अजूनकाही
गुजरातमधील पत्रकार नगीनदास संघवी यांचं काल (१२ जुलै २०२०) निधन झालं. ते १०१ वर्षांचे होते. रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी नगीनदास यांनी वयाची १०० वर्षं पूर्ण केली, तेव्हा म्हणजे ५ मार्च २०२० रोजी त्यांच्यावर एक छोटासा लेख लिहिला होता. त्याचा हा अनुवाद…
..................................................................................................................................................................
शतकमहोत्सवी वर्षांत पर्दापण केलेले गुजराती पत्रकार नगीनदास संघवी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! आपल्यातला एक पत्रकार वयाचं शतक पूर्ण करतो, याचा खरं तर डांगोरा पिटायला हवा, उत्सव साजरा करायला हवा. त्यांच्या पुस्तकांवर बोललं जायला हवं. मला आशा आहे की, गुजरातच्या हवेत याचा सुगंध पसरेल की, नगीनदास संघवी १० मार्च रोजी शतक पार करत आहेत.
संघवीसाहेब वयाच्या १९व्या वर्षांपासून पत्रकारिता करत आहेत. त्यांचा पहिला लेख गुजरातमधील लोकप्रिय साप्ताहिक ‘चित्रलेखा’मध्ये छापून आला होता आणि त्यांचा नुकताच प्रकाशित झालेला लेख नागरिकता कायद्याविषयी आहे. त्यात त्यांनी लिहिलंय की, ‘आम्ही भारतात १०० वर्षांपासून राहतोय पण आमच्याकडेसुद्धा कुठलेही कागदोपत्री पुरावे नाहीत.’ ३ मार्च रोजी त्यांनी ११ लाख रुपयांची थैली नाकारली. ही रक्कम दुसऱ्या कुणा लेखकाला मिळायला हवी, असं त्यासाठी त्यांनी कारण दिलं. मुरारीबापू त्यांना सन्मानित करू इच्छित होते.
१००व्या वर्षांतही संघवीसाहेब तंदुरुस्त आहेत. त्यांना कुठलाही गंभीर आजार नाही. त्यांचा जन्म १९१९मधला, गुजरातमधल्या भावनगर जिल्ह्यातल्या भुंभली गावचा. मुंबईत विमा कंपनीत त्यांनी काम केलं. त्यानंतर राज्यशास्त्र हा विषय मुंबईच्याच मिठीबाई महाविद्यालयात सलग ३२ वर्षं शिकवला. तिथूनच निवृत्त झाले.
गेल्या ५० वर्षांत संघवीसाहेबांची लेखणी एक दिवसही थांबली नाही. त्यांनी संपादकाला कधीही सांगितलं नाही की, आज मला लेखन करता येणार नाही. दर आठवड्याला ५००० शब्दांचा मजकूर संघवीसाहेब स्वत:च्या हातानं टाइप करत. त्यांची चार सदरं चालू आहेत. ‘चित्रलेखा’शिवाय दै. ‘दिव्य भास्कर’मध्ये त्यांचं दर बुधवारी ‘कलश पूर्ती’ हे सदर असतं. रविवारी ‘तड़ ने तड़’ या नावानं सदर असतं. या सदरातील लेखांची अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.
त्यांची चार पुस्तकं इंग्रजीतही आहेत.
१. Gujarat : a political analysis,
२. Gandhi : the agony of arrival,
३. Gujarat at cross roads,
४. A brief history of yoga.
अमेरिकेचा इतिहास आणि राजकारण यांवरील नऊ पुस्तकांचा त्यांनी गुजरातीमध्ये अनुवाद केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासावरही त्यांनी एक पुस्तक लिहिलंय. देश आणि जग यांच्याविषयी त्यांनी ३० पुस्तिका लिहिल्या आहेत.
संघवीसाहेबांनी नेहमीच वंचितांची तरफदारी केलीय. सेक्युलर मूल्यांचा पुरस्कार केलाय. निर्भीडपणे लिहिलंय. २६ जून २०१९च्या लेखात ते लिहितात – “राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रभक्ती यांबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे.” हेही सत्य आहे की, त्यांना मोदी सरकारच्या कार्यकाळातच पद्मश्री मिळालीय. पण संघवीसाहेबांची लेखणी कुठे कुणापुढे झुकते!
गुजरातमध्ये एक परंपरा पाहायला मिळते. कांतीभाई भट यांच्या लेखन आणि लोकप्रियतेतून हे दिसलं की, लेखक-पत्रकार समाज आणि सत्तेचे कठोर टीकाकार असतात. हे विधान मी सामान्यपणे आणि सर्वांसाठी करत नाहीये. पण ज्या नेत्यांवर टीका केली जाते, तेसुद्धा ही गोष्ट लक्षात घेतात की, त्यांचा ‘मतदार’ हा ‘वाचक’ही आहे. आणि ‘वाचक’ कधी आपल्या ‘लेखका’चा अपमान सहन करत नाहीत.
माझ्यापर्यंत संघवीसाहेबांची माहिती ज्यांनी पोहचवलीय त्यांचे आभार. त्यासाठी त्यांनी संघवीसाहेबांच्या एका ऑनलाईन नियतकालिकात प्रकाशित झालेल्या लेखाचा हिंदी अनुवाद केलाय. त्यामुळे हिंदी वाचकही त्यांचं लेखन वाचू शकणार आहेत. त्यात संघवीसाहेबांच्या लेखाविषयी म्हटलंय की, ‘भावों से भरपूर और अंगत स्पर्श वाले लेख कभी देखने को नहीं मिलते, वे हमेशा तर्कबद्ध, सजावट मुक्त लेख लिखते है।’ त्यांचं बौद्धिक धैर्य आणि मौलिक चिंतन ‘रामायण नी रामायण’ या लेखमालेत पाहायला मिळतं. त्यांनी म्हटलंय की, १३ जानेवारी ते २४ फेब्रुवारी १९८५ दरम्यान मुंबईतील ‘समकालीन’ या दैनिकात लिहिलेल्या या लेखमालिकेचा उद्देश वाल्मिकी रामायणाच्या मूळकथेमागचं सत्य संदर्भांसह वाचकांसमोर मांडणं हा होता. बुवाबाबा आपलं पोट भरण्यासाठी धर्माआडून जे भ्रम पसरवतात, ते दूर करणं हाही त्यामागे एक हेतू होता. या लेखाला खूप विरोध झाला. जेव्हा दैनिकाच्या संपादकानं त्यांना प्रत्युत्तर देण्याची संधी नाकारली, तेव्हा त्यांनी त्याचं पुस्तक छापलं, ‘रामायण नी अंतर यात्रा’ या नावानं. ‘रिडल्स ऑफ राम’ या डॉ. आंबेडकर यांच्या पुस्तकाची आठवण करून देणाऱ्या या पुस्तकात प्रत्येक पानावर संघवीसाहेबांचं चिंतन दिसतं.
२०१९मध्ये ‘पद्मश्री’ पुरस्कारानं सन्मानित झालेल्या संघवीसाहेबांना गुजरातचे लोक ‘नगीनबापा’ आणि ‘बापा’ म्हणतात. कांतीभाई भट यांच्यानंतरचं नगीनबापा गुजराती पत्रकारितेतलं एक अदभुत उदाहरण आहे.
हा मजकूर टाइप करताना मला स्वत:लाच सन्मानित झाल्यासारखं वाटतंय. आपल्या पत्रकारितेला त्यांचा आशीर्वाद मिळो. सर्व पत्रकारांना या गोष्टीचा गौरव वाटायला हवा की, त्यांच्यामध्ये असा एक पत्रकार आहे ज्यानं शतकमहोत्सवी वर्षांत पदार्पण केलंय.
ज्या दिवसांत मला गोळ्या घालून मारण्याची धमकी दिली जातेय, त्या काळात नगीनबापांच्या शतकमहोत्साविषयी लिहिताना वाटतंय की, त्यांची १०० वर्षं मलाही मिळालीत! त्यामुळे मला गुजरातविषयी आस्था वाटते.
खूप दिवसांनंतर कुणाच्या तरी पायाला स्पर्श करावासा वाटतोय.
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment