माय लॉर्ड, पोलीस, गोळीबार, एनकाऊंटर ही सारी ओरड अगदीच निराधार आहे. माध्यमांच्या कल्पनेचा तो खेळ आहे.
सदर - वास्तव-अवास्तव
संजय
  • प्रातिनिधिक चित्र
  • Mon , 13 July 2020
  • सदर वास्तव-अवास्तव विकास दुबे Vikas Dubey एनकाऊंटर Encounter पोलीस Police

म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं साप्ताहिक सदर...

..................................................................................................................................................................

कोर्टाचं दालन गच्च भरलं होतं.

पहिली वकिलांची रांग, मागली पत्रकारांची रांग, त्या मागं बघे. सगळी माणसं चुळबूळ करत होती.  कोर्ट १० वाजता सुरू होणार होतं आणि साडेअकरा झाले तरी न्यायमूर्तींचा पत्ता नव्हता.

दालनाबाहेर हालचाल झाली. माणसं शांत झाली.

पांढरा डगला आणि डोक्यावर लाल टोपी असलेले कोर्टाचे दोन शिपाई दालनात शिरले. एकाच्या हातात वाराणसीच्या काठावर आरतीत वापरतात, तसा पेटलेल्या साताठ वातींचा कंपोझीट दिवा होता आणि दुसऱ्या हातात एक मोठ्ठी घंटा होती. दुसऱ्याच्या हातात एक ताट होतं, त्यात कुंकू, कापूर, उदबत्त्या इत्यादी सामान होतं.

दिवेवाल्या शिपायानं दालनातल्या लोकांच्या दिशेनं दिवा धरला आणि आरतीत फिरवतात तसा गरगर फिरवला. हातातली घंटा घणघण वाजवली. दुसरा शिपाई न्यायमूर्ती बसतात त्या मंचावर चढला, न्यायमूर्तींच्या खुर्चीला आणि टेबलाला हळद-कुंकू लावलं आणि पेटलेली उदबत्ती गोलगोल फिरवली. दिवा दालनात फिरला, जमलेल्या लोकांनी दिव्यावरून हात फिरवले.

विधी पार पडला, शिपाई दालनाबाहेर निघून गेले.

काही क्षणात घोषणा झाली, “न्यायाधीश महाराज येत आहेत. सर्वांनी उभं रहावं.”

माणसं उभी राहिली.

दालनात एक गलेलठ्ठ अस्वल डुलत डुलत आलं. नखांनी डोकं खाजवत ते शांतपणे मंचावर चढलं आणि खुर्चीवर बसलं.

दालनातले वकील, पत्रकार, बघ्ये, खुर्च्यांवर बसले.

न्यायमूर्तींनी पंजानं पाठ खाजवली. केसात खोलवर अडकलेला एक कीटक काढला, समोर फेकला. मंचाच्या तळाशी बसलेल्या कोर्ट कर्मचाऱ्याच्या अंगावर तो पडला. त्यानं तो चिमटीत पकडला, जमिनीवर बुटाच्या तळव्यानं चिरडला.

“माय लॉर्ड, एक तातडीचं पीआयएल बोर्डावर आहे.” कोर्ट कर्मचारी म्हणाला.

न्यायमूर्ती ‘हुं’ म्हणाले.

पीआयएल सादर करणारे वकील उभे राहिले. “माय लॉर्ड, काल सकाळी आधीच ताब्यात असलेल्या दुबे या व्यक्तीला पोलिसांनी गोळ्या घालून ठार मारलंय. पोलिसांचं हे कृत्य घटनेच्या १९८०, १७९९, १६३२ या कलमांचा भंग करणारं असल्यानं पोलिसांच्या वर्तनाची चौकशी करावी, अशी माझी एक नागरीक म्हणून प्रार्थना आहे.”

सरकारी वकील उभे राहिले.

“माय लॉर्ड, पीआयएल वकिलांचं सांगणं वस्तुस्थितीला धरून नाही. दुबेला पोलिसांनी गोळ्या घातलेल्या नाहीत. दुबे उलट्या होऊन मेला.”

सरकारी वकिलांनी एक फाईल न्यायालयाला सादर केली.

“माय लॉर्ड, कानपूरच्या सिविल सर्जनचा पोस्ट मॉर्टेम अहवाल सोबत जोडला आहे. त्यावरून असं दिसून येतं की, आदल्या रात्री दुबेनं कसलं तरी मांस खाल्लं होतं, त्याची बाधा त्याला झाली होती.” सरकारी वकील.

“माय लॉर्ड, उलट्या झाल्या की नाहीत ते माहीत नाही, पण त्याच्या छातीत चार आणि पाठीत एक गोळी होती त्याचं काय?” पीआयएल वकिलांनी विचारलं.

न्यायमूर्तीनी पंजा वर करून सरकारी वकिलाला बोलायला सांगितलं. 

“माय लॉर्ड, माझ्या सुशिक्षित वकील मित्रांनी सिविल सर्जनचा अहवाल काळजीपूर्व पाहावा. त्यात दुबेच्या शरीरावर गोळ्यांच्या जखमा असल्याचं कुठंही म्हटलेलं नाही.” सरकारी वकील.

“माय लॉर्ड, ही घटना प्रत्यक्ष पाहिलेल्यांचं म्हणणं आहे की, त्यांनी गोळीबाराचे आवाज ऐकले आहेत.” पीआयएल वकील.

न्यायमूर्तींनी सरकारी वकिलांकडं पाहिलं.

“माय लॉर्ड, त्या वेळी आकाशात ढगांचा गडगडाट होता, गोळीबाराचे आवाज ऐकू येणं शक्यच नाही. दुसरं म्हणजे त्या वेळी तिथं असलेल्या पोलिसांच्या पिस्तुलांत गोळ्याच नव्हत्या. एनकाऊंटर करतात असा आरोप होत असल्यानं मुख्यमंत्र्यांनी पोलिसांकडल्या गोळ्याच काढून घेतल्या आहेत.” सरकारी वकील.

वकिलांनी माना हलवत सरकारी वकिलांच्या युक्तीवादाचं कौतुक केलं.

पीआयएल वकील गप्प झाले.

“माय लॉर्ड, संबंधित दुबे हे एक समाजसेवक होते. त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या माध्यमांतून समाजाची गेली वीसेक वर्षं सेवा केली होती. ‘देशद्रोही’ विरोधी पक्ष आणि माध्यमं दुबेंविरोधात विषारी मोहीम चालवून त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न करत होते. दुबे उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारच्या गृहखात्याचे सल्लागार होते. उत्तर प्रदेशात वाढत चाललेली गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी आणि पोलीस खात्यात सुधारणा करण्यासाठी नेमलेल्या समितीच्या अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक झाली होती आणि त्याच कामासाठी ते उज्जैनला गेले होते. तिथून ते परतत असताना वाटेत त्यांनी धाब्यावर खाल्लं, त्यांना विषबाधा झाली. कानपूरला परतेपर्यंत वाटेत त्यांना सतत उलट्या होत होत्या. म्हणूनच त्यांची गाडी वाटेत सतत थांबत होती. एका ठिकाणी ते खाली उतरले. एकीकडं त्यांना उलटी होत होती आणि दुसरीकडं त्यांची गाडीही उलटी झाली. या खटाटोपात त्यांना कानपूरला परतायला उशीर झाला आणि त्यांचं वाटेतच प्राणोत्क्रमण झालं. माय लॉर्ड, पोलीस, गोळीबार, एनकाऊंटर ही सारी ओरड अगदीच निराधार आहे. माध्यमांच्या कल्पनेचा तो खेळ आहे. आपण पीआयएल नामंजूर करावं.” सरकारी वकील.

न्यायाधीश शांत होते. त्यांच्या तोंडाची रचनाच अशी होती की, ते हसत आहेत की गंभीर आहेत, तेच कळत नव्हतं.

न्यायाधिशांनी पीआयएल वकिलाकडं पाहिलं.

“माय लॉर्ड, सरकारी वकील काय म्हणत आहेत ते मला कळत नाहीये. मी वर्तमानपत्रांची कात्रणं जोडली आहेत. त्यावरून लक्षात येईल की, दुबे हे सार्वजनिक कार्यकर्ते वगैरे नव्हते, ते गुन्हेगार होते. त्यांच्यावर २१ केसेस होत्या. त्यांचे पुढाऱ्यांशी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संबंध होते, लागेबांधे होते. दुबे काही पुढाऱ्यांना अडचणीत आणत असल्यानं त्यांना मारण्यात आलंय असं वर्तमानपत्रं  लिहीत आहेत...” पीआयएल वकील.

पीआयएल वकिलांना मध्येच अडवून सरकारी वकील म्हणाले, “माय लॉर्ड, दुबे यांच्यावर खटले आहेत हे खरं आहे, पण त्यांच्यावर एकही आरोप सिद्ध झालेला नसताना त्यांना गुन्हेगार ठरवणं अन्यायकारक आहे. आज देशाचे माननीय गृहमंत्री यांच्यावरही त्यांनी एनकाऊंटर केल्याचे आरोप झाले, त्यांना तीन महिने तुरुंगात राहावं लागलं आणि दोन वर्षं गुजरातमधून हद्दपार करण्यात आलं. परंतू त्यांच्यावर कोणतेच आरोप सिद्ध झाले नाहीत आणि ते आज देशाचे गृहमंत्री आहेत. भारतामध्ये विरोधी पक्ष देशभक्तांना कसं छळत असतात त्याचं माननीय गृहमंत्री हे एक उत्तम उदाहरण आहे. आणि नेमकं तेच दुबे यांच्याबाबतीत घडत आहे. माननीय न्यायमूर्तींनी हे सारं लक्षात घेऊन पीआयएल खारीज करावं असा माझा आग्रह आहे.”

कोर्टात टाळ्यांचा कडकडाट झाला. वकील वर्ग तर इतका हर्षभरीत झाला होता की, त्यांनी टेबलावर चढून ‘भारत माता की जय’ अशा घोषणा दिल्या.

न्यायमूर्तींनी पंजा वर करून उपस्थितांना शांत व्हायला सांगितलं.

वकील वर्ग टेबलांवरून खाली उतरला. पत्रकार आणि प्रेक्षक खुर्च्यांवर बसले. सर्वांचं लक्ष न्यायमूर्ती काय निकाल देतात यावर लागलं.

न्यायमूर्ती खुर्चीवरून उठले. मंचावर दोन फेऱ्या घातल्या. फेऱ्या घालताना दोन्ही पंजांनी एकदा पाठ खाजवली, एकदा पोट खाजवलं. केसात एकादा कीटक वगैरे शिल्लक नाहीये ना, अशी शंका कोर्ट कर्मचाऱ्यांना आली. त्यांना चिंता वाटली.

न्यायाधीश खुर्चीवर बसले. त्यांना पेन हातात धरणं जमत नव्हतं. त्यांनी निकाल तोंडी सांगायला सुरुवात केली. ते काय बोलत होते ते वकील आणि प्रेक्षकांना नीटसं कळत नव्हतं, त्यांना बोलणं गुरगुरीसारखं वाटलं. पण कोर्ट कर्मचाऱ्यांना मात्र ते कळत होतं.

“माझ्या समोरचा हा शेवटला खटला आहे. चार दिवसांनी मी निवृत्त होणार आहे. माझा हा शेवटला निकाल ऐतिहासिक ठरेल याची खात्री मला आहे. सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे आणि पीआयएल वकिलांचे दावे याचा मी काळजीपूर्वक अभ्यास केला. हा माझा अभ्यास जरी ३७ मिनिटांचा असला तरी त्यामागं माझ्या २७ वर्षांचा न्यायालयीन अनुभव आहे. गांधीजींच्या पवित्र भूमीत मी वकिली केली, हायकोर्टात न्यायाधीश झालो. या काळात मी देशातली राजकीय व्यवस्था आणि प्रशासन फार जवळून पाहिलं आहे. मी खात्रीनं सांगू शकतो की, या देशातली पोलिटिकल एस्टाब्लिशमेंट नेहमीच शहाणपणानं वागत आली आहे. पोलिटिकल एस्टाब्लिशमेंट आणि नोकरशाही दोन्ही भ्रष्टाचारविरहीत आहेत, असा माझा अनुभव आहे. वेळोवेळी काही राजकीय व्यक्ती आणि माध्यमं चुकीची आणि खोडसाळ माहिती पसरवून जनतेत गोंधळ उडवत असतात. माझं असं मत झालं आहे की, सरकारनं अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कायद्याचा पुनर्विचार करावा. खोडसाळ माहिती पसरवणारी माणसं, मग ती कुणीही असोत, राजकारणातली की माध्यमांतली, त्यांना अजामीनपात्र अटक करून दहा वर्षांपर्यंत खटल्याशिवाय तुरुंगात ठेवण्याची तरतूद करावी, कारण अशा रीतीनं सरकारला काम करू न देणं हा देशद्रोहच आहे. दुबे यांचा मृत्यू नैसर्गिकरीत्याच झाला असून पोलिसांवर केलेले आरोप निराधार आहेत, पोलीस निर्दोष आहेत, असा निकाल देऊन मी पीआयएल खारीज करत आहे.”

कोर्टात पुन्हा उत्साहाची लाट उसळली. कोर्टात फटाके वाजले. दालनातून बाहेर पडणारा एक माणूस उत्साहानं सोबतच्या माणसाच्या कानात म्हणाला, “फटाक्यांची व्यवस्था आम्ही आधीच करून ठेवली होती. आम्हाला निकाल काय येणार हे माहीत होतं.”

कोर्ट रिकामं झालं. पण न्यायाधीश मात्र खुर्चीवर बसून होते. बुचकळ्यात पडलेले कोर्ट कर्मचारी न्यायाधीश महाराज बाहेर पडण्याची वाट पहात होते.

..................................................................................................................................................................

या सदरातील आधीचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/author_articles/

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......