अजूनकाही
‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ हे डॉ. मुदुला बेळे यांचे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकामागील भूमिका स्पष्ट करणारे लेखिकेचे मनोगत आणि पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
लेखिकेचं मनोगत
मार्च महिन्याच्या मध्यातली गोष्ट असेल. महाराष्ट्रात कोविडचे अगदी तुरळक रुग्ण सापडू लागले होते. लॉकडाऊन अजून व्हायचा होता. एक दिवस एका मैत्रिणीला बरेचदा फोन करूनही तिनं उचलला नाही. थोड्या वेळानं तिनं मला फोन केला आणि म्हणाली की, ती एका प्रशिक्षणात होती. या प्रशिक्षणात तीनशे लोक उपस्थित होते. ‘‘कोविडचं संकट घोंघावत असताना आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा - असं सरकार पुन्हा पुन्हा सांगत असताना तू तिथं गेलीस कशाला?’’ असं मी तिला ओरडले. ‘‘अगं, काही होत नाही गं. मस्त फिट आहे मी. प्रतिकारशक्ती उत्तम असते आपणा भारतीयांची!’’ हे तिचं उत्तर होतं.
यानंतर काही दिवसांनी जाणत्या लोकांच्या एका व्हॉट्सअॅप ग्रूपवर चर्चा चालू होती. एकजण तणतणत म्हणाला, ‘‘काहीही राव. उगीच आपलं घरी बसवलंय. या सरकारला काही कळतंय का? नवीन टूम आपली काही तरी. नोटबंदी झाली, उरी झालं, काश्मीर झालं... आता काय म्हणे करोना!’’ ‘हो’ला ‘हो’ म्हणत आणखी एक जण म्हणाला, ‘‘अगदी अगदी. आणि इथे कुठे आपण परदेशातून आलेल्या कुणाला भेटतोय. मला तर कुणीही माहीत नाही जे इतक्यात परदेशातून आलेत.’’
आणि या दोन प्रसंगांनी कधी नव्हे तो माझा फारच तोल गेला. हे असे संवाद तेव्हा सतत घडत होते, लोक एकतर भयंकर घाबरलेले होते, नाही तर कमालीचे बेफिकीर होते. काही दर पाच मिनिटांनी हात धुवत होते, आंघोळी करत होते, तर काही बेफिकीरपणे रस्त्यावर पानाच्या पिंका टाकत फिरत होते. त्यात माध्यमांतल्या चुरचुरीत उथळ बातम्या आणखीन भर घालत होत्या. त्या दिवशी झालेल्या संतापात मी चिडून चिडून काय केलं असेल, तर एक पोस्ट लिहून फेसबुकवर टाकली. यात आपण काय काळजी घ्यायला हवी आणि ती का घ्यायला हवी, अशी अगदी साधीच माहिती होती. औषधनिर्माणशास्त्रात गेली पंधरा वर्षं प्राध्यापकी केल्यानं सूक्ष्मजीवशास्त्र, साथरोगशास्त्र, शरीरशास्त्र, शरीरक्रियाशास्त्र, औषधांमधलं रसायनशास्त्र, त्यांची निर्मितिप्रक्रिया, त्यांच्या चाचण्या हे माझे रोजच्या अभ्यासाचे आणि शिकवायचे विषय. शिवाय या क्षेत्रात गेली कित्येक वर्षं संशोधन केल्यानं मुळात एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपोआप अंगी बाणला जातोच. औषधांवरची पेटंट्स आणि त्यामुळे जगभरात होणारं राजकारण हा दुसरा अभ्यासाचा विषय. या सगळ्याचाच वापर मी ते लिखाण करताना केला होता.
..................................................................................................................................................................
अधिक माहितीसाठी क्लिक करा - https://bit.ly/3he3mvf
..................................................................................................................................................................
रोजच्या रोज घडणाऱ्या या असल्या संवादांमुळे सतत लोकांना शहाणं करण्याची शिक्षकाची प्रवृत्ती उफाळून येत होती. तर जगात यावर रोज काय नवीन शोध लागतायत, शास्त्रज्ञ काय म्हणतायत याचा शोध घेण्याची जिज्ञासा स्वस्थ बसू देत नव्हती. विज्ञान तुम्हाला कुठलेही चष्मे न लावता डोळे उघडून जग पाहायला शिकवतं. तिथं पक्षीय राजकारण आणि भाजप की काँग्रेस, भक्त की विरोधक, ट्रम्पप्रेमी की ट्रम्पद्वेषी - असे चष्मे लावून उपयोग काय? हा विषाणू कुठलंही राजकारण जाणत नाही! अशा वेळी डोळे उघडे ठेवून वाचत राहिले. लिहिण्याची खुमखुमी सतत खदखदत होतीच. या विषयावर काही वृत्तपत्रीय लेखनही चालूच होतं.
ही खुमखुमी जिरवण्यासाठी या विषयावर एक पुस्तक लिहायला मिळायला हवं, असं सतत वाटत होतं. पण माझ्या पहिल्या पुस्तकाचे प्रकाशक राजहंसचे दि. ग. माजगावकर तथा दिगमा यांना ‘मी लिहिलं, तर राजहंस छापेल का?’ असं विचारण्याची माझी काही बिशाद नव्हती. पण एक दिवस ‘लोकसत्ते’च्या रविवार पुरवणीतला माझा एक लेख वाचून दिगमांचाच मला फोन आला तो, ‘असं एक पुस्तक करावं असं वाटतंय, तू ते लिहिशील का?’ असं विचारायला. मनापासून लिहावं असं वाटत असताना दिगमांनी हे विचारणं, हा एक महत्त्वाचा योगायोग होता. मी हे पुस्तक लिहू शकेन, असं प्रकाशनक्षेत्रातल्या दिगमांसारख्या अध्वर्यूला वाटलं, हा मी माझा सन्मान समजते. तो घडला आणि मी पडत्या फळाची आज्ञा समजून कामाला लागले. ही गोष्ट होती १५-२० एप्रिलच्या आसपासची.
हे नवं पुस्तक जलद गतीने लिहून व्हायला हवं होतं. टाळेबंदी माझ्या पथ्यावर पडली, सोशल मीडियापासून तात्पुरता काडीमोड घेऊन मी दिवसरात्र वाचण्यात आणि मग मान मोडून लिहिण्यात गढून गेले. ‘न्यू यॉर्क टाइम्स’, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’, ‘गार्डियन’, ‘वॉशिंग्टन पोस्ट’, ‘इकॉनॉमिस्ट’, सारख्या वृत्तपत्रांबरोबरच मी मोठ्या प्रमाणात शोधनिबंधही वाचले. अनेक न्यूज बुलेटीन, व्हिडिओ पाहिले. औषधनिर्माण, वैद्यकीयशास्त्र, साथरोगशास्त्र या क्षेत्रातल्या अनेक तज्ज्ञांशी चर्चा केली आणि जेमतेम दीड महिन्यात हे पुस्तक लिहून हातावेगळं केलं.
पुस्तक लिहिताना मी विषाणूच्या बाबतीतल्या कुठल्याही अफवांना, सिद्ध न झालेल्या षडयंत्राच्या कहाण्यांना फाटा देत फक्त आणि फक्त शास्त्रशुद्ध आधार असलेल्या गोष्टीच लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. कारण या अफवा आणि कहाण्या कितीही मनोरजंक असल्या, तरी त्या आपल्याला वास्तवापासून दूर नेतात. त्यांना मनोरजंकतेची चुरचुरीत फोडणी दिल्याने त्या खमंग असतात. पण कोविडच्या या साथीशी मुकाबला करण्यासाठी आपल्यासारख्या सामान्य नागरिकाच्या हातात एकमेव शस्त्र आहे. ते म्हणजे आपल्या राजकीय मतांचे, धार्मिक भावनांचे चष्मे उतरवून ठेवून कुठलाही पवित्रा न घेता वस्तुनिष्ठपणे या घटनेकडे आणि तिच्या परिणामांकडे पाहणे. हे पुस्तक लिहितानाही मी तेच शस्त्र वापरायचं ठरवलं. बा. सी. मर्ढेकरांच्या ‘भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्याची कसोटी’ या ओळी हा अशा सगळ्या घटनांकडे पाहण्याचा माझा मंत्र आहे. तुम्हीही याच मंत्राचा जागर करत हे पुस्तक वाचावं, हीच एकमेव अपेक्षा!
..................................................................................................................................................................
प्रकरणाचा संपादित अंश
जानेवारी २०२०
वॉशिंग्टन डीसी, अमेरिका
डॉ. कीथ जिरोम आपल्या सहकाऱ्याशी - डॉ. अॅलेक्स ग्रेनिंजरशी तावातावानं बोलत होते. त्यांच्या कोविड टेस्टिंग किटला परवानगी द्यायला अमेरिकन औषधनियामक संस्थेनं (FDA) नकार दिला होता. काही वेळापूर्वीच एफडीएनं पाठवलेला इमेल त्यांनी वाचला होता आणि त्याने झालेला अपेक्षाभंग त्यांच्या प्रत्येक शब्दांत व्यक्त होत होता.
डॉ. कीथ होते सिएटलच्या वॉशिंग्टन विद्यापीठाच्या विषाणूशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक आणि डॉ. अॅलेक्स होता तिथला त्यांचा सहकारी. वुहानला करोना विषाणूचा उद्रेक झाला आहे, हे समजताक्षणी ही जोडगोळी कामाला लागली होती. चीनच्या शास्त्रज्ञांनी सार्स करोना-२ या कोविडच्या कर्त्या विषाणूचा जिनोम सिक्वेन्स जाहीर केला आणि हे दोघं या विषाणूची निदान-चाचणी तयार करण्याच्या कामाला लागले. दिवस-रात्र काम करून त्यांनी टेस्ट किट्स तयार केले. करोना विषाणूचं अनुकरण करणाऱ्या अनेक कृत्रिम पदार्थांवर त्यांनी ही चाचणी करून पाहिली. चाचणी त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच उत्तम आणि अचूक काम करत होती. लवकरच या चाचणीची गरज त्यांच्या देशाला लागणार आहे, याचा त्यांना पूर्णपणे अंदाज होता. पण प्रशासन मात्र त्यांची काहीही दखल घ्यायला तयार नव्हतं.
२० जानेवारीला अमेरिकेत कोवडचा पहिला रुग्ण आढळला. हा वॉशिंग्टनमध्ये राहणारा माणूस नुकताच वुहानहून आला होता. यानंतर रुग्ण हळूहळू वाढू लागले, तरी प्रशासन अजून निवांतच होतं. करोना व्हायरसचा जिनोम सिक्वेन्स मिळाल्यावर सगळ्या देशांतले संशोधक तातडीने कोविडचं निदान करणारी टेस्ट किट्स बनवण्याच्या कामाला लागले. अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसिज कंट्रोल (सीडीसी)मध्ये हे काम सुरू झालं. तसं ते इतर काही प्रयोगशाळांतही सुरू होऊ शकलं असतं. पण अमेरिकन अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) फक्त काही बोटांवर मोजण्याइतक्या प्रयोगशाळांनाच या चाचण्या करायची परवानगी दिली. या सगळ्यांनी फक्त सीडीसीने बनवलेले टेस्ट किट्स वापरावेत, असंही सांगण्यात आलं. एफडीए फक्त सीडीसीच्या चाचण्यांनाच मंजुरी देणार होतं. इतर शास्त्रज्ञांच्या चाचण्या नाकारण्यात आल्या. या नाकारण्यात आलेल्या चाचण्यांत कीथ आणि अलेक्सचीही चाचणी होती. अमेरिकेला फारशा चाचण्या कराव्याच लागणार नाहीत. कारण अमेरिकेसारख्या देशात हा विषाणू पसरणारच नाही, या भ्रमात ट्रम्प प्रशासन होतं. ‘असल्या साथीबिथी येतात त्या गरीब देशात... अमेरिकेत कसं असं काही होईल? आणि झालाच काही रुग्णांना कोविड तर पाहता येईल. आमच्या देशाकडे जगातली सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था आहे, सर्व सुविधांनी युक्त अशी रुग्णालयं आहेत. आम्हाला काय होणार आहे?’ असा काहीसा गर्वही होता प्रशासनाला.
२०१७ सालात निवडून आल्यावर वर्षभरानंतर ट्रम्प यांनी व्हाईट हाउस मध्ये कार्यान्वित असलेलं साथरोग नियंत्रणाचं कार्यालय सरळ बंद करून टाकलं. २०१४ सालात आलेल्या इबोलाच्या महामारीनंतर हे कार्यालय स्थापन करण्यात आलं होतं. भविष्यात येऊ घातलेल्या रोगांच्या उद्रेकांसाठी देशाला तयार ठेवणं आणि त्यांना साथ किंवा महामारी होण्यापासून रोखणं हेच या कार्यालयाचं काम होतं. बेथ कॅमेरॉन हे या कार्यालयाचे प्रमुख होते. हे कार्यालय अस्तित्वात असतं, तर अमेरिकन सरकारनं कोविड साथीला प्रतिसाद द्यायला नक्कीच बरीच आधी सुरुवात केली असती. आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अशा प्रकारच्या परिस्थितीला उत्तर देण्यात अत्यंत महत्त्वाचा असतो तो वेग. हे काम या कार्यालयाने ‘वेगानं’ केलं असतं.
ट्रम्प प्रशासनाला वुहानमधल्या साथीची खबर मिळाली तीन जानेवारीला. त्या आधी कितीतरी दिवसांपासून अमेरिकन गुप्तहेर संस्था अशी काहीतरी भयानक साथ येऊ घातली आहे, असा इशारा देत होत्या. पण तरीही या संकटाला पूर्ण ताकदीनिशी तोंड द्यायला सरकार सरसावलं, ते यानंतर तब्बल ७० दिवसांनी. हा उशीरच अमेरिकेला प्रचंड महागात पडला. या सगळ्या काळात काही तरी चमत्कार होईल आणि ही साथ नाहीशी होईल - याच आविर्भावात ट्रम्प आणि त्यांचे सहकारी होते. प्रशासन सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञांचे सल्ले सतत धुडकावत राहिलं आणि लोकांच्या मनातला गोंधळ वाढतच गेला.
दरम्यान WHOने देऊ केलेले टेस्ट किट्स अमेरिकेने नाकारले, कारण सीडीसीचे किट्स तयार झाले होते. पण सीडीसी ही कुठली मोठी औद्योगिक संस्था नव्हे. त्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर हे किट्स बनवण्याची सवयच नव्हती. बराच उशीर करून सीडीसीने अवघी ‘९०’ किट्स काही प्रयोगशाळांना पाठवली ....आणि ही किट्स अपयशी ठरली! ते वापरून कोविडचं निदान करताच येईना. मोठी अवघड परिस्थिती निर्माण झाली. एकाच संस्थेच्या किट्सवर अवलंबून राहून प्रशासनाने अक्षरश: हाराकिरी केली होती.
मग एक दिवस डॉ. किथ आणि डॉ. अॅलेक्सच्या प्रयोगशाळेला इमेल आला की, त्यांच्या टेस्ट किट्सना मान्यता देण्यात आली आहे. त्यांच्या विषाणूशास्त्र प्रयोगशाळेलाही या चाचण्या करण्यासाठी अधिकृत जागा म्हणून परवाना मिळाला होता. पाणी गळ्यापर्यंत येऊन पोचल्यावर अमेरिकेतली नोकरशाही आळस झटकून खडबडून जागी झाली होती खरी. पण यात प्रचंड उशीर झाला होता. पहिला रुग्ण सापडून चार आठवडे झाले, तरी अमेरिकेत चाचण्याच होत नव्हत्या. त्यामुळे संसर्ग झालेले कितीतरी रुग्ण निदान न झाल्याने लोकांत मिसळत राहिले आणि साथ पसरवत राहिले.
३१ जानेवारीला चीनमधून येणाऱ्या प्रवाशांना अमेरिकेत प्रवेशबंदी केली गेली. ‘‘पन्नास वर्षांत अमेरिकेत घडली नव्हती अशी प्रवेशबंदी करण्याचं काम मी अत्यंत धाडसानं केलं!’’ असं म्हणत ट्रम्प आपली पाठ थोपटत राहिले. पण खरं तर संपूर्ण जानेवारी महिन्यात जवळजवळ तीन लाख प्रवाशांनी चीनमधून अमेरिकेत प्रवेश केला होता आणि कोविड महामारीची बीजं त्या महिन्याभरात अमेरिकाभर रुजली होती.
..................................................................................................................................................................
‘कोरोनाच्या कृष्णछायेत’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5210/Coronachya-Krushnchhayet#
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment