अजूनकाही
आज १५ जुलै. नरहर कुरुंदकर यांचा जन्मदिवस. कुरुंदकर अवघ्या पन्नाशीत निघूनही गेले. तेवढ्या काळात सार्वजनिक आयुष्यातली २० वर्षं, लिहिलेली ३५ पुस्तके आणि महाराष्ट्रभर दिलेली व्याख्याने, समीक्षा, लेख, वाद-विवाद, प्रबोधन… यांतून या माणसाने प्रत्येक गोष्टीत मानदंड तयार केले. आजच्यासारखी गुगल, इंटरनेट, ईमेल अशी साधनं हाताशी नसताना, केवळ उपलब्ध असलेला लिखित शब्द आणि इतक्या दूरच्या गावात सर्व गैरसोय असताना, ज्या प्रकारचा व्यासंग केला, वैचारिक उंची विकसित केली, ते पाहून थक्क व्हायला होते.
कुरुंदकरांविषयी तसे खूप लिहिले गेले आहे. तरीही मी लिहितो आहे, कारण मीही आज वयाच्या पन्नाशीत आहे. कुरुंदकरांच्या आणि माझ्या आयुष्याचा हिशोब नेमका काय आहे? अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात या माणसानं लिहिलेली ३५ पुस्तकं, त्या प्रत्येक पुस्तकाची खोली, त्यातील विषयावैविध्य, व्यासंग, अभ्यास, हे सारं बघितल्यावर आपण आपल्या आयुष्यातील ५० वर्षं खरंच नेमकं काय केलं, असा मला प्रश्न पडतो.
प्रतिभेची आणि व्यासंगाची उंच उंच विमानं कुरुंदकर उडवताना आपण फक्त साबणाचे फुगे उडवत राहिलो की काय, असं शल्य वाटत राहतं. व्यासंग करावा आणि मग प्रकट व्हावं, ही गोष्ट माझ्यासारखे अनेक जण विसरले आहेत. झालं असं की, आम्हाला लिहिता यायला लागलं तो आणि वृत्तपत्रांच्या अनेक आवृत्त्या, अनेक नियतकालिकं आणि दिवाळी अंक सुरू व्हायचा कालखंड एकच होता. त्यामुळे आम्ही लिहीत गेलो आणि ते छापून येत राहिलं. एका वर्षी तर मी १८ दिवाळी अंकांत लिहिलं होतं...
त्यातून एक प्रतिमा बनत गेली, मान्यता मिळाली. पुस्तकं प्रकाशित होत गेली; पण आज मागे वळून पाहताना वाटतं, एखाद्या विषयाचा कुरुंदकर जसा सांगोपांग अभ्यास करत, तसा आपण कुठे गेला? आपण केवळ प्रतिक्रियावादी लेखन करत राहिलो. घडलेल्या घटना, त्यांचा तेव्हाचा अर्थ लावणं, व्यक्त होणं, असंच आपल्या एकूण लेखन व्यवहाराचं स्वरूप राहिलं. एक कार्यकर्ता म्हणून ते नक्कीच महत्त्वाचं आहे. घडणाऱ्या घटनांवर प्रतिक्रिया व्यक्त करून समाजमन बदलवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असतं, पण आपण फक्त तितकंच करत राहिलो, ही खंत आता कुरुंदकरांकडे बघून वाटत राहते.
ज्या विषयात आपण काम करतो, त्यात जगभरात, भारतभरात किंवा महाराष्ट्रात लिहिलेलं सगळं तरी वाचलं का? जे मानवी जगण्याशी जोडलेले महत्त्वाचे विचार आहेत ते, मार्क्सपासून तर अनेक विचारवंतांनी लिहिलेलं सगळं साहित्य वाचून तरी आपण आपली वैचारिक भूमिका बनवली का? ज्या साहित्यावर आपलं प्रेम आहे, त्यातील महत्त्वाचे मानदंड तरी आपण पूर्णपणे वाचले का? इंग्रजी साहित्य आपण किती वाचू शकलो?
आपण एकदा लिहायला लागलो की, नवनवे विषय खुणावत राहतात. थोडंफार वाचून आपण त्यांची तात्कालिक तयारी करतो. त्यात आपल्या व्यासंगापेक्षा मतप्रदर्शनच जास्त असतं. आपल्या आजूबाजूचा मोठा समूह फारसा व्यासंगी नसणारा असल्यामुळे तो असं लेखन वाचून प्रभावित होतो. पण जेव्हा आपण कुरुंदकर, नेमाडे आणि इंग्रजीतल्या दिग्गजांचं काही वाचतो, त्या क्षणी आपली सारी आवरणं गळून पडतात. आपण फक्त व्यक्त होत राहिलो, पण स्वतःला समृद्ध करण्याचं काम तसंच राहून गेलं, ही खंत आणि ही सल पुन्हा पुन्हा जाणवायला लागते.
कुरुंदकरांच्या चरित्रात हैदराबाद येथे त्यांनी जे वाचन केलं त्याचा उल्लेख आहे. महाविद्यालयातून ते जवळच्या ग्रंथालयात जात, तिथं संध्याकाळपर्यंत सर्व प्रकारचं वाचन करत. अनेक महिने त्यांनी हा परिपाठ ठेवला. घरी त्यांचे मामा नांदापूरकर मराठीतले नामवंत साहित्यिक, समीक्षक आणि अत्यंत व्यासंगी. त्यांची पुस्तकं कुरुंदकरांनी वाचून काढली. या सगळ्यांतून त्यांची मनोभूमिका घडली.
मला पूर्वी वाटायचं, फार पूर्वीच्या काळात लेखनाची माध्यमं मर्यादित होती हा खूप अन्याय होता. आज मला असं वाटतं की, तेव्हा माध्यमं मर्यादित होती हेच बरं होतं. कारण त्यामुळे स्पर्धा खूप तीव्र असायची. परिणामी आपली उंची वाढवत नेणं हा एवढाच पर्याय शिल्लक असायचा. आज अनेक माध्यमं उपलब्ध आहेत. आणि त्यातल्या कुणीही आपलं छापलं नाही, तर सोशल मीडियावर आपण लिहू शकतो. ब्लॉग लिहू शकतो, युट्यूब व्हिडिओ करू शकतो. हे सगळं नक्कीच चांगलं आहे, परंतु या सर्व प्रक्रियेत व्यासंग वाढवणं राहून जातं.
नोबेल विजेता लेखकही पुस्तक लिहितो आणि मीही पुस्तक लिहितो. पी. साईनाथ वृत्तपत्रात लिहितात, मीही लिहितो. एखादा जागतिक विचारवंत फेसबुकवर पोस्ट टाकतो आणि मीही टाकतो, पण यातील खोली व अंतर हे मात्र आम्ही विचारात घ्यायला तयार नाही, असंच मला वाटत आहे.
कुरुंदकरांच्या मृत्यूला आज ३८ वर्षं झाली. आजही त्यांची सर्व पुस्तकं तितक्याच उत्सुकतेनं वाचली जातात आणि ती तितकीच मार्गदर्शकही आहेत. माझ्यानंतर ३५ वर्षांनी माझं काय टिकेल? तात्कालिक परिस्थितीला प्रतिसाद देता देता आपण तात्कालिकच राहतो की काय, अशी साधार भीती वाटते.
एकदा तुमच्याकडे वाचकांची आणि चाहत्यांची गर्दी झाली की, व्यासंग करण्यासाठी फुरसत मिळत नाही. वरवर कितीही म्हटलं तरी आतूनही ती गरज वाटत नाही. मग आपण तेच तेच बोलत राहतो, तेच तेच लिहीत राहतो. प्रत्यक्ष काम करणारी व्यक्ती असेल तर ते क्षम्य मानलं जातं, किंबहुना त्या कामाचे मार्क त्या लेखनामध्ये पकडले जाऊन सरासरी उंच होते, पण ‘अभ्यासोनी प्रकटावे’ हे मात्र तसंच राहून जातं.
हेमंत देसाई एकदा म्हणाले होते की, ज्यांना खूप वाचनाची आवश्यकता आहे, ती माणसं आज खूप लिहीत आहेत आणि ज्यांनी लिहायला हवं ते मात्र वाचत बसले आहेत. या प्रकाशात मला कुरुंदकर समजावून घ्यावेसे वाटतात, माझ्यातील अंधाराला उलगडून बघावंसं वाटतं....
मला आजकाल अनेक तरुण मित्र ‘आम्हाला लिहावंसं वाटतं, काय लिहू?’ असं विचारतात. पूर्वी मी कौतुकानं विषय सुचवायचो. आता सांगतो - जी चूक आम्ही केली, ती करू नका; लेखन सुरू करण्यापूर्वी अगोदर किमान तीन वर्षं मराठी-इंग्रजीतील आवडीच्या विषयांवरचं खूप वाचून घ्या. मगच लेखन सुरू करा.
कदाचित अनेकांना हे चुकीचं वाटेल. अभिव्यक्त होणं या गोष्टीचं महत्त्व ते मला सांगतील, पण खरं सांगतो- खूप लिहिल्यानंतर आता एक पोकळपणा तीव्रतेनं जाणवतो आहे. कुरुंदकरांकडे पाहिल्यावर तर स्वतःचं खुजेपण अधिकच तीव्रतेनं जाणवतं. ५० वर्षांच्या आयुष्यात उंच झेप घेऊन अंतर्धान पावणारे कुरुंदकर आणि ५० वर्षं जगूनही जमिनीवरच, मातीत खेळणारा मी, हे अंतर बोचत राहतं.
काही जण म्हणतील सामाजिक कार्यकर्ता असेल तर व्यासंगाची थोडीशी सूट असायला हरकत नाही. पण माझ्यापुढे काल मार्क्सचं उदाहरण आहे, आपल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शरद जोशी यांचं उदाहरण आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून आंबेडकर किंवा जोशी यांनी लढे दिले, पण तत्पूर्वी त्यांनी संबंधित विषयाचा सांगोपांग अभ्यास केला. आंबेडकरांनी जातिव्यवस्थेची खोलवर चिकित्सा केली आणि शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची अत्यंत मूलगामी मांडणी केली. म्हणून त्यांनी हाती घेतलेले विषय निर्णायक वळणापर्यंत गेले. चळवळी करताना ऊर्जास्त्रोत असणाऱ्या व्यक्तीची बॅटरी जितकी जास्त, तितका त्याचा प्रकाश अनुयायांना दूरवर दिसायला लागतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनाही व्यासंगाची पूर्वअट पाहिजे, असं मला या वळणावर वाटतं.
कधी कधी वाटतं आयुष्यात उपेक्षेचा कालावधी मोठा असला पाहिजे. त्यात तुमच्या क्षमता जास्त उजळून निघतात. अनेक वर्षं वाचन-संशोधन करून नंतर व्यक्त होण्याची पूर्वीच्या काळी पद्धत होती, तीच योग्य होती. माझ्या नंतरची पिढी तर थेट सोशल मीडियावरच लेखनाचा जन्म झालेली आहे. ती लाईक, कमेंट, शेअर या मोहजालात लवकर सापडते. जितकं कमी शब्दांत लिहाल, तितकं जास्त वाचलं जातं, याच निकषावर जर ते लिहीत राहिले तर मूळ विषयाचं वाचन व दीर्घलेखन न होण्याचा धोका संभवतो. तेव्हा शाळा-महाविद्यालयं यांच्यासारख्या ‘लेखन आणि संशोधन’ यांचं नातं असणाऱ्या इयत्ता निर्माण करायला हव्यात का, असा अतिरेकी वाटणारा विचार मनात येऊन जातो ...
कुरुंदकरांची प्रेरणा किमान उरलेल्या आयुष्यात तरी व्यासंगाची साथ द्यायला लागो, अशा आज मीच मला शुभेच्छा देतो!
.............................................................................................................................................
लेखक हेरंब कुलकर्णी शिक्षणतज्ज्ञ आहेत.
herambkulkarni1971@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vividh Vachak
Fri , 17 July 2020
उत्तम लेख.
Gamma Pailvan
Thu , 16 July 2020
हेरंब कुलकर्णी,
विचारवंतांच्या व्यथेवर अगदी नेमकं बोट ठेवलंत पहा.
प्रत्येक क्षेत्रास इतिहास असतो. तुम्ही ज्याला व्यासंग करणे म्हणता ते म्हणजे ' संबंधित क्षेत्राच्या इतिहासाचा अभ्यास करून त्यातनं तात्त्विक चौकट उत्पन्न करणे' होय. अगदी विज्ञान, तंत्रज्ञान, गणित या विषयांनाही इतिहास व तात्त्विक पार्श्वभूमी असते. मला वाटतं की आजचा मराठी विचारवंत ऐतिहासिक व तात्त्विक पार्श्वभूमी ध्यानी घेण्यात कमी पडतो आहे. त्याच्याकडे बुद्धिमत्तेची वानवा अजिबात नाही. गरज आहे ती वेधनाची ( = म्हणजे exposure ची ). यासाठी पाहिलं पाऊल म्हणून भारतीय दर्शनाचं अभ्यास असणं फायदेशीर ठरावं. दुसरं पाऊल म्हणजे जमल्यास आधुनिक विज्ञानाच्या एखाद्या शाखेची म्हणजे गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, अभियांत्रिकी, यापैकी एक वा अधिकांची तोंडओळख असवी. तिने पाया बराच पक्का होईल.
असो. विषयाचा आवाका बराच मोठा आहे. चर्चा व्हावी.
आपला नम्र,
गामा पैलवान