सध्याच्या अभूतपूर्व स्थितीत मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत १ जुलै २०२० रोजी ‘आषाढी एकादशी’ पार पडली. अशी अस्मानी-सुलतानी संकटे काही पहिल्यांदाच आलेली नाहीत. धर्मश्रद्धेच्या क्षेत्रात आलेली ही नवी ‘विषाणू’बाधा पाहता, ढेऱ्यांनी घेतलेल्या श्रीविठ्ठलाच्या आद्य मूर्तीच्या शोधाकडे पुन्हा पाहणे अत्यंत संयुक्तिक आणि रास्त आहे.
रामकृष्ण चिंतामण ढेरे यांनी दै. ‘केसरी’च्या १५ फेब्रुवारी १९८१च्या अंकात ‘श्रीविठ्ठलाच्या आद्य मूर्तीचा शोध’ आणि १६ फेब्रुवारी १९८१ रोजी ‘फेडूनि पीतांबर उघडा दिगंबर’ असे दोन लेख लिहिले. त्यानंतर अनेक अनुकूल-प्रतिकूल प्रतिक्रिया उमटल्या. श्रीविठ्ठल गेली आठ-नऊ शतके मराठी लोकमानसात अधिराज्य गाजवतो आहे. ढेरे यांनी मांडलेला ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ दक्षिणेतल्या एका लोकप्रिय देवाच्या वैष्णवीकरणाची आणि उन्नयनाची शोधकथा आहे.
मराठी संतांचा ‘चैतन्याचा गाभा’ ज्या मूर्तीत प्रतीत झाला, ती यादवकालात ज्ञानदेवांच्याही पूर्वी प्रतिष्ठित झालेली मूर्ती कशी होती, तीच मूर्ती आजही विठ्ठलमंदिरात नांदते आहे काय, अनेक संकटांत मूर्तीचे स्थलांतर करावे लागले असताना मूळ मूर्ती बदलली तर गेली नसेल ना, असे अनेक प्रश्न जिज्ञासू जनांना पडले. उपलब्ध साधनांच्या आधारे पुष्कळ अभ्यासकांनी त्या प्रश्नांना उत्तरे दिली. अर्थात, धर्मेतिहासातला हा प्रश्न उलगडण्यासाठी वापरली गेलेली साधने आणि संशोधन पद्धती प्रामुख्याने राजकीय इतिहासाच्या क्षेत्रात वापरली जात असे. ढेऱ्यांनी मात्र यापलीकडची धर्मश्रद्धेचा आविष्कार असणारी सर्व माध्यमे-साधने आणि जवळपास निर्दोष असणारी संशोधन पद्धती वापरली. अत्यंत आस्थेने मुख्यतः दक्षिण भारतीय श्रद्धाप्रदेशांचा अभ्यास करून त्यांनी पुढच्या अभ्यासाच्या दिशा जवळजवळ प्रत्येक पुस्तकात दाखवल्या आहेत. जिथे त्यांना असे वाटले की, इथे आपलं प्रतिपादन संपले; तिथे ते सांगतात की याचा पुढचा मार्ग नंतरच्या संशोधकांनी शोधायचा आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
धर्मक्षेत्रे आणि तिथे नांदणारी दैवते यांच्या उत्कर्षाचा उलगडा स्थलपुराणांच्या अंतरंगात प्रवेश केल्यावाचून होत नाही. पंढरपूर आणि विठ्ठल यांच्याबाबतीत ढेऱ्यांनी स्कंद (स्कांद माहात्म्य), पद्म (पाद्म्य माहात्म्य) आणि विष्णुपुराणान्तर्गत मानली जाणारी तीन संस्कृत माहात्म्ये वापरली आहेत. यापैकी पाद्म्य आणि स्कांद या दोन्ही ‘पांडुरंगमाहात्म्यां’त श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचे एक अनन्यसाधारण वैशिष्ट्य सांगितले आहे. हे वैशिष्ट्य एवढे अपवादात्मक आहे की, आद्य मूर्तीची निश्चिती करण्यासाठी त्यासारखे दुसरे कोणतेच साधन असू शकणार नाही. पंढरपूरच्या श्रीविठ्ठलमूर्तीचे लक्षण असे आहे की, त्या मूर्तीच्या हृदयावरच श्रीविठ्ठलाचा मंत्र कोरलेला आहे.
पाद्म्य ‘पांडुरंगमाहात्म्या’त ‘श्रीवत्सं धारयन् वक्षे मुक्तमालां षडक्षराम् |’ असा मुक्तामाळेप्रमाणे शोभणाऱ्या षडक्षरी मंत्रावळीचा उल्लेख आहे. स्कांद ‘पांडुरंगमाहात्म्या’त ‘मन्त्राक्षराणि देवर्षे दृश्यन्ते तस्य वक्षसि |’ (हे, नारदा, देवाच्या हृदयावर मंत्राक्षरे पाहायला मिळतात!) असे स्पष्ट विधान आहे. साक्षात शंकर नारदमहर्षींना या गोप्य मंत्राचा उपदेश करतो आहे, अशा भूमिकेतून स्कांद ‘पांडुरंगमाहात्म्या’त हा मंत्र गूढतेने नोंदविला आहे, तो असा –
स्पर्शाद्यं सत्यनामाद्यं पृष्टषष्टं सदीर्घकम् |
षणं षष्टानित्यंतं समारं तं विदुर्बुधाः ||
या पाठात मुद्दाम वापरलेली कूटाची भाषा आणि नकलाकारांनी निर्माण केलेली संभाव्य पाठभ्रष्टता यांमुळे पाठनिश्चिती अवघड आणि अंतिम होत नसली तरी मूर्तीनिश्चितीच्या संदर्भात तरी ते अत्यावश्यक नाही. श्रीविठ्ठलाच्या मूर्तीच्या हृदयावर त्याचा मंत्र कोरलेला आणि आणि त्याचे स्वरूप पाठभेद गृहीत धरूनही वर उद्धृत केलेल्या कूट-शब्दांचे आहे, एवढेच आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे ढेरे म्हणतात.
ढेरे लिहितात, आज पंढरपूरच्या मंदिरात विराजमान मूर्तीच्या हृदयावर अशी अक्षरे नाहीत. मात्र, अशी मूर्ती सोलापूर जिल्ह्यात माढे या गावच्या विठ्ठलमंदिरात आहे. गेल्या शतकातच इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी ‘ग्रंथमाला’ मासिकात ‘माढे’ येथील विठोबाच्या हृदयावरील लेख’ वाचलेला आहे. (ग्रंथमाला, १२.१, एप्रिल १९०५.) त्यात राजवाड्यांनी माढ्याच्या विठोबाच्या देवळातल्या मूर्तीच्या हृदयावर कोरलेल्या श्लोकाचा आणि देवळाच्या उंबरठ्यावरच्या ओळींचा उल्लेख केला आहे. (राव माहादाजी निंबाळकर शेरनांगत पांडुरंग चेरणीं) त्यानुसार हे देऊळ महादजी निंबाळकराने बांधले. हे निंबाळकर माढ्याचे जहागीरदार घराणे होते. ढेरे यांनी वर उल्लेख केलेला कूट-श्लोक आणि हस्तलिखितांत असलेले पाठभेद तपासून ते एकरूप असल्याचा निष्कर्ष काढला. राजवाड्यांना उपलब्ध न झालेले हेमाद्रीच्या काळापूर्वीचे स्कांद माहात्म्य ढेऱ्यांना मिळाल्यामुळे हे शक्य झाले.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
हेमाद्रिपूर्व काळातील स्कांद ‘पांडुरंगमाहात्म्या’त विठ्ठलमूर्तीच्या हृदयावरील ज्या नाममंत्राची स्पष्ट नोंद केलेली आहे, तो मंत्र पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरातील मूर्तीच्या हृदयावर आढळत नाही आणि माढे येथील मूर्तीच्या हृदयावर मात्र आढळतो. ही वस्तुस्थिती लक्षात घेता सहजच असा प्रश्न निर्माण होतो की, पंढरपूरची ती पुरातन विठ्ठलमूर्ती कधी काळी या गावी हलवली गेली होती काय?
मुसलमानांच्या आक्रमणाच्या काळात अनेक तीर्थक्षेत्रांत मूर्ती हलवून दुसरीकडे हलवली जात असे. संकट टळताच पुन्हा मूळ जागी तिची प्रतिष्ठापना होई. पंढरपूरची विठ्ठलमूर्तीही पंढरपुराबाहेर नेऊन ठेवल्याचे अनेक दाखले उपलब्ध आहेत. इ. स. १६५९ (शके १५८१) मध्ये अफझलखानाच्या स्वारीदरम्यान किंवा त्यानंतर इ. स. १६९५ (शके १६१७) पासून चार-पाच वर्षे औरंगजेबाची छावणी पंढरपुराजवळ ब्रह्मपुरी येथे होती. या काळातील क्षेत्र आणि देव संकटात असल्याचे उल्लेख मिळतात. मधल्या काळातही अनेक संकटप्रसंगात मूर्ती चिंचोली, गुळसरे, देगाव इत्यादी शेजारच्या गावांत हलवली गेली होती. एकदा तर बडव्यानेच मुद्दाम मूर्ती पळवून लपवून स्वार्थसाधनासाठी दर्शनोत्सुक भक्तांची अडवणूक केली होती. (श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, ग. ह. खरे, पुणे १९६३. पृ. १८-२३)
विठ्ठलमूर्तीच्या स्थलांतराच्या बाबतीत राजवाड्यांनीच विठ्ठलमूर्तीवरील संकटांबाबत महत्त्वाची माहिती पुरवली आहे. विठोबाच्या मूर्तीला शके १५८१त अफझलखानाच्या हाते येण्याचा समय आला होता. परंतु असे सांगतात, की बडव्यांनी ऐन वेळी मूर्ती पंढरपुराहून वीस मैल असलेल्या माढे गावी नेऊन ठेविली. पुढे अफझलखानाचा वध झाल्यावर ती मूर्ती परत आणिली व ह्या गंडांतराच्या स्मरणार्थ माढ्यात विठोबाचे एक स्वतंत्र देऊळ व मूर्ती स्थापण्यात आली. (ग्रंथमाला, १२.१, एप्रिल १९०५.) ढेरे म्हणतात, ज्या अर्थी श्रीविठ्ठलाच्या संपर्काची स्मृती म्हणून माढेकरांनी मुद्दाम तिथे मंदिर बांधले आणि ज्या अर्थी पुरातन विठ्ठलमूर्तीचे अनन्यसाधारण लक्षण आजही फक्त माढे येथील मूर्तीतच आढळून येत आहे, त्या अर्थी माढेकरांनी बांधलेल्या विठ्ठलमंदिरात मूळच्या पुरातन मूर्तीची अथवा तंतोतंत तिच्यासारख्या मूर्तीचीच स्थापना श्रद्धेने करण्यात आली असे मानावे लागते, हे उघड आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
या आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी ढेऱ्यांनी अन्य समकालीन पुरावे दिले आहेत. सभासद बखरीत देवास ‘उपद्रव’ दिल्याचा मोघम उल्लेख येतो. राजवाड्यांनी पंढरपूरच्या आराध्यांचे जे कागद छापले आहेत, त्यांतील एकात ‘अफझलखानाची तसवीस क्षेत्रास लागले’, एवढेच या संदर्भात म्हटले आहे. (मराठ्यांच्या इतिहासाची साधने, खंड २०, संपा. वि. का. राजवाडे, लेखांक २१७. पृ. २३२.) हा कागद माघ व. १, शके १५८९ या दिवशीचा आहे असे, श्री. दत्तोपंत आपटे यांनी ‘शिवभारता’च्या प्रस्तावनेत म्हटले आहे. (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, मुंबई, शके १८४९. पृ. १६४.) आणखी एका पत्रात, ‘विजापुरामध्ये अलिपातशाय असता’ शके, १५८१ (इ. स. १६५९) मध्ये ‘पंढरपुरीचा विठ्ठल मूर्ती काडिली’ असे म्हटले आहे. (शिवचरित्रसाहित्य, खंड १, लेखांक ४७. पृ. ६८.)
यासंबंधीचा महत्त्वपूर्ण निर्देश संकर्षण सकळकळेच्या संस्कृत शिवकाव्यात मिळतो. या काव्याचा कर्ता शिवसमकालीन होता. अफझलखानाने पुंडरीकप्रिय पांडुरंगाला ‘दिगंताविश्रान्तगति’ प्राप्त करून दिल्याचे यात म्हटले आहे. ‘दिगंत’ या शब्दातून मूर्तीचे स्थलांतर स्पष्ट होते, तर ‘विश्रांतगति’ यांतून देव दर्शनार्थींना वंचित झाल्याचे सूचित होत आहे. याचा अर्थ त्या वेळी सुरक्षिततेसाठी मूर्ती अन्यत्र नेऊन लपवून ठेवल्याची माहिती हा समकालीन कवी आपल्याला देतो. (संकर्षण सकळकळे-कृत शिवकाव्य : संपा. रा. पां. गोस्वामी, पुणे, १९७४. पृ. ४१.) ढेरे पुढे लिहितात, यावेळी मूर्ती माढ्यास न हलविता आणखी दुसरीकडे हलविली होती, असे उद्या सबळ प्रमाणांनी सिद्ध झाले, तरी माहात्म्याच्या प्रामाण्यानुसार ती माढ्याच्या आजच्या मूर्तीसारखीच असणारी मूर्ती कुठे आहे, याचा शोध घेणे आवश्यक ठरेल.
ढेरे यांनी या सर्व विवेचनातून पुढील निष्कर्ष काढले आहेत. स्कांद ‘पांडुरंगमाहात्म्य’ हा संस्कृत ग्रंथ पंढरपूर आणि श्रीविठ्ठलाच्या अभ्यासाचे अग्रमानाचे साधन आहे. विठ्ठलमूर्तीच्या हृदयावरील मंत्राक्षरे हे अनन्यसाधारण मूर्तिलक्षण आहे. या लक्षणांनी युक्त असणारी एकमेव ज्ञात मूर्ती माढे येथील विठ्ठलमंदिरात विराजमान आहे. इ. स. १६५९च्या अफझलखानाने केलेल्या स्वारीवेळी पंढरपूरची विठ्ठलमूर्ती माढ्याला हलवली, अशी पारंपरिक माहिती आहे. तिथे निंबाळकरांनी या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थच मुद्दाम विठ्ठल मंदिर बांधले. ज्ञानदेवांपासूनच्या संतश्रेष्ठांनी पूजिलेली आद्य मूर्ती तुकोबांनंतर एक दशकभर तरी पंढरपूरच्या मंदिरात होती. आज ती मूर्ती माढे येथे सुरक्षित, सुप्रतिष्ठित आणि सुपूजितही आहे.
श्रीविठ्ठलाच्या आद्य मूर्तीच्या बाबतीत ढेऱ्यांनी स्वतःच्या अपेक्षांच्या पलीकडे गेलेले सत्य सर्व समृद्धीनिशी प्रकट झाल्याचा अपूर्व अनुभव घेतला तेव्हा धन्य झाले.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
अर्थात, आपल्या या निष्कर्षामुळे पंढरपूरच्या प्रतिष्ठेला यत्किंचितही उणेपणा येण्याचे कारण नाही असे ढेरे मानत होते. मूर्तिद्रव्य हे भंगूर असल्यामुळे त्याच्यातल्या बदलामुळे देवतत्त्वाची आणि देवतत्त्वाशी संबंद्ध झालेल्या क्षेत्राची प्रतिष्ठा कधीच उणावत नसते, असे त्यांनी सांगितले आहे. केवळ मूर्तीच्या बदलामुळे किंवा मूर्तीवर संकट आल्यामुळे स्थानमहिमा उणावत नसल्याची कित्येक उदाहरणे भारतीय धर्मपरंपरेत आढळतात.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी वाराणसीचा विश्वनाथ आणि सौराष्ट्रातील सोमनाथ यांची कहाणी हेच सत्य सांगते. सोमनाथाचे लिंग तर अनेकदा भंगले आहे आणि पुन्हा पुन्हा नव्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना त्या ठिकाणी होत राहिली. मुघल सत्तेच्या काळात विश्वनाथाच्या मंदिराची मशीद झाली. पण पेशवाईत अहल्यादेवीने शेजारीच बांधलेल्या नव्या मंदिरात तोच पुरातन विश्वनाथ विराजमान झालेला आहे, अशीच हिंदूंची श्रद्धा आहे. भारतीय धर्मेतिहासात अशा अनेक आपत्तींची व आपत्तीतही अभंग राहिलेल्या श्रद्धेची उदाहरणे पावलोपावली आढळतील. मूर्तीच्या ठायी शिलाभाव कल्पू नये, असे माहात्म्यकारांनी पुनः पुन्हा सांगितल्याचा उल्लेख करून लक्षावधी भक्त-भाविकांच्या उत्कट श्रद्धेचे निधान पंढरपूर येथेच आहे असा ढेऱ्यांचा दावा आहे, अनुभव आहे. सुलतानी संकटांत मूळ मूर्तीची अप्रतिष्ठा तर झाली नाही नसेल ना, या शंकेने अस्वस्थ होणाऱ्यांसाठी हे निष्कर्ष निर्णायक उत्तर देणारे आहेत. ढेरे यांच्या लेखनाचे हेच मर्यादित उद्दिष्ट आहे.
आद्य विठ्ठलमूर्तीच्या बाबतीत हे विचार मांडले गेल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात मोठे वादळ उठले. या संदर्भात आक्षेपकांनी काही विरोधी मुद्दे उपस्थित केले. ढेऱ्यांनी त्याला साधार प्रत्युत्तर दिले. माढे येथील मूर्ती ही माहात्म्यानुसार असली तरी, ती आधुनिक काळात घडविलेली नसेल कशावरून, अशी एक प्रमुख शंका घेतली गेली. ढेऱ्यांनी पंढरपूरची आजची मूर्ती माहात्म्यानुसार का नाही आणि माढ्यातल्या मूर्तीप्रमाणे आवश्यक ठरणारी पंढरपूरची ती प्राचीन मूर्ती कुठे गेली, याचा शोध घेण्याची जबाबदारी आक्षेपकांना स्वीकारावी लागेलच असे म्हटले.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
‘केसरी’त आलेल्या लेखांनी उपस्थित केलेले मुद्दे आणि पुढे नव्याने उपलब्ध झालेले पुरावे लक्षात घेऊन ढेऱ्यांनी आपल्या या विवेचनात भर टाकली. त्यांनी प्रख्यात धर्मशास्त्रज्ञ, ‘धर्मसिंधू’कर्ते काशीनाथ उपाध्याय तथा बाबा पाध्ये यांच्या साक्षीचा दाखला देत आपले आधीचे निष्कर्ष सुधारले आहेत. १८०५ मध्ये समाधी घेतलेल्या बाबा पाध्यांनी पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीच्या वक्षःस्थलावरील षडक्षर मंत्राचा स्पष्ट उल्लेख आपल्या एक संस्कृत कृतीत केला आहे. डॉ. उषा भिसे यांनी त्यांची अज्ञात-अप्रकाशित अशी तीन विठ्ठलस्तोत्रे (‘बोधद्विरदपद्याली’, ‘विठ्ठलध्यानमानसपूजा’ आणि ‘शयनोत्सव’) एशियाटिक सोसायटीच्या ‘जर्नल’मध्ये प्रकाशित केली. (Journal of the Asiatic Society of Bombay, Vols. 52-53/1977-78 (New series), Published in 1981.) यांपैकी ‘विठ्ठलध्यानमानसपूजा’ या स्तोत्रात बाबांनी विठ्ठलाचे नखशिखान्त ध्यान व त्याची यथाक्रम मानसपूजा वर्णन केली आहे. यात सांगितलेला विठ्ठल दोन्ही पायांमध्ये गोवळकाठी धारण करणारा आणि त्याच्या वक्षःस्थलांवर षडक्षर मंत्र असलेला आहे. बाबांनी अत्यंत निःसंदिग्ध शब्दांत म्हटले आहे- ‘षडक्षरं कृष्णमंत्रं वक्षःस्थलगतं स्मरेत् ||’ म्हणजे, वक्षःस्थलावर कोरलेला षडक्षर कृष्णमंत्र स्मरावा.
बाबांना विठ्ठलमूर्तीचा नित्य सहवास होता. आज पंढरपूर मंदिरात नित्य-नैमित्तिक उपासनेची व्यवस्था परंपरेच्या आधारावर यांनीच बसवून दिली. देवमूर्ती रोज प्रत्यक्ष पाहणाऱ्याने मूर्तीचे नखशिखांत वर्णन केले आहे. १८०५ मध्ये बाबांनी समाधी घेतली व त्याचदरम्यान हे लिखाण त्यांनी केले. ढेरे लिहितात, श्रीविठ्ठलाची समंत्रक आद्यमूर्ती, स्कांद ‘पांडुरंगमाहात्म्या’त वर्णन केलेली मूर्ती इ. स. १८०५ मध्ये पंढरपूरच्या विठ्ठलमंदिरात भक्तांना अनन्यसाधारण लक्षणांसह दर्शन देत उभी होती हे निर्णायक सिद्ध झाले.
याचप्रमाणे इ. स. १६५९ मध्ये अफझलखानाच्या स्वारीच्या संकटामुळे पंढरपुराहून माढ्याला नेलेली विठ्ठलमूर्ती परत स्थिरस्थावर झाल्यावर सुरक्षितपणे पंढरपुरात आणून प्रतिष्ठित केली होती. राजवाडे यांना समजलेली हकीकत केवळ अर्धीच (मूर्तीचे माढे येथे स्थलांतर झाले एवढ्यापुरतीच) खरी आहे, असे नव्हे; तर ती पूर्णतःच (म्हणजे स्थिरस्थावर झाल्यावर माढ्याहून ती मूळ मूर्ती पंढरपुरात परत आणली, इथपर्यंत) खरी आहे असा याचा अर्थ आहे. अर्थात, माढे इथली विठ्ठलमूर्ती पंढरपूरच्या ‘विठ्ठला’ला संकटकाळात जो निवास घडला, त्याची पावन स्मृती निरंतर राहावी म्हणून घडवलेली आहे. ढेऱ्यांनी या भावनेशी पूर्णतः संवाद साधण्यासाठी पंढरपूरच्या मूळ मूर्तीप्रमाणेच घडवली आहे, असा याचा उलगडा केला आहे.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
आता १८०५ पर्यंत पंढरपुरात मंदिरात नांदणारी आद्यमूर्ती होती, ती केव्हा, कुठे व का नाहीशी झाली? इ. स. १८७३ मध्ये कोण्या माथेफिरूने मूर्तीवर धोंडा फेकल्यामुळे त्याच्या आघातामुळे मूर्तीचा एक पाय भंगला होता, अशी हकीकत समकालीन वृत्तपत्रांत आली होती. बडव्यांच्या मते, विठ्ठलाची मूर्ती ‘स्वयंभू’ (?) असल्यामुळे ती भग्न झाली तरी पायाला मागून आधार देऊन आम्ही मूर्ती न बदलता त्याच मूर्तीची पूजा-अर्चा चालू ठेवली. धर्मशास्त्राच्या दंडकाप्रमाणे भग्न मूर्तीचे विसर्जन करून नवी मूर्ती घडवून तिची विधिपूर्वक प्राणप्रतिष्ठा करायची असते.
ढेऱ्यांनी नाईलाजाने या बडव्यांच्या आणि तथाकथित संशोधकांच्या दाव्याला स्वार्थरक्षणाचा बनाव म्हटले आहे. साक्षेपी ढेरे श्रीविठ्ठलाची आद्य मूर्ती पंढरपूरच्या मंदिरात इ. स. १८०५ पर्यंत होती; ती बहुदा इ. स. १८७३ मधल्या आघातानंतर बदलली गेली इथवर निष्कर्ष काढून थांबतात आणि ती कशी होती, हे जाणून घेण्याचे आजचे एकमेव ज्ञात साधन माढे येथील आद्य मूर्तीची तंतोतंत प्रतिकृती असणारी विठ्ठलमूर्ती आहे, हे सुनिर्णीत सत्य दृष्टीपुढे ठेवतात. जर आद्य मूर्तीचा शोध घ्यायचा असेल तर हेच रूप समोर ठेवून वाटचाल करावी लागेल.
पंढरपूरच्या विठ्ठलाची आद्य मूर्ती ही स्कांद ‘पांडुरंगमाहात्म्या’त वर्णन केल्याप्रमाणेच होती. आजची मंदिरातली मूर्ती वेगळी आहे. याची जाणीव तिथल्या नित्योपासनेशी ज्यांचा हक्काने संबंध आहे, त्या मंडळींना आहे व नसलेली लक्षणे सांगण्याची प्रथा सुरू झाल्याचे ढेऱ्यांनी साधार म्हटले. स्थळपुराणांची वा माहात्म्यांची प्रतिष्ठा केवळ संशोधकांनीच नव्हे तर श्रद्धावंतांनी आपल्या श्रद्धेच्या आणि क्षेत्रोपाध्यायांनी व्यवसायाच्या सुरक्षिततेसाठी मानायला हवी.
पूर्वसुरींना उपलब्ध झालेल्या साधनांची व्याप्ती वाढवून, ज्ञानाच्या प्रेरणा शुद्ध ठेऊन आणि आपले जुने हट्टाने कवटाळून न ठेवता नव्या पुराव्यांना पडताळून आपली मते दुरुस्त करणाऱ्या या ऋषितुल्य व्रतस्थ संशोधकाने आपल्या सर्वांच्या श्रद्धाप्रदेशाचा विस्तार आणखी मोठा केला, उंच केला. ‘उद्या वेगळी प्रमाणे उपलब्ध झाली, तर मी स्वतःच स्वतःला दुरुस्त करीन,’ अशी सत्यान्वेषक दृष्टी असणारे ढेरे आधुनिक जगात श्रद्धा न सोडता जितके वस्तुनिष्ठ राहता येईल तितके वस्तुनिष्ठ राहिले. या गुरूला नमस्कार असो!
..................................................................................................................................................................
‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/293/Shree-Vitthal-:-Ek-Mahasamanvay
..................................................................................................................................................................
(टीप- कंसात दिलेले संदर्भ रा. चिं. ढेरे यांनी आपल्या ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय’, पद्मगंधा प्रकाशन, चौ. आ. पुनर्मुद्रण, २०१८ यातील आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १९८४ साली प्रकाशित झाली. यानंतर दुसरी २००५, तिसरी २००९ व चौथी २०१२ साली प्रकाशित झाली.)
..................................................................................................................................................................
संदर्भ - (ढेरे यांनी आपल्या पुस्तकाच्या शेवटी ‘केवळ निवडक संदर्भ-साहित्याची’ १० पानी यादी दिली आहे. यावरून आपल्याला विषयाचा आवाका कळून येईल. सर्वसाधारण माहिती होण्यासाठी खालील पुस्तके जिज्ञासू वाचकांना उपयोगी पडतील.)
खरे. ग. ह., महाराष्ट्राची चार दैवते, १९५३.
खरे. ग. ह., श्रीविठ्ठल आणि पंढरपूर, तिसरी आवृत्ती, पुणे, १९६३.
ढेरे, रा. चिं., ‘श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पद्मगंधा प्रकाशन, चौथी आवृत्ती, पुनर्मुद्रण, २०१८.
भागवत, दुर्गा, लोकसाहित्याची रूपरेखा, दुसरी आवृत्ती, पुणे, १९७७.
..................................................................................................................................................................
लेखक पंकज घाटे रत्नागिरीच्या गोगटे - जोगळेकर महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.
pankajghate89@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Sun , 05 July 2020
रोचक माहिती! धन्यवाद!
__/\__
-गा.पै.