अजूनकाही
जॉन अॅलन पावलॅास या लेखकाने १९८८ साली ‘Innumeracy’ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. तो ‘Innumeracy’ हा शब्द ‘illiteracy’ला समांतर म्हणून वापरतो. त्याचं म्हणणं असं की, सामान्य माणूस शिकून साक्षर पटकन होतो, म्हणजे त्याला अक्षरं, शब्द आणि त्यांचे अर्थ चांगले समजतात. पण आकडे वाचता आले तरी आकड्यांचे अर्थ मात्र बहुतेकांना समजत नाहीत. आज कोविडच्या साथीच्या संदर्भात पावलॅासच्या म्हणण्याचा पावलोपावली प्रत्यय येतो आहे. सर्व प्रकारच्या माध्यमांतून आकडे नुसते फेकले जात आहेत आणि त्याचे अर्थ न कळल्यामुळेच सामान्य माणूस गोंधळलेला आणि धास्तावलेला आहे.
वास्तविक मोजमाप आणि आकडे विज्ञानात खूप महत्त्वाचे असतात. पण आकडेवारी हे दुधारी शस्त्र आहे. समजले तर फारच उपयुक्त, नाही समजले तर फक्त गोंधळ वाढवणारेच नाही, तर पूर्णपणे चुकीच्या मार्गाला लावणारेसुद्धा. वास्तविक आकडे समजण्यासाठी जे ज्ञान लागतं ते आपण शाळेतच शिकतो. त्यापेक्षा फार जास्त गणित शिकण्याची गरज नसते.
आकड्यांना काही सांगायचं असतं आणि ते आपण खुल्या मनाने ऐकलं तर सहज ऐकू येतं. पण हे खुलं मन दुर्मीळ आहे. आकडेवारी वापरणाऱ्या बहुतेकांनी आकडे पाहण्याच्या आधीच स्वतःचं मत बनवलेलं असतं किंवा कुठला निष्कर्ष काढला असता, स्वतःचा फायदा आहे ते आधीच ठरवलेलं असतं. आणि मग आकड्यांना स्वतःला काय सांगायचंय ते न ऐकता आपल्या जे सांगायचंय ते आकड्यांमार्फत कसं वदवता येईल असं ते पाहत असतात.
कोविडच्या साथीचे आकडे स्वतः काय म्हणताहेत ते पाहूया. साथीच्या रोगाच्या प्रसाराचं गणित चक्रवाढ व्याजाच्या गणितासारखं असतं. आज नव्याने संसर्ग झालेली माणसं संसर्ग पसरवणाऱ्यांच्या मुद्दलात मिळवली जातात आणि संसर्ग आणखी पसरतो. मात्र मेल्यामुळे किंवा बरे झाल्यामुळे या मुद्दलात दुसरीकडे घटही होत असते. जर नव्याने संसर्ग होणाऱ्यांचं प्रमाण घट होणाऱ्यांच्या प्रमाणापेक्षा जास्ती असेल तरच साथ पसरते. पण जेव्हा पसरते तेव्हा दिवसेंदिवस रोग्यांची संख्या चक्रवाढीने वाढत असते.
आपण जेव्हा काही प्रतिबंधात्मक उपाय वापरतो, तेव्हा या चक्रवाढीच्या गणितातला व्याजाचा दर कमी होतो. म्हणजे रुग्णांचा आकडा वाढण्याचा दर कमी होतो. आकडा तरीही वाढत राहू शकतोच. मग आपण योजलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचा काही उपयोग झाला की नाही, हे आपण रोग पसरण्याचा दर कमी झाला की नाही यावरून ओळखायचं, रुग्णांच्या संख्येवरून नाही.
मार्चच्या मध्यापासून ते मेअखेरपर्यंत आपण लॅाकडाउन पाळला आणि एक जूनपासून बंधनं उठवायला सुरुवात केली. बंधनं उठवल्यावर रोग पुन्हा अधिक वेगाने पसरू लागला का? तर भारतामधल्या, महाराष्ट्रामधल्या आणि पुण्यामधल्या या आलेखांकडे पाहा.
दररोज किती नवे करोना पॉझिटिव्ह सापडले, त्याची पाच-पाच दिवसांची धावती सरासरी यात तारखेनुसार दिली आहे. फक्त त्यासाठी घातांक गणित किंवा लॅागॅरिदम वापरलं आहे. त्यामुळे ही सरासरीची आळी ज्या चढावाने वर चढते, तो चढाव रोग पसरण्याचा दर दाखवतो.
आपल्याला असं दिसेल की, लॉकडाउन उठल्यानंतर हा चढाव वाढलेला तर नाहीच, उलट भारताच्या आणि महाराष्ट्राच्या आलेखात तो कमीच झाला आहे, तर पुण्याच्या आलेखात तो थोडा कमी होऊन परत पहिल्याइतका झाला आहे. म्हणजे लॉकडाउन उठल्यावर रोग अधिक वेगाने पसरू लागला म्हणून आता रुग्णांचे आकडे वाढताहेत हे म्हणणं एकतर आकडे न समजण्याचं लक्षण आहे किंवा जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. अर्थातच परत लॉकडाउन लादण्याची भाषाही तितकीच तर्कदुष्ट आहे, हे सांगायला नकोच.
पण दुसरीकडे प्रत्यक्ष रुग्णांची संख्या वाढते आहे आणि त्यामुळे वैद्यकीय सेवांवर ताण येतो आहे, ही समस्याही खरीच आहे. या प्रश्नाच्या संदर्भात साथीच्या संसर्गाचा दर महत्त्वाचा नसून प्रत्यक्ष रुग्णसंख्या महत्त्वाची आहे. पण पुन्हा लॅाकडाउन लादण्याने हा प्रश्न सुटू शकत नाही. संसर्गाचा दर मारे कमी झाला तरी ही संख्या वाढणारच, आज ना उद्या रुग्णालये कमी पडणारच.
साथीच्या सुरुवातीला लॉकडाउन आणण्याचा हेतू हा होता की, एकदम मोठी साथ झेलायला आपल्या वैद्यकीय व्यवस्थेची तयारी नव्हती. ती करायला काही अवधी मिळायला हवा होता. लॉकडाउन फार काळ चालणं परवडण्यासारखंच नाही, कारण लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे. साथीच्या सुरुवातीपासून साथ काय वेगाने पसरू शकेल याची गणिते मांडली जात होती आणि ती प्रसिद्धही होत होती. या गणितांची दखल घेऊन वैद्यकीय सुविधा किती वाढवाव्या लागणार आहेत, ते ठरवून नियोजन करता आलं असतं.
प्रत्यक्षात या गणितांच्या होऱ्यापेक्षा कितीतरी कमी दराने संसर्ग वाढला आहे. आणि तरीही आता वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत असतील तर प्रशासनाला गणित समजत नाही, याचंच ते द्योतक आहे. पण परिस्थिती इतकी वाईट नाही, हेसुद्धा आपल्याला आकडेच सांगताहेत.
सर्व जगात कोविडमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण सातत्याने कमी होत आहे. अनेक देशांत मार्च आणि एप्रिलच्या सुरुवातीला संसर्ग झालेल्यांपैकी पाच, दहा किंवा अधिक टक्क्यांने लोक मरत होते. काही देशात १७ टक्के मृत्यूसुद्धा नोंदले गेले आहेत. पण एप्रिल मध्यापासून सगळीकडेच मृत्युदर कमी कमी होत गेल्याचं दिसून आलं आहे. ते प्रमाण आता दोन टक्क्यांवर आलं आहे. भारतात हा दर चार टक्क्यांच्या वर कधीच गेला नाही, पण तोही आता दोनच्या खाली आला आहे.
संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी होत नाही. जर लक्षणे दिसू लागली तर चाचणी करून घेण्याची शक्यता खूपच वाढते. त्यामुळे संसर्ग झालेल्या पण चाचणी न झालेल्या बहुतेक व्यक्ती लक्षणं न दाखवणाऱ्या असतात. हे सर्वच देशांमध्ये कमी-अधिक प्रमाणात खरं आहे. याचा हिशेब विचारात घेऊन काळजीपूर्वक मृत्यूदर काढणारे अभ्यासही आता प्रसिद्ध झाले आहेत.
‘नेचर’ साप्ताहिकातल्या एका शोधनिबंधाने अशा अनेक अभ्यासांना एकत्र करून प्रत्यक्षात मृत्युदर ०.५ ते १ टक्के एवढाच आहे असा निष्कर्ष काढला होता. भारतात चाचणी न झालेले कोविड पॉझिटिव्ह किती असतील, हे नक्की सांगता येत नाही. पण त्यांचा समावेश केला तर भारतातला मृत्युदर ०.५ टक्क्यांहूनही बराच कमी निघू शकतो.
म्हणजे कोविडची घातकता आधी वाटलं होतं, त्याच्या एक दशांश एवढीच आहे. म्हणजे फार काळजी करण्याचं कारण नाही. मात्र काळजी घेण्यात हयगय करावी असा याचा अर्थ नाही. आधी वाटलं त्यापेक्षा कमी घातक असला तरी हा दुर्लक्ष करण्याचा विषय नाही. वैद्यकशास्त्राचं एक तत्त्व असं आहे की, प्रत्येक रोगाचा मुकाबला केलाच पाहिजे. मग रोगी चार असोत वा चार हजार, तरुण असोत वा वृद्ध, गरीब असोत वा श्रीमंत.
पण आपण आकड्यांचे खरे अर्थ ओळखत असलो तर त्याप्रमाणे धोरणं बदलायला हवीत. घरात बिबट्या घुसला तर करण्याचे उपाय वेगळे असतात आणि ढेकूण झाले तर करण्याचे वेगळे असतात, एवढा तरी विवेक असायलाच हवा.
..................................................................................................................................................................
लेखक मिलिंद वाटवे जीवशास्त्राचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
वरील लेख त्यांच्या ब्लॉगवरून पूर्वपरवानगीसह साभार.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 15 July 2020
नमस्कार मिलिंद वाटवे!
प्रथमत: उद्बोधक लेखाबद्दल धन्यवाद! करोनाचं थोतांड माजवण्यात मोठ्या प्रमाणावर प्रसारमाध्यमांचा हात आहे. तसंच सरकारकडून निश्चित खुलासा होत नाही. मुद्दाम घबराट पसरवली जातेय की काय अशी शंका येते. सरकारला करोनावर उपाय काढण्यापेक्षा टाळेबंदी लादण्यात अधिक रस आहे.
या निराशाजनक पार्श्वभूमीवर तुमचे दोन लेख दीपस्तंभासारखे आश्वासक आहेत.
अंगात करोना सापडलेल्या प्रत्येकास उपचारासाठी व/वा विलगीकरणात अडकवून ठेवल्याने आरोग्यव्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे रुग्णालये ही करोनाची लागण करणारी केंद्रे बनली आहेत. परिणामी ज्यांची स्थिती गंभीर झालीये अशांना उपचार मिळंत नाहीयेत व ते मरताहेत. यासंबंधी मी इथे थोडं विवेचन केलं आहे : https://www.misalpav.com/comment/1073793#comment-1073793
मात्र आता योग्य उपचारांचे बाबतीत हळूहळू जाग येते आहे. करोनामुळे हृदयविकार बळावतो असा निष्कर्ष मुंबईच्या केईएम रुग्णालयात अभ्यास करून काढला आहे. संबंधित बातम्या :
१. https://www.esakal.com/mumbai/these-type-covid-patients-has-more-risk-heart-attack-320319
२. https://www.lokmat.com/mumbai/coronavirus-news-corona-patients-risk-blood-clots-study-experts-kem-hospital-a309/
लेखाबद्दल पुनश्च धन्यवाद!
आपला नम्र,
-गामा पैलवान