अजूनकाही
ती खिडकीपाशी उभी राहून बाहेर बघत कसला तरी निर्धार करते. फक्त पैसे आणि पासपोर्ट कमरेपाशी स्कर्ट मध्ये खोचते आणि बाहेर पडते. वाटेत टोकणारे असतातच. त्यांना सांगते- ‘सासरच्या घरी चालले आहे.’ आणि तिचा प्रवास सुरू होतो. आयुष्याच्या वेगळ्याच वाटेवरचा... फक्त स्वतःच्या भरवशावर.
‘Unorthodox’ ही फक्त चार भागांची नेटफ्लिक्सवरची एक मालिका. न्यूयॉर्कमध्ये एका भागात राहणाऱ्या Hasidic Jew समाजाची, रूढी-परंपरांना घट्ट धरून ठेवणाऱ्या ज्यू धर्मीय कुटुंबात जन्माला आलेल्या ‘एस्टी’ची.
रोज झोपेतून उठल्यापासून दिवसभरात विविध रूढी पाळत जगणारे ते प्रतिष्ठित कुटुंब. एस्टीचा नवरा यांकी दुसऱ्या दिवशी एस्टी त्याला सोडून निघून गेली असल्याचं घरी सांगतो आणि सासूचा पारा चढतो, ‘काय कमी होतं तिला म्हणून सोडून गेली? गेली कुठे? चुकीचीच मुलगी निवडली होती आपण. वर्ष होत आले लग्नाला. पण...’
एस्टी इकडे बर्लिनला पोहोचते. लहानपणी तिला सोडून गेलेल्या तिच्या आईकडे जाण्यासाठी. आई रस्त्यात दिसते तिच्या पार्टनरबरोबर (बहुदा लाईफ पार्टनर). पार्टनर स्त्री असते. (पुरुष नव्हे.) एस्टीसाठी हा नक्कीच धक्कादायक प्रकार असतो. ती तिथून दूर जाते आणि अशीच भरकटत एका कॉफी शॉपमध्ये पोहोचते.
फ्लॅशबॅक आणि वर्तमान यांचा सुंदर मेळ साधत मारिया श्रेडरचं अप्रतिम दिग्दर्शन असलेली ही मालिका आपल्याला दिङमुढ करते. खोलवर रुजलेल्या रूढी, परंपरा मनात प्रश्न निर्माण करतात. आणि ‘जगण्यासाठी’ आसुसलेल्या १९-२० वर्षांच्या एस्टीची धाडसी वृत्तीही अचंबित करते.
लग्नाआधी एस्टीला तिची होणारी सासू तिला ‘पाहायला’ येणार असते, घरी नव्हे, एका मॉलमध्ये. सून कशी आहे याचं दुरूनच निरीक्षण करण्यासाठी. एस्टी तिच्या आत्याला विचारते, ‘पण मी तिला कसं पाहू?’ आत्या दटावते, ‘तू पाहायची गरज नाही.’ यांकीनेही मुलीला लग्न ठरण्याआधी पाहिलेलं नसतं. स्वतःला ‘दाखवण्या’च्या या प्रकाराने होणारा त्रास आणि एकंदरच एस्टीचं व्यक्तिमत्त्व अभिनेत्री शिरा हासने उत्तमरीत्या साकारलं आहे.
“The man is a giver and woman is receiver. शारीरिक नातं हे मूल होण्यासाठी असतं. आणि नवऱ्याला मूल देण्यासाठी आपलं शरीर उपलब्ध करून देणं हे बायकोचं पवित्र कर्तव्य असतं,” असं अत्यंत मृदू स्वरात कौन्सिलर एस्टीच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करते. स्वतःच्याच बाह्य शरीराविषयी नव्यानेच माहिती होत असलेली, थोडी बावरलेली एस्टी मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतानाही या नव्या नात्याला सामोरं जायचं मनापासून स्वीकारते. ती तिच्या वडिलांच्या मदतीने चोरून पियानोचे धडे घेत असते. कारण त्यांच्यात मुलींनी संगीत शिकणं वर्ज्य असतं. अर्थातच लग्न ठरल्यावर तिला ते बंद करावं लागतं. लग्नाआधी एकदा दोन्ही कुटुंबं एकत्र येतात. एस्टी आणि यांकी दोघंच एका खोलीत काही मिनिटांसाठी भेटतात. खरं तर तिला भरभरून व्यक्त व्हायचं असतं. पण बुजरा यांकी साधी नजरेला नजरही देत नसतो. त्यामुळे ती एकच वाक्य सांगते, ‘मी इतर मुलींपेक्षा वेगळी आहे.’ तिला कदाचित हे सांगायचं असतं की, मला भरभरून जगायला आवडतं, मला संगीत आवडतं, मला नव्या गोष्टी शिकायला आवडतात. तिच्या मनाला त्रास देणारी अजून एक गोष्ट म्हणजे लग्नाच्या वेळी कराव्या लागणाऱ्या केशवपनाची एक रूढी. नंतर विग वापरून किंवा ठराविक पद्धतीने डोकं झाकून जगायची तिला सवय होते.
लग्नानंतर ‘‘Yanki is sensitive. You are supposed to make him feel like a king,” त्यांचा सेक्स (!) यशस्वी (म्हणजे तिने गरोदर रहाणं) होत नसतो म्हणून सासू येऊन तिला सुनावून जाते. तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे, काही त्रास होतो आहे का, याच्याशी तिला काहीही देणं-घेणं नसतं.
मन आनंदी नसताना, रोमँटिक फिलिंगचा लवलेशही नसताना, कुठल्याही रोमांचकारी स्पर्शाशिवाय, नजरेशिवाय, फक्त ‘रिसिव्हर’ म्हणून सतत ‘तयार’ असणं, हे भयंकर वेदनादायी असतं तिच्यासाठी. वेदना शारीरिक आणि मानसिकही.
एकदा वैतागून ती सर्व काही सहन करत त्या प्रसंगाला सामोरी जाते. पण तरीही तिच्या सेक्सविषयीच्या तक्रारी, त्याविषयीची तिची अपात्रता (!?) आणि वर्ष होत आलं तरी मूल नाही या कारणास्तव आईच्या सांगण्यावरून यांकी तिला घटस्फोट मागतो. त्यालाही खरं तर कळत नसावं काय बरोबर आणि काय चूक. या यांकीचा आपल्याला राग येत नाही. तो कधी बावळट, भाबडा आणि शेवटी तर बिचारा वाटतो. त्याला तरी कुठे माहिती असतं शारीरिक आणि भावनिक नातं म्हणजे काय ते.
...तर नवरा, सासर, सगळं सोडून बर्लिन शहरात दाखल झालेली एस्टी एका तरुण मुला-मुलींच्या ग्रुपमध्ये धाडसानं प्रवेश मिळवते, मैत्री करू पाहते. प्रत्येकाचं मोकळेपणाने वागणं, बोलणं, हसणं, चेष्टा-मस्करी, स्वतःचे स्वतः निर्णय घेणं... सगळंच अचंबित आणि आकर्षित करत असतं तिला. त्यांच्या मदतीनं संगीत शिकण्यासाठी होतकरू मुलांसाठी असलेली स्कॉलरशिप मिळवण्याची तिची धडपड सुरू होते. त्या मुलांबरोबर राहिल्यानं खुलेआम चुंबन घेणं, समलिंगी नातेसंबंध, इंटरनेटचा वापर, कुटुंब सोडून एकट्यानं काम करून जगणं अशा विविध गोष्टी तिला नव्यानं बघायला, शिकायला मिळतात. ग्रुपमधल्या एका मुलाबरोबरची तिची जवळीक तिला नवीन अनुभव देऊन जाते. एका तळ्यातल्या पाण्यात शिरल्यावर डोक्यावरचा विग काढून पाण्यात टाकण्याचा प्रसंग बरंच काही सांगून जातो आपल्याला.
या सगळ्या धांदलीमध्ये अजून एक गोष्ट तिला समजते... तिला दिवस गेलेले असतात.
इकडे यांकी त्याच्या एका भावाला घेऊन तिला शोधत बर्लिनमध्ये पोहोचतो. त्याचा भाऊ मोशे बराच ‘अनुभवी’ असतो. त्याच्यामुळे यांकीला बऱ्याच गोष्टी नव्यानं कळतात. एका वेश्येमुळे स्त्रीला नक्की काय हवं असतं, याचा त्याला शोध लागतो.
…तर यांकी एस्टीच्या त्या संगीत संस्थेमध्ये पोहोचतो. त्या दिवशी तिचा स्कॉलरशिपसाठी इंटरव्ह्यू आणि संगीताची परीक्षा असते. तिचं सिलेक्शन झालं तर तिला बर्लिनमध्ये राहता येणार असतं. सादरीकरणाच्या वेळी तिचे नवे मित्र-मैत्रिणी, तिची आई आणि यांकी उपस्थित असतात प्रेक्षक म्हणून.
शेवटी यांकीला एस्टी वेगळी आहे म्हणजे नक्की काय हे लक्षात आलेलं असतं आणि आता त्याला ती मनापासून आहे तशी हवी असते. त्यासाठी तो तिला विनवण्या करतो, त्यांच्या प्रथेप्रमाणे असलेल्या त्याच्या कानांवरून खाली येणाऱ्या दोन शेंड्याही तो कापून टाकतो.
एस्टी यांकीबरोबर परत जायला तयार होते? तिच्या नव्या नात्यांचं पुढे काय होतं? तिला स्कॉलरशिप मिळते का? आणि तिची आई? हे सर्व जाणण्यासाठी ‘अनऑर्थोडॉक्स’ बघाच.
..................................................................................................................................................................
लवकरच प्रकाशित होत आहे...
प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki
..................................................................................................................................................................
Hasidic Jew हे कट्टर परंपरावादी लोक. Orthodox हा शब्द आपल्यालाही परिचितच. हा असा फायदे-तोटे न बघता ‘परंपरा’ जपण्याचा कट्टरपणा आपल्याकडेही दिसतो, नाही का? एखाद्या उत्सवाची परंपरा मनाला नक्कीच आनंद देऊन जाते आणि जोपावीशीही वाटते. पण काही रूढी चालीरीती त्रासदायक असतात.
एस्टीची होणारी सासू मॉलमध्ये तिला बघायला येते, तेव्हा वाटलं ही मॉलमधली वस्तू आहे का? तिला मन, विचार, भावना, मतं काही नाहीतच? मला एका मैत्रिणीचा बघण्याचा कार्यक्रम आठवला. तिच्या वडिलांनी तिला न सांगताच ठरवून टाकला होता आणि तिला सांगण्यात आलं की साडी नेसून ये. तिला बघायला येणार हे तिच्या अपरोक्ष ठरवलं असल्यामुळे आधीच डोकं गरम झालं होतं तिचं. त्यात ही साडीची जबरदस्ती. पण तिने ठणकावून सांगितलं- ‘ड्रेसमध्येच येणार. साडी रोज नेसत नाही. उगाच काय शो करायचा?’ तिला जे आवडत नाही, पटत नाही ते ठामपणे सांगितलं तिनं.
पण हे असं जमतं प्रत्येकीला? विशेषतः मुली-बायकांच्या बाबतीत अशी अनेक बंधनं अजूनही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. ‘आपल्याकडे हे असंच असतं’च्या नावाखाली. तिला काय हवंय, काय आवडतं हे इतरांनी ठरवायचं. लग्नाआधी असू देत, नाही तर लग्नानंतर.
लग्नानंतरचे विषय जरा वेगळे आणि अधिक गंभीर.
शारीरिक संबंध हा काय कर्तव्याचा भाग आहे? ही आधी इच्छा असावी लागते. समूपदेशक म्हणून काम करताना दिसून येतं की, सुशिक्षित म्हणवल्या जाणाऱ्या घरांमधल्या मुलामुलींना आजच्या काळातसुद्धा स्त्री-पुरुष संबंध म्हणजे काय माहीत नसतं. ‘पुरुषत्व’ सिद्ध करण्याच्या नादात पुरुष ‘माणूसपण’ विसरल्याच्या काही केसेस मी स्वतः हाताळलेल्या आहेत. यांकीसारख्या पुरुषांना घरातल्यांच्या आणि समाजाच्याही बऱ्याच दडपणांना सामोरं जावं लागतं. त्यांच्याही बाबतीत काही गोष्टी गृहीत धरल्या जातात. पुरुष स्वतः धीट, आक्रमक मर्द नसला तर त्याला ‘किंग’ फील देण्याची जबाबदारी मात्र समाजाने स्त्रीवरच टाकलेली आहे.
बऱ्याच समाजांमध्ये, घरांमध्ये आजही स्त्रीला आपल्या मनाप्रमाणे वागवलं, वापरलं जातं. तिच्यासाठी असतात नियम आणि अटी. हल्ली तर पैसेही तिनेच कमवायचे, घर तिनेच सांभाळायचं, स्वैपाकपाणी, नातेवाईक, परंपरा, चालीरीती सगळ्या जबाबदाऱ्या तिच्याच. शिवाय घर लख्ख नाही ठेवलं तर नावं तिलाच ठेवली जाणार, सण साजरे सगळेच करतात पण कामाला जुंपलेली असते ती बाईच. पुरुषाने एखादं ठुसकं काम केलं तर त्याचं कोण कौतुक!
हल्ली मल्टी टास्किंग. सुपर वूमन बनून मिरवायची तर फार हौस. मग बसतात रडत मला गृहीत धरलं जातं म्हणून आणि मनासारखं जगताच आलं नाही म्हणून. मग या परंपरा स्त्रीला त्रासदायकच नाहीत का?
बरं अशाच सगळ्या कष्टांमधून ‘ज्येष्ठ’ झालेले लोक हे सगळं आपल्या सुनेच्या माथी मारायला मोकळे. “म्हणजे काय? आपल्याकडे वर्षानुवर्षं चालत आलंय हे. झालंच पाहिजे. आपली संस्कृती आहे ही.” ठीक आहे ती करेल. पण मग सगळ्यांनी कामं वाटून घ्यायची. नवरा, बायको, मुलं, सासू, सासरे सगळ्यांनी जबाबदाऱ्या वाटून घ्यायच्या. कशी काय वाटते आयडिया?
अगदी या मालिकेतल्या एस्टीइतकं नाही, पण थोडं ‘अनऑर्थोडॉक्स’ व्हायला काय हरकत आहे? मान, अपमान ठेवा बाजूला. मोकळा श्वास घ्या आणि घेऊ द्या. ‘विन-विन सिच्युएशन’ची सवय घालून घ्या. मी मोठी, तू धाकटी संपवा आता. आता मैत्रीचा जमाना आहे. होऊद्यात मैत्री सासू सुनेमध्ये, वडील आणि मुलामध्ये.
परंपरा आणि त्याचे फायदे-तोटे हा खरं तर स्वतंत्र प्रबंधाचा विषय आहे. थोडक्यात म्हणजे मी आजपर्यंत असा वागत आलो/आले म्हणजे बाकीच्यांनीही तसंच वागलं पाहिजे हा अट्टाहास टाळायला हवा. नाविन्याचा, बदलाचा स्वीकार हवा. मी ऑर्थोडॉक्सच राहिलो/राहिले तरी जग पुढे जाणार आहे. मग मी स्वतः बदलून त्याचा आनंद घ्यायचा की कट्टरपणा ठेवून स्वतःला आणि दुसऱ्यांनाही त्रास द्यायचा? याचा जरा गंभीरपणे विचार करायला हवा.
काय वाटतं?
..................................................................................................................................................................
लेखिका रत्ना साने-गोसावी मानसोपचार समुपदेशक आहेत.
ratnagosavi@gmail.com
..................................................................................................................................................................
Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment