अजूनकाही
भारतीय परंपरेत आषाढ महिना हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. उन्हाळा संपून नुकताच पावसाळा सुरू झालेला असतो. त्यावेळच्या सृष्टीचा नजारा अत्यंत विलोभनीय असतो. म्हणूनच कविकुलगुरू म्हटल्या जाणाऱ्या कालिदासाने ‘मेघदूत’ या काव्याची सुरुवातच ‘आषाढस्य प्रथम दिवसे मेघमालिष्टमास्तू’ या शब्दांनी केली आहे.
अशा या महिन्यातील आजचा दिवस, म्हणजे ‘आषाढी एकादशी’ हा सर्वांत महत्त्वाचा मानला जातो. तशा वर्षभरात एकंदर २४ एकादशी असतात. म्हणजे प्रत्येक महिन्यात दोन. एक कृष्ण पक्षात व एक शुक्ल पक्षात. त्यातली शुक्ल\शुद्ध पक्षातील अकरावी तिथी ‘आषाढी एकादशी’ म्हणून ओळखली जाते. या दिवसापासून चातुर्मासाला प्रारंभ होतो आणि तो कार्तिक शुद्ध एकादशीला संपतो. या शुद्ध एकादशीला ‘देवशयनी आषाढी एकादशी’ असंही म्हणतात. कारण या दिवशी देवाची निद्रा सुरू होते, असा समज आहे. असं सांगितलं जातं की, भगवान विष्णू या दिवसापासून योगनिद्रेसाठी जातात. त्यांची ही निद्रा कार्तिक शुद्ध एकादशीला म्हणजेच प्रबोधिनी एकादशीला संपते. चातुर्मासात मांसाहार वर्ज्य मानला जातो.
शैव व वैष्णव असे दोन्ही ही एकादशी साजरी करतात.
या एकादशीविषयी एक कथा सांगितली जाते. शंकराच्या वरामुळे उन्मत्त झालेल्या कुंभ या दैत्याच्या मृदुमान्य या मुलाला मारण्यासाठी सर्व देवांच्या श्वासातून एक दिव्य शक्ती निर्माण झाली. ती म्हणजेच एकादशी. तिने मृदुमान्याचा वध केला. या वधापूर्वी सर्व देव एका गुहेत लपून बसले होते. त्यामुळे त्यांना उपवास घडला. त्यामुळे या दिवशी उपवास करण्याची प्रथा पडली असे सांगितले जाते.
याशिवाय आषाढी एकादशीला आणखी एक महत्त्व आहे. या दिवशी महाराष्ट्रभरातून अनेक पालख्या पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनासाठी जमतात. लक्षावधी लोक सर्व भेद, पंथ, वर्ण विसरून विठ्ठलनामाचा गजर करतात. तल्लीन होऊन विठ्ठलाचा जयघोष करतात.
गेल्या जवळपास ८०० वर्षांपासून ही वारीची परंपरा महाराष्ट्रात अहर्निशपणे चालू आहे.
वारकरी संप्रदायाची ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली एक धार्मिक पण उदारमतवादी परंपरा मानली जाते.
संतश्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात -
होय होय वारकरी | पाहे पाहे रे पंढरी ||१||
काय करावी साधने | फळ अवघेची येणे ||२||
अभिमान नुरे | कोड अवघेची पुरे ||३||
तुका म्हणे डोळा | विठो बैसला सावळा ||४||
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून, खेड्यापाड्यातून आणि अनेक शहरांतून (आणि महाराष्ट्राबाहेरून, भारताबाहेरूनही) भाविक विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भेटीसाठी निघतात. आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूतून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी निघते. त्याला ‘वारी’ म्हणतात. या वाऱ्या आजच्या दिवशी, म्हणजे आषाढी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. जमलेले भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेतात.
संत नामदेवांनी विठ्ठलाची आरती लिहिली आहे. त्यात ते शेवटी म्हणतात -
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमध्ये स्नान जे करती ।
दर्शन हेळामात्रे तया होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावे ओवाळिती
आषाढ महिना आणि शेती यांचा घनिष्ठ संबंध आहे. शेतकरी शेतीत पेरण्या करून पंढरपूरला जाण्यासाठी वारीमध्ये सहभागी होतात. रोज कैक मैल अंतर पायी चालत पार करतात. ते पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत चालत राहतात आणि इकडे त्यांनी पेरलेले धान्य वाढायला सुरुवात होते. आपल्या लाडक्या दैवताची भेट घेऊन शेतकरी आपापल्या गावी परतात तेव्हा त्यांच्या शेतातले पीक तरारून वर आलेले असते.
‘ज्या देशातले लोक पंढरीला येतात, तो महाराष्ट्र’ अशी महाराष्ट्राची एक व्याख्या इरावती कर्वे यांनी केली आहे.
यंदाची वारी करोनामुळे रोडावली आणि आज एरवी पंढरपुरात जो जनसागर लोटतो, तोही. पण असं स्थिती काही नेहमी नसते. हे मलभ आज ना उद्या जाईल. वारी तर दरवर्षी येते. आषाढी एकादशीही दरवर्षी येते, येत राहो!
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment