अजूनकाही
गप्पा, संवाद आणि प्रश्नोत्तरे यातून उलगडत जाणारं पुष्पा भावे यांचं व्यक्तिमत्त्व. त्याला जोड म्हणून काही मान्यवरांनी रेखाटलेलं त्यांचं व्यक्तीचित्रण असं स्वरूप असलेलं ‘लढे आणि तिढे : चिकित्सक गप्पा... पुष्पाबाईंशी’ हे पुष्पा भावे यांच्यावरील पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. पत्रकार, सामाजिक कार्यकर्त्या मेधा कुलकर्णी यांनी पुष्पाबाईंची ही सविस्तर, दीर्घ मुलाखत घेतली आहे. त्यानिमित्ताने या पुस्तकाची झलक दाखवणारी अमोल पालेकर यांची ही प्रस्तावना...
..................................................................................................................................................................
पुष्पाबाईंची आणि माझी पहिली भेट कधी झाली ते नक्की आठवत नाही. मी १९७१ साली केलेल्या ‘अवध्य’नंतर उठलेल्या टीकेच्या वादळाला तोंड देताना की, १९७३ मधल्या ‘गोची’नंतर सुरू झालेल्या प्रायोगिक नाटकाबद्दलच्या उलटसुलट चर्चांच्या संदर्भात! तेव्हा पुष्पाबाईंनी नाट्यविषयक वेगळा दृष्टिकोन ठामपणे मांडायला सुरुवात केली होती. ‘माणूस’मध्ये नाट्यसमीक्षा लिहिताना अनेकदा त्यांच्या विचारांमधली पुरोगामी दिशा स्पष्ट व्हायची; पण त्याहीपेक्षा चर्चासत्रांमधल्या प्रत्यक्ष सहभागातून किंवा नाट्यप्रयोगानंतर रंगणाऱ्या वादविवादांमध्ये त्यांची नाट्यविषयक जाण आणि प्रायोगिक नाटकांबद्दलची आस्था प्रकर्षाने जाणवायची. त्यामुळे वेगवेगळ्या टप्प्यांवरून वाटचाल करताना पुष्पाबाई आणि मी एकमेकांच्या जवळ कधी आलो, हेही सांगणं कठीण! अशाच एका बैठकीनंतर बाहेर पडताना पुष्पाबाईंनी विचारलं, तू सूझन सोन्टागचे निबंध वाचले आहेस? माझ्या नकारात्मक प्रतिक्रियेवर बाईंनी उभ्याउभ्या रस्त्यावरच तिच्याबद्दल, तिच्या लेखनाबद्दल आणि एकूणच पाश्चिमात्र समीक्षेतल्या विविध प्रवाहांबद्दल समर्पक निरूपण केलं ते लख्ख आठवतं. शेवटी ‘Against interpretation and other essays’ हे पुस्तक आणून देण्याचं आश्वासन देऊन पुष्पाबाई गेल्या.
दोनच दिवसांत ते पुस्तक माझ्या हातात पडलंसुद्धा! नंतरचा बराच काळ अन्वयार्थाचे अनेक पदर उलगडून दाखवणाऱ्या त्या निबंधांमधल्या कित्येक छटांबद्दल पुष्पाबाईंशी चर्चा करताना मी खूप समृद्ध आणि श्रीमंत झालो हे नक्की! त्याच कालखंडात पुष्पाबाईंनी कोल्हापूरला एक नाट्य शिबिर घेण्यासाठी मला उद्युक्त केलं. प्रायोगिक नाट्य चळवळ मुंबई-पुण्यापुरतीच मर्यादित न राहता दूरवर पसरली पाहिजे, या आग्रहापोटी बाईंनी हा प्रपंच मांडला होता. त्या शिबिरामध्ये रोज संध्याकाळी होणाऱ्या खुल्या अनौपचारिक चर्चासत्राची सुरुवात बाईंच्या ‘तासा’ने होत असे. आठवड्याअखेर सर्वसामान्य रसिकाला दडपण आणणाऱ्या ‘प्रायोगिक नाटक’, ‘नवनाट्य’, ‘न-नाट्य’, ‘अॅब्सर्ड थिएटर’ अशा वाक्प्रचारांची फक्त तोंडओळखच झाली नाही, तर त्याबद्दल एक सजग दृष्टी मिळाली, हेही मला खूप जवळून अनुभवायला मिळालं.
सत्तरीच्या दशकाच्या सुरुवातीला मध्यमवर्गीय मराठी नाट्यरसिकांना बाळ कोल्हटकर आणि मधुसूदन कालेलकर लिखित कौटुंबिक जिव्हाळ्याच्या अतिरेकी भावनाप्रधान नाटकांनी भारून टाकलं होतं. त्या काळी प्रसिद्ध होणारी नाट्यसमीक्षा म्हणजे आधी नाटकाचं कथानक सविस्तर सांगून मग कलावंतांच्या अभिनयाबद्दल स्तुती वा टीका करणारी एक-दोन वाक्यं लिहायची. शेवटी पार्श्वसंगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना इत्यादीविषयी जुजबी उल्लेख करण्याचा प्रघात होता. त्यामध्ये अधूनमधून ‘नायिकेच्या काखेतला घाम दिसत होता, त्यामुळे रसभंग झाला,’ अशी बाष्कळ मल्लिनाथीही आढळायची. दुर्दैवाची बाब एवढीच की, आजही असंच निकृष्ट दर्जाचं लिखाण ‘समीक्षा’ या लेबलखाली वाचायला मिळतं. या पार्श्वभूमीवर जागतिक समीक्षेचा कानोसा घेऊन मराठी समीक्षेला वळण देणाऱ्या पुष्पाबाईंच्या प्रयत्नांची यथायोग्य नोंद घेतली गेली पाहिजे. तसंच तत्कालीन समांतर रंगभूमीवर होणाऱ्या नवनवीन प्रयोगांचं महत्त्व रसिकांना उलगडून दाखवायचं अवघड काम ज्या मोजक्या समीक्षकांनी केलं, त्यात पुष्पाबाईंचं स्थान अग्रेसर होतं.
समांतर/प्रायोगिक रंगभूमीवरच्या माझ्या वाटचालीत ‘वासनाकांड’वर महाराष्ट्र शासनाने आणलेली बंदी हा एक वैशिष्ट्यपूर्ण टप्पा! नाट्य परिनिरीक्षण मंडळाने ‘नैतिक’ कारणांसाठी संपूर्ण संहितेलाच परवानगी नाकारल्यानंतर त्याविरुद्ध कायदेशीर लढा देण्याचं मी ठरवलं. सकाळी उच्च न्यायालयात हजर राहून संध्याकाळच्या प्रयोगाची न्यायालयीन अनुमती हातात पडल्यावर सुसाट जाऊन प्रभादेवीला रवीन्द्र नाट्य मंदिरात नाटकाचा प्रयोग पार पाडण्याचा पराक्रमही मी केला. शिवाय लगेच दुसऱ्या दिवशी सकाळी शासनाने केलेल्या अपिलाला तोंड देण्यासाठी न्यायालयात हजर राहून पुन्हा संध्याकाळचा प्रयोग करायला मी रवींद्रमध्ये हजर होतो. अशा दमछाक करणाऱ्या दोन दिवसांनंतर एका रात्री उशिरा दारावरची बेल वाजली. ‘आता आणखी काय...’ अशा काळजीयुक्त शंकेनं दार उघडलं तर समोर पुष्पाबाई आणि अनंतराव उभे होते. ‘मध्यंतराविना सलग दीड-पावणेदोन तासांचा पराकाष्ठेचा घनदाट नाट्यानुभव तुम्ही दोघांनी आपल्या संयत आणि समर्थ अभिनयानं पेललात, अभिनंदन!’ असं चित्राचं आणि माझं भरभरून कौतुक केल्यावर मग अनंतरावांनी एक पाकीट माझ्या हातात ठेवलं.
काही विचारण्याआधी अत्यंत हळुवारपणे पुष्पाबाई म्हणाल्या, ‘छोटीशी रक्कम आहे. या सगळ्या धावपळीत असू दे हाताशी.’ पाठोपाठ अनंतरावांनी पुस्ती जोडली, ‘कायदेशीर लढाया किती खर्चिक असतात याची कल्पना आहे आम्हाला.’ चित्राच्या डोळ्यांतून ओघळणारे अश्रू थांबवण्यासाठी पुष्पाबाईंनी तिला जवळ घेतलं आणि अनंतरावांनी माझ्या पाठीवर प्रेमानं थोपटलं. थोड्याच वेळात आम्हाला विश्रांती घेण्याचा सल्ला देऊन दोघे निघून गेले. बँकेत कारकुनाची नोकरी करणाऱ्या मला आणि कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या चित्राला आमच्या तुटपुंज्या कमाईत या कायदेशीर लढाईचा ताण सहन करताना पुष्पाबाई-अनंतरावांनी कोणतंच भावनिक ओझं न लादता केलेली आर्थिक मदत लाखमोलाची होती.
त्यानंतरच्या बऱ्याचशा संध्याकाळी बाईंच्या हातच्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा कार्यक्रम त्यांच्या घरी व्हायचा. कधी खवय्येगिरीच्या नादात भावे दाम्पत्य, माधव मनोहर, यशवंत देव, प्रा. धो.वि. देशपांडे अशा समविचारी ‘कलासक्त’ मंडळींच्या बरोबर मुंबईच्या गल्ल्याबोळात हिंडायचो, तर अनेकदा शशी मेहताच्या घरी रंगणाऱ्या मैफलींमध्ये बुडून जायचो. नाट्यवाचन वा नाट्यप्रयोगानंतरच्या खडाजंगी बैठका म्हणजे तर विचारमंथनाची पर्वणीच असायची. एव्हाना चित्रपट क्षेत्रात मला प्राप्त झालेल्या ‘वलया’चं या मंडळींना मनापासून कौतुक असूनही त्यांच्यावर ‘हिंदी स्टारडम’चं कोणतंच अनावश्यक दडपण नसल्यामुळे मीही निर्धास्त होतो.
या सौहार्दपूर्ण वातावरणात दुधात मिठाचा खडा पडावा, तशी एक घटना घडली. सत्यदेव दुबेने अच्युत वझेच्या ‘सोफा कम बेड’ नाटकाच्या तालमी सुरू केल्या होत्या. दुबेने नाटकाचं नाव बदलून ‘धाडसी धोंडूच्या धांदली’ करायचं ठरवलं आणि त्यातली मध्यवर्ती भूमिका एका नटाने करण्याऐवजी तीन नटांच्या अभिव्यक्तीतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा निर्णय घेतला. त्यामुळे नाराज झालेल्या अच्युतने स्वत: वेगळं ‘समांतर’ प्रॉडक्शन करायचं ठरवून तालमी सुरू केल्या. प्रायोगिक/समांतर चळवळीतल्या नाट्यकर्मींमध्ये खळबळ माजली. दोन तट पडले. नाट्यसंहितेत दिग्दर्शकाने केलेले बदल जर लेखकाला अमान्य/जाचक/असह्य वाटत असतील तर त्याने स्वत:च्या संहितेला न्याय देण्यासाठी वेगळं प्रॉडक्शन करण्यात अनुचित काय? या अच्युतच्या भूमिकेला पाठिंबा द्यायला डॉ. लागू, पुष्पाबाई आणि अनंतराव उभे राहिल्यामुळे द्वंद्वाला वेगळी धार प्राप्त झाली. त्या संदर्भात काही तोडगा निघतो का, हे बघण्यासाठी पुष्पाबाईंच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये दुबेच्या वतीने मी दोन मुद्दे मांडले. एक म्हणजे, लेखकाला अभिप्रेत नसलं तरी त्याच्या शब्दांचं वेगळं interpretation शोधायचा हक्क दिग्दर्शकाला आहे की नाही? आणि दुसरा, एकाच वेळी एकाच संहितेची दोन समांतर प्रॉडक्शन्स आली तर प्रायोगिक रंगभूमीला पाठबळ देणारा सहृदय प्रेक्षकवर्ग विभागला जाणं कितपत उचित आहे? डॉक्टरांनी आणि अनंतरावांनी लेखकाच्या पारड्यात जास्त गुण टाकले तरी पुष्पाबाईंचं मौन मला अधिक अस्वस्थ करून गेलं. दोन तात्त्विक मुद्द्यांच्या पलीकडचा आणि कदाचित जास्त ऐरणीवरचा मुद्दा मी मांडला. अच्युतच्या संहितेतल्या काही संवादांना राज्य परिनिरीक्षण मंडळाने हरकत घेतल्यानंतर दुबेने त्याविरुद्ध संघर्ष सुरू केला आहे. त्या लढाईत दुबेची भूमिका अशी आहे की, अच्युतने लिहिलेला प्रत्येक शब्द कलात्मक दृष्टीने आवश्यक/अपरिहार्य आहे आणि म्हणून कोणतीही काटछाट न करता संहिता मंजूर करावी.
‘दुबे लेखकाच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या बाजूने लढत असताना दुर्दैवाने अच्युतने ती काटछाट मान्य केली आहे आणि सेन्सॉर सर्टिफिकेट मिळवलं आहे. त्याचं हे पाऊल सेन्सॉरशिपविरुद्धच्या व्यापक लढाईत प्रतिगामी/घातक आहे,’ हे ऐकल्यावर स्तब्धता पसरली. काही क्षणांनंतर मीटिंग संपल्याचं सूचित करत डॉ. लागू उठले. याही संदर्भात पुष्पाबाईंनी काहीच न बोलणं मला पुन्हा एकदा अस्वस्थ करून गेलं. जास्तच अवघडलेल्या अवस्थेतला मी थोड्या वेळाने तिथून निघालो. या संपूर्ण घटनेमुळे, विशेषत: बाईंच्या तटस्थतेमुळे आमच्यात दुरावा निर्माण झाला.
आणखी काही महिन्यांनी ‘कलासक्त’ मंडळींमधल्या एका मित्राने मला आर्थिकदृष्ट्या फसवल्याचं मी जेव्हा जेव्हा पुष्पाबाईंच्या कानावर घातलं, त्याही वेळी त्या काहीच बोलल्या नाहीत. त्यानंतर आमच्यातली दरी वाढतच गेली. तरीही ३ डिसेंबर १९७५ रोजी मी आणीबाणीविरोधात केलेल्या ‘जुलूस’च्या पहिल्या प्रयोगानंतर ‘मृणाल गोरे वेशांतर करून आली होती, तिला खूप आवडला,’ असं माझ्या कानात कुजबुजून लगबगीने जाताना बाईंनी पाठीवर ठेवलेल्या हाताचा ओझरता स्पर्श पूर्वीच्या मायेच्या आठवणी जाग्या करून गेला.
पुष्पाबाई हळूहळू नाटकाच्या वर्तुळात कमी आणि समाजकारणासाठी जास्त वेळ द्यायला लागल्याचं दिसत होतं. त्यांनी रमेश किणी प्रकरणात शासनाविरुद्ध दिलेल्या लढ्याचा मी साक्षीदार आहे. आपमतलबासाठी राजकारण्यांच्या कळपात न घुसणाऱ्या माझ्यासारख्याला बाईंसारखे लखलखीत स्त्रोत वेळोवेळी प्रेरणादायी ठरले आहेत...
त्यानंतर पुलाखालून किती तरी पाणी वाहून गेलं. मी पुन्हा एकदा त्या परिचित काळोख्या जिन्यावरून ‘राधा मंदिर’मध्ये पोहोचलो. नुकतीच बायपास होऊन गेलेल्या अनंतरावांनी थकल्या पावलांनी, पण पूर्वीच्याच प्रसन्न चेहऱ्याने ‘ये अमोल’ म्हणत दार उघडलं. म्हणाले, ‘पुष्पाला चालताना जरा त्रास होतोय.’ दोघांच्याही ढासळत्या तब्येतीची माहिती होती, त्यामुळे वेळ न दवडता मी आणि संध्या दोघांचीही इच्छा बोलून दाखवली... नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांना आधी दिलेलं निमंत्रण मागे घेऊन आयोजकांनी त्यांचा अपमान केला आहे. त्याबद्दल महाराष्ट्राच्या सुजाण, सुशिक्षित जनतेच्या वतीने सहगलबाईंची माफी मागावी आणि त्याच वेळी अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांविरुद्ध ‘चला, एकत्र येऊ या’ असा आवाज उठवावा, या भूमिकेतून संध्याने २९ जानेवारी २०१९ला शिवाजी मंदिरला एक निषेध कार्यक्रम आखला आहे. मंचावर कोणताही राजकीय पक्ष वा नेता अर्थातच नसेल. याची सुरुवात ज्येष्ठतेच्या नात्याने पुष्पाबाईंच्या भाषणाने व्हावी.
क्षणभर विचार करून त्या म्हणाल्या, ‘आधी घेतलेला कार्यक्रम रद्द करते आणि येते.’ पुष्पाबाईंचा मोजक्या आणि नेमक्या शब्दांतला होकार घेऊन मी उठलो. कार्यक्रमाच्या सकाळी अनंतरावांशी फोनवर बोलताना पुष्पाबाईंना अजिबात चालता येत नाही असं कळलं; पण संध्याकाळी उपस्थित राहाण्याचा त्यांचा निग्रह मात्र अढळ होता आणि खरोखरच, व्हीलचेअरवरून ठरल्या वेळेला त्या पोहोचल्या. भाषण वाचून दाखवताना त्यांना होणारा त्रास मला विंगमध्ये जास्त अस्वस्थ करत होता; पण उशिरापर्यंत चाललेल्या त्या कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाई आम्हा सगळ्यांच्या बरोबर तिथेच होत्या. मंचावर पुष्पाबाई आणि प्रेक्षागृहात ज्ञानपीठविजेते भालचंद्र नेमाडे, दोघेही वैद्यकीय सल्ला झुगारून व्हीलचेअरमध्ये उपस्थित असल्यामुळे समस्त लेखक, कलावंत, विचारवंतांच्या निषेधाला एक वेगळीच धार आली होती.
त्यानंतर दोनच दिवसांनी बाईंना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. शस्त्रक्रिया पार पडल्यावर मी भेटायला गेलो तेव्हा ‘जमलं तर अनंताला भेटून जा... कॉलनी नर्सिंग होममध्ये आहे तो,’ म्हणाल्या, तेव्हा माझ्या डोळ्यांच्या ओलावलेल्या कडा त्यांना दिसणार नाहीत अशा बेताने मी उठलो. जवळ जाऊन त्यांच्या हातावर हात ठेवला. क्षणभरच त्यांनी माझा हात घट्ट धरला आणि त्या स्पर्शातून एकही शब्द न उच्चारता जागवलेला इतक्या वर्षांचा सगळा जिव्हाळा माझ्या रोमारोमांत झिरपला.
अशा आदर्शांच्या जोरावरच तर समकालीन मिंधेपणाच्या दलदलीत आपण तग धरून आहोत. पुष्पाबाई, आपल्यातला संवाद कमी झाला तरी तुम्ही माझ्यासारखी कित्येक आयुष्यं उजळून टाकली आहेत... अनेक अंगांनी माझ्यात तुम्ही पाझरत राह्यला आहात... आणि राहालही!
..................................................................................................................................................................
‘लढे आणि तिढे : चिकित्सक गप्पा... पुष्पाबाईंशी’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5206/Ladhe-ani-tidhe
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment