आज आषाढी एकादशी. आज पंढरपुरात भक्तगण आपल्या विठ्ठलाचे मनोभावे दर्शन घेतात. ही ‘पंढरी’ नेमकी कशी आहे, याचे संत नामदेवांनी मोठे बहारदार वर्णन केले आहे. ते वर्णनामध्ये अतिशयोक्ती आहे की, ते सत्यस्वरूप आहे, असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. नामदेवांच्या त्या ‘पंढरपूर-वर्णना’चे स्पष्टीकरण करणारा हा लेख...
हा लेख लेखकाच्या ‘नामदेवांनी पाहिलेले पंढरपूर - एका अभंगाचे विश्लेषण’ (स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे, २०१७) या पुस्तकातून संपादित स्वरूपात घेतला आहे.
..................................................................................................................................................................
The beginning of wisdom is found in doubting; by doubting we come to the question; and by seeking we may come upon the truth. - Pierre Abelard
आपण अनुसरलेला मार्ग व त्यावरील खाणाखुणा सांगून ठेवणे, हे संतांच्या आचरणाचे व साहित्याचेही सूत्र असते. ते ‘मार्ग दाऊनी गेले आधी । दयानिधी संत पुढे ॥’ या संत श्रीनिळोबांच्या अभंगात व्यक्त झाले आहे. संत गेले त्याच मार्गाने जाताना कुठेही गुंता निर्माण होत नाही. कारण, देवाधिदेवाच्या स्वरूपाबाबतच्या आणि त्याप्रत घेऊन जाणाऱ्या भक्तिमार्गाबाबतच्या विविध मतांचे खंडन करून संतांनी हितकर असा सिद्धान्तच सश्रद्ध वाचकांपुढे मांडलेला असतो. संत श्रीनामदेवकृत ‘पंढरपूर-वर्णना’लादेखील हे सूत्र लागू पडते. अर्थात देवदर्शनासाठीची आंतरिक तीर्थयात्रा करत चाललेल्या योगसाधकास येणाऱ्या अनुभवांच्या मुख्य खुणाच श्रीनामदेवांनी या अभंगात व्यक्त करून ठेवल्या आहेत.
पंढरपूर हे सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे. सर्वच संतांनी त्याचा महिमा गायिला आहे. श्रीनामदेव हे तर पंढरपूरजवळचेच रहिवासी होते. म्हणूनच त्यांनी पाहिलेल्या व वर्णिलेल्या त्या पंढरपुराचा शोधपूर्वक बोध करून घेणे उपयुक्त ठरते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
श्रीनामदेवकृत पंढरपूर-वर्णनाचा अभंग -
आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥१॥
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपुर ॥२॥
जेव्हा नव्हती गोदा गंगा । तेव्हा होती चंद्रभागा ॥३॥
चंद्रभागे तटीं । धन्य पंढरी गोमटी ॥४॥
नासिलिया भूमंडळ । उरे पंढरीमंडळ ॥५॥
असे सुदर्शनावरी । म्हणुनी अविनाश पंढरी ॥६॥
नामा म्हणे बा श्रीहरी । ते म्यां देखिली पंढरी ॥७॥
या अभंगातील पहिल्या ओळीच्या उलट अर्थाची वाटावीत अशी विधाने संत-साहित्यात आहेत. उदा. पुंडलिकाने ‘वैकुंठीचा देव भूतलां आणिला’, हे संत श्रीतुकारामकृत एक विधान होय. अशी विधाने वाचून, आधी वैकुंठ होते, तेथून देव विठ्ठलरूपाने पुंडलिकासाठी पंढरपुरात अवतरला व त्यानंतर लोक पंढरपुरास ‘भूवैकुंठ’ म्हणू लागले; परिणामी, देवाने आधी वैकुंठ निर्माण केले आणि मग पंढरी निर्माण झाली, असे वाटू लागते आणि म्हणूनच,
१. ‘आधी रचिली पंढरी । मग वैकुंठ नगरी ॥’ असे जणू त्याच्या उलट विधान करून श्रीनामदेवांना नेमके काय सांगावयाचे आहे?
२. चराचर नव्हते तेव्हा पंढरपूर असू शकेल काय? जर हो, तर या चराचरापेक्षा ते वेगळेच असणार. त्याबाबत श्रीनामदेवांनी व इतर संतांनी काही सांगितले आहे काय?
३. गोदा, गंगा या नद्या नव्हत्या तेव्हाही चंद्रभागा ही नदी होती, हे विधान भूगोलशास्त्राला पटणारे आहे काय? जर नसेल, तर चंद्रभागा वगैरे शब्दांनी श्रीनामदेवांनी कोणत्या वेगळ्या बाबींचा निर्देश केला आहे?
४. भूमंडळाचा नाश झाल्यानंतरही उरते ते पंढरपूर कुठे आहे? भूमंडळ व ते पंढरपूर यांच्या स्वरूपात काय फरक आहे?
५. वैकुंठीचा राजा साक्षात् अवतरला, तेव्हा त्याच्या ‘सवें चाले सुदर्शन’ असे दुसऱ्या एका अभंगात, तर ‘असे सुदर्शनावरी...पंढरी’ असे प्रस्तुत अभंगात त्यांनी म्हटले आहे. श्रीनिळोबा, श्रीज्ञानोबा व श्रीतुकोबा यांनीही ‘पंढरी सुदर्शनावरी’ असल्याचे म्हटले आहे. श्रीविष्णूच्या हातात सुदर्शन चक्र हे एक अस्त्र असते, हे समजू शकते. पण ‘पंढरी सुदर्शनावरी’ म्हणजे सुदर्शनचक्रावर आहे, असा शब्दश: अर्थ घेतला तर ते समजून घेणे मोठे अवघड होते आणि ‘असे सुदर्शनावरी...पंढरी’ या विधानाचा अर्थ काय, यासारखे प्रश्न निर्माण होत राहतात.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
श्रीनामदेवकृत पंढरपूर-वर्णनाबाबत अभ्यासकांची मते
म्हणूनच, प्रस्तुत अभंग समजून घेताना विद्वानही बुचकळ्यात पडल्याचे आढळते. या अभंगातील विधानांची उकल, माझ्या माहितीनुसार, अद्याप करण्यात आलेली नाही. काही अभ्यासकांनी मात्र अशा विधानांबाबतची आपली मते व्यक्त केली आहेत. उदा.
१) नामदेवांच्या मनात पंढरीनगरीविषयी आत्यंतिक प्रेमभाव आहे. सर्व सृष्टीच्या लयानंतरही एकटे पंढरपूरच राहणार, असे अतिशयोक्तीने भरलेले विधान ते करतात, असे डॉ. कानडे यांनी ‘संतांची हे भेटी’ या पुस्तकाच्या पृष्ठ क्र. ७२-७३वर म्हटले आहे.
२) ज्या तीर्थाचे वर्णन चालू असेल त्याला प्राधान्य देणे आणि वर्णनात अतिशयोक्ती करणे या दोन प्रवृत्ती (संत) वाङ्मयात आढळतात, असे ‘विश्वकोशा’तही म्हटले आहे. (पहा : खंड ७, पृष्ठ क्र. ३७५)
श्रीनामदेवांचा हा अभंग म्हणजे अतिशयोक्ती नव्हे; तर पंढरीस्वरूपविषयक अंतिम सत्यच आहे!
सदर अभ्यासकांची मते पटत नाहीत. कारण, या अभंगात श्रीनामदेवांनी अतिशयोक्ती केली नसून पंढरपुराच्या स्वरूपाबाबतचे अंतिम सत्यच सांगितले आहे.
१. ओव्या-अभंगांचा सकलार्थ अनुभवात उमगतो
संतदेखील अतिशयोक्ती करतात, असे गृहीत धरून चालले तर संत सत्यवचनी वा सत्याचे उपासक असतात, असे म्हणताच येणार नाही. स्वत: श्रीनामदेवांनी ‘ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी’तील ‘एक तरी ओवी अनुभवावी’, असा उपदेश एका अभंगातून केला आहे. अर्थात, ज्ञानेश्वरीतील ओव्यांमधून सांगितलेल्या बाबी सत्य आहेत, असेच त्यांना म्हणावयाचे आहे. ओव्यांतील शब्दांचा अर्थ, त्यांचा एकमेकांशी असलेला संबंध म्हणजे ओव्यांचा सकलार्थ फक्त अनुभवानेच सुस्पष्ट होत असतो. श्रीज्ञानेश्वरांच्या ओव्यांना लागू असणारा हा विचार संतकृत अभंगांनाही लागू आहे. अर्थात, प्रस्तुत अभंगातही यौगिक अनुभवांच्या अशा खुणा व्यक्त केल्या आहेत.
एक तरी अभंग अनुभवावा । नामयाचा हाही सांगावा ॥
श्रीज्ञानदेव हे श्रीविसोबा खेचर यांचे गुरू होते आणि श्रीविसोबा खेचर हे श्रीनामदेवांचे गुरू होते. सोऽहंसाधना करून झालेल्या अनुभवरूपी संचिताच्या गाठी सोडून श्रीज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहिली आहे, हे श्रीनामदेवांना माहीत होते. म्हणूनच ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या सन्मार्गदर्शक शब्दांत ज्ञानेश्वरीचे माहात्म्य त्यांनी गायले आहे. त्यांनी स्वत:देखील यौगिक अनुभव घेतल्यानंतरच अभंग लिहिण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या अनेक अभंगात यौगिक अनुभवांचे उल्लेख आहेत. म्हणूनच त्यांच्या प्रस्तुत अभंगाचे विश्लेषणही त्यातील यौगिक अनुभवांच्या खुणा समजून घेत करावे लागते. ॐकाराच्या मात्रांचे अर्थ व त्या अनुषंगाने त्यातील चंद्रभागा, गंगा, गोदा, भूमंडळ, पंढरीमंडळ इत्यादी शब्दरूपी खुणांनी निर्देशित केलेले यौगिक अनुभव सुसंगतपणे जाणून घ्यावे लागतात. परिणामी अध्यात्मशास्त्रातील किंवा गीता-ज्ञानेश्वरीतील सिद्धान्तच श्रीनामदेवांनी प्रस्तुत अभंगात व्यक्त केले आहेत, असे स्पष्ट होत जाते. खरे तर, श्लोक व ओव्यांमधली सत्ये संतांनी अभंगांमधूनही व्यक्त वा सूचित केलेली आहेत. म्हणूनच ‘एक तरी अभंग अनुभवावा । नामयाचा हाही सांगावा ॥’ आहे, असे मला वाटते.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
२. संतांची विधाने अर्थवाद वाक्ये नसतात
संतांची विधाने अतिशयोक्तीयुक्त आहेत किंवा अर्थवाद आहेत, असे म्हणू नये, असे संत-साहित्याचे एक गाढे अभ्यासक डॉ. रा. चिं. ढेरे यांनी म्हटले आहे. आपले हे मत पटवून देताना ते म्हणतात की, सत्संगरूपी तीर्थाचा महिमा सांगताना “महापुरुषांच्या साहचर्यात पापाचे नावसुद्धा उरत नाही, अवघे जगच महासुखाने दुमदुमून जाते, असे जे ज्ञानदेवांसारखा महामानव सांगतो आहे, ते केवळ अर्थवाद आहे, असे मानून चालणार नाही; तेव्हा ज्ञानदेव सांगताहेत, ते प्रतीतीचे सांगणे असल्यामुळे शंभर टक्के झळझळीत सत्य आहे, असे मानायलाच हवे; अगदी नि:संकोच मनाने मानायला हवे.” (पहा, श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पृष्ठे क्र. ३५७-५८)
गुरुंचा पुत्र मेला होता तो मी त्यांना परत जिवंत आणून दिला, असे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतो. यासारख्या वाक्यांना अर्थवाद म्हणून कमी लेखू नये, अशी जणू सूचनाच स्वत: श्रीज्ञानेश्वरांनीदेखील केली आहे. (ज्ञानेश्वरी, ३.१६३ व १९४-९६)
संतांच्या संगतीत देवाविषयीची ओढ तीव्र होत जाते. संत साधकांच्या पात्रतेनुसार त्यांना मार्गदर्शन करतात, अंतिम सत्ये उमगू लागतात तसतशी त्यांची प्रगती होते. म्हणून संतसंगती हाच देवभेटीसाठीचा मार्ग अवलंबा, असे श्रीज्ञानदेवांनी ‘हरिपाठात’ही उपदेशिले आहे.
थोडक्यात संत हितावह सत्ये सांगतात. त्याप्रमाणे अनुभव येतो. म्हणूनच श्रीनामदेवांनी केलेले पंढरपुराचे वर्णन समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत आहोत.
२.१ : अर्थवाद वाक्ये समजून घेण्याची रीत -
अर्थवाद वाक्यांबाबत थोडा विचार करणे आवश्यक होय. कारण त्यामुळे श्रीनामदेवांचा प्रस्तुत अभंग समजून घेण्यासाठी अनुकूल दृष्टिकोन तयार होईल. भूमंडळ नष्ट झाल्यानंतरही पंढरपूर उरते, असे श्रीनामदेवांनी पंढरपुराविषयीच्या अतीव प्रेमापोटी म्हटले आहे, असे म्हटले जाते. कारण, ‘भूमंडळ नष्ट होते’ आणि ‘पंढरी उरते’ या दोन विधानांत विरोध आहे. पंढरपूर हा भूमंडळाचाच एक भाग आहे. म्हणून भूमंडळ नष्ट होताना पंढरपूरही नष्ट होणार, हे उघड आहे. अर्थात ही दोन विधाने एकाच वेळी सत्य असू शकत नाहीत. पण संतांची वचने तर साक्षात्कारी वर्णने असतात, ती सत्य असल्याची अनुभवाने खात्री होते. म्हणूनच संतकृत अशा वाक्यांचा शब्दश: अर्थ घेऊन चालत नाही; तर त्यांचा अर्थ लक्षणानेच घ्यावा लागतो. (पहा, ‘भारतीय संस्कृति कोश’, खंड १, पृष्ठ क्र. २५४) अशा वाक्यांचा लक्ष्रार्थ घेतला नाही तर ती व उदा. प्रस्तुत अभंगातील इतर अनेक विधानेही अनाकलनीय वाटू लागतात आणि धर्मग्रंथातील अशा प्रकारची विधाने कशी सिद्ध करावयाची, हा प्रश्न भेडसावत राहतो.
उदा. गीता-ज्ञानेश्वरीत, मी सूर्याला उपदेश केला, हे विधान आहे. श्रीकृष्णाचे हे म्हणणे अर्जुनाला पटत नाही. तुम्ही व मी तर आताचे आणि सूर्य आपल्या फार आधीपासूनचाच आहे; मग तुम्ही त्याला उपदेश केला, हे कसे काय? ही आपल्याही मनात येणारी शंका अर्जुन व्यक्त करतो. पण नंतर समोर असलेला द्विभुज श्रीकृष्ण हा चतुर्भूजही आहे व त्याचे ते चतुर्भुज रूपही त्याच्याच विश्वरूपाचा एक अंश आहे, असे त्याच देवाने दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे त्याला दिसून येते. सूरदेखील त्या देवाच्या असीम प्रकाशमान स्वरूपात काजव्यासारखा त्याला दिसतो. केवळ चर्मदृष्टी होती तोपर्यंत अर्जुनाला श्रीकृष्णाचे म्हणणे पटत नव्हते; दिव्य ज्ञानदृष्टीने पाहिल्यावर मात्र त्याची शंका दूर होते. अशा प्रकारच्या साक्षात्कारी अनुभवानेच सिद्ध होऊ शकते, असे ते सत्य असल्याचे त्याला पटते. ते वाचकांनीही समजून घ्यावे म्हणूनच, देवाने आपले स्वरूप ज्ञानेंद्रियांना कळणार नाही, अशा स्वरूपाचे करून ठेवले आहे, असे ज्ञानेश्वरीत म्हटले आहे. (११.१५९)
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
२.२ : देवाची व संतांची भाषा समजून घ्यावी -
‘अंतराळातील सूर्य, ग्रह, तारे व धुमकेतू वगैरेंची व्यवस्था कुणा एखाद्या बुद्धिमान व शक्तिमान व्यक्तिच्या (बीईंगच्या) प्रभावी सल्ल्यानुसारच कार्यरत असू शकते’, हे शास्त्रज्ञ न्यूटन यांचे विधान वाचताना ‘मी चालवितो म्हणून सूर्य चालतो’, हे भगवान श्रीकृष्णाचे विधान आठवते. श्रीनामदेवांनीदेखील अशी विधाने केली आहेत. पांडुरंगाला उद्देशून ते एका अभंगात म्हणतात, “हे देवा, तुझ्या सत्तेमुळेच सूर्य चालत असतो, मेघ वर्षाव करत असतात व वायूला गती मिळत असते. हे वर्म जाणले म्हणूनच मी तुला शरण आलो आहे.”
देवाच्या अनेक विभूतींपैकी सूर्य ही एक विभूती आहे. सूर्य हे देवाने धारण केलेले एक रूप आहे. म्हणून आपल्यासारख्या सामान्य लोकांना न कळणाऱ्या अशा एखाद्या भाषेत देवाने सूर्याला उपदेश केला असणार, अशी श्रद्धा आपल्या ठिकाणी तयार होते.
‘चराचराचे जन्मस्थान’ असलेल्या देवाला सर्व देव-देवता, मनुष्य, सिद्ध, किन्नर किंबहुना हे स्थावरजंगमात्मक विश्व हर्षयुक्त होऊन नमस्कार करत आहे, असे अर्जुनाला श्रीकृष्णाच्या विश्वरूपाचे दर्शन झाले तेव्हा स्पष्ट होते. हेच सत्य ‘अव्यक्त निराकार नाही ज्यां आकार । जेथोनी चराचर हरिसी भजे ॥” या हरिपाठातील अभंगातूनही श्रीज्ञानेश्वरांनी व्यक्त केले आहे. ‘सृष्टीमध्ये असे काहीही वा कोणीही नाही की, जे अल्लाहचे स्तुतिगान करत नाही; पण तुम्हाला त्यांची भाषा समजत नाही’, असे प्रेषित मुहम्मद यांनीदेखील म्हटले आहे.
नमस्कार, भजन, स्तुतिगान हे शब्द आपल्या सर्वांना परिचित आहेत. या शब्दांचे संतमहात्म्यांना अभिप्रेत असलेले अर्थ कोणते? चराचरातील सर्व पशु, पक्षी, किडामुंगी व जीवजंतु वगैरे सारे देवाचे भजन करत असतील तर कसे? संतांप्रमाणेच लोक भजन करतात काय? नसतील तर संतांच्या गूढ भाषेचा अर्थ नेमकेपणाने समजून घेणे आवश्यक ठरते.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
त्याबाबत पुढील विधान सूचक होय : ‘इंग्रजी किंवा लॅटिन ही देवाची भाषा नाही, तर त्याची भाषा सेल्ल्युलर व मोलेक्युलर आहे’. वर्तमानकाळी मोबाईल फोन, संगणक वगैरेंचा मुबलक वापर केला जात आहे. म्हणून देव आपण बोलतो त्याहूनही आणखी वेगळ्या अशा भाषेत बोलला असेल, बोलत असेल व बोलेल, किंवा लोक बोलतात त्या हजारो भाषांतील कोणत्याही भाषेतून अनेक गूढ रहस्ये त्याने सांगितलेली असतील, असे समजणे चुकीचे ठरणार नाही. संतही देवाशी एका आगळ्यावेगळ्या भाषेत बोलत असतील, असेही प्रेषित मुहम्मद यांच्या विधानावरून सूचित होते.
आपण पंढरपुराबाबत सांगत आहोत, त्या शब्दरूपी खुणा संतांनाच कळतात, असे श्रीनामदेवांनीही म्हटले आहे. यावरून योगी व संत घेतात ते अनुभव आपणही घेत नाही, तोपर्यंत संतवाणीतील नमस्कार, भजन, स्तुती यासारख्या परिचित शब्दांचा बोध तर होत आहे, पण त्यांचे सकलार्थ मात्र आपल्याला उमगत नाहीत, असे आपल्याही लक्षात येऊन जाते.
३. भौगोलिक वर्णने ही आंतरिक विश्वाची निदर्शक - महायोगी श्रीअरविंद घोषकृत मार्गदर्शन
आपण अनुभवले तेच जगाला सांगत आहोत व आम्ही सांगत आहोत, ते तुम्ही आपल्या देहात शोधून पहा, असे अनुक्रमे श्रीतुकाराम व श्रीनामदेव यांनी म्हटले आहे. उदा. प्रस्तुत अभंगातील ‘चंद्रभागा’ हा शब्द एका यौगिक अनुभूतीची खूण आहे. अशा खुणांनी सांगितलेली सत्ये अनुभवावयाची असतात, असे मार्गदर्शन महारोगी श्रीअरविंद घोष यांनीही केले आहे. ते म्हणतात, “प्रयाग वगैरे भूपृष्ठांचे भौगोलिक वर्णन रूपकात्मक, अलंकारात्मक आहे. रोगाच्या एका मानसिक-शारीरिक-प्रक्रियेतील कसोटीचा अनुभव या रूपकाने सूचित होतो. भौगोलिक वर्णने (नावे) ही आंतरिक विश्वाची निदर्शक आहेत, असे पुराणेच सांगत आहेत.” (पहा, भारतीय संस्कृतीचा पाया, पृष्ठ क्र. १६३)
४. श्रीनामदेव हेदेखील आध्यात्मिक वारी करणारे एक संत व योगी होते
आपल्या ‘नाभिस्थानाच्या मागे जी अंत:करणाची पोकळी आहे, त्या पोकळीत कुंडलिनी नावाची नाडी आहे. ती जागृत होते व आपले तोंड उघडते. ती कुंडलिनी मूलाधार चक्रापासून ते थेट महाद्वारापर्यंत सरळ होते व तिच्यातून जीव वायूच्या अश्वावर आरूढ होऊन सुषुम्नामार्गाने वर चढतो आणि महाद्वारातून तो (मेंदूच्या पोकळीत असलेल्या) सहस्त्रदलकमलात जाऊन आत्मारामाजवळ जातो व देव बनतो,’ असे सद्गुरू श्रीहंबीरबाबा यांनी ‘जीवनकलेची साधना’ या स्वधर्मग्रंथात स्पष्ट केले आहे. (१०वी आवृत्ती, पृष्ठ क्र. ५०-५२)
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
..................................................................................................................................................................
तर अशा प्रकारे आपल्या देहात ‘मूलाधारचक्र ते सहस्त्रदलकमल’ या आध्यात्मिक वारीचा श्वासोच्छवास-निमिषोन्निमिष म्हणजे नित्य निरंतर अनुभव घेत असतात तेच योगी व संत असतात, असे श्रीज्ञानदेवांनी ‘आकाश हे असे’ अशी सुरुवात असलेल्या अभंगात म्हटले आहे.
सद्गुरू समर्थ श्रीहंबीरबाबांनी व संत श्रीज्ञानदेवांनी उल्लेखिलेली ही ‘देहभावरूपी गावापासून सुरू करून देवभाव प्राप्त होईपर्यंत करावयाची’ वारी श्रीनामदेवही करत होते, असे देव ‘सहस्त्रदळात आकाशाच्या परी । राहोनी शरिरीं शोभा दावी’त असतो, या त्यांच्या अभंगावरून सिद्ध होते. ते करत होते त्या आंतरिक वारीचे स्वरूप या पुस्तकाच्या सातव्या प्रकरणाच्या शेवटीही त्यांच्या आणखी एका अभंगाधारे स्पष्ट केले आहे.
सहस्त्रदलकमलात देव राहतो. त्याच्या सत्तेमुळेच इंद्रियांचे व्यवहार व शरिरांतर्गत सर्व क्रिया होत असतात. म्हणूनच देवास हृषीकेश म्हणतात. ‘हृषीकेश म्हणती माझिया स्वामीतें । चाळी इंद्रियातें म्हणोनिया ॥’, हा त्या अर्थाचा त्यांचा अभंग आहे. हृषीक् म्हणजे वृत्ती व ईश म्हणजे स्वामी (निरामक) होय. आपल्या अंतर्यामीचा देवच वृत्तीद्वारे आपल्या सर्व इंद्रियांना चालना, प्रेरणा देत आहे, असे ते आणि संत श्रीएकनाथही अनुभवत होते. अर्थात, आपल्या शरिरात असलेल्या आत्मारूपी नारायणामुळेच शरिराच्या व शरिरातील विविध हालचाली होत असतात; आपण बोलत, ऐकत असतो, असे सांगणाऱ्या श्रीतुकारामांप्रमाणे तेदेखील श्वासोच्छवास-निमिषोन्निमिष स्वदेहात देवदर्शनाचा आनंद घेत होते. देवच आपल्या देहात सारे काही करत आहे, हे जसे योगी अनुभवत असतात, तसे श्रीतुकारामही अनुभवत होते. देव आपल्या देहातच आहे, असे पटवून देताना ते म्हणतात, की जिभेलाच अन्न गोड, खारट किंवा फिके आहे ते कळत असते; हातांनाही मांस असते, पण त्यांना अन्नपदार्थांच्या विविध चवी कळत नाहीत; डोळ्यांनीच पाहता येते, मुखानेच बोलता येते, वास घेण्यासाठी नाक आहे तर ऐकता यावे म्हणून कान आहेत. आपल्या या एकाच देहात या भिन्न भिन्न कला देवाने निर्माण केल्या आहेत. अशा प्रकारे देवरूपी सूत्रधार आपला देहरूपी पुतळा नाचवत असतो.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ (२५० रुपये), ‘मायलेकी-बापलेकी’ (२९५ रुपये) आणि ‘कामगारांचे मानसिक आरोग्य’ (३०० रुपये) ही तीन ८४५ रुपये किमतीची पुस्तके भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.............................................................................................................................................................
डॉ. कानडे यांचे अनुमान :
श्रीनामदेवदेखील आपल्या अंतर्यामी असलेल्या देवाचा असा अनुभव घेत होते. त्याबाबत त्यांना त्यांच्या सद्गुरुंनी मार्गदर्शन केले होते. ‘गुरुकृपेनंतर नामदेवांनी योगमार्गाचीही काही उपासना केली असावी’ व ‘पदपिंडविवर्जित केला नामा’ या शब्दात त्यांचा योगानुभव दिसून येतो’, असे डॉ. कानडे यांनीही अनुमानिले आहे. (‘संतांची हे भेटी’, पृष्ठ क्र. ७५)
डॉ. पेंडसे यांचा साधार निष्कर्ष :
श्रीनामदेवांना त्यांच्या सद्गुरुंनी ‘पदपिंडविवर्जित केले’ म्हणजे काय ते डॉ. शं. दा. पेंडसे यांनी पुढीलप्रमाणे साधार स्पष्ट केले आहे -
श्रीसद्गुरू सत्शिष्याच्या मस्तकावर हात ठेवून शक्तिपात करतात म्हणजे शक्तिसंक्रमण करतात. “शक्तिपात हा एक पारिभाषिक शब्द आहे. शक्तिपाताने विदेह स्थितीचा अनुभव येतो. देहातील निर्गुण परमात्मवस्तूशी जीवात्मा एकरूप होतो. बाह्य जगाशी इंद्रियांचा संबंध त्या अवस्थेत राहात नाही. ज्ञानेंद्रियांना भिन्नत्वाने विषय न होणारी अशी ती अतींद्रिय अवस्था आहे. या अवस्थेत मी ब्रह्म आहे अशी जाणीवही नसते. म्हणून ‘पदपिंडविवर्जित’ या शब्दाचा, ‘पद म्हणजे ब्रह्म व पिंड म्हणजे जीव, हे जीवभाव व ब्रह्मभाव दोन्ही घालवून केवळ ब्रह्म केले, कैवल्यपदावर बसविले’, असा अर्थ वै. पांगारकरांनी केला आहे.”
श्रीज्ञानदेवांनी ही अतींद्रिय स्थिती श्रीविसोबा खेचर यांना दिली होती व सद्गुरू श्रीविसोबांकडून ती श्रीनामदेवांना प्राप्त झाली होती. डॉ. पेंडसे यांनी पुढे शिव, विष्णुरूपी मत्स्येंद्र, गोरक्ष, गहिणी, निवृत्ती, ज्ञानदेव, विसोबा व नामदेव अशी गुरुपरंपराही उल्लेखिली आहे. अशा प्रकारे योगशक्तीचे संक्रमण फार प्राचीन काळापासून अधिकारी पुरुषाकडून अधिकारी पुरुषाकडे होत आले आहे आणि आपल्या विश्वव्यापक अविनाशी स्वरूपाची अनुभूती घेतलेल्या सत्पुरुषांची परंपरा या देशात अखंड टिकली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
विशेष म्हणजे ‘विसोबांच्या अनुग्रहामुळे नामदेवांच्या जीवनात क्रांती झाली. आजपर्यंत ते केवळ भक्त होते. पण यौगिक शक्तीच्या संचारामुळे सर्वत्र सम असणाऱ्या निर्गुण निराकार चिन्मय परमात्मतत्त्वाची त्यांना अनुभूती आली. त्यामुळे साम्य अवस्थेस पोचलेले ते योगीही झाले’, असा जणू ‘श्रीनामदेव हे एक योगीही होते’ या माझ्या म्हणण्याला पुष्टी देणारा निष्कर्षही त्यांनी व्यक्त केला आहे. (पहा, ज्ञानदेव आणि नामदेव, पृष्ठ क्र. ३२४ व ३२७)
श्री. शेणोलीकर यांचे पुष्टीदायक स्पष्टीकरण :
श्रीनामदेवांच्या ठिकाणी ज्ञान आणि योग तसेच ज्ञान आणि भक्ती यांचा सुरस संगम आढळतो. तसेच, विठ्ठलाच्या सगुण भक्तिवरच निर्भर राहून तीत तल्लीन होणारे नामदेव आपल्या आयुष्याच्या अखेरच्या पर्वात भारतात उत्तरेकडे गेले आणि निर्गुण-मताचे प्रवर्तन करण्याइतके विशालहृदयी झाले. या मतांची नोंद ‘नामदेव गाथा’ या पुस्तकात श्री. शेणोलीकर यांनीही केली आहे. (पहा, पृष्ठ क्र. १३८-१४१)
श्रीनामदेव व श्रीजनाबाई या गुरुशिष्यांनी योगानुभव वर्णिले आहेत :
खरे तर श्रीनामदेव हे एक योगी संत होते, असे स्पष्ट किंवा सूचित करणारे त्यांचे शेकडो अभंग आहेत. अनेक यौगिक अनुभवांचे मार्गदर्शक वर्णन त्यांनी करून ठेवले आहे. त्याशिवाय खेळिया, मुंगी, पांखरू, स्वप्न, घोंगडे या रूपक-अभंगांमधूनही काही गूढ गोष्टी उल्लेखून त्या अनुभवा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. श्रीजनाबाई या त्यांच्या सत्शिष्या होत्या. त्यांनीही आपल्या अभंगांमधून योगानुभवांच्या काही खुणा व्यक्त केलेल्या आहेत.
आपल्याला देव भेटत असतो याचा श्रीनामदेवांना अभिमान वाटत होता. पण, स्वत:चे व देवाचे सर्वव्यापी स्वरूप त्यांना अवगत झाले नव्हते. श्रीज्ञानदेवादि संतांच्या सहवासात आल्यानंतर त्यांचा गर्वपरिहार होतो. त्याबाबत त्यांनी उद्बोधक अभंगही लिहिले आहेत. त्यावरून, जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही, तोपर्यंत देवाचे सर्वव्यापक स्वरूप कळत नाही व तोपर्यंत ब्रह्मबोली बोलणे’ही योग्य नसते, असे स्पष्ट होते. हरिभक्त झाला तरी आपल्या ‘आतली सोय’ (म्हणजे देवच आपल्या देहात कार्यरत आहे हे) अनुभवास येण्यासाठी सद्गुरू करणे आवश्यक ठरते. सद्गुरुकृपेशिवाय आत्मज्ञान होत नाही व आत्मज्ञान झाल्याशिवाय संतपण येत नाही, असेही त्यांनी आत्मचरित्रपर अभंगात म्हटले आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
स्वदेहातच आत्मारूपी देवाचे ज्ञान साध्य केलेले असते तेच खरे योगी वा संत असतात, हा श्रीज्ञानेश्वरांनी सांगितलेला सिद्धान्तही आपण यापूर्वी पाहिला आहे. थोडक्यात, योग्यांची माउली असलेल्या संत श्रीज्ञानेश्वरांच्या सहवासात राहून श्रीनामदेवही एक परिपूर्ण योगी व संत होऊन गेले होते.
५. ओव्या-अभंग लिहून ठेवण्यामागील संतांची भूमिका
योगी होऊन भक्ती करत राहणे हे सर्वोत्तम ध्येय होय. ते, रोग साधून भक्ती करण्याची रीत दाखवून देणारे श्रीज्ञानदेव धन्य होत, या अर्थाच्या अभंगातून श्रीनामदेवांनी व्यक्त केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गृहस्थाश्रमी अर्जुनाला ‘तू योगी हो!’ असा उपदेश केला आहे. देवाशी एकरूपता अनुभवतो तो योगी असतो. असा योगी होण्यासाठीची प्रेरणा देत राहणे हे खरे पारमार्थिक कार्य होय. संत ते करत असतात. ‘जीव-जगत्-जगदीश्वर यांच्या नात्याविषयी त्यांना शब्दपांडित्य करायचे नसते, तर त्या नात्यातले एकत्व आपल्या जीवनात अनुभवायचे असते. त्यांना मंदिरे हवी असतात; पण ती आपल्या जीवनात देवत्वाची प्रतिष्ठापना करण्याची प्रेरणा जागी ठेवण्यासाठी’, अशा शब्दात संतांची ती भूमिका डॉ. रा. चिं. ढेरे यांनी व्यक्त केली आहे. (पहा, श्रीविठ्ठल : एक महासमन्वय, पृष्ठे क्र. ३५२-३५३)
संतांच्या सहवासात कथाकीर्तन करत व रामनाम जपत राहिले की, देवच आपले संपूर्ण शरीर व्यापून राहतो व (अशा प्रकारे) आपला विसर पडू देत नाही, असे श्रीतुकारामांनी म्हटले आहे. संतांनी आपल्या जीवनात देवत्वाची प्रतिष्ठापना केली होती. देव आपल्या शरिरात अविरत कार्यरत आहे, असे ते अनुभवत होते. म्हणूनच ते नियमितपणे व नित्यनेमाने भक्ती करू शकत होते.
..................................................................................................................................................................
लेखक विजय बाणकर अकोले महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक आहेत.
vijaymaher@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2024 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment