अजूनकाही
कोविड-१९ या विषाणूने लेखकांना खूप फुरसत दिलेलीय. कोंडमारा, घुसमट, दडपशाही यांचा काळ फार सर्जनशील असतो. कितीतरी अफाट अन अचाट कल्पना सुचतात त्यात. सत्ताधाऱ्यांना अशा कधी आपण केलेल्या दडपशाहीतून तर कधी आपसूक तयार झालेल्या कोंडीतून जे साहित्य प्रसवते, त्याची फार धास्ती असते. ते बारीक लक्ष ठेवून असतात. या लोकांच्या कल्पनांमधून काय बाहेर पडेल व आपला घास घेऊन टाकील याने तमाम सत्ताधारी (अर्थातच एकाधिकारशाही, हुकूमशाही वृत्तीचे) काळजीत पडलेले असतात. यापुढचे उत्तम साहित्य काश्मिरी असेल का? कित्येक वर्षे या राज्याने मुस्कटदाबी अन दहशत सोसलेली. त्यात गेली १० महिने आणीबाणीसदृश परिस्थिती. समजा लेखक-कवी लिहू लागले तर केवढे दाहक, दु:खी अन दीप्तीमान असेल ते!
पण काही लेखक तसे वातावरण सभोवती नसताना केवळ कल्पनेद्वारे अशा भयंकर जगाची उभारणी करतात की, ते बनावट वाटू लागते. ‘छे! असे कधी घडेल का?’, ‘असे होऊच शकणार नाही’, असे म्हणत त्या लेखकाची वाट लावण्यास वाचक मागेपुढे बघत नाहीत. आता २०१७ साली कुणी विषाणूच्या विश्वव्यापी विध्वंसाची कल्पना केली असती तर असेच झाले असते. ही तर विज्ञानकथा किंवा हे भयकथेचे एक उदाहरण म्हणून त्याकडे बघितले गेले असते. ‘टेंडर इज द फ्लेश’ या कादंबरीची अशीच वासलात लागली असती. ऑगस्टिना बझ्तेरिका यांनी २०१७ साली स्पॅनिश भाषेत लिहिलेली ही कादंबरी मात्र तशी नाही. अर्जेंटिना देशाची ही लेखिका तशी तरुण व नवी आहे. म्हणजे हे तिचे दुसरे पुस्तक. त्याआधी एक कथासंग्रहही प्रसिद्ध झालेलाय. मात्र या कादंबरीचा नऊ भाषांत अनुवाद होऊन एक टीव्ही मालिकाही तीवर निघालीय.
एका अनाम देशाच्या अनाम शहराची ही कहाणी. एका विषाणूमुळे सारे प्राणी-पशू विषारी होऊन जातात. ते सर्व नष्ट केले जातात. ना घरी कुणी पाळायचे, ना प्राणीसंग्रहालयात. खायचा तर प्रश्नच नाही. पण एक अडचण आली. माणसाला लागणारी प्रथिने कुठून मिळवायची? माणूस खायला सुरुवात केली तर? सरकार परवानगी देते. मग सुरू होते माणसांची कत्तल. मृतदेहांची पळवापळवी, काळाबाजार, चोरटी वाहतूक असे सारे. ‘ह्यूमन ब्रीडींग’ही केले जाते. मग सरकारी काही कठोर नियम करते. ‘नरभक्षण’ (कॅन्निबालिझम) शब्द वापरायचा नाही. ‘कत्तलखाना’, ‘माणूस’, ‘मानवी मांस’ हेही शब्द वापरायचे नाहीत. जो वापरेल त्याची रवानगी खाद्य म्हणून होईल! कुठे? प्रोसेसिंग प्लांट अर्थात प्रक्रिया कारखान्यात. ‘स्पेशल मीट’साठी खास, शुद्ध, तरुण, निर्जंतुक, पुष्ट शरीरे जन्माला घालायला प्रयोगशाळा व फलन-संवर्धन केंद्रे सुरू होतात. मेंदूपासून यकृत, हृदय, हातपाय यांचे चवदार, पौष्टिक खाद्यपदार्थ जेवणात खाल्ले जातात.
कादंबरीचा नायक एका प्रक्रिया केंद्राचा व्यवस्थापक असूनही माणूस खात नसतो. कादंबरीची अखेर अशी आहे की, नायक मार्कोस याला भेट म्हणून मिळालेली एक स्त्री तो उपभोगतो, भयंकर असूनही. तिला एक सुंदर, निरोगी मुलगा होतो. तिला तो बेशद्ध करून खाद्य व्हायला धाडतो. मार्कोसची पत्नी एक परिचारिका असते. दोघांचे एक मूल दगावलेले असते. त्या स्त्रीचे बाळंतपण करायला मार्कोस पत्नीला बोलावतो. ती हादरते, पण सारी प्रसृती व्यवस्थित करते. मार्कोस त्या स्त्रीला बेशुद्ध करतोय हे पाहून पत्नी म्हणते, ‘अरे, तिने आणखी मुले दिली असती की आपल्याला!’ तो स्त्रीदेह उच्च प्रतीचा म्हणून जोपासलेला असतो. मार्कोसला काहीही करून मूल हवे असते. ते त्या दर्जेदार देहाकडून मिळवणे हा लेखिकेने हिटलरच्या शुद्ध संततीच्या आग्रहाशी जोडलेला प्रसंग. त्या देशाची स्थिती नाझीवादाकडे वळत चालल्याची ही सूचना. पुरुषप्रधान समाज तर तो असतोच.
बाकी कादंबरी इतकी वेधक व धक्कादायक आहे की, सारी कथा सांगण्यात खूप जागा जाईल.
कोविड-१९नंतर सारे जग बदलेल असे सांगणाऱ्यांसाठी या कादंबरीने ‘ट्रान्झिशन’ (स्थित्यंतर) हा शब्द बहाल केलेलाय. पण खरोखर तो विषाणू तेवढा खतरनाक होता काय आणि मुळात तो होता काय असा संशय कादंबरीत घेतला गेलाय. एक सुप्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ सांगतो की, हा विषाणू एक बकवास असून लोकसंख्यावाढ घटवण्यासाठी हे कुभांड रचलेलेय. हा गृहस्थ एका गूढ अपघातात ठार होतो. काही बेकार तरुण एका ओसाड प्राणीसंग्रहालयाच्या आवारात सापडलेली कुत्र्याची पिल्ले मारून टाकण्याचा खेळ खेळताना म्हणतात की, ‘हा सारा बनाव आहे. बेकारी, गरिबी व लोकसंख्या कमी करण्यासाठी चाललेय हे सारे!’
जीजीबी नामक तो व्हायरस आहे, हे समजताच आलेले सामूहिक उन्मादाचे झटके, आत्महत्या अन दहशत यांचा फैलाव होतो. मार्कोसला वाटते की, प्राण्यांमधून विषबाधा होईल ही ऑफिशियल लाईन झाली. आम्ही सरकारी साच्याप्रमाणे वागावे, कोणी प्रश्न विचारू नयेत म्हणून जी कारणे दिली गेली ती वजनदार होती. माध्यमांनी ‘स्थित्यंतर’ हा शब्द असा माथी मारलाय जणू ते खरेच झालेय. पण मार्कोसला माहितेय हे स्थित्यंतर किती झटपट अन क्रूर होते ते.
कित्येक देशांत स्थलांतरितांसह गरीब अन वंचित लोक गायब होऊ लागले. त्यांचा छळ आणि शेवटी खाद्य होऊ लागले. बड्या उद्योगांनी सरकारांवर दबाव आणल्यावर माणूस खाण्याचा कायदेशीर कार्यक्रम आरंभला. त्यांनीच वाढती मागणी पाहून प्राण्यांसारखे मानवपालन-जनन सुरू केले. पण एक झाले. दारिद्रय व लोकसंख्या कमी झाली. विद्यापीठे, डॉक्टर्स सांगू लागले की, हे मांस खाण्यायोग्य आहे. भाजीपाला खाणाऱ्यांनाही रोग होऊ शकतात असे लेख प्रसिद्ध होऊ लागले. प्राणी खाऊन माणसे मरण पावल्याच्या बातम्या दिल्या जाऊ लागल्या. जनमत पालटले. विरोध मावळला. चीनमध्ये जागा पुरेना म्हणून माणसे मारली जाऊ लागल्याची उदाहरणे दिली जाऊ लागली…
स्पॅनिश बोलणाऱ्या बव्हंशी देशांनी हुकूमशाही, लष्करशाही, एकाधिकारवाद भोगलाय. त्यामुळे या भाषेतील बव्हंश लेखक राजकीयदृष्ट्या फार जागरूक व धीट असतात. कारस्थाने, कट, बंडे, प्रचार, वावड्या यांचा त्यांना इतिहास आहे. म्हणून त्यांचे लेखन प्रचंड कल्पक तरीही वास्तवास धरून असते. त्यामध्ये ऑगस्टिनाची भर पडलीय.
पत्रकार जशी कोणतीही घटना वरकरणी न घेता तिचा चौफेर व सखोल अंदाज घेतो व मग बातमीचे रूप तिला देतो, तसे या लेखकांचे भयभीत समाज, पडद्याआडची सत्ता, आंतरराष्ट्रीय बाजार आदी संबंध ते त्यांच्या कथा-कादंबऱ्यांत जोडतात.
‘टेंडर इज द फ्लेश’मध्ये जे देह खाण्यायोग्य बनवले जात आहेत, त्यांच्या घशातून स्वरयंत्रे काढलेली असतात. कसलाच आवाज काढता येऊ नये यासाठी! हा केवढा तरी मोठा संकेत लेखिका अवघ्या तीन वर्षांपूर्वी देऊन बसलीय. शिवाय माणसांना ‘पाळीव प्राणी’ म्हणून घडवण्याची प्रतिमा तर केवढी स्फोटक आहे! कादंबरीत ती खाण्यासाठी आहेत. आपणही आसपास रक्ताला चटावलेले पाळीव हिंसक माणसे अनुभवतोय. खाद्यरूपी देहाचे उत्पादन शास्त्रशुद्ध निर्जंतुक, निर्दोष अन आवडीनुसार (काळ्या कातडीला मागणी खूप) बनवण्याचा विविध कंपन्यांचा खटाटोप आजही आपण अन्य बाबतीत बघतोच की! नको असलेली माणसे आज असंख्य कंपन्या टाकून देताहेत! त्यांच्या पोटापाण्याची पर्वा मुळीच न करता. कादंबरीत खराब, बिघडलेले, कापताना चुकलेले देह ‘स्कॅव्हेंजर्स’च्या जमावाला देण्याची पद्धत आहे. तो प्रत्येक कारखान्याबाहेर उभा असतोच. म्हणजे गरिबी, भूक, बेकारी संपलेली नाहीय.
माओच्या सांस्कृतिक क्रांतीच्या प्रयोगावेळी कित्येक लेखक, वैज्ञानिक, विचारवंत, प्राध्यापक, कलावंत, राजकीय नेते शेतात व कारखान्यात उत्पादन करायला पाठवले जात. ते सारे प्रतिक्रांतिकारक, वाट चुकलेले समजले जात. माओच्या मृत्युनंतर ‘गँग ऑफ फोर’चा अमल उठला. तेव्हा नव्या सरकारनेच या सांस्कृतिक क्रांतीत काय अनुभव आले ते लिहायला उत्तेजन दिले. पुष्कळ कथा व कादंबऱ्या आणि नवे लेखक-लेखिका यामुळे जगाला वाचता आल्या. पण आता? आता फुटकळ रूपात, सौम्य टीका सहन केली जाते. माफक टीका व विश्लेषण करणारे चित्रपट व वाङ्मय उपलब्ध आहे. चीनमध्ये व्यक्तीवाद वाढलाय, पण उच्चारस्वातंत्र्य आक्रसलेय.
युद्धे असोत की विकास, विषाणू असो की अंतराळ, सरकारी शब्दाला वजन असते आणि जनता हळूहळू त्यापुढे झुकते, हे मार्कोस समजून घेतो, हे या कादंबरीचे मर्म. मात्र त्याला या शारीरविक्रीत सामील व्हावे लागते. तरीही तो नरभक्षक होणे टाळून स्वत्व टिकवतो हेही महत्त्वाचे. भारतीय मध्यमवर्ग सरकारी उत्तेजनानुसार हिंदुत्ववादी, उग्र राष्ट्रवादी अन धर्मद्वेष्टा होतोय. सर्व उदार, पुरोगामी, आधुनिक, समतावादी, सामाजिक न्यायनिष्ठ विचार हा मध्यमवर्ग झुगारतोय तरी किंवा त्याची टिंगलटवाळी तरी करतोय.
नरभक्षक होण्याचा आणखी एक अर्थ म्हणजे पुन्हा आदिम समाजाकडे वळणे. मानवाने केलेली प्रगती नष्ट करणे. भावनांचे राजकारण बहुतेकदा आदिम रूपातच व्यक्त होते. त्यामुळे अवघा समाज असुरक्षित, अस्वस्थ व अस्थिर होत राहतो.
कोविड-१९ने उजव्या पक्षांची सत्ता अधिक सहजपणे बळकट करण्याची संधी दिलेलीय. होतेयही तसेच. विरोधक दुर्बल, माध्यमे मांडीवर, नागरिक गाफील. अशा वेळी साहित्यिक जेवढे सर्जक होतील तेवढ जागृतीसाठी गरजेचे आहे. अजून प्रकाशन संस्थांकडे सरकारची वक्रदृष्टी गेलेली दिसत नाहीय. पण वाट कशाला पाहायची?
..................................................................................................................................................................
‘टेंडर इज द फ्लेश’ या कादंबरीच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.amazon.in/dp/B082VPXVHT?ref
..................................................................................................................................................................
लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.
djaidev1957@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment