अजूनकाही
करोनामुळे जगभर हतबलता आली आहे. जिथे जागतिक आरोग्य संघटना आपल्या मार्गदर्शक सूचना बदलते आहे, तिथे सामान्य माणूस गोंधळलेला असणं स्वाभाविक आहे. भारतातसुद्धा करोनाची झपाट्याने साथ वाढू लागली आहे. १०० दिवस लॉकडाऊनचे मिळूनसुद्धा सरकारी वैद्यकीय सेवा पुरेशा सक्षम झालेल्या नाहीत. लस यायला अजून वर्ष दीड वर्ष आहे. सामान्य जनता अगतिकतेने जादुई उपचारांची वाट बघत आहे. पण चतुर व्यापारी होमिओपॅथीच्या गोळ्या, आयुर्वेदिक गोळ्या विकायला पुढे आले आहेत. या गोळ्यांमुळे आधी करोना १०० टक्के बरा करायचा दावा होता, आता करोनाविरुद्ध रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी त्या उपयुक्त आहेत, असे सांगितले जात आहे!
भारतात अॅलोपॅथीबद्दल अनेक गैरसमज आहेत. अॅलोपॅथीचे साईड इफेक्ट असतात आणि अॅलोपॅथी फक्त रोग बरे करते, तर आयुर्वेद व होमिओपॅथी मुळात रोगच होऊ देत नाहीत, असा चुकीचा समज जनमानसात आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीची औषधे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, यावर भारतीय जनमानस चटकन विश्वास ठेवताना दिसत आहे - काहीही प्रश्न न विचारता!
होमिओपॅथी वा आयुर्वेदामुळे साईड इफेक्ट होत नाहीत, हा तद्दन अंधविश्वास आहे. कुणीही प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करणारा/करणारी त्या त्या पॅथीतील तज्ज्ञ असे विधान करणार नाही. आयुर्वेदाची म्हणून जी काही औषधे आज विकली जातात, त्यांच्यावर अॅलोपॅथीसारखा ‘क्वालिटी कंट्रोल’ नाही. वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना, मी स्वतः आयुर्वेदाची बाजारात मिळणारी औषधे घेऊन सीरिअस असे शिश्याचे (लेड) पॉयझनिंग झालेल्या केसेस बघितल्या आहेत. इतर काही डॉक्टर मित्रांचाही तो अनुभव आहे.
आपण थोडा इतिहासाचा धांडोळा घेऊ. साल १८५०. तेव्हा जन्माला आलेला माणूस सरासरी किती वर्षे जगत होता? तर फक्त २५.४ वर्षे. साल २०१९. भारतात आज आयुर्मर्यादा काय आहे? ६८.७ वर्षे. १८५०च्या आसपास होमिओपॅथी नुकतीच जन्माला आली होती आणि आयुर्वेद तर काही हजार वर्षे अस्तित्वात होते. जर या दोन पॅथीकडे १८५० साली रोगप्रतिकारकशक्ती वाढवायची जादू होती, तर त्यावेळच्या माणसाची आयुर्मर्यादा इतकी कमी का होती? त्यावेळचा माणूस अॅलोपॅथी प्रगत झाली असताना (तिचे शास्त्रीय नाव आहे – ‘मॉडर्न मेडिसिन’) आज जेवढा जगतो, त्यापेक्षा तब्बल ४३.३ वर्षे का आधी मरत होता?
वस्तुत: १८५० साली अॅलोपॅथी वा आयुर्वेद दोन्हींकडे आनंदीआनंदच होता. अॅलोपॅथीचीसुद्धा मुख्य औषधं होती- अफू, दारू, शिसे, पारा. पण गेल्या २०० वर्षांत शास्त्रीय पायावर प्रयोग करत अॅलोपॅथी ‘मॉडर्न मेडिसिन’ झाली आहे. युरोपात विद्येच्या पुनरुज्जीवनामुळे विज्ञान-तंत्रज्ञानाने झेप घेतली. १६१० साली ल्युएन्हॉकने मायक्रोस्कोपचा शोध लावला. जंतुंमुळे रोग होतात, हे समजण्याची ती सुरुवात होती. त्याचीच परिणती म्हणून आज ‘मॉडर्न मेडिसिन’च्या विज्ञानाला - आयुर्वेद किंवा होमिओपॅथीला नव्हे, करोनाच्या विषाणूची जनुकेसुद्धा माहीत झाली आहेत.
१८६७ साली लिस्टरने ‘कार्बोलिक अॅनसीड’ म्हणजे साध्या शब्दांत ‘डिसइंफेक्टंट’ अर्थात जंतुनाशकाचा शोध लावला. तो आज ब्लिचिंग पावडरच्या पाण्याने करोनाचा व्हायरस मरतो, इथपर्यंत आपल्याला घेऊन आला आहे. पेनिसीलीनचा शोध १९२८मध्ये लागला आणि जीवाणू मारता येतात, हे माणसाला पहिल्यांदा समजले. त्यानंतरच आयुर्वेदाच्या काळात ज्या रोगांना माणूस अगतिकपणे शरण जात होता, त्या टायफॉईड / टीबीवर प्रभावी अँटिबायोटिक मिळाले. जेन्नरने देवीरोगाविरुद्ध लस शोधून काढली म्हणून आज सगळे जग करोनाविरुद्ध लस येईल.
आज लोक अॅलोपॅथीला पर्याय शोधत आहेत, ते वाढत्या बाजारीकरणात तिचा खर्च हाताबाहेर गेल्यामुळे. आणि काही हॉस्पिटल्स व डॉक्टर्स अॅलोपॅथीचा उपयोग अगतिक पेशंटना फसवून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी करत आहेत, पण याचीही नोंद घ्यायलाच हवी की, आयुर्वेद व होमिओपॅथीसुद्धा त्याच बाजारात उभे आहेत. ज्या प्रमाणात अॅलोपॅथीचे डॉक्टर धंदेवाईक झाले आहेत, त्याच प्रमाणात आयुर्वेद व होमिओपॅथीचे डॉक्टरसुद्धा.
अर्थात जेव्हा होमिओपॅथी वा आयर्वेदिक असा काहीही पुरावा नसलेला दावा करतात की, त्यांची औषधे ही तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढवतील आणि तुमचा करोनापासून बचाव करतील, तेव्हा ते बाजारात फक्त पैसे कमवायला उभे असतात आणि त्यांचे बळ हे समाजाच्या होमिओपॅथी व आयुर्वेदावरील भाबड्या अंधविश्वासात असते. नव्हे अवघ्या काही महिन्यांत ते अब्जावधीची कमाई करणार आहेत ती तुमच्या आमच्या भाबड्या विश्वासामुळे. ‘पी हळद आणि हो गोरी’ अशी रोगप्रतिकारशक्ती मिळत नसते- ना आयुर्वेदात, ना होमिओपॅथीत, ना अॅलोपॅथीत. तसा दावा करणारे फक्त चतुर व्यापारी असतात आणि हे युगानुयुगे चालत आले आहे. दुनिया बेवफूक है, बिकनेवाला चाहिये!
मित्र-मैत्रिणींनो तुमची घालमेल मला समजते. नका लागू अशा बिनबुडाच्या बाजाराच्या नादी. त्याऐवजी आज शास्त्रज्ञ व विज्ञान जे सांगत आहे, ते कटाक्षाने पाळा. मास्क वापरणे, सहा फूट शारीरिक अंतर ठेवणे, बाहेरच्या वस्तूला हात लागला की, साबणाच्या पाण्याने हात धुणे, आणि जे साठ वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, ज्यांना ब्लडप्रेशर वा डाएबेटिस यासारखे आजार आहेत त्यांनी जास्त काळजी घेणे, हे अत्यावश्यक आहे.
मला तर असा धोका वाटतो की, या आयुर्वेदाच्या, होमिओपॅथीच्या गोळ्या खाऊन काहींचा आत्मविश्वास वाढेल आणि ही जी प्राथमिक काळजी घ्यायची आहे, ती न घेतल्यामुळे करोनाची लागण होण्याची शक्यता वाढेल. तसे होऊ देऊ नका आणि आपल्या अगतिकतेमुळे व अंधविश्वासामुळे चतुर व्यापाऱ्यांना गडगंज कमवून देऊ नका.
..................................................................................................................................................................
‘साथी’ संचालित ‘वेध आरोग्याचा’मधून साभार
..................................................................................................................................................................
लेखक डॉ. अरुण गद्रे हे ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ व लेखक आहेत.
drarun.gadre@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Amit Kamble
Thu , 16 July 2020
Respected Dr.Gadre Sir..its real fact ur highlighted in this article....Jago Lok ho Jago... Aankhe khuli rakho...
Amol kamble
Thu , 16 July 2020
म्हणून तर रामदेव बाबानी अगोदर लस काढली म्हणून अफवा पसरवली अन नतर म्हणे त्या immunity boost करायच्या गोळ्यात ....