अजूनकाही
आज आषाढी एकादशी. त्यानिमित्त हा लेख...
..................................................................................................................................................................
पंढरीसी जावे ऐसे माझे मनी ।
विठाई जननी भेटे केंव्हा॥
न लगे त्याविण सुखाचा सोहळा ।
लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय ।
मग दुख जाय सर्व माझे॥
पंढरीला जाण्याची, विठ्ठलाला पाहण्याची किती आस लागली आहे, ती वाचणाऱ्याच्या मनात इतकी रुजते, तर लिहिणाऱ्या तुकोबात किती असेल!
दरवर्षी या काळात वेध लागतात ते पालख्यांचे, वारीचे आणि पंढरपूरचे! ‘पंढरपुरा जावे’ हेच स्वप्न, भावना सगळ्या संतांच्या मनी सदैव असल्याचे दिसते. या वर्षी करोनामुळे परिस्थिती सामान्य नाही आणि सरकारनेही तेच धोरण राबवले आहे. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याला अजूनच हुरहूर लागली आहे. पालखी म्हणजे उत्साह, स्वागत, हुरूप, भक्ती, आनंद!
पण पंढरीला जाणं म्हणजे नेमकं काय, हे आपण कितीदा समजून घ्यायचा प्रयत्न करतो? चार महिने घरात बसावं लागलं की, डोकं फिरतं. एरव्ही आपणच म्हणतो देव माणसात आहे, माझ्यात आहे; तेव्हा त्याला भेटायला बाहेर जायची गरज आहे? डोक्याला बुक्का अथवा टिळा लावला की, वारकरी होतो का? वारकरी होणं म्हणजे नेमकं काय?
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
असे अनेक संत, योगी होऊन गेले, जे कधीही मंदिरात गेले नाही. त्यांनी मंत्रपठण-होमहवनही केलं नाही, तरीही त्यांना ईश्वराच्या अगदी जवळच स्थान मिळालं, ते ईश्वरमयी होऊन गेले.
भक्ती करण्यासाठी बाहेर जाण्याऐवजी आपल्याच अंतर्मनात जाण्याची गरज आहे.
आयुष्य इतकं वेगवान झालं आहे की, आम्ही विचार खूप करतो, पण विचारांवर विचार करायला वेळ नाही. मनात आलं की टाकलं सोशल मीडियावर, मनात आलं की केलं ट्रोल. मनात आली की वासना, मनात आला की कामभाव, मनात आलं की बहिष्कार, मनात आला की मैत्रभाव.
किती विचार करून आपण आपली कृती करतो? खरं तर आपणच आपल्यात नकारात्मकतेची बीजं पेरत आहोत. म्हणून सध्याचा काळ ही संधी मानून आपण दुसऱ्याचं सोडून स्वतःचंच अवलोकन केलं, तर नक्कीच पंढरीला पोहचू.
पंढरी, विठ्ठल, एकूणच मंदिर आणि देव या संकल्पना का आल्या? संसारातल्या विकारांना अजून प्रबळ करण्यासाठी की त्यातून बाजूला येऊन मूळ पुरुष म्हणजेच आत्म्याचे (हाचि देव, असं संत सांगून गेले, इथे स्त्री-पुरुष नव्हे) दर्शन करण्यासाठी? जर या कारणासाठी देव ही संकल्पना असेल तर मग पंढरीला जाऊन आपण काय मागतो? मुलं-बाळं, सत्ता-संपत्ती, यश-कीर्ती, सहचर (life partner), अडी-अडचणीतून (आयुष्यातील लहान-मोठे संसारी प्रश्न) मुक्ती! हे सारं संसारी आहे; संसारातले काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आदि विकार घेऊन येणारं आहे.
मग काय कामाची पंढरी, काय कामाचा विठ्ठल, जीव गेला टाळ कुटण्यात, नाही भेटला परमेश्वर! ज्ञानोबा, तुकोबा, जना, बहिणा,... नावांची यादी मोठी, ती घेण्यात कोणताच लाभ नाही. त्याहून अधिक लाभ हा त्यांनी सांगितलेला मार्ग डोळसपणे समजून घेणं आणि अनुसरणं यात आहे.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
हीच पंढरी आणि हाच विठ्ठल आहे. ‘जया नाही भेद-अभेद, जया नाही मान-अपमान, जेथे नाही सुख-दुःख, जेथे नाही मोह-मत्सर, जया नाही क्रोध-हिंसा, तोचि जाय पंढरपुरा, तया जडे संग विठ्ठलाचा!’ सध्याची परिस्थिती पाहून तुकारामांच्या ओळी आठवतात,
घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान । परि मेळवण बहु माजी ।।
नीरे कोणापाशी होय एक रज । तरि द्या रे मज दुर्बळासी ।।
आशा तृष्णा माया कालवूनि दोन्ही । दंभ तो दुरोनि दिसतसे ।।
काम क्रोध लोभ सिणवी बहुत । मेळवूनि आत काळकूट ।।
निंदा अहंकार द्वेष बहू फार । माजिवरी धूर सारियेला ।।
तुका म्हणे तेथे काही हाता नये । आयुष्य मोले जाये वायावीण ।।
संतांनी दाखवलेला पंढरीचा, पांडुरंगाचा हाच मार्ग आहे.
दरवर्षी वारीच्या नियोजनावर कोट्यवधी रुपये खर्च होतात. पण विठ्ठलाची खरी भेट (मनात नाना विकार ठेवून) होते का? मग वारीची प्रथा अनिष्ट आहे का? वारी गरजेची आहे?
पण वारी म्हणजे काय हे समजून घेणं आणि त्यानुसार वागणं अधिक गरजेचं आहे. आपल्यातल्या विकारांवर दुसऱ्याला नियंत्रण करू न देता, त्याचा ताबा आपणच घेऊन संसाराचं निवारण करणं म्हणजे वारी.
मनाचा गाभारा पंढरपूर आहे आणि त्यातला आत्मा (श्वास चालू असलेला जीव नव्हे) हाच विठ्ठल आहे. भक्ती हा आत्म्याला भेटण्याचा सर्वांत सोपा मार्ग आहे असं विवेकानंद म्हणाले आहेत. पण भक्ती म्हणजे विकारांच्या आधीन जाऊन केलेलं मंत्रपठण किंवा पूजाअर्चा नाही, तर आपल्या विकारांवर आपलं अधिपत्य ठेवून आत्म्या (देव, ईश्वर)चा जप करणं आहे, विकारांऐवजी विठ्ठलाच्या चरणी एकाग्र होणं.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल.
सवलत योजना फक्त ५ जुलै २०२३पर्यंत.
वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
................................................................................................................................................................
आज न उद्या पंढरीला शरीररूपानं जाताही येईल, विठ्ठलाची मूर्ती डोळा भरून पाहताही येईल; पण खरंच त्या अद्वैताची गाठभेट होईल? विचार करायला हरकत नाही!
राहो मुखी तुझे नाम,
अंतरी शुद्धीचा आग्रह,
झडो मायेचे विकार,
तुजकृपे।
भेट घ्यावी वाटे मज,
मनी तुझा वसे ध्यास,
शिंपडुनी गोमूत्र,
घे पवित्र करून।
दाव पंढरी कैसी तुझी,
डोळा आस सोहळ्याची,
जावो अवघेचि विरघळूनि,
कशा तुझा-माझा भाव!
..................................................................................................................................................................
लेखिका तृप्ती चव्हाण या Data Scientist आहेत.
chavantrupti89@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment