अजूनकाही
सामान्यत: उत्तर-औद्योगिक उपभोगवादी समाजामध्ये मृत्यू ही निषिद्ध मानली गेलेली गोष्ट आहे. या समाजात अश्लीलतेबद्दल उघडपणे बोललेले चालते आणि मृत्यूबद्दल जाहीरपणे कोणीही बोलू नये, त्याबद्दल बोलणे म्हणजे पाप असे समजले जाते. म्हणजे असे आहे की, जणू मृत्यूची किंमत ही ग्राहकांच्या आवडीनिवडी इतकीच. असे होऊ न देणे ही समाजाची फार मोठी जबाबदारी आहे, परंतु देखाव्याद्वारे वास्तवावर पांघरून घालून आपली जबाबदारी टाळणे हे समाजाचे नमुनेदार वैशिष्ट्य आहे. परिणामी वास्तव झाकले जाऊन दिखाऊपणालाच महत्त्व प्राप्त होते. सेवा पुरवणाऱ्या उद्योगाने सुकर केलेल्या ‘मृत्यूच्या एकाकीपणाच्या वास्तवाचे’ यथार्थ चित्रण समाजशास्त्रज्ञ नोर्बर्ट इलियास (Norbert Ilias) यांनी केले आहे. अशा एकाकीपणामध्ये व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होतो आणि जे मृत्यूला कवटाळतात, त्यांनी समाजाचा नियम मोडला, असे मानले जाते.
आत्महत्येच्या घटनांचा संबंध बऱ्याचदा मनोवैज्ञानिक कारण, जसे निराशा आणि सामाजिक-आर्थिक ताणतणाव यांच्याशी जोडला जातो, मात्र कारण वेगळेच असते. सामाजिक ऐक्य व सामंजस्य रसातळाला गेल्याचे हे द्योतक आहे. सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपल्या ‘मरण्या’वरून आपल्या समाजाची गतिशीलता कळते.
हीच बाब फ्रेंच समाजशास्त्रज्ञ एमिल डरखाईम (Émile Durkheim) यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ‘सामाजिक विकृतीशास्त्र आणि आत्महत्या’ यांच्या सहसंबंधाची मांडणी करताना सांगितली. त्यांनी त्याला ‘प्रमाणकशून्यता’ (anomie) असे संबोधले. ही अवस्था सहज जीवनाचे दैनंदिन निकष आणि मूल्य विस्कटल्याचे दर्शवते. डरखाईम यांनी आत्महत्येला एक वैयक्तिक कृत्य न मानता ‘सामाजिक घटना’ म्हटले आहे. व्यक्ती ही तिच्या सामाजिक परिस्थितीची निर्मिती असते. समाज व्यक्तीची जडण-घडण करतो, हा विचार डरखाईमच्या समाजशास्त्रीय लिखाणातील प्रधान विचार आहे.
आत्महत्या या घटनेचे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विश्लेषण करून निष्कर्ष मांडण्याचे महत्त्वाचे कार्य प्रथमतः डरखाईम यांनी केले आहे. त्यांच्या मते, जेव्हा समाजामध्ये आकस्मिक किंवा अचानक बदल घडून येतात आणि व्यक्तींना अशा बदलाशी जुळवून घेता येत नाही, तेव्हा त्यांच्याकडून ‘प्रमाणकशून्य’ आत्महत्येचा अवलंब केला जातो. व्यापारातील मंदी, दिवाळखोरी, आकस्मिक आलेले दारिद्र्य अथवा श्रीमंती, वैधव्य, विधुरपणा यांसारख्या अचानक घडणाऱ्या बदलांमुळे व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. व्यक्तीजीवनाची चाकोरीबद्ध चौकट ढासळते. जुनी परिस्थिती त्या व्यक्तीवर नियंत्रण ठेवण्यास अपुरी पडते आणि नवीन परिस्थितीत व्यक्तीवर नियंत्रण ठेवू शकेल, अशी अस्तित्वात नसलेली एक प्रकारची ‘पोकळी’ निर्माण होते. सामाजिक जीवनात अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमधून अशा प्रकारच्या आत्महत्या घडून येतात.
लॉकडाउनमधील सामाजिकता
डरखाईमच्या संकल्पनेतील ‘प्रमाणकशून्यता’ करोनाकाळात सुस्पष्टपणे दिसते आहे. या काळात गरीब-श्रीमंत आणि प्रत्येक व्यक्तीने केवळ जिवंत राहण्यावरच लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. दारिद्र्य, अन्नधान्याचा तुटवडा, भीती, चिंता आणि नैराश्य लॉकडाऊनमधील नागरिकांवर घिरट्या घालत आहे. निराशा आणि बंधुभावविरहीत परिस्थितीत ‘जगणं’ आणि ‘मरणं’ भयावहपणे एकाकी बनलं आहे. हा काळ अनेक देखाव्यांचा साक्षीदार बनला आहे.
विशेषतः करोना महामारीच्या काळात अग्रक्रमाने लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कौतुकासाठी २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता भांडीकुंडी वाजवण्याचे आणि शंखनाद करण्याचे पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाचाही साक्षीदार हा काळ बनला.
सर्वसाधारण नागरिकांपासून सिनेअभिनेते, मोठमोठे उद्योगपती आणि खेळाडू या कसरतीत सहभागी झाले. ज्या वेळी ‘फिजिकल डिस्टन्स’ पाळणे गरजेचे होते, अशा काळात ही घटना म्हणजे सामाजिक एकात्मतेची भावना रुजवण्याचा निराशाजनक प्रयत्न होता. निव्वळ निराशाजनक परिस्थितीमध्ये आशेची इच्छा ठेवण्यातून ‘देखावा’च महत्त्वाचा यालाच पुष्टी मिळते!
काही आठवड्यानंतर ५ एप्रिल रोजी अनेक भारतीयांनी मोदींच्या ऐक्याच्या देखाव्याच्या दुसऱ्या एका आव्हानाला भरघोस प्रतिसाद दिला. त्यांनी ‘बाहेरील जग’ उजळवण्यासाठी संध्याकाळी नऊ वाजता ‘घरातील दिवे’ सलग नऊ मिनिटे बंद ठेवले. या वेळी भारतामधील अनेक प्रांत फटाक्याच्या आतषबाजीचे साक्षीदार बनले.
जीर्ण होत चाललेले नातेसंबंध
राज्य, नागरी समाज, कुटुंब आणि नातेसंबंधांना एकत्र बांधणारा धागा जीर्ण झाल्याच्या वास्तवाला हे देखावे झाकून ठेवण्यात अपयशी ठरलेले दिसतात. मास्क लावलेला असला तरीही संपर्कात आलेला प्रत्येक जण करोना व्हायरसचा दमदार वाहक आहे, असेच प्रत्येकाला वाटते आहे. नेहमीच्या भेटीगाठीत तणाव आहे. चेहऱ्यावरचे नाटकी हावभाव, अविश्वास आणि करोना व्हायरसबद्दलचा संशय ते दाखवत आहेत.
प्रत्येक संबंध हा जोखीमयुक्त आहे. सामाजिक सौहार्द इतक्या खालच्या थराला गेले आहे की, समुदाय, मैत्री, नातेसंबंध हे सोशल मीडिया साईटवरच्या युजर ऑप्शन्ससारखे वाटावेत. हिंदी चित्रपट अभिनेता सुशांत सिंगच्या मृत्युने अनेक वर्तमानपत्रांच्या हेडलाईन्सचे लक्ष वेधून घेतले, तर आत्महत्येतून झालेल्या मृत्यूच्या दुसऱ्या अनेक बातम्या लॉकडाऊन सुरू झाल्यापासून वर्तमानपत्राच्या आतील पानांवर छापल्या गेल्या.
उदाहरणार्थ १९ मे रोजी लॉकडाऊनमध्ये सुरतमध्ये अडकलेल्या आसामी मजुराने (वय वर्षे २०) केवळ हाताला काम नसल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केली. एका महिन्यानंतर १६ जूनला दिल्लीमध्ये हरिकिशन नावाच्या ४० वर्षीय स्थलांतरित मजुराने लॉकडाउनच्या काळात त्याचा भाजी विक्रीचा व्यवसाय डबघाईला आल्याने आत्महत्या केली. त्याने आत्महत्येचे कारण लिहून ठेवले नाही.
या आणि इतर डझनावारी झालेल्या आत्महत्या केवळ मानसशास्त्रीय घटकांशी संबंधित नाहीत, तर त्या विशिष्ट समाजवैशिष्ट्य प्रतिबिंबित करतात. भारतात सध्या आत्महत्येसाठी कारणीभूत निराशेला प्रोत्साहित करणारे दुःख सर्वत्र दिसते. मृत्यूचे कारण पूर्णपणे मानसशास्त्रीय घटकांशी जोडून समाज स्वतःला निर्दोष ठरवत अशा मृत्यूला कारणीभूत असल्याच्या जबाबदारीतून मुक्त होतो आहे. अशा समाजशीलताविरहित समाजामध्ये प्रत्येकालाच धोका संभवतो, हे लक्षात घेतले पाहिजे.
..................................................................................................................................................................
प्रा. देवनाथ पाठक हे नवी दिल्ली येथील ‘साउथ एशियन विद्यापीठा’मध्ये समाजशास्त्राचे प्राध्यापक आहेत. ‘Living & Dying : Meaning in Maithili Folklore’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत.
अनुवादक : प्रा. विलास भुतेकर व प्रा. प्रियदर्शन भवरे हे बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, जालना येथे अध्यापन करतात.
priyadarshan1971@gmail.com
..................................................................................................................................................................
हा मूळ इंग्रजी लेख ‘स्क्रोल’ या संकेतस्थळावर १८ जून २०२० रोजी प्रसिद्ध झाला आहे.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment