‘देहाचिये गुंती’ : ‘कामप्रेरणे’कडे बघण्याची नवी दृष्टी देणारी आध्यात्मिक बाबाच्या जीवनावरील कादंबरी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
शौकत आतार
  • ‘देहाचिये गुंती’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 10 July 2020
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस अंजली सोमण Anjali Soman देहाचिये गुंती Dehachiye Gunti

माणसाच्या भूक आणि काम या आदिम व स्वाभाविक प्रेरणा. समाजातील प्रत्येक व्यक्तीवर संस्कार, परंपरा, आसपासचं वातावरण, जीवनानुभव, वाचन, मनन अशा अनेक गोष्टी प्रभाव टाकतात आणि त्या अनुषंगानं त्याचं व्यक्तिमत्त्व घडत जातं. त्याचबरोबर माणसाला दैनंदिन जीवन जगत असताना वेगवेगळ्या ताणतणावांना सामोरं जावं लागतं. मग ते कौटुंबिक, सामाजिक, लैंगिक अशा कुठल्याही प्रकारचे असू शकतात. त्यामुळे माणूस त्रस्त होऊन सुखाला पारका होतो. तो आपल्या समस्यांना मनामध्ये घेऊन अस्वस्थतेत जगतो. त्या वेळी कुठल्यातरी माध्यमातून तो गुरू-बाबांच्या संपर्कात येतो, त्यांच्याकडे आकर्षिला जातो.

..आणि मग त्याला आपल्या समस्येची सोडवणूक होणार, आपल्या जीवनातील दु:ख कमी होणार, आपण सुखी होणार अशी आशा निर्माण होते. तो एका विशिष्ट निष्ठेतून, श्रद्धापूर्वक अशा गुरूंचं ऐकत राहतो, त्यांचा अनुयायी बनून राहतो, त्यांच्यासाठी आपल्या आयुष्यातील काही वर्षे खर्ची घालतो. पण कालांतरानं गुरूच्या ‘कथनी और करनी’मधलं अंतर, त्यांच्या आश्रमातील पडद्यामागचं वास्तव, सहकाऱ्यांचे खून, कोकेनच्या ओव्हरडोसने झालेला गुरुजींचा मृत्यू इ. गोष्टी त्याच्या लक्षात येतात. तो ‘आपल्याला काय मिळाले?’ याची शहानिशा करतो. गुरूच्या व्यक्तिमत्त्वाचा तटस्थपणे आलेख मांडतो.

‘देहाचिये गुंती’ ही डॉ.अंजली सोमण यांची कादंबरी साधारणत: असा आशय मांडते.

या कादंबरीचा नायक परम हा मानवी मनाचं प्रगाढ ज्ञान, विलक्षण बुद्धिमत्ता, वाचन व चिंतनाच्या जोरावर आपल्या वाणीनं सगळ्यांना प्रभावित करण्याची क्षमता असलेला एक सर्वगुणसंपन्न तरुण. त्याचा प्राध्यापक ते आध्यात्मिक गुरूपर्यंतचा प्रवास या कादंबरीत रेखाटला आहे. तो स्वत: काही बोलत नाही; विद्या, प्रेमा, योगेश व क्रांती या चार पात्रांच्या माध्यमातून त्याची व्यक्तिरेखा स्पष्ट होत जाते.

त्यातील पहिली विद्या, ती परमच्या व्यक्तिमत्त्वानं प्रभावित होते. विशेषत: त्याच्या वाणीनं. त्यालाही विद्या आवडते. जेव्हा ती त्याला ‘तुला माझ्यातलं काय आवडलं?’ असे विचारते, तेव्हा तो म्हणतो, “विद्या, मानवी वर्तनाचं विश्लेषण करणं फार अवघड असतं. तू तेच करायला मला सांगते आहेस. एखादी भावना मनात जागी होते. ती का जागी झाली, हे सांगणं फार अवघड असतं. काही कारणं भूतकाळात रुजलेली असतात, काही वर्तमानात.” या आणि अशा अनेक वाक्यांवर, त्याच्या बोलण्यावर विद्या खूप प्रभावित होते आणि ते दोघं लग्न करतात. पण काही कालावधीनंतर परम तिला व छोट्या मुलाला सोडून निघून जातो.

नंतर त्याच्या आयुष्यात प्रेमा नावाची व्यक्ती येते, जी या कादंबरीतील दुसरं महत्त्वाचं पात्र. ती आपल्या वासनांध नवऱ्याला, सासरच्या संवेदनाहीन माणसांना, त्यांच्या बुरसटलेल्या परंपरांना कंटाळलेली असते. ती परमच्या संपर्कात येते. त्याचं शिबिरातील प्रवचन तिच्या कानी पडतं. तो सांगत असतो- “तुमचा आनंद तुमच्याच हातात असतो. पण तुम्हाला तो मिळत नाही. कारण तो तुमच्या अंतर्मनात असतो. माणूस कधीच अंतर्मुख होऊन स्वत:च्या सुखाचा शोध घेत नाही. स्वत:ला काय पाहिजे आहे, याचा विचार करत नाही. माणूस नावाचा प्राणी बहिर्मुखच. नेहमी इतरांविषयी बोलत असतो. इतरांच्या सुख-दु:खातच उड्या घेत असतो. स्वत:च्या सुखाचा कधी असा कसून शोध घेतो का? घेतला तरी चुकीच्या मार्गानं सुख शोधतो. त्याला वाटतं, सुख म्हणजे पैसा, सुख म्हणजे बंगला, गाडी. सुख म्हणजे रेडिओ ऐकणं, सिनेमा बघणं, परीक्षा देणं, त्यात चांगले मार्क्स मिळवणं. पण यानं खरं सुख लाभतं का? अजिबात नाही. हे खरं सुख नाहीच. हे रस्ते म्हणजे दु:खांवर झाकण टाकण्याचा प्रयत्न. यांनी दु:ख नाहीसं होत नाही. काही काळ नजरेआड होतं इतकच. वर घातलेल्या झाकणाला जरा फट पडली की, आतलं भळभळतं दु:ख उसळी घेऊन बाहेर येतंच.”

प्रेमा परमच्या प्रवचनाने प्रभावित होते. आपल्या नवऱ्याला व मुलाला सोडून परमसोबत पळून जाते. पुढे त्याचा आश्रम उभा करण्याची संपूर्ण जबाबदारी घेते. परमचा पुढे ‘परमानंद गुरुजी’ होतो. पण कालांतरानं परम सुनंदाला जवळ करतो. प्रेमाला दुय्यम स्थान देतो. तिला एकाकी पाडतो. शेवटी प्रेमा त्याला सोडून निघून जाते.

तिसरं पात्र योगेश, तो आपल्या डॉक्टर वडिलांच्या सतत धाकानं आत्मविश्वास हरवून बसलेला असतो. अशा परिस्थितीत तो परमानंदच्या संपर्कात येतो, त्याच्या शिबिरात सहभागी होतो. परमानंद गुरुजी म्हणत असतात, “सत्य आणि आभास यांच्यातील गोंधळ म्हणजे जीवन. या गोंधळात आपण अडकून पडलेलो असतो. मनात संभ्रम असतात. चूक काय आणि बरोबर काय याचा निर्णय घेता येत नसतो. असं फरफटत जाणं आणि पैसे मिळवण्यासाठी करावी लागणारी नित्यकर्म करणं म्हणजे आयुष्य…”

त्या प्रवचनाने योगेशच्या जीवनाला दिशा मिळते. पण आश्रमातील वास्तव गोष्टी योगेशला कळतात. तो भूतकाळात जाऊन त्यांचं विश्लेषण करत राहतो.

कादंबरीतील चौथं पात्र क्रांती, ती लहानपणी मामाच्या वासनेला बळी पडलेली असते... पुढे प्रियकर जितूच्या आत्महत्येमुळे डिप्रेशनमध्ये गेलेली असते. त्यामुळे निम्फोमॅनिअॅक, हायपर सेक्शूअल झालेली असते. ती परमानंद गुरुजींच्या संपर्कात येते. ते सांगत असतात, “तुमचं मन म्हणजे उत्साहानं उसळणारं एक कारंजं आहे. खरं नाही ना वाटत तुम्हाला हे? पण ते सत्य आहे. लहान मुलाकडे कधी बघितलंय तुम्ही? किती उत्साहात असतात. सतत खिदळत असतात. चेहऱ्यावर निरागस हास्य असतं. तुमचं मन या लहान मुलासारखंच होतं. पण ते काळवंडलं. का? तर तुमच्यासमोर प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांचं तुम्ही कोळ्यासारखं सुंदर जाळं निर्माण केलंत आणि त्यात स्वत:च अडकलात.”

ती योगेशसोबत लग्न करते व चार वर्षांत घटस्फोटही घेते.

या चार व्यक्तीरेखांच्या कथनातून परमचा प्राध्यापक ते आध्यात्मिक गुरूपर्यंतचा प्रवास स्पष्ट होत जातो. या चारही पात्रांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. ती वेगवेगळ्या कुटंबांतील, वेगवेगळ्या सामाजिक-मानसिक परिस्थितीत वाढलेली आणि वेगवेगळ्या समस्या असलेली आहेत.

अलीकडच्या काळात आध्यात्मिक बुवा-बाबांचं प्रस्थ वाढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर ही कादंबरी महत्त्वाची ठरते. अध्यात्माच्या नावाखाली गुरू-बाबांचं वाढतं प्रस्थ आणि लोकांची एका अर्थानं फसवणूक, हे समाज-वास्तव ही कादंबरी अधोरेखित करते.

प्रारंभीच ‘गुरुजींची हत्या का झाली?’ ही गोष्ट कादंबरीमध्ये कुतूहल वाढवते. कम्यून, तिथली शिस्त, तिथले लहानसहान संदर्भ, बारकाईनं केलेलं मनोविश्लेषण यामुळे कादंबरी गुंतवून ठेवते.

या कादंबरीत मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, समाजशास्त्र यातील खूप सारे संदर्भ आले आहेत. लेखिकेचा जीवनानुभव, वाचन, चिंतन, मननाचा परिचय देणारी ही कादंबरी एका ज्वलंत विषयाचं भान आणून देण्याचं काम करते.

कादंबरी फ्लॅशबॅक पद्धतीनं उलगडत जाते. प्रत्येक पात्राला सुरुवातीला परमच्या मृत्यूची बातमी कळते आणि मग ते पात्र भूतकाळातली परमबरोबरची आपली कथा सांगतं… त्यातून परमची व्यक्तिरेखा उलगडत जाते.

या कादंबरीमध्ये फ्राईडने सांगितलेल्या कामप्रेरणेचा मानवी जीवनावर होणारा परिणाम अत्यंत कलात्मकतेनं वास्तवादी पात्रांच्या माध्यमातून अभिव्यक्त झाला आहे. पात्रं आपल्या जीवनाविषयी, लैंगिकतेविषयी बोलतात.

आध्यात्मिक चिंतन, जीवनविषयक अनुभव, अनेक पुस्तकांचे संदर्भ, नातेसंबंधांचं मार्मिक विश्लेषण, पात्रांचं मनोविश्लेषण, पात्रानुकूल भाषा, शब्दनिवड, मानसशास्त्रीय संकल्पना असा विस्तृत पट असलेली ही कादंबरी प्रभावित तर करतेच, पण ‘कामप्रेरणे’कडेही बघण्याची नवी दृष्टी देते.

..................................................................................................................................................................

देहाचिये गुंती : डॉ. अंजली सोमण

कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे

पाने : ४३६, मूल्य : ४०० रुपये.

..................................................................................................................................................................

‘देहाचिये गुंती’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5208/Dehachiye-Gunti

..................................................................................................................................................................

लेखक प्रा.शौकत आतार हे नागठाणे येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयात अध्यापन करतात.

shaukatatar@gmail.com

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

ज्या तालिबानला हटवण्यासाठी अमेरिकेने अफगाणिस्तानात शिरकाव केला होता, अखेर त्यांच्याच हाती सत्ता सोपवून अमेरिकेला चालते व्हावे लागले…

अफगाण लोक पुराणमतवादी असले, तरी ते स्वातंत्र्याचे कट्टर भोक्ते आहेत. त्यांनी परकीयांची सत्ता कधीच सरळपणे मान्य केलेली नाही. जगज्जेत्या, सिकंदरालाही (अलेक्झांडर), अफगाणिस्तानवर संपूर्ण ताबा मिळवता आला नाही. तेथील पारंपरिक ‘जिरगा’ नावाच्या व्यवस्थेला त्याने जिथे विश्वासात घेतले, तिथेच सिकंदर शासन करू शकला. एकोणिसाव्या शतकात, संपूर्ण जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेला अफगाणिस्तानात नामुष्की सहन करावी लागली.......

‘धर्म, जात, देश, राष्ट्र’ या शब्दांचा गोंधळ जनमानसात रुजवून संघ देश, सत्ता आणि समाजजीवन यांच्या कसा केंद्रस्थानी आला, त्याच्याविषयीचे हे पुस्तक आहे

या पुस्तकाच्या निमित्ताने संघाची आणि आपली शक्तिस्थाने आणि मर्मस्थाने नीटपणे अभ्यासून, समजावून घेण्याचा प्रयत्न परिवर्तनवादी चळवळीत सुरू व्हावा ही इच्छा आहे. संघ आज अगदी ठामपणे या देशात केंद्रस्थानी सत्तेत आहे आणि केवळ केंद्रीय सत्ता नव्हे, तर समाजजीवनाच्या आणि सत्तेच्या प्रत्येक क्षेत्रात संघ आज केंद्रस्थानी उभा आहे. आपल्या असंख्य पारंब्या जमिनीत खोलवर घट्ट रोवून एखादा विशाल वटवृक्ष दिमाखात उभा असतो, तसा आज.......

‘रशिया : युरेशियन भूमी आणि संस्कृती’ : सांस्कृतिक अंगानं रशियाची प्राथमिक माहिती देणारं पुस्तक असं या लेखनाचं स्वरूप आहे. त्यामध्ये विश्लेषणावर फारसा भर नाही

आजपर्यंत मला रशिया, रशियन लोक, त्यांचं दैनंदिन जीवन आणि मनोधारणा याबाबत जे काही समजलं, ते या पुस्तकाच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावं, असा एक उद्देश आहे. पण त्यापलीकडे जाऊन हे पुस्तक रशिया समजून घेण्यात रस असलेल्या कोणाही मराठी वाचकास उपयुक्त व्हावा, अशीही इच्छा होती. यामध्ये रशियाचा संक्षिप्त इतिहास, वैशिष्ट्यं, समाजजीवन, धर्म, साहित्य व कला आणि पर्यटनस्थळे यांचा वेध घेतला आहे.......

‘हा देश आमचा आहे’ : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केलेल्या आणि प्रजासत्ताकाच्या अमृतमहोत्सवाच्या उंबरठ्यावर उभ्या भारतीय मतदारांनी धर्मग्रस्ततेचे राजकारण करणाऱ्या पक्षाला दिलेला संदेश

लोकसभेची अठरावी निवडणूक तिचे औचित्य, तसेच निकालामुळे बहुचर्चित ठरली. ती ऐतिहासिकदेखील आहे. तेव्हा तिच्या या पुस्तकात मांडलेल्या तपशिलांना यापुढच्या विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकांच्या वेळी वेगळे संदर्भमूल्य असेल. या निवडणुकीचा प्रवास, त्या प्रवासातील वळणे, निर्णायक ठरलेले किंवा जनतेने नाकरलेले मुद्दे व इतर मांडणी राजकीय वर्तुळातील नेते व कार्यकर्ते यांना साहाय्यभूत ठरेल, अशी आशा आहे.......

‘भिंतीआडचा चीन’ : श्रीराम कुंटे यांचं हे पुस्तक माहितीपूर्ण तर आहेच, पण त्यांनी इ. स. पूर्व काळापासून आजपर्यंतचा चीन या प्रवासावर उत्तम प्रकारे प्रकाशही टाकला आहे

‘भिंतीआडचा चीन’ हे श्रीराम कुंटे यांचे पुस्तक चीनविषयी मराठीत लिहिल्या गेलेल्या आजवरच्या पुस्तकात आशयपूर्ण आणि अनेक अर्थाने परिपूर्ण मानता येईल. चीनचे नाव घेताच सर्वसाधारण भारतीयाच्या मनात एक कटुता, शत्रुभाव आणि त्या देशाच्या ऐकीव प्रगतीविषयी असूया आहे. या सर्व भावना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या विचारांची दिशा ठरवतात. अशा प्रतिमा ठोकळ असतात. त्यांना वस्तुस्थितीच्या छटा असल्या तरी त्या वस्तुनिष्ठ नसतात.......

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......