र.वा. दिघे : अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
भाऊसाहेब नन्नवरे
  • र.वा. दिघे आणि त्यांची ग्रंथसंपदा
  • Fri , 03 July 2020
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो र. वा. दिघे Raghunath Vaman Dighe पाणकळा Pankala पड रे पाण्या Pad Re Panya आई आहे शेतात Aai Ahe Shetat

र. वा. अर्थात रघुनाथ वामन दिघे यांनी ग्रामीण जीवन, शेतकरी व आदिवासींची दुःखं, व्यथा-वेदना अत्यंत समर्थपणे आपल्या कथा-कादंबऱ्यांतून मांडली. त्यांच्या ११ कादंबऱ्या, ६ कथासंग्रह, ३ नाटके व १ लोकगीतसंग्रह, अशा एकूण २१ साहित्यकृतींतून व्यापक मानवतावादी दृष्टी, शेतीबद्दलचा आधुनिक विचारविवेक व्यक्त होतो. २५ मार्च १८९६ रोजी जन्मलेल्या रवांचे २०२० - २०२१ हे ‘शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्ष’ आहे.

४ जुलै १९८० रोजी त्यांचं निधन झालं. उद्या त्यांची ४०वी पुण्यतिथी आहे. या दोन्हींच्या निमित्ताने हा विशेष लेख…

..................................................................................................................................................................

विसाव्या शतकात नाथमाधव, ग. त्र्यं. माडखोलकर, पु. भा. भावे, ना. सी. फडके, वि. स. खांडेकर आदींनी ‘कादंबरी युग’ निर्माण केलं. त्याच वेळी व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘माणदेशी माणसं’मुळे ग्रामीण जीवनाचं अस्सल चित्रण साहित्यातून मांडलं जाऊ लागलं. त्याच काळात ग्रामीण भागातील शेतकरी-आदिवासी समाजाला आपल्या कथा-कादंबऱ्यांतून ‘नायक’ म्हणून प्रस्थापित करण्याचं काम र. वा. दिघे यांनी केलं.

कोकणातल्या खंडाळा घाटाच्या पायथ्याशी शेतकरी, आदिवासींमध्ये फिरून त्यांच्या जगण्यातली दाहक वास्तवता पहिल्यांदाच प्रभावीपणे मांडणारे खोपोलीचे लेखक म्हणजे रघुनाथ वामन दिघे. आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून त्यांनी ग्रामीण जीवन तेथील शेतकरी, त्याचं दुःख व व्यथा-वेदना अत्यंत समर्थपणे चित्रित केल्या. त्यांच्या साहित्यातून व्यापक मानवतावादी दृष्टी व्यक्त होते. दिघे यांच्या कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लेखनातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. मराठी संस्कृतीची नस पकडून त्यांनी वारकरी शेतकऱ्याला नायक बनवलं. शेतकरी वारकरी संप्रदायाची मूल्यं जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी  संघर्ष करतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची उत्तम वर्णनं दिघेंच्या कादंबऱ्यांमध्ये वाचायला मिळतात. 

कवी व समीक्षक सतीश काळसेकर म्हणतात, “ज्ञानदेव-तुकारामांच्या विचारांत असलेल्या तत्त्वांची कलात्मक हाताळणी करणारे दिघे हे मराठी कादंबरीचे मापदंडच होत.”

‘पाणकळा’ ही दिघेंची पहिली कादंबरी १९४० साली प्रकाशित झाली. पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना त्यांनी या कादंबरीतून मांडल्या आहेत. ही सजलपूर गावातील गावकऱ्यांची आणि तिथल्या डोंगरदऱ्यात राहणाऱ्या भिल्लांची कथा. १९४० साली जमखिंडीमध्ये भरलेल्या ‘दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलना’त उत्कृष्ट कादंबरीचा ‘ना. सी. फडके पुरस्कार’ विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ व र.वां.च्या ‘पाणकळा’ या कादंबऱ्यांना भागून देण्यात आला. अलीकडेच माधुरी तळवलकर यांनी ‘पाणकळा’ची संक्षिप्त आवृत्ती (जोत्स्ना प्रकाशन) संपादित केली आहे.

दिघेंनी ‘सराई’, ‘पड रे पाण्या’, ‘सोनकी’, ‘हिरवा सण’ आदी कादंबऱ्यांतून शेतकऱ्यांची, आदिवासींची दु:खं समाजासमोर आणली. बीए, एलएलबीचे शिक्षण घेतलेले र.वा. दिघे स्वत: हाडाचे शेतकरी होते. कोकणात न पिकणारा गहू स्वत:च्या शेतात पिकवून दाखवल्यामुळे १९५४-५५ मध्ये खालापूर तालुका विकास संघानं ‘प्रगतशील शेतकरी’ म्हणून त्यांना गौरवलं होतं. आज शेतकरी आत्महत्या करताहेत, पण हा इशारा दिघेंनी तेव्हाच दिला होता. नुसत्या शेतीवर अवलंबून काही होणार नाही. काही तरी जोडधंदा करा. ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ हा विचारविवेक त्यांनी आपल्या कादंबऱ्यांतून दिला.

‘आई आहे शेतात’ ही कादंबरी म्हणजे शेतकऱ्यांचं जीवन समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. या कादंबरीतून शेती ही फुकाची नाही, इथं कौशल्य लागतं, शेतीचं ज्ञान असणाऱ्यांच्या हातात तरी जमीन गेली पाहिजे किंवा ज्यांच्या हातात ती आहे, त्यांनी अद्ययावत शेतकरी बनलं पाहिजे. नाहीतर ही काळी आई आपली बाळं खाऊन टाकील. शेतीबद्दल सर्व माहिती आपण मिळवली पाहिजे. शेतकीच्या यशाचं गमक त्यांनी एका कृषीतज्ज्ञाच्या अधिकारवाणीनं शेतकऱ्यांना सांगितलंय. शेतकरी व समाजाबरोबर त्यांनी इतरही काही सामाजिक विषय हाताळले आहेत.

त्यांची ‘कार्तिकी’ ही कादंबरी अस्पृश्यता निवारण या विषयावर आहे. त्यावर पुढे ‘कार्तिकी’ नावाचाच मराठी सिनेमा निघाला. लेखन करण्यासाठी त्यांनी खूप प्रवास केला. ‘सोनकी’ ही कादंबरी लिहिण्यासाठी गोंडवनात जाऊन त्यांनी आदिवासी जीवन व परिसर जवळून पाहिला. नंतर ‘निसर्गकन्या : रानजाई’ व ‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या. ‘पड रे पाण्या’ या कादंबरीतून त्यांनी पावसाला केलेली आळवणी वाचनीय व उदबोधक आहे.   

“पड रं पाण्या, पड रं पाण्या 

कर पाणी पाणी

शेत माझं लय तान्हलं चातकावाणी

बघ नांगरलं कुळवून वज त्याची केली

सुगरणबाई पाभळली शेतावर नेली

तापली धरणी,

पोळले चरणी मी अनवाणी

पड रं पाण्या, पड रं पाण्या,

कर पाणी पाणी...

‘गानलुब्धा मृगनयना’ या कादंबरीत त्यांनी ग्वाल्हेर संस्थानाचा तोमर वंशीय राजा मानसिंह व त्याची प्रेयसी मृगनयना यांची प्रेमकथा रंगवली आहे. या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यात ठिकठिकाणी पद्यं आहेत.

दिघे यांनी काही कथालेखनही केलेलं आहे. त्यांची ‘लज्जा’ ही पहिली कथा ‘मनोहर’ या मासिकातून प्रसिद्ध झाली. पुढे त्यांच्या कथा ‘किर्लोस्कर’ मासिकात प्रकाशित होऊ लागल्या. ‘रम्यरात्री’, ‘पूर्तता’, ‘आसरा’, ‘ताजमहाल’ हे कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. ‘माझा सबूद’, ‘द ड्रिम दॅट व्हॅनिश्ड्’ (इंग्रजी) ही नाटकं त्यांनी लिहिली. त्यांच्या नावावर ‘गातात व नाचतात धरतीची लेकरे’ नावाचा एक लोकगीतसंग्रहही आहे. काही कविताही त्यांनी लिहिल्या आहेत. त्या अप्रकाशित आहेत.

लोकसंस्कृती, लोकजीवन, निसर्ग, माणसं त्यांच्या समजुती, चालीरीती, बोलीभाषा, दैवतं यांचा समूहनिष्ठ कलात्मक आविष्कारच दिघे यांच्या लेखनातून व्यक्त होतो. ग्रामीण जीवनाच्या प्रत्यक्ष अनुभवातून व निसर्गाच्या रम्य सहवासातून त्यांचं लेखन स्फुरलेलं आहे. “बाबांनी कुठलंही लेखन चार भिंतीच्या आत बसून न करता निसर्गाच्या सानिध्यात केलं. कधी आमच्या घराच्या परसात असणाऱ्या आंब्यांच्या झाडाखाली, शेताच्या बांधावर, विहारीत नदीवर बांधलेल्या पुलाच्या खांबाला टेकून ते लेखन करत असत,” अशी आठवण त्यांचे चिरंजीव वामनराव सांगतात.

त्यांच्या कादंबऱ्यांत नाट्यपूर्ण, रसरशीत साहसी घटना, अद्‌भुतरम्य वातावरण, काव्यात्म वर्णनं, ठसठशीत व्यक्तिदर्शनं, ग्रामीण जीवन यांचं प्रत्ययपूर्ण चित्रण आलं आहे.

दिघेंच्या ‘पाणकळा’ या कादंबरीवर ‘मदहोश’ व ‘सराई’वर ‘बनवासी’ हे हिंदी चित्रपट निघाले. ‘पड रे पाण्या’वर ‘धरतीची लेकरं’ हा मराठी चित्रपट आला. संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी दिघेंचा ‘अस्सल मराठी मातीतला शेतकरी कादंबरीकार’ म्हणून गौरव केला.

दिघे यांच्या साहित्यावर संशोधन करून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी ‘कादंबरीकार र.वा.दिघे’ हा समीक्षाग्रंथ लिहिला आहे. १९६० साली ठाणे येथील साहित्य संमेलनात त्यांचा विशेष सन्मान झाला. असं असलं तरी कोकणातला हा महान साहित्यिक काहीसा उपेक्षित राहिला. मराठी समीक्षेनं म्हणावी तशी दखल त्यांच्या लेखनाची घेतली नाही. “कथा-कादंबरीकार या नात्याने र.वा. दिघे यांचे मूल्यमापन करण्यात व त्यांची स्थाननिश्चिती करण्यात आपल्याला यश आले नाही,” अशी खंत कवी-समीक्षक सतीश काळसेकर यांनी व्यक्त केली आहे.

कोकणाला एक मोठी साहित्यिक परंपरा आहे. ‘कोमसाप’चे संस्थापक अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कादंबरीकार विश्वास पाटील हे र. वा. दिघे यांना प्रेरणास्थानी मानतात. ‘र.वा.दिघे यांची खोपोली’ म्हटलं की, अभिमानानं उर भरून येतो. खोपोलीतील ‘विहारी’त त्यांचं वास्तव्य होतं. खोपोली नगरपरिषदेच्या पुढाकारानं व शासनाच्या सहकार्यानं ‘र.वा.दिघे स्मारक व वाचनालय’ उभं राहिलं आहे. त्यांच्या लेखनाचा वारसा त्यांच्या स्नुषा कवयित्री सौ. उज्ज्वला वामन दिघे पुढे चालवत आहेत. वामनराव दिघे यांनी अथक प्रयत्नातून संस्कृती प्रकाशना (पुणे)च्या माध्यमातून वडिलांची सर्व ग्रंथसंपदा प्रकाशित केली आहे. नव्या पिढीसाठी ती प्रेरणादायी आहे. दिघेंची साहित्यिक परंपरा जपण्याचं काम खोपोली व पंचक्रोशीतील नव्या पिढीचं लेखक-कवी जोमानं करत आहेत.

..................................................................................................................................................................

लेखक भाऊसाहेब नन्नवरे खोपोलीच्या के.एम.सी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक आहेत.

nannwareb@yahoo.com

..................................................................................................................................................................

र. वा. दिघे यांची साहित्यसंपदा

कादंबरी : पाणकळा, सराई, आई आहे शेतात, पड रे पाण्या, कार्तिकी, सोनकी, हिरवा सण, निसर्गकन्या : रानजाई, गानलुब्धा मृगनयना, वसंतराव व चाळीसचोर,

कथासंग्रह : पूर्तता, पावसाचं पाखरू, रम्यरात्री, पांडुरंग कांती, लक्ष्मीपूजन, आसरा

नाटके : माझा सबुद (मराठी), द ड्रिम दॅट व्हॅनिश्ड् (इंग्रजी)

लोकगीतसंग्रह : गातात  व नाचतात धरतीची लेकरे

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शेतकऱ्यांपासून धोरणकर्त्यांपर्यंत आणि सामान्य शेतकऱ्यांपासून अभ्यासकांपर्यंत सर्वांना पुन्हा एकदा ‘ज्वारी’कडे वळवण्यासाठी...

शेती हा बहुआयामी विषय आहे. त्यातील एका विषयांवर विविधांगी अभ्यास करता आला आणि पुस्तकरूपाने वाचकांसमोर मांडता आला, याचं समाधान वाटतं. या पुस्तकात ज्वारीचे विविध पदर उलगडून दाखवले आहेत. त्यापुढील अभ्यासाची दिशा दर्शवणाऱ्या नोंदी करून ठेवल्या आहेत. त्यानुसार सुचवलेल्या विषयांवर संशोधन करता येईल. ज्वारीला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणकर्त्यांनी धोरणात्मक दिशेने पाऊल टाकलं, तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.......

म. फुले-आंबेडकरी साहित्याकडे मी ‘समाज-संस्कृतीचे प्रबोधन’ म्हणून पाहतो. ते समजून घेण्यासाठी ‘फुले-आंबेडकरी वाङ्मयकोश’ उपयुक्त ठरणार आहे, यात शंका नाही

‘आंबेडकरवादी साहित्य’ हे तळागाळातील समाजाचे साहित्य आहे. तळागाळातील समाजाचे साहित्य हे अस्मितेचे साहित्य असते. अस्मिता ही प्रथमतः व्यक्त होत असते ती नावातून. प्रथमतः नावातून त्या समाजाचा ‘स्वाभिमान’ व्यक्त झाला पाहिजे. पण तळागाळातील दलित, शोषित व वंचित समाजाला स्वाभिमान व्यक्त करणारे नावदेखील धारण करता येत नाही. नव्हे, ते करू दिले जात नाही. जगभरातील सामाजिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजघटकांचा हाच अनुभव आहे.......

माझ्या हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवलेला हा सीमारेषाविहिन कवी तुमच्याही हृदयात घरोबा करो. माझ्याइतकंच तुमचंही भावविश्व तो समृद्ध करो

आताचा काळ भारत-पाकिस्तानातल्या अधिकारशाही वृत्तीच्या राज्यकर्त्यांनी डोकं वर काढण्याचा आहे. अशा या काळात, देशोदेशींच्या सीमारेषा पुसून टाकण्याची क्षमता असलेल्या वैश्विक कवितांचा धनी ठरलेल्या फ़ैज़चं चरित्र प्रकाशित व्हावं, ही घटना अनेक अर्थांनी प्रतीकात्मकही आहे. कधी नव्हे ती फ़ैज़सारख्या कवींची या घटकेला खरी गरज आहे, असं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतल्या विवेकवादी मंडळींना वाटणंही स्वाभाविक आहे.......