देशाचे पंतप्रधान, हिंदूमेंदूसम्राट, माननीय उद्धवसाहेब ठाकरे पधार रहे है…
सदर - वास्तव-अवास्तव
संजय
  • उद्धव ठाकरे यांचं एक छायाचित्र
  • Fri , 03 July 2020
  • सदर वास्तव-अवास्तव उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे शिवसेना भाजप शरद पवार

म्हटलं तर वास्तव, म्हटलं तर अवास्तव. म्हटलं तर शक्य, म्हटलं तर अशक्य. म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. म्हटलं तर कल्पना, म्हटलं तर सत्य. आजच्या कल्पना उद्याचं वास्तव असू शकतात किंवा उद्याचं वास्तव आजच्या कल्पना. अशा अनेक शक्य-अशक्य घटनांचा वेध घेणारं हे नवं-कोरं साप्ताहिक सदर...

..................................................................................................................................................................

तुताऱ्या वाजल्या.

“बा आदम बा मुलाहिजा, देशाचे पंतप्रधान, हिंदूमेंदूसम्राट, माननीय उद्धवसाहेब ठाकरे पधार रहे है.”

“घोषणा ऐकली? हिंदूमेंदूसम्राट. ही माझी कल्पना. हृदयसम्राट फक्त बाळासाहेबच असू शकतात. उद्धवला सर्वोच्च पदावर तर बसवायचं पण बाळासाहेबांचाही आब राखायचा. बाळासाहेब हृदय, उद्धव मेंदू. कसं काय वाटलं?” संजय राऊत स्टेजवर लोकांचं स्वागत करून त्यांना नियोजित जागी बसवत असताना मिलिंद नार्वेकरांच्या कानात बोलले.

शिवाजी पार्कवर आजवर कधीही उभारलेलं नव्हतं इतक्या भव्य स्टेजच्या पायऱ्या उद्धव ठाकरे चढू लागले. कारमधून उतरून पायऱ्यांपर्यंत पोचेपोचेपर्यंत पन्नास वेळा तरी उद्धवनी मुजऱ्यांची देवाण घेवाण केली होती. बाजूलाच असलेल्या आदित्य ठाकरेंना म्हणाले उद्धव म्हणाले, “माझी कंबर मोडून गेली आहे. शिवाजीमहाराजांनी कधी इतके मुजरे केले असतील काय? राजा म्हटल्यावर खरं म्हणजे लोकांनी राजाला मुजरे करायला हवेत. इथं मीच वाकतोय. पंतप्रधान होण्यासाठी मुजरे करावे लागले हे मी समजू शकतो. पण आता राजा झालोय ना?”

आदित्यनं उद्धवच्या कंबरेभोवती हात घातला, त्यांना सपोर्ट दिला,  दोघं पायऱ्या चढू लागले.

उद्धव स्टेजवर पोचले तसं स्टेजच्या बाजूला असलेल्या बँडनं ‘जय जय महाराष्ट्र माझा वाजवायला सुरुवात केली.’

स्टेजवर डाव्या बाजूला फायबरचे चौथरे केले होते, त्यावर फायबरच्या मूर्त्या बसवल्या होत्या. शिवाजीमहाराज, प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, माँसाहेब ठाकरे,बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले. एकेका पुतळ्याला हार घालून वाकून नमस्कार करून उद्धव पुढल्या पुतळ्याकडं जात होते. सर्वांत शेवटल्या पुतळ्याजवळ उद्धव पोचले. तो पुतळा अनोळखी होता. स्टेजवरची माणसं आपसात कुजबुजू लागली. लाईव कव्हरेज चाललं होतं. टीव्ही अँकरनं उत्साहानं जाहीर केलं आता उद्धवसाहेब माननीय रश्मीजींचे पिताश्री पाटणकर यांच्या पुतळ्याला हार घालतील.

उद्धव स्टेजवर उपस्थित लोकांना करत करत त्यांच्या खुर्चीपर्यंत पोचले. मधोमध तीन उंच पाठीच्या खुर्च्या होत्या. मधली उद्धवसाठी, त्या पलीकडची शरद पवारांसाठी, अलिकडली मुख्यमंत्र्यांसाठी. शरद पवारांच्या पायाला हात लावून उद्धवनी पवारांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या  खुर्चीवर बसले. 

मुख्यमंत्र्यांची खुर्ची मोकळीच होती. 

स्टेजमागं शिवाजी पुतळ्यामागं हालचाल झाली. लाल दिव्यांच्या गाड्यांचा तांडा पुतळ्याशी थांबला. पोलिसांनी लोकांना हटवत हटवत लाल दिव्याच्या गाडीला थेट स्टेजपर्यंतच आणून पोचवलं.

संजय राऊतांच्या कपाळावर आठ्या पडल्या.

गाडीतून मुख्यमंत्री गोपीचंद पाडळकर उतरले. उतरल्या उतरल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी त्यांना गराडा घातला. सर्व लोक त्यांच्या गळ्यात स्टेथोस्कोप घालत होते. स्टेजच्या पायऱ्या चढत असतानाही भगवे स्कार्फवाले स्टेथोस्कोर गळ्यात अडकवतच होते. प्रेक्षकांत हशा पिकत होता. टीव्ही अँकरनं माहिती दिली, “मुख्यमंत्री  डॉ. गोपीचंद पाडळकर यांनी लोकांना सांगितलं आहे की, त्यांना फुलांचे हार घालू नयेत, स्टेथोस्कोपचे हार घालावेत. नंतर ते स्टेथोस्कोप ते महाराष्ट्रातल्या आदिवासी विभागातल्या दवाखान्यांना दान करणार आहेत.”

खुर्चीपर्यंत गोपीचंदांच्या गळ्यात एवढे स्टेथोस्कोप झाले होते की, ते त्या वजनानं पार वाकलेच होते. एका कार्यकर्त्यानं सगळे स्टेथोस्कोप उतरवले, तेव्हां कुठं जनतेला गोपीचंद यांचं दर्शन झालं.

स्टेजवरचे लोक टाळ्या वाजवायला विसरले, हसत राहिले. शरद पवार मात्र हसले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या.

कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुधीर गाडगीळ यांच्यावर काम्पिअरिंगची जबाबदारी होती. त्यांनी सुरुवात केली.

“आज भारताच्या इतिहासातला अद्वितीय असा दिवस आहे. ….”

उद्धवनी हात वर केला. मंचावरचे लोक त्यांच्याकडं पाहू लागले. गाडगीळ बोलायचे थांबले. एका माणसानं लगबगीनं एक माईक उद्धवना दिला.

“गाडगीळसाहेब. मी तुमचा आदर करतो. तुम्ही बाळासाहेबांच्या घेतलेल्या मुलाखती माझ्या आठवणीत पक्क्या रुतलेल्या आहेत. तुम्ही आदित्यचीही एक सुंदर मुलाखत घेतली होतीत. गेल्याच आठवड्यात तुम्ही शर्मिलाची तीन तासांची उत्तम मुलाखत घेतलीत, तमाम मराठी चॅनेल्सनी ती लाईव दाखवली. तुमचे मनापासून आभार. पण आज मीच या कार्यक्रमाचं संयोजन करणार आहे. तेव्हां कृपा करून आता मला बोलू द्या…”

घटनेला मिळालेल्या या अचानक वळणानं सगळेच आश्चर्य चकीत झाले. गाडगीळ थोडेसे गोंधळले. पण त्यांनी स्वतःला सावरलं. माईकपासून दूर जाता जाता ते म्हणाले, “माननीय उद्धवजी कार्यक्रमाचं निवेदन करणार आहेत या परता दुसरा आनंद कोणता असेल. माझ्यासारख्या माणसाला त्यातून बरंच शिकण्यासारखं आहे. मी उद्धवजीचे आभार मानतो.”

उद्धव पोडियमकडे न जाता जागच्या जागीच उभं राहून बोलू लागले. आता कॅमेरा हाताळणाऱ्यांची धावपळ उडाली. मंचाचं मॅनेजमेंट करणाऱ्या लोकांना काय करावं ते कळेना. ती माणसं संजय राऊतांकडं बघू लागली.

संजय राउतांनी क्षणार्धात निर्णय घेतला. पोडियम उचकटून उद्धव उभे होते तिथं लावण्यात आला.

“मी आज भाषण करणार नाहीये. मी मुळात भाषणं करणारा माणूसच नाही. मी बोलत नाही, मी करून दाखवतो. मी महाराष्ट्राला वचन दिलं होतं, मी मराठी बांधवांना वचन दिलं होतं, मी बाळासाहेबांना वचन दिलं होतं की, मी दिल्लीवर भगवा फडकवेन. आणि मी ते करून दाखवलं…”

शरद पवार मंद हसले.

“…मी ममताना भेटलो. मी स्टालीनला भेटलो. मी चंद्राबाबूला भेटलो. मी नवीनबाबूना भेटलो. मी लालूची विनवणी केली. मी मायावतींना भेटलो. मी दिग्विजयसिंगना भेटलो. माझे राज ठाकरेशी कितीही मतभेद असले तरी मी राजबरोबर रतन टाटांना भेटलो, अनिल अंबानीना भेटलो. या सगळ्याचा परिणाम म्हणून आज दिल्लीत माझं सरकार स्थापन झालं आहे…..”

..................................................................................................................................................................

लवकरच प्रकाशित होत आहे...

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

प्रेक्षकांत भाजपची बरीच माणसं गटागटानं बसली होती. प्रत्येक गटाबरोबर एक गटनेता होता. त्यानं सगळ्यांना सांगून ठेवलं होतं की, त्यानं टाळी वाजवली की इतरानी त्यांचं अनुकरण करायचं. प्रेक्षकातल्या कोणी उद्धवच्या विधानावर टाळ्या वाजवल्या की, हे गटनेत्याकडं पाहत. ते नेते डोळे वटारून मान हलवत.

“…पण आमच्या नॅचरल पार्टनरच्या इच्छेला मान देऊन आम्ही महाराष्ट्रात भाजपला सरकार करू दिलं. फडणवीसांचा हट्ट होता की, त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार होईल. आम्ही सांगितलं तसं होऊ देणार नाही म्हणजे नाही. पडद्यामागं बऱ्याच हालचाली घडल्या. आम्ही शिवाजी महाराजांचा गनिमी कावा वापरला. आम्ही गोपीचंद पाडळकरांना मुख्यमंत्री केलं तरच विचार करू असं सांगितलं. भाजपचे आमदार खवळले होते. पण फडणविसांसाठी हट्ट धरला तर सत्ताच जाईल असं लक्षात आल्यावर ते तयार झाले…. आज केंद्रात गैरभाजप सरकार आहे आणि राज्यात भाजप सरकार आहे. आम्ही सहिष्णू आहोत हे यातून सिद्ध होतं.”

शरद पवारांच्या बाजूला पृथ्वीराज चव्हाण बसले होते. ते पवारांच्या कानात कुजबुजले “कोविड सुरू झाल्यापासून उद्धव फार बोलू लागलेत. पंतप्रधानपद गेल्यामुळे आम्ही मोदींच्या भाषणातून सुटलो असं म्हणून खूष झालो, ‘मन की बात’ आता ऐकावी लागणार नाही असं म्हणू लागलो तर आता उद्धव बोलत सुटले आहेत.”

शरद पवार हसले.

“आजचा समारंभ हा माझ्या सत्काराचा नसून तो शरदराव पवारांच्या सत्काराचा आहे. मी ही गोष्ट सगळ्यांपासून लपवून ठेवली होती. आता ती उघड करतो. हा समारंभ पवारसाहेबांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाचा आहे. पवारसाहेबांनी ८० वर्षं पूर्ण केलीत. मी त्यांचं अभिनंदन करतो. ….”

पवार हसले.

“आज आम्ही जे काही आहोत, आज आम्हाला जी काही सत्ता मिळालीय याचं सारं श्रेय बाळासाहेबांना आणि पवारसाहेबांना आहे. बाळासाहेब होते तेव्हा वाजपेयी मातोश्रीवर येत असत. आज नरेंद्र मोदी सिल्वर ओकवर येतात. …”

नरेंद्र मोदींचं नाव घेतल्यावर भाजप गटातल्या लोकांना टाळ्या वाजवण्याचा मोह अनावर झाला. त्यांनी काकुळतीला येऊन गटनेत्याकडं पाहिलं. गटनेता स्वतःच गोंधळला होता. यात मोदींचं कौतुक होतं की त्यांना ओचकारे होते हे त्याला कळत नव्हतं. त्यानं दुसऱ्या गटनेत्याकडं पाहिलं. तोही गोंधळला होता. त्यानं फोन काढला, फडणविसांचा नंबर टाईप केला.

स्टेजच्या मागल्या अंगाला उभे असलेले  हेमंत टकले लगबगीनं फोन घेऊन शरद पवारांकडं आले, कानात कुजबुजले आणि फोन त्यांना दिला.

“कसे आहात? तुम्ही उद्याच बारामतीला यायचं म्हणताय? या. स्वागत आहे. मधल्या काळात आपली निवांत भेट झाली नाही. मी कधी लखनऊ, कधी चेन्नई, कधी पाटणा असा फिरत होतो. आता गणितं जुळवतांना नाही म्हटलं तरी थोडीशी दगदग होते. वाजपेयी, चंद्रशेखर, जॉर्ज, छान माणसं होती. त्यांना काय हवंय ते कळायचं. हल्लीच्या मुलांना नेमकं काय हवंय ते त्यांचं त्यांना तरी कळतंय की नाही ते कळत नाही. नुसतं सत्ता हवीय असं म्हणून भागत नाही, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. असो. तुम्ही गडबडीत होतात. तुम्हीही तुमच्या परीनं खूप खटपट केलीत. तुम्हाला मी सांगितलं होतं की, शहांपासून सावध रहा. तुम्ही माझं ऐकलं नाहीत. परिणाम काय झाला ते तुम्ही पहात आहात. पण ते जाऊद्या. झालं गेलं साबरमतीला मिळालं. महाराष्ट्रातलं गणित जुळवायला तुम्ही मला मदत केलीत त्याबद्दल आभार. तुमचं सहकार्य नसतं तर ते शक्य नव्हतं. असो. आता तुम्हाला मोकळा वेळ आहे. बारामतीत दोन दिवस रहा. खूप बोलू. फोन ठेवतो. ”

पवारांनी फोन हेमंत टकलेंच्या हाती दिला.

उद्धवचं भाषण सुरू राहिलं.

लोक कंटाळून जाऊ लागले….

..................................................................................................................................................................

या सदरातील आधीचे लेख वाचण्यासाठी क्लिक करा -

https://www.aksharnama.com/client/author_articles/

..................................................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

जर नीत्शे, प्लेटो आणि आइन्स्टाइन यांच्या विचारांत, हेराक्लिट्स आणि पार्मेनीडीज यांच्या विचारांचे धागे सापडत असतील, तर हे दोघे आपल्याला वाटतात तेवढे क्रेझी नक्कीच नाहीत

हे जग कसे सतत बदलते आहे, हे हेराक्लिटस सांगतो आहे आणि या जगात बदल अजिबात होत नसतात, हे पार्मेनिडीज सिद्ध करतो आहे. आपण डोळ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आपल्या बुद्धीवर अवलंबून राहिले पाहिजे, असे पार्मेनिडीजचे म्हणणे. इंद्रिये सत्याची प्रमाण असू शकत नाहीत. बुद्धी हीच सत्याचे प्रमाण असू शकते. यालाच बुद्धिप्रामाण्य म्हणतात. पार्मेनिडीज म्हणजे पराकोटीचा बुद्धिप्रामाण्यवाद! हेराक्लिटस क्रेझी वाटतो, पण.......