कमल शेडगे : अक्षरांना ‘अक्षरश:’ जिवंत करणारा अक्षरशहा!
संकीर्ण - श्रद्धांजली
टीम अक्षरनामा
  • कमल शेडगे आणि त्यांच्या तीन पुस्तकांची मुखपृष्ठं
  • Sat , 11 July 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली कमल शेडगे Kamal Shedge

प्रसिद्ध चित्रकार कमल शेडगे यांचं ४ जुलै २०२० रोजी वयाच्या ८५व्या वर्षी मुंबईत निधन झालं. त्यांच्याविषयी…

..................................................................................................................................................................

अक्षरं, शब्द यांचा महिमा मराठीमध्ये तसा बराच जुना आहे. समर्थ रामदास यांनी अक्षर कसं काढावं, कसं असावं, याचा वस्तुपाठच ‘दासबोधा’त सांगितला आहे.

ब्राह्मणें बाळबोध अक्षर । घडसुनी करावें सुंदर ।

जें देखतांचि चतुर । समाधान पावती ॥ १ ॥

वाटोळें सरळें मोकळें । वोतलें मसीचें काळें ।

कुळकुळीत वळी चालिल्या ढाळें । मुक्तमाळा जैशा ॥ २ ॥

काया बहुत कष्टवावी । उत्कट कीर्ति उरवावी ।

चटक लाउनी सोडावी । कांहीं येक ॥ १३ ॥

नाना देसीचे बरु आणावे । घटी बारिक सरळे घ्यावे ।

नाना रंगाचे आणावे । नाना जिनसी ॥ १६ ॥

नाना जिनसी टांकतोडणी । नाना प्रकारें रेखाटणी ।

चित्रविचित्र करणी । सिसेंलोळ्या ॥ १७ ॥

हिंगुळ संग्रहीं असावे । वळले आळिते पाहोन घ्यावे ।

सोपें भिजौनी वाळवावे । संग्रह मसीचे ॥ १८

॥ तगटी इतिश्रया कराव्या । बंदरी फळ्या घोटाव्या ।

नाना चित्रीं चिताराव्या । उंच चित्रें ॥ १९ ॥ 

तर संत तुकाराम यांनी ‘शब्दां’ची थोरवी गायिली आहे.

“आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने

शब्दांचीच शस्त्रे यत्न करू

शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन

शब्द वाटू धन जन लोका

तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव

शब्देचि गौरव पुजा करू”

कमल शेडगे आयुष्यभर अक्षरं आणि शब्द जगले. म्हणूनच त्यांना ‘अक्षरांना ‘अक्षरश:’ जिवंत करणारा अक्षरशहा!’ असं म्हणावंसं वाटतं. एखादा माणूस असं आयुष्य ५०-५५ वर्षं जगू शकतो, यावर सहसा विश्वास बसणार नाही. पण ही खरी गोष्ट आहे. अनेकांनी मराठी वर्तमानपत्रांतलं मनोरंजनाच्या जाहिरातींचं पान पाहिलेलं असतं. कित्येक जण ते पाहून त्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कुठल्या नाटकाला वा कार्यक्रमाला जायचं हेही अनेक वर्षं ठरवलेलं असेल. वेगवेगळ्या नाटकांच्या, संगीत कार्यक्रमांच्या किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या जाहिरातींचे वेगवेगळ्या आकारांचे ते तुकडे जागा मिळेल तसे बसवलेले असले तरी प्रत्येक तुकडा चित्ताकर्षक असायचा. त्यामुळे ते संबंध पानही लक्षवेधी झालेलं असायचं. प्रत्येक जाहिरात वेगळी, तिची रचना वेगळी. खरं तर बहुतांश नावांचेच प्रकार. त्यातच विषय-आशयनुसार अक्षरांचे केलेले प्रयोग, क्वचित प्रसंगी त्याला चित्रांची दिलेली जोड, पण त्यातून ती अक्षरं जिवंत होत. अक्षरांना हे जिवंतपण देण्याचं, त्यातून आशय जिवंत करण्याचं काम अक्षरशहा कमल शेडगे करायचे.

नाटकांच्या जाहिराती

काशिनाथ घाणेकरांच्या हाउसफुल नाटकांचे, वसंत कानेटकरांच्या ऐतिहासिक नाटकांचे, तेंडुलकरांच्या वादग्रस्त नाटकांचे, खानोलकरांच्या भारदस्त नाटकांचे, जयवंत दळवींच्या मानवी संबंधांतील गुंतागुंतींच्या नाटकांचे, रत्नाकर मतकरी यांच्याही नाटकांचे दिवस संस्मरणीय करण्याचे, त्यांना कलात्मक साज देण्याचे काम शेडगे यांच्या अक्षरांनीच केले. या सगळ्या परस्परांहून भिन्न नाटकांचे स्वभाव, त्यांचा आशय आणि त्यांचा नेमकेपणा रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचे काम शेडगे यांच्या त्या छोट्या अक्षरात्मक जाहिरातींनी केले, असे म्हणण्यात कुठलीही अतिशयोक्ती होणार नाही.

शेडगे यांनी तसे कुठल्याही प्रकारचे कलाशिक्षण घेतलेले नाही. त्यांचे वडील ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या कलाविभागात काम करत होते. त्यांच्यामुळे त्यांच्याही तिथे चंचूप्रवेश झाला. तिथे त्यांना वाव मिळाला, त्यांच्यातली कला बहरली. टाइम्स समूहाच्या ‘फिल्मफेअर’, ‘धर्मयुग’, ‘माधुरी’, ‘फेमिना’ या नियतकालिकांचा लेआउट ते करायचे. पानांचा, त्यातील कॉलमचा आकार ठरलेला. त्यात लेखांची मांडणी करायची. पण त्यातही शेडगे विविध प्रयोग करायचे. तो कटिंग-पेस्टिंगचा जमाना. सगळं हातांनी करायचं आणि मग त्याचं पेस्टिंग. नंतर त्याचे ब्लॉक्स करणं वगैरे.

‘टाइम्स’मधून पुढे ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये आले. त्या दैनिकाच्या पुरवण्यांचे काम करू लागले. तिथेही नानाविध पुढे प्रयोग. स्वत:ही लिहिलं. त्यामुळेच पुढे जेव्हा ते नाटकांच्या जाहिराती करू लागले, तेव्हा ठरलेल्या आकारात काम करताना त्यांना कुठलीही अडचण आली नाही. त्यातही ते नानाविध कलात्मक प्रयोग करू लागले. १९६२ साली त्यांनी ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या वसंत कानेटकरांच्या नाटकाची पहिल्यांदा जाहिरात केली. त्यानंतर ‘गारंबीचा बापू’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘ती फुलराणी’, ‘काचेचा चंद्र’, ‘स्वामी’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘वस्त्रहरण’, ‘सखाराम बाइंडर’, ‘अवध्य’, ‘पुरुष’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘गरुडझेप’, ‘महाराणी पद्मिनी’, ‘इथे ओशाळला मृत्यु’, ‘बेइमान’, ‘अंधार माझा सोबती’, ‘लग्नाची बेडी’, ‘नटसम्राट’, ‘बॅरिस्टर’, ‘सूर्यास्त’, ‘शांतेचं कार्टं चालू आहे’, ‘गिधाडे’, ‘मृत्युंजय’, ‘शोभायात्रा’, ‘महासागर’, ‘ढोल-ताशे’ अशा कितीतरी नाटकांच्या जाहिराती शेडगे यांनी केल्या.

पाहता पाहता नाटकांच्या जाहिराती आणि कमल शेडगे हे समीकरण होऊन गेलं. त्यापुढच्या ५०-५५ वर्षांत त्यांनी कितीतरी नाटकांच्या जाहिराती केल्या. त्यातील किती नाटकं चालली, किती पडली, पडलेल्या नाटकांचे अपयश कुणी कुणी त्यांच्या माथी मारलं, चाललेल्या नाटकाच्या यशात कुणी कुणी त्यांचा उल्लेख केला, याचे नानाविध किस्से त्यांच्याकडे होते.

ठरलेल्या आकारात आणि त्यातही ठरलेल्या जागेत यांचा हिशोब केलेलं काम, यात कलेच्या आविष्कारापेक्षा क्राफ्टवर्कचाच भाग जास्त असतो. हे शेडगे यांनाही मान्य होतं. पण त्यातही प्रयोगशीलता, कलात्मकता आणि देखणेपणा आणता येतो, हे शेडगे यांनी सातत्यानं दाखवून दिलं.

दिवाळी अंकांची, दैनिकांची आणि चित्रपटांची नावे

‘दीपावली’, ‘अक्षर’, ‘माहेर’, ‘कथाश्री’ अशा अनेक दिवाळी अंकांची अक्षर शेडगे यांनी केली आहेत. ‘भिंतीवरी ‘कालनिर्णय’ असावे’ या एकाद्या परंपरेसारख्या झालेल्या नित्यक्रमातला मधला शब्द अनेकांच्या मनावर ठसतो, तो शेडगे यांनी तो केल्यामुळेच. ‘महाराष्ट्र टाइम्स’चा लोगोही त्यांनी केला होता. तो ३५ वर्षं कायम होता. दै. ‘सामना’चाही लोगो त्यांनी केलाय. त्याशिवाय त्यांनी अनेक हिंदी-मराठी चित्रपटांही शीर्षकं केली आहेत.

पुस्तकांची मुखपृष्ठे

पेटलेले दिवस – अनंत भालेराव, स्वामी (नाटक) – रणजित देसाई, अजून उजाडायचं आहे – माधव कोंडविलकर, मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी – सदा कऱ्हाडे, निरामय कामजीवन – डॉ. विठ्ठल प्रभू, तिरकस आणि चौकस – दि. पु. चित्रे, लेटेस्ट हेअरस्टाइल्स – माया परांजपे, चार्ली चॅप्लिन – रंगनाथ कुलकर्णी, महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ – अशोक चौसाळकर, पुरुष – जयंवत दळवी, सूर्यास्त - जयवंत दळवी, डॉक्टर तुम्हीसुद्धा – अजित दळवी अशा अनेक पुस्तकांची मुखपृष्ठेही शेडगे यांनी सजवली आहेत.

आपली ही कला लोकांपर्यंत जावी, त्यांना त्याची माहिती व्हावी यासाठी शेडगे यांनी आपल्या कामाची प्रदर्शनेही भरवली. अशाच एका प्रदर्शनाविषयी प्रसिद्ध अक्षररचनाकार र. कृ. जोशी यांनी भरभरून लिहिलं होतं. निसर्ग स्वभावधर्मच सौंदर्यवादी असतो. तसं अक्षरांचं शब्दांचं नसतं. कारण ते माध्यम असतं. त्याचा तुम्ही हवा तसा वापर करू शकता. त्यातून कलात्मक सौंदर्याचंही दर्शन घडवता येतं. कमल शेडगे यांनी ते आयुष्यभर घडवलं. नानाविध प्रकारांनी, नानाविध तऱ्हांनी, नानाविध शैलीत… कवी सुधीर मोघे यांची एक कविता आहे ना...

“शब्दांना नसते दु:ख

शब्दांना सुखही नसते

ते वाहतात जे ओझे

ते तुमचे माझे असते!”

अगदी तसंच.

शेडगे यांची पुस्तके

जानेवारी १९९५मध्ये शेडगे यांचं ‘माझी अक्षरगाथा’ हे पहिलं देखणं पुस्तक लोकवाङ्मय गृहाने प्रकाशित केलं. त्यामागे होते कविवर्य नारायण सुर्वे आणि लोकवाङमय गृहाचे प्रकाशक प्रकाश विश्वासराव. त्यात शेडगे यांचे छोटे खानी आठ-दहा लेख आहेत. शेडगे यांनी केलेली विविध डिझाइन्स, त्याबाबतचे त्यांचे अनुभव, टाइम्स व महाराष्ट्र टाइम्समधील दिवस यांविषयीचे हे पुस्तक आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी या पुस्तकाची मुक्तकंठाने स्तुती केली होती. मुखपृष्ठापासून देखणं झालेलं हे पुस्तक अतिशय प्रेक्षणीय आणि वाचनीय आहे.

त्यानंतर एप्रिल २००२मध्ये ‘चित्राक्षरं’ हे शेडगे यांचं दुसरं पुस्तक अक्षर प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं. या पुस्तकाचं पूर्ण शीर्षक आहे – ‘चित्राक्षरं – १९६६-२०००’. यात त्यांनी रंगभूमी, चित्रपट आणि इतर रंगमंचीय कार्यक्रम यांच्यासाठी केलेली निवडक डिझान्स आणि शीर्षकांचा समावेस आहे. या पुस्तकाला समीक्षक कमलाकर नाडकर्णी व दीपक घारे यांच्या प्रस्तावना आहेत. नाडकर्णी लिहितात – “कमलच्या अक्षरांनी नाटकांच्या जाहिरातीत एन्ट्री घेतली आणि नाटकाला अनपेक्षित वळण मिळालं. संपूर्ण नाटकाचा विषयच त्या अक्षरांतून डोकावून प्रेक्षकांना पाहू लागला. प्रेक्षकांचं पहिल्या घंटेअगोदरचं आकर्षण कमलची जाहिरात ठरलं. नाट्यसमीक्षकाने केलेल्या स्तुतीमुळे एखादं नाटक चालतं की नाही कुणास ठाऊक, पण कमलची अक्षरं नसतील तर प्रेक्षक त्या वाटेला जातच नाहीत ही वस्तुस्थिती आहे.”

तर दीपक घारे म्हणतात – “… मराठी नाटकांच्या जाहिरातींना स्वत:चा चेहरा कोणी दिला असेल तर तो मुख्यत: कमल शेडगे यांनी. आज नाटकाच्या रंगमंचीय आविष्काराइतकाच एकेका नाटकाच्या प्रतीकात्मक नामरचनेमुळे साकार झालेला दृश्य परिणाम मराठी नाट्यरसिकांच्या मनावर कोरला गेलेला आहे. ‘महाराणी पद्मिनी’, ‘पुरुष’, ‘नटसम्राट’, किंवा अलीकडची ‘रणांगण’, ‘ऑल दि बेस्ट’ अशी कितीतरी नावं सांगता येतील, की जी नावं उच्चारताच नाटकातील नटांपेक्षा जाहिरातीतील त्यांची शीर्षकं प्रथम डोळ्यांसमोर येतात. जाहिरातकलेच्या भाषेत बोलायचं तर, नाटकाच्या शीर्षकांना ही ब्रँड व्हॅल्यू दिली ती सर्वप्रथम कमल शेडगे यांनी.”

आपलं पहिलंच पुस्तक हे शेवटचं असणार असं वाटलेल्या शेडगे यांचं त्यानंतर अजून एक पुस्तक प्रकाशित झालं. त्याचं नाव – ‘कमलाक्षरं’. राजेंद्र प्रकाशनाने हे पुस्तक जून २००९मध्ये प्रकाशित केलं. शेडगे यांच्या पंचाहत्तरीनिमित्त प्रकाशित झालेलं हे पुस्तकही आधीच्या दोन्ही पुस्तकांसारखंच प्रेक्षणीय, वाचनीय आहे.

या पुस्तकाला नाटककार प्रशांत दळवी यांची छोटीशी प्रस्तावना आहे. त्यात ते म्हणतात – “मराठी रंगभूमीच्या क्षेत्रात तब्बल ४५ वर्षं ज्यांच्या अक्षरसाम्राज्यावरचा सूर्य अस्तास गेला नाही, अशी एकमेवाद्वितीय व्यक्ती म्हणजे अक्षरसम्राट कमल शेडगे! नेपथ्य हे नाटकाचं पहिलं स्टेटमेंट आहे असं म्हणतात. कारण पडदा उघडताक्षणीच ते नाटकाची शैली कोणती आहे याविषयी भाष्य करतं. पण आपल्या मराठी नाटकांच्या बाबतीत पडदा उघडण्यापूर्वीच हे भाष्य होतं. कारण आधी पेपरमधलं नाटकाचं पान उघडलं जातं, आणि त्या पानावरच्या प्रत्येक जाहिरातीतल्या शीर्षकलेखनातून आधी कमल शेडगे आपल्याशी त्या नाटकाविषयी बोलतात आणि मगच ते नाटक प्रेक्षकांशी संवाद साधतं. अर्थात कमल शेडगेंचं शीर्षकलेखन हे नवीन येणाऱ्या मराठी नाटकाचं पहिलं भाष्यकार ठरतं! नाटकाची नाडी जाणून घेऊन त्या-त्या नाटकाची प्रकृती सांगणारा, प्रेक्षक आणि मराठी नाटकामधला म्हणूनच हा मोठा ‘अक्षरदुवा’ ठरला आहे. नाटकाची ही नाडीपरीक्षा शेडगे कशी करतात, हे त्यांनी त्यांच्या या तिसऱ्या पुस्तकात अत्यंत मोजक्या पण मार्मिक शब्दात सांगितलं आहे.”

आता शेडगे नाहीत, पण त्यांची ही तीन पुस्तके आहेत. ती वरवर चाळली तरी त्यांच्या कामाचा आवाका अवाक करतो, करत राहील. 

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण विसावे - गेल्या दहा वर्षांत ‘लिबरल’ लोकांना एक आणि संघाच्या लोकांना एक, असे दोन धडे मिळाले आहेत. काँग्रेसला धर्माची आणि संघाला लोकशाहीची ताकद कळून चुकली आहे!

धर्म आणि आर्थिक आकांक्षा यांचा मेळ घालून मोदीजी सत्तेवर आले होते. धर्माचे विषय राममंदिर झाल्यावर मागे पडत चालले होते. आर्थिक आकांक्षा मात्र पूर्ण झाल्या नव्हत्या. त्या पूर्ण होण्याची शक्यताही नव्हती. मुसलमान लोकांच्या घरांवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश वगैरे राज्यात बुलडोझर चालवले जात होते. मुसलमान लोकांवर असे वर्चस्व गाजवायचे असेल, तर भाजपला मत द्या, असे संकेत द्यायचे प्रयत्न चालले होते. पण.......

तुम्ही दुसरा कॉम्रेड सीताराम येचुरी नाही बनवू शकत. मी त्यांना अत्यंत कठीण परिस्थितीतही कधी उमेद हरवून बसलेलं पाहिलं नाही. हे गुण आज दुर्लभ होत चालले आहेत

ज्याचा कामगार वर्गावरील विश्वास कधीही कमी झाला नाही, अशा नेत्याच्या रूपात त्यांचं स्मरण केलं जाईल. कष्टकरी मजुरांप्रती त्यांचं समर्पण अद्वितीय होतं. त्यांच्या राजकीय जीवनात खूप चढ-उतार आले, पण त्यांनी स्वतःची उमेद तर जागी ठेवलीच, पण सोबत आम्हा सर्वांनाही उभारी देत राहिले. त्यांनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या व्यापक समूहात त्यांची श्रद्धा असलेल्या विचारधारेप्रती असलेला विश्वास कायम जिवंत ठेवला.......

शिरोजीची बखर : प्रकरण अठरा - निकाल काहीही लागले, तरी या निवडणुकीच्या निमित्ताने दलितांमधील आत्मविश्वासामुळे ‘लोकशाही’ बळकट झाली, असे इतिहासकारांना म्हणता येणार होते...

...तीच गोष्ट आरक्षण रद्द केले जाईल की काय, या भीतीमुळे घडली होती. आरक्षण जाईल या भीतीने दलित पेटून उठले होते. या दुनियेत आर्थिक प्रगती करण्यासाठी तेवढी एकच गोष्ट दलितांपाशी होती. दलितांचे आंदोलन उभे राहण्याआधीच घटना बदलली जाणार नाही, असे आश्वासन मोदीजींनी दिले. राज्यघटनेविषयी दलित वर्ग अजून एका बाबतीत संवेदनशील होता. ती घटना बदलण्याचा विषय काढणे, हेदेखील दलित अस्मितेवर घाव घालण्यासारखे होते.......