अजूनकाही
“ऐका, ऐका, ऐका... सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी सोलापूरकरीण यांची बारी….”
लाऊड स्पीकर लावून फिरणाऱ्या टेम्पोत अनाऊन्समेंट सुरू झाली. माईकवर बोलणाऱ्या माणसाला ड्रायव्हरनं झापलं, “भाड्या, आज नेहमीची अनाऊन्समेंट नाहीये. आज विठोबाची अनाऊन्समेंट आहे. तुला दिलाय तो कागद वाच की, रे भाडखाऊ…”
अनाऊन्सरला आज जरा जास्तच झाली होती.
अनाऊन्सरनं कागदाची घडी उलगडली, वाचायला सुरुवात केली.
“ऐका ऐका ऐका… आजपासून पुढले तीन दिवस गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोणीही बिनाकाम, बिनापरवाना रस्त्यावर, चंद्रभागेच्या वाळवंटात, विठ्ठल मंदिराच्या आसपास दिसला तर अटक करण्यात येईल आणि सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा करण्यात येईल…”
गावातली चक्कर आटोपून टेम्पो विठ्ठल मंदिरापाशी पोचला. मंदिरापासचे दिवे गेले होते. एकाच दुकानापाशी एक दिवा मिणमिणत होता. अनाऊन्सरला कागद नीट वाचता येईना.
“ऐका हो ऐका… तुमच्यायला, दिवे लावा की. पैशे खाऊन खाऊन पालिकेची वाट लावलीत, दिवे गुल केलेत, इथं डोळे फुटू लागलेत…. ऐका होSSS, वाळवंटात…” अनाऊन्सर डोळे चोळू चोळू कागद वाचायचा प्रयत्न करत होता.
“बाब्बो… ब ब ब ब...”
ड्रायव्हरची बोबडी वळली होती.
“अरे, त्यो बघ, विठ्ठल.” ड्रायव्हर बोलायचा प्रयत्न करत होता.
अनाऊन्सरनं समोर पाहिलं.
चक्क विठ्ठल चालत येत होता. लंगडत होता. कित्येक वर्षं पायात काही घातलं नव्हतं, मंदिराच्या दारात कोणाच्या तरी चपला होत्या, त्या घालून विठ्ठल फिरायला निघाला होता, चप्पल चावत होती.
“त्याच्यासोबत आणखी कोणी तरी आहे. पंढरपुरातला दिसत नाही. मिशावाला आहे, जीनपँट घातलीय…” ड्रायव्हर.
ड्रायव्हरनं गाडी थांबवली. विठ्ठल सोबतच्या माणसाबरोबर बोलत बोलत आला आणि ड्रायव्हरच्या बाजूला उभा राहिला.
“अरे, स्टेशनकडं जायचा रस्ता कुठला?” विठ्ठलानं विचारलं.
ड्रायव्हरनं अंगभर चिमटे काढले, डोळे चोळले.
“अरे अरुण, किती वर्षं झाली, विटेवरून खाली उतरलो नव्हतो. म्हटलं बाहेर पंढरपूर कसं आहे ते पाहूया. हा विचार आला आणि चक्क तू माझ्या बाजूलाच होतास. ” विठ्ठल.
“विठ्ठला, मी तर नेहमीच तुझ्याजवळच आहे, अठ्ठावीस युगं. मी कुठंही गेलो नव्हतो. जरा मधे मधे दारू शोधायला जात असे, तुझ्या भक्त-रांडांशी गप्पा करायला जात असे तेवढाच. बाकी सारा वेळ तुझ्याच जवळ… पण तुला जायचंय तरी कुठं? स्टेशनकडं जाऊन तू काय करणार?” अरुण.
“बळवंतबुवाकडं जाऊ म्हणतोय. किती दिवस झाले त्याचा मृदंग ऐकला नाही. लाऊड स्पीकरवर ‘माझा नवीन पोपट हा लागला विठूविठू बोलायला’ ऐकून कंटाळलोय. तो मुंबईला असतो म्हणे!”
“विठ्ठला. मुंबईला कसा जाणार तू. गाडी बंद आहे. चालत जायचं म्हटलं तर फार दिवस लागतील.” अरुण.
ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला बसलेला अनाऊन्सर विठ्ठलाचं बोलणं ऐकत होते. विठ्ठल, अरुण. दोघं गरगरले.
“मग सांग की त्या पियुष गोयलला.” विठ्ठल.
“विठ्ठला, तू ग्रेट आहेस रे. सगळ्या दुनियेची खबर तू विटेवर उभ्या उभ्या मिळवतोस.” अरुण.
“कशी नाही मिळणार खबर? अरे ते बडवे असता की नई, ते मंत्रबिंत्रं म्हणतच नसतात, आपसात राजकारणाची चर्चा करत असतात, त्यांच्यातही बारा पक्ष आहेत. एकमेकाच्या पुढाऱ्यांची मापं काढत असतात. तेच सांगत होते की, आता पियुष गोयलनं रेल्वे विकायला काढलीय. एक जण सांगत होता की, या लोकांना पुढल्या निवडणुकीसाठी पैसा हवाय. म्हणत होता की, आता कार्यकर्ते लोक देशकार्य करण्यासाठी जास्त भाव मागत आहेत.” विठ्ठल.
अरुण हसला.
“अरे अरुण, ते ट्रोलर प्रकरण काय असतं रे? एक बडवा म्हणत होता की, ट्रोलर लोक जास्त पैसे मागत आहेत. म्हणू लागलेत की, आता ट्रोलिंग करतानाही डोकं चालवावं लागतंय, त्यासाठी जास्त मेहनत करावी लागतेय. काय असतं रे ते ट्रोलिंग?” विठ्ठल.
अरुणनं जॅकेटच्या खिशातून तंबाखूची डबी काढली. तंबाखू मळता मळता म्हणाला, “विठ्ठला, बाबा रे, जग बदललंय. आता रांडांकडं येणारी गिऱ्हाईकंही एसयुव्हीतून येतात. रांडा म्हणतात की, त्यांच्या गांडीखाली येवढी मोठी गाडी असते, पण आम्ही पैसे मागितले की शिव्या देतात. पैसे पैसे पैसे.” अरुण.
ड्रायव्हरची हालत खराब. तो अनाऊन्सरला म्हणाला, “तुझ्याकडं उरली असेल तर मला दे. माझं डोकं चालेना गेलंय.”
अनाऊन्सरनं खिशातली चपटी काढली.
समोर हालचाल दिसली. पाच-सात बडवे आणि पोलीस मंदिरातून बाहेर पडले. पोलीस बॅटरीचा प्रकाश चारही दिशांनी फिरवत होते, शिट्या वाजवत होते. ते टेम्पोकडं आले.
“काय रे, तू गावातून आलास ना? विठ्ठलाला पाहिलंस का? विठ्ठल पळालाय.” एक बडवा उपरण्यानं घाम पुसत म्हणाला.
विठ्ठल, त्याच्या बाजूला अरुण कोलटकर आणि त्यांच्यापासून सहा इंच अंतरावरच पोलीस आणि बडवे उभे आणि ते ड्रायव्हरला विचारतायत की, विठ्ठल पाहिलास का?
ड्रायव्हर बेशुद्ध झाला.
“पण एक सांगा. शेवटच्या टायमाला तुम्ही विठ्ठलाला कवा पाहिलं होतंत?” पोलीस बडव्याला विचारत होता.
“अहो, मी विठ्ठलाचे कपडे बदलत होतो. विठ्ठलाचं अंग पुसत होतो. बाहेर कोण उकाडा हो. विठ्ठल नुसता घामाघूम. विठ्ठल म्हणाला, असू दे, मला सवय आहे, किती तरी युगं मी इथं घामाघूम होऊन उभा आहे. पुरे.” बडवा.
“असं म्हणाला विठ्ठल? तुमच्याशी बोलला विठ्ठल?” पोलीस.
“होय ना. मग मी म्हणालो, बा विठ्ठला, तू एक वेळ घामाचा वास सहन करशील, पण आज मध्य रात्रीनंतर मुख्यमंत्री येणारेय. त्याला वास सहन होणार नाही. म्हणून तुला पुसलं पाहिजे, स्वच्छ केलं पाहिजे.” बडवा.
विठ्ठल ऐकत होता. तो अरुणला म्हणाला, “हा बडवा खोटं बोलतोय. काही पुसतबिसत नव्हता. त्याला घाई सुटली होती. त्याला कलेक्टरचा फोन आला होता की, मुख्यमंत्री लवकर येत आहेत. लॉकडाऊनमुळं रस्त्यावर चिटपाखरूही नसल्यानं मुख्यमंत्र्यांची गाडी सुसाट पंढरपूरला पोचलीय, मुख्यमंत्री लवकर पूजेला येणारेय. लवकर लवकर सगळी तयारी कर असं कलेक्टरनं त्याला सांगितलं होतं.” विठ्ठल.
“मग तुमचं म्हणणं विठ्ठलानं ऐकलं की नाही?” पोलीस.
“कसलं हो... विठ्ठल म्हणाला की पुसू नकोस आणि कपडेही घालू नकोस. मला उघडच रहायचंय. वर्षानुवर्षं गंधबिंध आणि ते दागिने वगैरे अंगावर ठेवण्याचा मला उबग आलाय. मलाही उघडाबंब रहायची इच्छा आहे. मी म्हणालो की, असं कसं चालेल? विठ्ठल म्हणजे झोकात हवा, डौलात हवा. तर विठ्ठल ऐकायलाच तयार नाही.” बडवे.
“काय म्हणता?” पोलीस.
“मग विठ्ठल म्हणतो कसा- ‘मला कंटाळा आलाय इथं उभं राहण्याचा आणि त्या चोरांच्या साकड्यांचा. चोर लेकाचे! काय काय धंदे करतात मला माहीत नाहीये का? त्या रांडा बऱ्या. प्रामाणिक असतात. हे चोर लोकांना दाखवण्यासाठी माझ्या दर्शनाला येतात, लोकांना दाखवण्यासाठी साकडं घालतात. डँबिस असतात. मला आता या लोकांचा कंटाळा आलाय. मी आज सुट्टी घेणार. आज दर्शन नाही, साकडं नाही. मी खुश्शाल उघडा बंब वाळवंटात हुंदडणार.’ ” बडवे.
“काय म्हणता? अहो, पण विठोबा किती तरी युगं त्या मंदिरात होता. त्याला पंढरपूरचे रस्ते कुठं माहीत आहेत! त्याला कोणी तरी वाट दाखवायला नको का? कोण गेलं असेल विठ्ठलाच्या दिमतीला?” पोलीस.
“अहो, विठ्ठल माझ्याशी झटापटच करू लागला. मला म्हणाला, ‘बाहेर अरुण माझी वाट पाहतोय. मी तुझं काहीही ऐकणार नाही.’ चार बडवे आले. ते विठ्ठलाला धरू लागले. विठ्ठलामध्ये इतकं बळ कुठून आलं? तो तर खातपीत नाही, नैवेद्य आणि तीर्थ आम्ही आणि भक्तच खातो. पण विठ्ठलात बळ होतं खरं. आम्हाला झटकून बाहेर पडला. मी ओरडलो, ‘अहो विठ्ठल, निदान पायात चपला तरी घाला.’ तर विठ्ठल पसारही झाला.” बडवे.
“आता हो काय करायचं? विठ्ठल सापडला नाही तर माझी नोकरी जाणार.” पोलीस.
“तुमचं जाऊ द्या हो. आमचे संसार उघड्यावर पडणार. आता नवा विठ्ठल कुठून आणायचा? मोठंच संकट आहे हो…” बडवा रडू लागला.
सहा इंचावर विठ्ठल जोरात हसला आणि अरुणला टाळी देण्यासाठी त्यानं हात वर उचलला. अरुणनं तंबाखूची फक्की तोंडात मारली आणि हात पुढे केला.
अरुण आणि विठ्ठल चालू लागले.
..................................................................................................................................................................
या सदरातील आधीचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा -
https://www.aksharnama.com/client/author_articles/
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment