‘इंडिका’ : भारताच्या भूगोलाची चित्तथरारक कहाणी!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
अजिंक्य कुलकर्णी
  • ‘इंडिका’चे इंग्रजी व मराठी अनुवादाचे मुखपृष्ठ
  • Sat , 18 July 2020
  • ग्रंथनामा शिफारस इंडिका Indica प्रणय लाल Pranay Lal

भूगोलाच्या अभ्यासाची फार मोठी परंपरा आहे. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकांपासून भूगोलाच्या अभ्यासाला प्रारंभ झाल्याचे दाखले सापडतात. या अभ्यासाला गती प्राप्त झाली ती Cartography म्हणजे नकाशा तयार करण्याचे तंत्र शोधल्यानंतर. आधुनिक काळात उपग्रहतंत्रज्ञान (सॅटेलाईट टेक्नॉलॉजी), जीपीएसच्या या तंत्रज्ञानाचा शेती, पर्यावरण, भूविज्ञान, भौगोलिक इतिहासाच्या अभ्यासात मोठा वापर आहे. सध्या ‘भौगोलिक इतिहास’ हा शालेय अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षा यांपुरताच मर्यादित झाला आहे. क्रमिक पुस्तकांच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर काही पुस्तके अशी असतात, जी भूगोल, मानवी उत्क्रांती, जीवसृष्टीचा नैसर्गिक इतिहास या विषयातसुद्धा रस निर्माण करतात. असंच एक प्रणय लाल लिखित, नंदा खरे अनुवादित आणि मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित पुस्तक म्हणजे - ‘इंडिका’ होय.

हे पुस्तक पंधरा वेगवेगळ्या प्रकरणांत विभागलेलं आहे. पृथ्वीच्या निर्मितीपासून ते थेट आजच्या प्रगत होमो सेपियन मानवाच्या उत्क्रांतीपर्यंतचा आढावा यात आहे. भौगोलिक इतिहासात एक कालमापनाची पायरी सर्वांत महत्त्वाची असते. त्यातले आकडे भयंकर मोठे असतात. त्याऐवजी या पुस्तकात नवीन युक्ती वापरलेली आहे. यात पृथ्वीच्या ४६० कोटी वर्षं वयासाठी ४६ वर्षीय स्त्रीचं रूपक योजल्यामुळे आकड्यांच्या जंजाळातून सुटका होते आणि समजायलाही सोपं जातं. पृथ्वी आणि चंद्राच्या आयुष्यातली सुरुवातीची दोन अब्ज वर्षं त्यावर सतत उल्काच आपटत होत्या. या उल्कापातामुळे पृथ्वीला हिरे, पाणी, सोने वगैरे अनेक खनिजं मिळाली. पुढे सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्थिर झाली. वातावरणातील ऑक्सिजन वाढू लागला, सूर्याच्या अतिनिल किरणांमुळे ऑक्सिजनचे रूपांतर ओझोनमध्ये होऊ लागले आणि ओझोनमुळे परत सूर्याची अतिनिल किरणे अडू लागली. पृथ्वीभोवती ओझोन वाढल्यामुळे पृथ्वी थंड पडायला सुरुवात होऊ लागली. ऑक्सिजन व कार्बन संयोग पावल्याने कार्बनडायऑक्साईड तयार होऊ लागला.

शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीवर सुरुवातीला बारा खनिजं होती. सूर्याभोवतीही हीच बारा खनिजं होती. सूर्याच्या उष्णतेनं पृथ्वीवर भूरासायनिक क्रिया सुरू होऊन इतर खनिजांची निर्मिती झाली. काळाच्या पटावर थेट पुढे एकपेशीय सजीवांच्या निर्मितीपर्यंत आलो तर असे लक्षात येते की, या एकपेशीय सजिवांच्या शरीररचना जास्त क्लिष्ट असतात. Mitochondria ज्याला ‘पॉवर हाऊस ऑफ सेल’ असं म्हटलं जातं, त्याची निर्मिती एकपेशीय सजीवात कशी झाली? पृथ्वीच्या आयुष्यात मग आल्या बुरश्या, परंतु त्यांनी अगदी थोडाच काळ वनस्पतींना मागे टाकलं होतं.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf

..................................................................................................................................................................

भारतीय उपखंडात एक पेशीय सजीव कसे तयार झाले? त्यांच्यापासून बहुपेशीय सजीवांची निर्मिती कशी झाली? सागरात जशी प्राण्यांची निर्मिती झाली, तशी जमिनीवर वनस्पतींची निर्मिती कशा प्रकारे झाली? भारतीय उपखंडातील सजीव-निर्जीवात झालेल्या उत्क्रांतीचा अभ्यास आपल्याला ‘इंडिका’त वाचायला मिळतो.

काही अद्भुत गोष्टीही यात वाचायला मिळतात. उदा. कोणकोणत्या प्रकारचे मासे आपल्याकडे आढळत होते? कोणते मासे उत्क्रांतीत टिकले कोणते कायमस्वरूपी नष्ट झाले? तर काही माशांमध्ये शारीरिक बदल कसे झाले. या शारीरिक बदल होऊन टिकलेल्या छोट्या माशांपैकी Cypselurus प्रजातींचे मासे मोठ्या माशांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी पाण्यापासून चक्क काही फूट उंच उडू शकतात. Lobe fish प्रकारातील मासे मात्र आज जवळपास नष्ट झाले आहेत.

भारतीय उपखंडातील जीवाष्म अभ्यास दाखवतो की, सूर्यस्नान करणाऱ्यांमध्ये हळूहळू मानेचे हाड व कवटी यांच्यातला सांधा बदलून तो लवचीक झाला आणि मान डावी-उजवीकडे वळवणे शक्य होऊ लागले. याचा फायदा होऊन पाण्यात वावरताना भक्ष्य पकडणे, अन्न चावणे, गिळणे या क्रिया सोप्या होऊ लागल्या. 

अकरावी-बारावीच्या जीवशास्त्रात फर्न (नेचे), सायकॅड या वनस्पतींचा समावेश आहे. मला व्यक्तीशः त्या वनस्पतींचा अभ्यास करायचा फार कंटाळा यायचा. प्रश्न पडायचा की, का करायचा या वनस्पतींचा अभ्यास? ‘इंडिका’ वाचल्यावर लक्षात समजतं की, पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान जेव्हा जेव्हा ८०-९०° सेल्सियसपर्यंत गेलं आहे, त्या त्या वेळी फर्न व सायकॅड यांचं बी मातीआड तग धरून राहिलेलं आहे. पृथ्वीवर वनं रुजवण्यात, या दोन वनस्पतींचा सिंहाचा वाटा आहे.

‘प्राणी मोठे आणि अजस्त्र’ आणि ‘भारत नावाचे बेट’ या दोन प्रकरणांत भारतीय उपखंड कोट्यवधी वर्षांपूर्वी कसं तयार झालं? भारतात कोणकोणत्या प्रकारच्या डायनासॉरचं वास्तव्य होतं? त्यांचे जीवाश्म कुठे कुठे सापडले आहेत? गोंडवाना प्रदेशा (मादगास्कर, ऑस्ट्रेलिया, भारत)पासून भारत वेगळा कसा झाला, भारताची निर्मिती कशी होत गेली? भारतीय उपखंडात हिमालय पर्वत कसा तयार झाला? याच्या चित्तथरारक गोष्टी वाचायला मिळतात. 

गोंडवाना प्रदेशापासून वेगळा होण्याचा वेग हा भारताचा इतरांच्या तुलनेत सर्वांत जास्त होता. सुरुवातीला हा वेगळं होण्याचा वेग साधारणपणे आठ सेंटीमीटर प्रति वर्ष इतका जास्त होता. इतरांच्या तुलनेत हा नक्कीच जास्त होता. नंतरच्या काळात अस्मानी संकटामुळे डायनासॉर नष्ट झाले, पण १६ कोटी वर्षं या डायनासॉरनी या पृथ्वीतलावर राज्य केलं.

भारतात सापडणाऱ्या डायनासॉरबद्दल वाचताना वाटतं की, इतका भोगोलिक वारसा आपल्याकडे असताना शालेय अभ्यासक्रमात सातासमुद्रापलीकडे असणारे टुंड्रा प्रदेशात तांदूळ पिकतो का गहू, हे का शिकवतात? त्याऐवजी हा खजिना का उघडून दाखवला जात नाही?

अंटार्टिकावर जेवढा जास्त बर्फ जमा होईल तेवढा भारतात पाऊस कमी पडतो. त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे अंटार्टिकावर जितका कमी बर्फ जमा होईल, तेवढ्या जास्त क्षेत्रावरच्या पाण्याची वाफ होते. परिणामी भारतात मान्सून जास्त सुधारतो.

भारतातील नद्यांचा उगम कुठे कसा झाला, त्यात कोणकोणते बदल झाले, महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगा, नेवाशाला सापडलेली पुरातन हत्यारे याचा इतिहास वाचताना नकळत मराठी म्हणून आपला अहम सुखावतो.

या पुस्तकात तांत्रिक माहिती व शास्त्रीय शब्दांची रेलचेल आहे. जर ही माहिती नकोशी वाटली तर आपण काही पाने ओलांडून पुढे जाऊ शकतो. त्यामुळे वाचनात कोणताही रसभंग होत नाही.

या अनुवादित पुस्तकात मुद्रितशोधनाच्या बऱ्याच चुका झालेल्या आहेत. ‘डीएनए’ हा शब्द ‘डिएने’ असा, तर ‘चेन्नई’ हा शब्द ‘चन्नै’ असा छापला गेला आहे. नकाशांखाली भारताचा उल्लेख ‘पिवळी चांदणी’ असा केला आहे आणि नकाशात प्रत्यक्षात ती दिसत नाही. त्यामुळे नकाशा वाचनात थोडी अडचण येते.

या चुका सोडल्यास पुस्तक माहितीपुर्ण आणि वाचनीय नक्कीच आहे.

..................................................................................................................................................................

‘इंडिका’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5153/Indica

.............................................................................................................................................

अजिंक्य कुलकर्णी

ajjukul007@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......