू पुरवून शिक्षणासाठी दरवाजे उघडे ठेवणारा चीन लढाया कशासाठी करेल? पण दोनदा तो भारताशी नडला खरा.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf
..................................................................................................................................................................
चिनी लेखक व लेखिका यांची दोन आत्मचरित्रे, तीन कथासंग्रह, चार कादंबऱ्या, एका अल्बानियन लेखकाची चीनवरची कादंबरी (पाने ४४४), डेन शिआओ पेंग यांच्या मुलीने लिहिलेले अनुभवकथन, बदलत्या चीनवरची दोन वैचारिक पुस्तके एवढे वाचल्यावरही चीनचा गलवानमधील आगावूपणा कशामुळे हे कळेना. चीन हिंदी महासागरात नौदल आणून आपली ताकद वाढवतो. अमेरिकेशी पंगा घेऊ पाहतो. अशा वेळी भाजप अमेरिकेकडे जरा प्रेमाने ओढला जात असल्याचे तो पाहतो. वैचारिक पुस्तकांत ती मांडणी आहे. पण त्यात भारताकडे काही मोठा शत्रू अथवा स्पर्धक म्हणून चीन पाहत नाही.
मग २०१८ साली प्रकाशित झालेली ‘चायना ड्रीम’ ही मा जियान यांची कादंबरी मिळवली. ती राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या राष्ट्रीय स्वप्नावर म्हणजे भूमिकेवर बेतल्याचे वाचले होते. मा जियान हे हद्दपार लेखक असून त्यांचा मोठा वाचकवर्ग आहे. ते प्रामुख्याने राजकीय, सामाजिक विषय हाताळतात. मा जियान लंडनमध्ये राहतात. त्यांची पुस्तके नामवंत प्रकाशन संस्था काढते. त्यामुळे ती मिळतात. परंतु ३० वर्षे चीनबाहेर राहत असल्याने त्यांच्या लेखनात प्रत्यक्ष पाहिलेले जीवन असे काही नसते. काल्पनिक वा दुय्यम स्रोत वापरून ते आपले लेखन सजवतात.
मो यान नावाचे नोबेल विजेते चिनी लेखक चीनमध्ये राहत असल्याने सामाजिक विषयांवरच भर देतात. शिवाय त्यांचा खर्च चिनी सरकार भागवते. गेल्या आठ वर्षांत म्हणजे २०१२ साली शी जिनपिंग चिनी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस व राष्ट्रपती झाले, तेव्हापासून चीन कसा बदलला त्याचे वर्णन चिनी साहित्यात व चित्रपटांत येते. मात्र ते सारे आपल्यापर्यंत पोचत नाही. म्हणून ‘चायना ड्रीम’सारखी कादंबरी हाती घेतली.
कल्पना अचाट, बांधणी उत्तम, संवाद व चित्रण वेधक, आशय क्षी जिनपिंग यांची एकाधिकारशाही राजवट असा असून आताचा चीन भ्रष्टाचारी, लिंगपिसाट व नोकरशाहीच्या अधिन कसा झालेला आहे, याची जाणीव मा करून देतात. चीनची आताची शहरी प्रगती ग्रामीण भाग नष्ट करून कशी झाली आहे, यावर मा यांनी या कादंबरीत खूप भर दिलेला आहे. चीनच्या असा विकास जर मोदींचा आदर्श असेल तर तो किती सारखा आहे! पण भारतात त्यावर एकही साहित्यिक कृती नाही, याचे फार वाईट वाटते.
विस्थापित लेखकाचे कल्पनाविश्व फार अफाट व स्फोटक असते. तो बाहेरून आपल्या मायभूमीकडे अत्यंत तीक्ष्ण नजरेने पाहू शकतो. म्हणून बहुतेक विस्थापित लेखकच त्यांच्या देशाचे व भाषांचे श्रेष्ठ लेखक बनतात. जागतिक पातळीवर त्यांचे लेखन लवकर पोचते.
शी जिनपिंग यांचे राष्ट्रीय पुनरुत्थानाचे चिनी स्वप्न आहे. ते त्यांना पाश्चात्य देशांसारखे व्यक्तिवादी व स्वार्थी न ठेवता चिनी जनतचे सामूहिक स्वप्न बनवायचे आहे. त्यासाठी ‘चायना ड्रीम ब्युरो’ तयार करण्यात आलेला आहे. कादंबरीचा नायक ६० वर्षांचा मा दाओदे या ब्युरोचा संचालक आहे. त्याचे काम म्हणजे झियांग शहरातील हरएक नागरिकाच्या डोक्यात हे स्वप्न पूर्णपणे भिनवणे. त्यासाठी त्याची खटपट अशी की, ‘चायना ड्रीम डिव्हाईस’ नामक एक मायक्रो चिप तयार करून ती प्रत्येकाच्या मेंदूत बसवायची. पहिली चिप हाच गडी बसवून घेणार असतो. हेतू हा की, मागची सारी स्वप्ने म्हणजे स्मृती पुसल्या जाऊन फक्त भविष्याची स्वप्ने प्रत्येक जण पाहू शकेल. अशाने साऱ्या नागरिकांमध्ये राष्ट्रीय श्रेष्ठत्वाची भावना व ताकद उत्पन्न होईल आणि राष्ट्रपतींचे स्वप्न पूर्णत्वाला जाईल अशी त्याची योजना.
या संगणकीय शस्त्रक्रियेला एक मोठी दु:खी व क्रूर पार्श्वभूमी आहे. ती मला अनेक लेखक-लेखिका यांच्या कलाकृतीत आढळली. ती म्हणजे १९६६ ते १९७६ या काळात माओ झेदाँग यांनी पुकारलेली ‘द ग्रेट प्रोलेटिरियन कल्चरल रिव्हॉल्यूशन’! या सांस्कृतिक क्रांतीत माओच्या तत्त्वज्ञानाचा फैलाव अधिक तीव्रतेने करण्यासाठी उजव्या, सरंजामी, भांडवली, क्रांतीविरोधी आणि गैरकामगारवर्गीय नागरिकांविरुद्ध मोठी मोहीम चालू होते. ती अनन्वित छळ, अपमान आणि रक्ताने माखलेली असते. असंख्य माओवादीच एकमेकांना प्रतिक्रांतिकारक ठरवण्यासाठी हिंसा करतात. स्वत:ला प्रखर व कठोर माओवादी ठरवण्यासाठी आपले आई-वडील, मित्र, शेजारी, शिक्षक-प्राध्यापक, कलावंत आदींना सरकारविरोधक संबोधून त्यांची मानखंडना व विटंबना करतात.
मा दाओदे अशा कार्यक्रमात सहभागी असतो. खुनी होतो. त्याची माओनिष्ठा पाहूनच त्याची उच्चपदावर नेमणूक होते. मात्र त्याला वेळोवेळी गतकाळातील आठवणी येत राहून त्याची प्रतारणा व संधिसाधू वृत्ती त्याला सतावते. इतकी की, तो छिन्नमनस्क होऊन जातो. लाच, रखेल्या अन सत्ता त्याला रमवू शकत नाही. अशात त्याच्यावर त्याचेच जुने गाव उदध्वस्त करून नव्या उत्तुंग प्रकल्पांसाठी जागा रिकामी करवून घेण्याची जबाबदारी येऊन पडते. तो गावकऱ्यांचा प्रतिकार चिरडतो. त्याच गावात त्याने रक्तरंजित सांस्कृतिक क्रांतीत भाग घेतलेला असतो. त्याचे आई-वडील उजवे व प्रतिक्रांतिकारक ठरवले गेल्याने आत्महत्या करतात. त्यांची प्रेते जिथे दफन केलेली असतात, तिथेच विकासाचे काम आरंभते. जुन्या स्मृती आणि नवे स्वप्न राबवतानाचा विध्वंस यांत मा दाओदे फाटला जाऊन एका उंच इमारतीवर जातो. खूप बरळतो अन वेडापिसा होत उडी घेतो.
‘जॉर्ज ऑर्वेलला, त्याने आधीच हे सारे सांगून ठेवले होते’ अशी अर्पणपत्रिका या कादंबरीला आहे. ज्या साम्यवादासाठी प्रचंड हिंसा झाली, तो तर बाजूला टाकला जातोच, शिवाय भांडवलशाही व बाजाराची अर्थव्यवस्था राबवण्यासाठी आपल्याच नागरिकांना कसे देशोधडीला लावले जाते, हे या कादंबरीचे मर्म!
नव्या जगाकडे जाताना जुन्या स्मृतींचा अडथळा नसावा हा जिनपिंग यांच्यासारख्या हुकूमशहांचा खटाटोप राहिला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या ज्या देशांत कम्युनिस्ट राजवटी आल्या, तिथे स्मृतींवर हल्ले करण्यात येऊ लागले. इतिहास विसरायला लावणे हा सरकारी कार्यक्रम झाला. सरकारचे जे विरोधक असतील ते सारे जुन्या राजवटींचे हस्तक ठरवले जाऊन तुरुंगात धाडले गेले वा मारले गेले.
या कादंबरीत सांस्कृतिक क्रांतीचा उल्लेख शिक्षेस पात्र ठरवला गेला आहे. भविष्याचे वेध व वेड असे लावायचे की, वर्तमानातील दूरवस्था साफ विसरली जाईल. ‘अच्छे दिन आने वाले हैं’ या घोषणेला खूप भावंडे आहेत तर! पण नायक गुलाबी स्वप्ने रंगवायला जाऊन स्वत:च दु:स्वप्नात बुडून जातो आणि मरून जातो. त्याचे मरण सार्वजनिक ठिकाणी एखाद्या सोहळ्याप्रमाणे गर्दी जमवते. जमलेल्यांपैकीच काहींना मा दाओदेचा हिंसक आणि धूर्तपणाचा भूतकाळ आठवतो. ते त्याला शिवीगाळ करतात. पण बेभान मा दाओदे त्या ऐकण्याचा पल्याड आत्मच्छल आणि पश्चात्तापात हरवलेला असतो.
या कादंबरीचे मुखपृष्ठ ऐ वैवै या प्रसिद्ध चिनी हद्दपार चित्रकाराचे आहे. दोन मोठे धाडसी कलावंत हुकूमशाही, स्वातंत्र्यहरण आणि सामान्य नागरिकांची परवड यांविरुद्ध एकत्र आले आहेत. असे कलांचे ऐक्य भारतीय कलावंतांनी दाखवण्याची वेळ कधीचीच खुणावते आहे. त्यांनी विश्वगुरूच्या स्वप्नातून जागे व्हायला पाहिजे एवढेच…
पण मूळ प्रश्न राहिलाय. चीनने आक्रमण का केले? काहीही करून स्पर्धकाचा काटा काढला पाहिजे हे चिनी राज्यकर्त्यांचे तत्त्व आहे. अरेच्चा! हे तर परिवारही करतो की!
..................................................................................................................................................................
‘चायना ड्रीम’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/China-Dream-Ma-Jian
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Rajan Mandavgane
Tue , 28 July 2020
नगर होते आटपाट राही त्यात एक भेकडभट नाही येई कशा कामा तरीही म्हणे पैलवान गामा येता-जाता मारी पिंका चांगले खेळा की मॅच जिंका स्वत:स समजे लई खवट बायको म्हणजे खास चावट फुकट खायला फार भारी आयत्या बिळावर हात मारी पोट्टे म्हणाले शिकवू धडा एकदा मारून पाहू खडा गपचिप निघाला एकदा शाखेत लपवली चड्डी-टोपी काखेत पोट्टे बोलले, पैलवान गामा हिंकड कुटं, पाकिस्तानात जाना
Gamma Pailvan
Fri , 24 July 2020
जयदेव डोळे,
लेख चांगला लिहिलाय. शेवटचं वाक्य एकदम खासंच आहे. गांधी परिवाराचं नाव घ्यायला इतके का लाजता हो तुम्ही?
आपला नम्र,
-गामा पैलवान