अजूनकाही
करोनाच्या जागतिक महामारीत सोलापूरच्या २६ वर्षांच्या कविता चव्हाणने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने एक इतिहास घडवला आहे. १५ जुलै २०२०पर्यंत तिने सोलापूरमधील १६२ करोनाग्रस्त मृतदेहांना स्मशानापर्यंत सोबत दिली आहे.
या मृत व्यक्तींपैकी काहींचे नातलग पोचू शकत नव्हते, तर काही नातलगांनी स्वत:हून अंत्यसंस्कारासाठी न येण्याचा निर्णय घेतला. १५ जुलैपर्यंत सोलापूरमध्ये ३०० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. पण महाराष्ट्रात इतर ठिकाणी करोनाग्रस्त मृतदेहांची विल्हेवाट लावताना जशा अडचणी आल्या, तशा सोलापूरमध्ये आल्या नाहीत.
सकाळी आठ वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचे काम करणारी कविता ही राज्यातली पहिली आणि एकमेव महिला आहे. ‘टायगर ग्रुप’ची ती सोलापूरची अध्यक्ष आहे. “प्रसिद्धीसाठी मी हे काम सुरू नव्हतं केलं. मला वाटलं हे काम करायला आपण उतरलं पाहिजे. जिथे आत्तापर्यंत महिलांना थांबवण्यात आलं, त्या स्मशानभूमीपर्यंत सोबत करून रोज कितीतरी जणांना मी शेवटचा निरोप देते. साथ देते,” कविता सांगते.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf
..................................................................................................................................................................
काम करून आलेला शारीरिक, भावनिक थकवा तिची कामाची पॅशन रोखू शकत नाही. अनेकांच्या आयुष्याची करोनामुळे झालेली अखेर तिने संवेदनशीलपणे हाताळली, पण त्यामुळे तिच्या व्यक्तिमत्त्वात कडवडपणा किंवा नैराश्य जराही आलेलं नाही.
सोलापूरमधील करोना नियंत्रण अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी शहरातील स्वयंसेवी संस्थांची बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी करोनाग्रस्त मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी कोण मदत करू शकेल, याची विचारणा केली. त्यासाठी काही संस्थांनी तयारी दाखवली. त्यात कविता चव्हाण ही एकमेव महिला होती.
“एका महिलेला हे काम द्यायचं का नाही, यावर आम्हीही चर्चा केली. पण आता सगळ्याच क्षेत्रात समानता आहे. कविता यांचा स्थानिक सामाजिक कामाचा अनुभव चांगला होता. कोणतंही मानधन न घेता हे काम करायची तयारी त्यांनी दाखवली. केवळ महिला आहे म्हणून ही जबाबदारी त्यांना नाकारायची हे मला पटलं नाही. सर्वानुमते चर्चा करून कविता यांच्या ग्रुपला हे काम आम्ही दिलं,” सोलापूरचे करोना नियंत्रण अधिकारी धनराज पांडे सांगतात.
करोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या जसजशी वाढू लागली, तसतसा प्रशासनापुढचा प्रश्न गंभीर बनत होता. मृतदेहांच्या व्यवस्थापनामध्ये कुठलाही गैरप्रकार घडला तर अडचणी वाढल्या असत्या.
नवी मुंबई, ठाणे महानगरपालिकांच्या हॉस्पिटलमध्ये असे प्रकार घडलेले आहेत. भलत्याच व्यक्तीचा मृतदेह नातलगांकडे सुपूर्द करण्यात आला. शवागरात ठेवलेले मृतदेह बघा आणि तुमच्या नातलगाचा मृतदेह घेऊन जा, असं सायनच्या लोकमान्य टिळक म्युनिसिपालिटी जनरल हॉस्पिटलमध्ये एका नातलगाला सांगण्यात आलं होतं. याच हॉस्पिटलमध्ये मनुष्यबळाची कमतरता, नातलग आणि पोलीस पोचायला झालेला विलंब यामुळे करोना वॉर्डमध्येच पेशंटच्या बाजूला पिशवीत बांधलेले मृतदेह काही तास तसेच पडून होते. मुंबई महानगरपालिकेच्या कूपर हॉस्पिटलमध्येही एका रुग्णाने तक्रार केली की, २२ तास त्याच्या डाव्या-उजव्या बाजूला करोनाने मृत्यू पावलेल्यांचे मृतदेह पडून होते. तर कांदिवली शताब्दी हॉस्पिटलमध्ये दोन तरुणांनी तक्रार केली की, त्यांच्या आईचे मृतदेह त्यांनाच बॅगमध्ये भरायला सांगितला. केईएम हॉस्पिटलच्या शवागरातले काही मृतदेह स्मशानभूमीत न्यायला उशीर होतो, कारण करोनाच्या भीतीमुळे आपल्या मृत नातलगाच्या पार्थिवाची जबाबदारी घ्यायला नातेवाईक फिरकत नाहीत. मृतदेहाच्या वाहतुकीसाठी शववाहिका न मिळाल्यामुळे नातलगांना झालेला त्रास हादेखील मुंबई महानगरातला कळीचा प्रश्न होता.
मात्र असे प्रकार सोलापूरमध्ये घडले नाहीत, याचं श्रेय लोक आणि प्रशासन कविता व तिच्या टीमलाही देतात.
सोलापूरमध्ये मृतदेहांच्या वाहतुकीसाठी सरकारकडे स्वत:चं मनुष्यबळ पुरेसं उपलब्ध नव्हतं. पण पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई), अॅम्ब्युलन्स, स्मशानभूमीत काम करणारे कर्मचारी हे महानगरपालिकेकडे होते. करोनामुळे मृत्यू झाल्यास मृतदेह ‘लीकप्रूफ डेडबॉडी बॅग’मध्ये ठेवला जातो. नातलग मृतदेह घेण्यासाठी येतात, तेव्हा मृतदेहाचा चेहरा उघडून ओळख पटवून घेणं गरजेचं असतं. सर्व परवानग्या मिळून कायदेशीर बाबींची पूर्तता होईपर्यंत दु:खात असलेल्या नातलगांना धीर देणं, त्यांना कायदेशीर बाबींबाबत मार्गदर्शन करणं ही जबाबदारी कविताने स्वेच्छेने पेलली.
“गेले तीन महिने मी घरी गेलो नाहीये. घरच्यांची आठवण येते, पण मी सोलापूरमध्येच एका वेगळ्या ठिकाणी स्वतंत्र राहते. तिथं माझं ऑफिसही आहे,” कविता सांगते. ती ‘आलो, गेलो’ असं बोलते, कारण वडिलांनी लहानपणापासून मुलाप्रमाणे वाढवलं असं ती सांगते. तिची दोन भावंडं, आई आणि आज्जी हे सगळे घरी असतात. कविताची आज्जी केगावची सरपंच होती. त्यामुळे नेतृत्वाचं बाळकडू तिला घरातूनच मिळाल्याचं ती सांगते. कविताची कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी नाही, मात्र तिच्यामागे खंबीर कौटुंबिक पाठिंबा आहे. तिचा एक भाऊ सोलापुरातच बांधकाम व्यवसायात, तर एक भाऊ भूमी अभिलेख कार्यालयात कोल्हापूरला काम करतो. “त्यांनी काळजी व्यक्त केली, पण हे काम करू नकोस, असं कधीच म्हटलं नाही. हा सक्रीय पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे,” असं कविता सांगते.
बी.ए. झाल्यानंतर कविताने पूर्णवेळ समाजकामासाठी स्वत:ला वाहून घेतलं. कविता रोज व्यायाम करते. सकाळी पोटभर जेवते. दुपारी ज्यूस पिते. रात्री जेवण उशिराच होतं, कारण ती रुग्णांच्या नातलगांसोबत असते. “मी हे काम करते, पण मी खूप हळवी आहे. नातलग जेव्हा रडतात, तेव्हा मलाही खूप रडू येतं. दिवसातून ज्या ज्या वेळी मी मृतदेह नेते, त्या प्रत्येक वेळी रडते,” असं ती सांगते. एका इमारतीमधून मृतदेहांची विल्हेवाट लावण्याचं काम चालतं. तिथं सकाळपासून कविता बसून असते. जसजसे मृत्यू होतात, तसं तिचं काम सुरू होतं. काही वेळा रात्री उशिरा झालेल्या मृत्यूनंतर मृतदेहाचं काम सकाळी केलं जातं.
“परवा एक मृतदेह होता, ज्यांच्या मुली खूप लहान आहेत. त्यांनी प्रशासनाला सांगितलं त्या गावातून त्यांना इथं आणणारं कुणी नाही. पुन्हा क्वारंटीन केलं जाईल. तेव्हा त्यांच्याकडे पाहायला कुणी नाही. मुलींनी परवानगी दिल्यानंतर त्या व्यक्तीला आम्ही शेवटचा निरोप दिला,” कविता सांगते.
कविता सतत कामात असते. एकतर फोनवर बोलत असते किंवा फिल्डवर. झोपेवरही परिणाम झालाय. तिचे सहा-सात सहकारी आहेत. ते दोन शिफ्टमध्ये तिच्यासोबत असतात. प्रशासन त्यांना जेवण देतं. बाकी या कामाचे पैसे त्यांना कविताच देते. “मी भावाकडून पैसे घेऊन यांना देते,” असं ती सांगते. अॅम्ब्युलन्सचा ड्रायव्हर सरकारने नेमलेला आहे. बाकी मृतदेह आत ठेवण्याचं काम तिचे सहकारी करतात. त्यानंतर ती अॅम्ब्युलन्समध्ये पीपीई घालून पुढे बसते. “भीती नाही वाटत. समाधान वाटतं की, करोनाच्या महामारीत मी समाजाला काही देऊ शकले,” असं ती सांगते.
सलमान खान आणि ऐश्वर्या राय तिचे आवडते कलाकार आहेत. वडिलांच्या आठवणीने ती आजही व्याकूळ होते आणि त्यांच्या इच्छेनुसार असंच सामाजिक काम पुढे चालू ठेवायचा निर्धार व्यक्त करते.
“सोलापुरातील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, नागरिक सर्व जण या कामाबद्दल आदराने, कौतुकाने बोलतात. ‘तू आम्हाला लाजवलंस पोरी’ असं प्रेमाने सांगतात, तीच माझ्या कामाची पोचपावती,” हे नमूद करायला कविता विसरत नाही. गेल्या दीड महिन्यात वाढलेल्या कामाच्या व्यापामुळे कविताला मुलाखतीसाठी गाठणंही सहज शक्य नव्हतं. तिची धावपळ सतत सुरू असते. करोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून कविता स्वत:ची आणि टीमची सर्वतोपरी काळजी घेते.
करोनाच्या काळात जागतिक स्तरावर घरगुती हिंसाचार, बालविवाह, मुलींचं शिक्षण अर्धवट सुटणं, असे अनेक प्रकार समोर येत आहेत. जागतिक महामारीचा महिलांच्या सबलीकरणावर मोठा विपरित परिणाम होत असल्याची भीती कार्यकर्त्यांना वाटत आहे. महिलांना विविध पद्धतीने पाठिंबा देण्यासाठीचे प्रयत्न भारतातही सुरू आहेत. पण अशा काळात नेतृत्वगुण झळाळून उठून स्वत:च्या कामातून समाजासमोर आलेल्या मोजक्याच तरुणी आहेत. कविता चव्हाण हे त्यापैकी एक नाव आहे.
..................................................................................................................................................................
लेखिका अलका धुपकर ‘मुंबई मिरर’ या इंग्रजी दैनिकात असिस्टंट एडिटर आहेत.
alaka.dhupkar@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment