अजूनकाही
कादंबरीची दृश्यात्मकता सिनेमा किंवा सिरिअलपेक्षा निराळी असते. त्यामुळे तिला ‘सदर कलाकृतीतील पात्रं पूर्णतः काल्पनिक असून प्रत्यक्षात किंवा वास्तवात अशी पात्रं आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा’ अशा डिस्क्लेमर नोटची काही गरज नसते. वाचक आपापल्या नजरेनं ही दृश्यात्मकता रचत असतो. परंतु कधी कधी कादंबरीत देखील वास्तव आणि कल्पना यांची इतकी सरमिसळ होते की, ‘फिक्शन’बद्दलच शंका वाटू लागते. शेहान करुणतिलका या श्रीलंकन लेखकाची ‘चायनामन’ ही कादंबरी अशाच पद्धतीनं फिक्शनॅलिटीलाच आव्हान देते. वास्तव आणि कल्पना यांच्या सीमारेषेवर झुलत राहणारी ही कादंबरी अखेरपर्यंत चकवा देत राहते.
प्रदिप एस्. मॅथ्यू नामक लिजेंडरी श्रीलंकन गोलंदाजाच्या आयुष्यावर आधारित ही कादंबरी आहे. ८०च्या दशकात उदयाला आलेला हा गोलंदाज श्रीलंकेसाठी केवळ ७ कसोट्या व २७ एकदिवसीय क्रिकेट सामने खेळला. ‘चायनामन’ म्हणजेच लेफ्ट आर्म स्पिन – ज्यात मनगटाचा कौशल्यानं वापर केला जातो. ही प्रदिप मॅथ्यूची खासीयत असते. त्याचबरोबर तो दोन्ही हातांनी (लेफ्ट आर्म/राईट आर्म) गोलंदाजी करू शकतो. तब्बल बारा प्रकारे चेंडू वळवण्याची जादू त्याच्याकडे असते आणि ‘डबल बाउन्स’ नावाचे त्याच्याकडे एक अमोघ शस्त्रही असतं. जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज बनण्याची सर्व कौशल्यं जवळ असूनही प्रदिप मॅथ्यू १९९५ च्या आसपास एकाएकी गायब झालेला असतो. एवढंच नाही तर अशा प्रतिभावान गोलंदाजाबद्दल खुद्द श्रीलंकेतच कोणाला फारसं ठाऊक नसतं.
डब्ल्यू. जी. करुणसेना हा या कादंबरीचा निवेदक. डब्ल्यू. जी. एक निवृत्त क्रीडा पत्रकार आहे. क्रिकेटबद्दलची खडान खडा माहिती असणाऱ्या डब्ल्यू. जी.ची कारकिर्द फार काही यशस्वी नाही (आर्थिकदृष्ट्या तर नाहीच नाही). सतत ताडीच्या नशेत धुंद असणारा डब्ल्यू. जी. आयुष्याच्या उत्तरार्धात विकल झालेला असतो. त्याचं लिव्हर निकामी होऊ लागलेलं असतं. डॉक्टर त्याला अल्टीमेटम देतात आणि आयुष्याच्या संध्याकाळी डब्ल्यू. जी. अचानक गायब झालेल्या प्रदिप मॅथ्यूच्या ध्यासानं पछाडला जातो. डब्ल्यू. जी.ने प्रदिप मॅथ्यूच्या हातातली जादू प्रत्यक्ष पाहिलेली आहे. त्यामुळे त्याला प्रदिप मॅथ्यूच्या आयुष्यावर पुस्तक लिहायचं आहे. ते लिहिण्यासाठी डब्ल्यू. जी. प्रदिप मॅथ्यूचा आणि त्याच्या अचानक गायब होण्याचा शोध सुरू करतो. त्या शोधाबद्दलची ही कादंबरी.
या शोधासाठी डब्ल्यू. जी. श्रीलंकन क्रिकेट बोर्डातील पदाधिकाऱ्यांपासून प्रदिप मॅथ्यू माहीत असू शकेल, अशा सर्व व्यक्तींपर्यंत जाऊन पोहोचण्याचं ठरवतो. क्रिकेट बोर्डाकडून सहज माहिती उपलब्ध होईल, अशा भ्रमात असणाऱ्या डब्ल्यू. जी. ला पहिला धक्का बसतो, जेव्हा पदाधिकारी त्याला प्रदिप मॅथ्यू नावाचा कोणी खेळाडू श्रीलंकेसाठी खेळल्याचं माहीत नसल्याचं सांगतात तेव्हा. सहज सोपा वाटणारा प्रदिप मॅथ्यूचा शोध डब्ल्यू. जी.साठी इथून पुढे कमालीचा त्रासदायक (आणि वाचकांसाठी कमालीचा उत्कंठावर्धक) ठरतो.
डब्ल्यू. जी. बरोबर काम करणारा सांख्यिकी तज्ज्ञ व डब्ल्यू. जी.चा मित्र अॅरी यानेदेखील प्रदिप मॅथ्यूच्या गोलंदाजीची जादू अनुभवली आहे. क्रिकेटची जाणकारी असणारा या दोघांचा अजून एक मित्र आहे, ग्राहम स्नो… इंग्लंडचा भूतपूर्व क्रिकेट कॅप्टन आणि क्रिकेट कॉमेंटेटर. त्यालाही प्रदीपच्या जादुई गोलंदाजीबद्दल माहिती आहे. प्रदीपने श्रीलंकन क्रिकेटच्या भवितव्याबद्दल आपलं मत व्यक्त करणारं आयसीसीला लिहिलेलं एक पत्र स्नोकडे आहे. त्यामुळे प्रदिपच्या जीवनावर एक डॉक्युमेंटरी बनवावी अशी स्नोची इच्छा आहे. त्यासाठी त्याने डब्ल्यू. जी.ला फंड उपलब्ध करून दिला आहे.
हा प्रस्ताव घेऊन डब्ल्यू. जी. जेव्हा श्रीलंकन टीव्ही चॅनेलकडे जातो, तेव्हा प्रदीपचं नाव ऐकल्याबरोबर त्याला नकार दिला जातो. शेवटी सर्वोत्कृष्ट श्रीलंकन क्रिकेटपटूंवर डॉक्युमेंटरी बनवण्याचं ठरतं, ज्यात डब्ल्यू. जी. अखेरच्या भागात प्रदिपबद्दलची माहिती शूट करतो. ज्या दिवशी ही डॉक्युमेंटरी टीव्हीवर प्रसारित होते, त्यावेळी अचानक श्रीलंकेत बहुतांश ठिकाणची लाइट जाते. त्यानंतर पुन्हा कधीही या डॉक्युमेंटरीचं प्रसारण होत नाही. प्रदीपची कामगिरी आणि डब्ल्यू. जी.ची डॉक्युमेंटरी अशा प्रकारे त्याच्या मित्रपरिवारापुरतीच मर्यादित राहते.
प्रदीपचा कोच कोण असावा, त्याला ओळखणारे अजून कोणी आहेत का, त्याच्या घरचे कुठे असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रदिप अचानक का व कुठे गायब झाला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी डब्ल्यू. जी. शेवटी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात देतो. माहिती देणाऱ्यास बक्षीसही जाहीर करतो. मग एका मागून एक नमुनेदार पात्रं प्रदिपबद्दल माहिती असल्याचं सांगून डब्ल्यू. जी.ला भेटायला येऊ लागतात. या सगळ्या माहितीतून तुकड्या-तुकड्यातून प्रदिप आपल्यासमोर प्रकट होऊ लागतो. त्यातून मग वाचकाला प्रदीपचा कोच, त्याची बहीण, मैत्रीण, त्याच्याबरोबरचे ज्युनियर खेळाडू, त्याच्या ओळखीचा डॉन अशा अनेक लोकांची जंत्री भेटत राहते.
या सर्व तुकड्यांतून काही गोष्टी स्पष्ट होत जातात. प्रदिप मॅथ्यू हा एक स्पष्टवक्ता खेळाडू होता. तो वरिष्ठांची भीडभाड ठेवत नसे. तो शेफाली नावाच्या एका मुलीच्या प्रेमात आकंठ बुडालेला होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो श्रीलंकन तामिळ होता. त्यामुळे प्रदीपच्या गायब होण्यापाठीमागे तत्कालीन श्रीलंकेतील तामिळ-सिंहली संघर्षाची एक गडद किनार आहे. श्रीलंकन क्रिकेट नुकतंच कुठं बाळसं धरू लागलं आहे. १९९६ चा विश्वविजय आणि त्यापाठोपाठचा सुवर्णकाळ अजून यायचा आहे. याच कालखंडात श्रीलंकन क्रिकेटला बेटिंगची कीड लागलेली आहे. प्रदिप मॅथ्युसारख्या खेळाडूनं बेटिंगच्या मोहापायी क्रिकेटचा बळी द्यायला नकार दिलेला आहे. असं असलं तरी प्रदीपचे आणि श्रीलंकन अंडरवर्ल्डचे जवळचे संबंध आहेत. तो एलटीटीईच्या संपर्कात आहे. असे प्रदिपबद्दलचे अनेक पैलू समोर येऊ लागतात. अशा तऱ्हेनं प्रदीपचा शोध घेता घेता ८०-९०च्या दशकातील राजकीयदृष्ट्या अशांत आणि अस्थिर असणाऱ्या श्रीलंकन समाजव्यवस्थेचं एक भेदक चित्र आपणासमोर उभं राहू लागतं.
प्रदीपचं न्यूझीलंडमध्ये अपघाती निधन झाल्याची एक बातमी डब्ल्यू. जी. पर्यंत येऊन पोहोचते. प्रदिपबद्दलची जशी माहिती पोहोचत गेली, तशी डब्ल्यू. जी.ने कादंबरीत लिहून काढली आहे. पण डब्ल्यू. जी. च्या पुस्तकाचा शेवट अजून लिहून व्हायचा आहे आणि या टप्प्यावर डब्ल्यू. जी.चं लिव्हर त्याला दगा देतं. प्रदिप आपणाला प्रत्यक्ष भेटला आहे, आपल्याशी बोलतो आहे असे भास अनुभवत डब्ल्यू. जी. जगाचा निरोप घेतो.
डब्ल्यू. जी. च्या निधनानंतर जगभर फिरणारा त्याचा मुलगा, गॅरफिल्ड श्रीलंकेला परत येतो. वडलांच्या स्टडीमध्ये प्रदिप मॅथ्यूचं हस्तलिखित त्याच्या हाती पडतं. ते वाचून गॅरफिल्ड चक्रावून जातो. कोण आहे हा प्रदिप मॅथ्यू? शोध घेण्यासठी तो गुगल सर्च करतो. प्रदीपच्या कारकिर्दीचा आढावा घेणारी क्रिकेपेडिया नावाची एक आणि प्रदिप मॅथ्यूच्या नावाची एक वेबसाईट त्याला सापडते. वडलांचे मित्र अॅरी यांच्याकडे तो प्रदिपबद्दल चौकशी करतो. त्यांच्याकडून प्रदिपबद्दल ऐकल्यानंतर पछाडून जाण्याची पाळी गॅरफिल्डची येते. प्रदिप प्रकरणाचा छडा लावायचाच आणि वडलांचं पुस्तक पूर्ण करायचंच अशा ध्येयानं भारावलेला गॅरफिल्ड प्रदिपला शोधत शोधत न्यूझीलंडला येऊन पोहोचतो आणि कादंबरी एका रोमांचक टप्प्यावर येऊन पोहोचते.
डब्ल्यू. जी. आणि गॅरफिल्डप्रमाणे आपण वाचकदेखील प्रदिप मॅथ्यूच्या गूढ आणि अगम्य व्यक्तिमत्त्वानं त्रस्त होतो. या दोघांप्रमाणे आपणालाही प्रश्न पडत राहतात, प्रदिपचं खरंच निधन झालं आहे काय, तो न्यूझीलंडला का निघून गेला, प्रदिपबद्दल श्रीलंकेत कोणालाच काहीही कसं माहीत नाही, एक क्रिकेटपटू म्हणून, एक उत्कृष्ट चायनामन म्हणून प्रदीपची कागदोपत्री कुठेही कशी नोंद नाही, गॅरफिल्डला न्युझीलंडमध्ये प्रदिप खरंच भेटतो का आणि खरं म्हणजे प्रदिप मॅथ्यू नावाचा असा कुणी खेळाडू अस्तित्वात तरी होता का?
अर्थात यातील बहुतांश प्रश्नांची उत्तरं आपणाला कादंबरीत नक्कीच सापडतात. त्यामुळे कादंबरी अगदी शेवटच्या पानापर्यंत वाचनीय बनते. पुन्हा या सगळ्या कथनाला नर्म खुसखुशीत विनोदाची जोडही आहे. कादंबरी क्रिकेटबद्दलची आहे आणि त्यामुळे कादंबरी समजण्यासाठी क्रिकेटची प्राथमिक माहिती असणं गरजेचं आहे असं बिलकुल नाही. निवेदकानं वेळोवेळी छानपैकी चित्रं काढून अगदी विकेट म्हणजे काय, पिच म्हणजे काय, क्रिकेट बॅाल कसा असतो, गोलंदाजीचे वेगवेगळे प्रकार कोणते वगैरे गोष्टी समजावून दिल्या आहेत. अशी तांत्रिक माहिती वाचतानादेखील कादंबरीच्या एकूण लयीचा कुठेही रसभंग होत नाही, हेही इथं आवर्जून नोंदवावं लागेल.
शेहान करुणतिलका यांची ही पहिलीच कादंबरी. क्रिकेटचं रूपक वापरून श्रीलंकेतील अशांत दशकांचा लेखक शोध घेऊ पाहतोय हे सुस्पष्ट आहे. स्वाभाविकपणे प्रदीपच्या अनुषंगानं कादंबरीत अजूनही काही उपकथानकं येतात. पण हे करत असताना ‘प्रदिप मॅथ्यूचा शोध’ हा कादंबरीचा मेन फोकस कुठेही ढळत नाही, हे विशेष.
शेवटी वाचकाच्या मनात फिरून फिरून उरतो तो एकच प्रश्न, प्रदिप मॅथ्यू नावाचा खरंच कोणी श्रीलंकन खेळाडू होता? निम्मी अधिक कादंबरी वाचून झाल्यावर वाचकांनादेखील गॅरफिल्डप्रमाणे गुगल सर्च करून पाहावं असं वाटू शकतं. गुगल आपणाला प्रदिप मॅथ्यूबद्दलचे तीन पत्ते सांगतं- १) pradeepmathew.com, २) crikipedia आणि ३) ‘क्रीडा’ नावाचं श्रीलंकन पत्रक. या ठिकाणी आपणाला प्रदिपबद्दलची माहिती, त्याचे धुसर दिसणारे (पण क्रिकेट खेळतानाचे) फोटो, ‘क्रीडा’मध्ये छापून आलेले प्रदीपबद्दलचे लेख आदी मजकूर पहायला–वाचायला मिळतो.
आता यात गमतीचा भाग असा आहे की, प्रदिपबद्दल ज्या पत्रकाराने लेख लिहिले आहेत, त्याचं नाव आहे डब्ल्यू. जी. करुणसेना (म्हणजे कादंबरीचाच निवेदक). तर pradeepmathew.com किंवा crikipedia या संकेतस्थळांवर प्रदिप मॅथ्यूबद्दलची माहिती वगळल्यास अन्य पानांवर ‘Error 404 Page Not Found’चा इशारा मिळतो. सहज कुतूहल म्हणून ज्या कसोटी सामन्यांचं वर्णन कादंबरीत आलं आहे, त्या वर्षातील श्रीलंकन क्रिकेट टीमचा तपशील मीही शोधून पाहिला. पण तिथंही कुठे प्रदीप मॅथ्यू हे नाव वाचायला मिळत नाही. प्रदीपची व्यक्तिरेखा अजून विश्वासार्ह बनवण्यासाठी कादंबरीमध्ये मुबलक छायाचित्रंही पाहायला मिळतात. उदा. स्वतःला प्रदीपचा कोच म्हणवून घेणारा दारूच्या मोबदल्यात डब्ल्यू. जी.ला मुलाखत देतो. त्या वेळचा फोटो आपणाला पहायला मिळतो किंवा स्वतःला प्रदीपची बहीण म्हणवून घेणारी फोटो द्यायला नकार देते, त्यावेळी आलेला केवळ तिच्या हाताचा फोटोही पाहायला मिळतो. प्रदीप मॅथ्यूबद्दलचा गोंधळ अजून वाढवून ठेवण्यासाठी लेखकानं कादंबरी सुरू होण्यापूर्वीच एक प्रश्न विचारला आहे- “If a liar tells you he is lying, is he telling the truth?”
त्यामुळे प्रदीप मॅथ्युची प्रतिमा आभासी की वास्तव या प्रश्नाचं उत्तर काहीही असो, त्याचं तुकड्या तुकड्यातून घडत जाणारं दर्शन, त्याच्यायोगे घडणारं तत्कालीन श्रीलंकन समाजव्यवस्थेचं दर्शन, खुमासदार विनोद आणि अफलातून निवेदन तंत्र हे सारंच उत्कट आहे हे नक्की.
चायनामन : दि लिजंड ऑफ प्रदीप मॅथ्यु –शेहान करुणतिलका. पृष्ठे - ५२६, मूल्य ३९९ रुपये.
लेखक इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात.
nitin.jarandikar@gmail.com
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment