साहित्य संमेलन @ डोंबिवली : संमेलनाच्या तयारीला अजून चिक्कार वेळ आहे!
संकीर्ण - फोटोएसे
टीम अक्षरनामा
  • ९०व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह
  • Mon , 23 January 2017
  • साहित्य संमेलन Sahitya Sammelan आगरी युथ फोरम Agri Youth Forum सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल Savlaram Maharaj Sport Complex

९० वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ३, ४, ५ फेब्रुवारी दरम्यान डोंबिवली इथं होत आहे. न भुतो न भविष्यती अशा पद्धतीचं हे संमेलन होऊ घातलं आहे, असा एकंदर त्याचा रागरंग दिसतो आहे. एकीकडे संमेलनाच्या निमित्तानं दरवर्षी जे वावदूक वाद होतात, तसं काहीही यंदा होताना दिसत नाही. तर दुसरीकडे संमेलन जेमतेम १० दिवसांवर आलं आहे, पण अजून त्याच्या तयारीला साधी सुरुवातही झालेली दिसत नाही. अर्थात १० दिवसांतही सर्व तयारी होऊ शकतं म्हणा! करायचंच ठरवलं तर काहीच अशक्य नसतं. आतापर्यंत संमेलनाध्यक्ष डॉ. अक्षयकुमार काळे यांनी कसलाही वाद निर्माण केला नाही आणि इतरांनाही तशी संधी अजून तरी मिळालेली नाही, हीसुद्धा नियोजनानंच साध्य झालेली गोष्ट आहे. त्यामुळे संमेलनाची पूर्वतयारीही अशीच बिनबोबाट पण नियोजनानंच होईल अशी आशा करायला काहीच हरकत नाही. तोवर संमेलनस्थळाची ही चित्रमय झलक पाहू या...

साहित्य संमेलन कल्याण रोडवरील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कै. ह. भ. पा. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल इथं होणार आहे. त्याचा हा नकाशा. मुख्य मैदान लाल रेषेनं दाखवलं आहे. त्यातील लाल चौकोनांच्या जागी संमेलनाचं मुख्य व्यासपीठ व सभामंडप असेल, तर त्याच्या शेजारी असलेल्या निळ्या-काळ्या चौकोनांच्या जागी ग्रंथप्रदर्शन असेल...

हे आहे घरडा सर्कल. संमेलनस्थळाची ही सर्वांत मोठी खूण असेल. रिक्षा, बसनं येणाऱ्यांसाठी आणि स्वत:च्या वाहनांनी येणाऱ्यांसाठीही. या सर्कलच्या डाव्या बाजूनंही संमेलनस्थळाकडे जाण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे.

संमेलनस्थळाच्या समोरील रस्ता. हा कल्याण रस्ता पुढे शिळफाटा रस्त्याकडे जातो. पुण्याहून वा एक्सप्रेस हायवेवरून संमेलनस्थळाकडे येण्यासाठी शिळफाटा रस्त्याने यावं लागेल. पनवेलवरून थेट येण्यासाठी रस्ता आहे आणि ऐरोलीवरूनही येता येतं. अर्थात ज्यांच्याकडे स्वत:चं वाहन असेल त्यांच्यासाठीच हा पर्याय फायदेशीर आहे. इतरांनी सरळ कल्याण किंवा ठाण्यापर्यंत रेल्वेनं यावं. तिथून तिथून लोकलनं डोंबिवली स्टेशनला. स्टेशनवरून संमेलनस्थलापर्यंत रिक्षानं एका माणसाचं भाडं वीस रुपये होतं. डोंबिवलीमध्ये जवळपास कुठलीही रिक्षा मिटरवर चालत नाही. तेव्हा त्याबाबतीत मनाची तयारी केलेली बरी!

संमेलनस्थळाच्या मुख्य प्रवेशदाराचं समोरच्या बाजूनं काढलेलं छायाचित्र. समोरच्या बाजूला रोटरी गार्डन आहे. संमेलनामध्ये कंटाळा आला किंवा तेथील एखाद्या परिसंवादानं डोकं उठलं तर या बागेत छानपैकी एखादी डुलकी काढता येईल. किंवा कुणाची थोडं निवांत बोलायचं असेल तरी हा बागेचा पर्याय चांगला ठरू शकतो.

संमेलनस्थळाचं मुख्य प्रवेशद्वार. संमेलनस्थळाला कुणाचं नाव दिलं जाणार आहे हे अजून गुलदस्त्यात आहे. ते काहीही असलं तरी ती ओळखीची खूण नसणार आहे. त्यापेक्षा प्रवेशद्वाराशेजारी असलेलं विजय सेल्स हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचं शोरूम हा संमेलनस्थळाचा पत्ता विचारण्यासाठीचा घरडा सर्कलनंतरचा सर्वांत मोठा लँडमार्क असेल. तेव्हा तो आवर्जून लक्षात ठेवावा.

मुख्य प्रवेशद्वारातून आत शिरल्यानंतर दिसणारा रस्ता. या रस्त्याच्या डावीकडे उजाड झालेली बाग आहे, तर उजवीकडे केडीएमसीचं स्पोर्ट कॉम्प्लेक्स आहे. डावीकडच्या भिंतीला पांढरा रंग देण्याचं काम चालू आहे. ते करणाऱ्यांना साहित्यसंमेलनाची तयारी चालली आहे का, असं विचारलं तेव्हा त्यांनाही ही भिंत आपण नेमकी कशासाठी रंगवतो आहोत, याची काहीही कल्पना नव्हती. कारण ते आम्हाला काही माहीत नाही, असं म्हणाले!

हीच ती उजाड बाग...पण लवकरच तिला रंगरूप येईल. काळजी नसावी.

उजवीकडचं केडीएमसीचं स्पोर्ट कॉम्प्लेक्स. इथं काही कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. कदाचित कवितांचे किंवा कथाकथनांचे सामने होण्याची शक्यता अगदीच नाकारता येत नाही.

त्यापुढे आलं की, ज्या मैदानावर संमेलनाचं मुख्य व्यासपीठ व सभामंडप असेल, त्याचं दृश्य. आता जिथं वाहनं पार्क केलेली दिसत आहेत, तिथं कदाचित व्हीआयपी लोकांसाठीचं पार्किंग असू शकेल. इतरांनी आपली वाहनं कुठं पार्क करायची याची कुठलीही माहिती आयोजकांनी संमेलनाच्या संकेतस्थळावर कालपर्यंत तरी दिलेली नव्हती.

संमेलनाच्या मुख्य व्यासपीठाकडे जाण्यासाठी डाव्या बाजूनंही एक प्रवेशद्वार आहे. त्या बाजूनं घेतलेलं मुख्य व्यासपीठाच्या जागेचं छायाचित्र.

हेच ते डावीकडचं प्रवेशद्वार क्रमांक दोन.

संमेलनाचा उदघाटन सोहळा, समारोप आणि इतर महत्त्वाचे कार्यक्रम याच मैदानावर लवकरच उभारल्या जाणाऱ्या व्यासपीठ-सभामंडपात पार पडणार आहेत. सध्या इथं मुलं खेळत आहेत, ढोल वाजवण्याचा सराव करत आहेत. काही दिवसांनी इथं साहित्यिक आणि साहित्यरसिक बागडताना दिसतील.

मैदानाचं डाव्या बाजूनं घेतलेलं छायाचित्र. या बाजूला ग्रंथप्रदर्शन असेल. ३००हून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स असणार आहेत, असं आयोजक संस्था, आगरी युथ फोरमनं १९ जानेवारीला जाहीर केलं. स्टॉल्सची सोडतही काढली. पण या ठिकाणी अजून स्टॉल्स उभारणीला साधी सुरुवातही झालेली नाही.

सध्या हे मैदान असं दिसतं...लवकरच त्याचे दोन भाग होतील. एकीकडे संमेलनाचं मुख्य व्यासपीठ आणि दुसरीकडे ग्रंथप्रदर्शन.

मैदानाचं उजव्या बाजूनं घेतलेलं छायाचित्र. इथं काही ट्रक, पत्रे आणि व्यासपीठ उभारणीचं सामान येऊन पडलं आहे. नुकतं नुकतंच पडलं आहे. त्याची मांडामांड करणाऱ्यांना इथं समेलन होणार आहे, त्याची ही तयारी आहे का, असं विचारलं तेव्हा ते म्हणाले की, आम्हाला काही ते माहीत नाही, पण इथं व्यासपीठ उभारायचं आहे. याच बाजूला महानगरपालिकेचं सावित्रीबाई फुले नाट्यगृह आहे. तिथंही काही कार्यक्रम होतील असं दिसतं.

संमेलनस्थळाचा एरियल व्ह्यूि.

या संमेलनाविषयी तुम्हाला अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्ही http://www.90thsahityasammelan2017.com या संकेतस्थळाला भेट देऊ शकता. अर्थात हे संकेतस्थळ अतिशय जुजबी आहे. त्यावर साधा संमेलनस्थळाचा नकाशाही टाकलेला नाही. पण संमेलनस्थळाचा गुगल मॅप दिलेला आहे. शिवाय सदस्य नोंदणी, कार्यक्रमपत्रिका आदि माहिती आहे.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......