अजूनकाही
१. पुणे महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येताच संभाजी बागेत पुन्हा एकदा राम गणेश गडकरी यांचा पुतळा बसवण्यात येईल, अशी घोषणा भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. तर मेधा कुलकर्णी या समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे उत्तर संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी दिले आहे.
दोघांना अनुक्रमे 'ब्राह्मणांनो आम्हाला मत द्या' आणि 'मराठ्यांनो आम्हाला मत द्या' असं म्हणायचं आहे, हे मतदार समजून गेले असतील. महापालिकांनी यापुढे निव्वळ चौथरे ठरवून ठेवावेत. म्हणजे जो सत्तेत येईल, तो आपल्या सोयीने पुतळे बसवेल… दुसरा सत्तेत येईपर्यंत. उगाच कार्यकर्त्यांना रात्रीची जागरणं नकोत आणि नेत्यांच्या खिशाला लाखालाखांची चाट नको.
……………………………….……………………………….
२. पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळणार नाही असे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खडसावले असताना उत्तर प्रदेशात भाजपने ‘घराणेशाही’ला प्राधान्य दिले आहे. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांचे चिरंजीव पंकज सिंह यांना नोएडा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. याशिवाय खासदार हुकुमसिंह यांची कन्या मृगांका कैराना, लालजी टंडन यांचे चिरंजीव गोपाल टंडन यांनादेखील उमेदवारी देण्यात आली आहे.
अहो, हे सगळे उमेदवार सतरंज्या उचलण्यापासूनची कामं करून कार्यकर्त्यांच्या प्रेमाच्या बळावर इथपर्यंत पोहोचले आहेत. ते या सगळ्या मान्यवरांचे पुत्र-पुत्री आहेत, हे या बातम्यांमुळेच लोकांना कळलं असेल. ती गलिच्छ घराणेशाही मुंडे-महाजनांच्या भाजपमध्ये शक्य तरी आहे का? ते गुंडाराज-माफियाराज वगैरे सगळं अमित शाह यांच्या सत्शील नेतृत्वाखाली कधी पोसलं जाईल का?
चित्र - सतीश सोनवणे
३. तामिळनाडूत जलिकट्टू या बैलांच्या खेळाचा वाद शमला नसताना आता कर्नाटकात म्हशींच्या कंबाला शर्यतींसाठी परवानगी मिळावी यासाठी मंगळुरू येथे मोठे आंदोलन केले जाणार आहे. कंबाला ही कर्नाटकाची परंपरा आहे म्हणून चित्रपट उद्योगातील लोकही त्याला पाठिंबा देणार आहेत. दरम्यान तामिळनाडूत जलिकट्टूच्या खेळात जबर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला आहे. बैलाने शिंगे खुपसल्याने किंवा त्याच्या पायाखाली येऊन चिरडले गेल्याने २८ जण जखमी झाले आहेत.
आता नागपंचमी, कोंबड्यांच्या झुंजी, अस्वलांचे खेळ, प्राण्यांच्या सर्कशी वगैरे सगळं एकदाचं सुरू होऊन जाऊद्यात. कोणत्याही प्रथे-परंपरेचा अवमान नको. हळूहळू काटे उलटे फिरवत आपण सतीप्रथेपर्यंत गेलो की आपल्या संस्कृतीच्या पुनरुज्जीवनवादाचा एक मोठा टप्पा पार पडेल.
……………………………….……………………………….
४. पृथ्वीवर पत्रकार हे सर्वांत जास्त अप्रामाणिक आहेत. माझे प्रसारमाध्यमांसोबत युद्ध सुरू आहे. शपथविधी सोहळ्यातील गर्दीविषयीचे चुकीचे वार्तांकन करणाऱ्या प्रसारमाध्यमांवर कारवाई करू : डोनाल्ड ट्रम्प
आपलं प्रत्येक विधान वाचणाऱ्याला, ऐकणाऱ्याला डोनाल्ड डकच्या आवाजात ऐकू यावं, यासाठी तात्यांनी चालवलेले प्रयत्न स्तुत्य आहेत. तात्या येनकेनप्रकारेण महाभियोग ओढवून घेण्याच्या फुल तयारीने उतरलेले दिसतायत.
……………………………….……………………………….
५. शिवसेनेच्या वचननाम्याविरोधात बोलेल, तो मुंबईद्रोही : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
मुंबई पोर्तुगीजांनी ठाकरे घराण्याला आंदण दिल्याची कागदपत्रं सापडलीयेत का?
……………………………….……………………………….
६. शिवसेनाप्रमुखांच्या डोळ्यात अपार माया, पण राष्ट्रासाठी मन पोलादी होते. त्यांनी आपल्या छातीची उंची व माप सांगितले नाही, पण शिवसेनाप्रमुखांच्या फक्त नावाने पाकिस्तानसारख्या दुश्मनाचा थरकाप होत असे. हिंदुस्थानातील धर्मांध शक्तीवर शिवसेनाप्रमुखांची अदृश्य जरब होती. शिवसेनाप्रमुख हे नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर राहिले, पण त्यांच्यावर ‘घात’ करण्याची हिंमत कोणी दाखवली नाही. शिवसैनिकांनाच ते आपली कवचकुंडले मानीत. या कवचकुंडलांना भेदून माझ्यापर्यंत येणारी गोळी अद्यापि निर्माण झाली नाही असे ते आत्मविश्वासाने सांगत. : सामना
ती झेड प्लस सुरक्षा फक्त कमांडोंच्या हाताला काम आणि पगार मिळत राहावा, या उदात्त हेतूनेच बाळगली होती, बरं का! जगदंभ जगदंभ!!!
editor@aksharnama.com
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment