गौरवर्णीय अमेरिकन नागरिकांना जाग आली आहे. भारतीय सवर्ण समाज कधी जागा होणार?
पडघम - सांस्कृतिक
अलका गाडगीळ
  • ‘फेअर अँड लव्हली’ची एक जाहीरात
  • Mon , 29 June 2020
  • पडघम सांस्कृतिक जॉर्ज फ्लाईड George Floyd वर्णभेद Racism फेअर अँड लव्हली Fair and lovely बिपाशा बासू Bipasha Basu स्मिता पाटील Smita Patil नंदिता दास Nandita Das डार्क इज ब्युटिफुल Dark Is Beautiful

जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर अमेरिकेत जनक्षोभ उसळला आहे. समाजात रुजलेल्या वंशविद्वेषावर सार्वजनिक चर्चा घडून येतेय. राजकारण, साहित्य, चित्रपट, प्रसारमाध्यमं आणि  इतर अनेक क्षेत्रांत ठाण मांडून बसलेल्या या मानसिकतेची समीक्षा होतेय. तसंच वांशिक तिरस्कार  दर्शवणार्‍या म्हणी, वाक्प्रचार आणि वचनांवर क्ष-किरण रोखला गेलाय. एकंदरीत ही चळवळ जीवनाच्या प्रत्येक पैलूची समीक्षा करण्याच्या वाटेवर निघाली आहे.

या सार्वजनिक घुसळणीतून यूनिलीव्हर, जॉन्सन अँड जॉन्सन, प्रॉक्टर अँड गॅम्बल यांसारख्या इतर बड्या कॉर्पोरेटसची उत्पादनेही सुटलेली नाहीत. या बहुराष्ट्रीय कंपन्या गोरेपणाची स्वप्नं विकतात. दक्षिण आशियाई समाजात गोरेपणाचा हव्यास गोचिडासारखा चिकटला आहे. या हव्यासाला प्रतिसाद देत अमेरिकन कॉपोरेटसनी करोडो डॉलर्स कमावले.

ही चर्चा चालू असताना ‘फेअर अँड लव्हली’च्या जाहिराती कशा विसरता येतील? त्यांच्या एका जाहिरातीत सावळ्या मुलीचं लग्न होणं किती कठीण असतं हे दाखवलं जायचं. नंतर तिने ‘फेअर अँड लव्हली’ वापरायला सुरुवात केली. काही काळातच ती गोरी झाली आणि तिचं लग्न जुळलं. या एका जाहिरातीत किती भ्रम ठासून भरलेले होते! मुलीचा वर्णच महत्त्वाचा, तिचे गुण, शिक्षण चेहर्‍याच्या रंगापुढे कस्पटासमान. मुलीनं काळं असता कामा नये. तशी ती असेल तर तिला नवरा मिळणं मुश्किल. मुलींसाठी अंतिम ध्येय लग्न हेच असतं. आणि लग्नासाठी गोरं असणं/होणं आवश्यक. नकार देण्याचा अधिकार फक्त मुलालाच. असे अनेक भ्रम या जाहिरातीने पसरवले. तरीही या उत्पादनांचा खप काही अब्जांमध्ये असतो. अगदी दूरवरचे आदिवासी पाडे असोत वा खेडी, तेथील कचऱ्यांमध्ये ‘फेअर अँड लव्हली’ची आवरणं सापडतात.

गोरेपणाच्या अवास्तव स्तोमाला कंटाळून अभिनेत्री नंदिता दासने ‘डार्क इज ब्यूटीफूल’ ही मोहीम सुरू  केली. तिला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या संकेतस्थळावर अनेक स्त्रिया आपलं मनोगत व्यक्त करताहेत. त्यातील एक तरुणी म्हणते- “दिल्लीला महाविद्यालयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी माझ्या त्वचेच्या रंगाचा मी कधीच विचार केला नव्हता. तिथे मात्र माझ्या वर्णाची आणि माझ्या दाक्षिणात्य असण्याची जाणीव करून दिली गेली. सुरुवातीला खूप वाईट वाटलं. पण कोंकणा सेनशर्मा आणि नंदिता दास यांनी रंगंभेदाविरोधात भूमिका घ्यायला सुरुवात केली. ‘डार्क इज ब्यूटीफूल’ या त्यांच्या मोहिमेमुळे मला बळ मिळालं, तरी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. माझी पार्लरवाली सनस्क्रीन वापरायला सांगते किंवा फेअरनेस फेशियल करून घे असं सुचवते. मी मात्र स्त्रियांना हेच सांगते की, तुमच्या त्वचेचा रंग महत्त्वाचा नाही. स्वतःवर प्रेम करायला लागा आणि आत्मविश्वास जोपासायला शिका.”

सावळ्या मुलींना बऱ्याच भेदभावांना तोंड द्यावं लागतं. लग्न जुळवताना कातडीच्या रंगाचा मुद्दा येतोच. ‘शादी डॉट कॉम’ या संकेतस्थळावर ‘गोरेपणा’चा फिल्टर होता, तो उगीच नाही! अगदी पुरोगामी म्हणवून घेणार्‍या कुटुंबातही गोर्‍या मुली हव्या असतात.

या वर्चस्ववादी जाणिवा सिनेसृष्टीतही उमटल्या. युरोपिय आणि उत्तर अमेरिकेतील हॉलिवुड चित्रपटांना ‘ओ! सो व्हाईट’ असं उपरोधानं म्हटलं जातं. या दोन्ही चित्रपट व्यवसायात वर्णवैविध्य  दिसतं. अॅफ्रो-अमेरिकन अभिनेत्यांना प्रमुख भूमिका मिळत  नाहीत. कृष्णवर्णीय कथानकं आणि संवेदनांवर चित्रपट बनत नाहीत. कृष्णवर्णीय पात्रं एक तर गुन्हेगारी किंवा  सेवकवर्गातील असतात.

‘बायबल’वर आधारित चित्रपटात जीझससहित इतर पात्रं युरोपिय गोरी दाखवली जातात. जीझस पश्चिम आशियाई असल्यामुळे तो आणि इतर स्थानिक जेरुसलेमवासीय युरोपिय गोरे असण्याची शक्यताच नव्हती. त्या भूमिकेसाठी अरब अभिनेत्याची निवड न करता हॉलिवुडच्या गोऱ्या नटांनाच भूमिका दिल्या गेल्या. जीझसला युरोपिय गोरं दाखवण्याचा किती अट्टाहास! एक प्रकारे पश्चिम आशियाई संस्कृतीचा हा अपहारच म्हटला पाहिजे. बायबल, जीझस आणि तेथील समाजाची रंगसफेदी पश्चिमी चित्रपटांतून सतत होत असते.

बॉलीवूड मात्र त्वचेच्या रंगाला अजनूही महत्त्व देतं. या इंडस्ट्रीमध्ये अनेक काळ्या-सावळ्या नायिकांची संभावना केली गेली. नंदिता दाससारख्या बुद्धिमान अभिनेत्रींना काम मिळत नाही. पण अभिनयाच्या नावानं शून्य पण मेणाच्या पुतळीसमान अभिनेत्रींना एका मागोमाग चित्रपट मिळतात.

मॉडेलिंगमध्ये प्रस्थापित झाल्यानंतर बॉलिवुडमध्ये प्रवेश करताना बिपाशा बासूला संघर्ष करावा लागला. सावळा वर्ण आड आला. भूमिका मिळणं कठीण जाऊ लागलं. काही काळानंतर बी ग्रेडच्या सिनेमात कामं मिळू लागली. मोठ्या बॅनरकडून भूमिका आल्या, पण त्या सहनायिकेच्या. काही कारणानं बिपाशा आणि करीना कपूरमध्ये वादावादी झाली. या बाचाबाचीत करीनाला काही युक्तिवाद करता येईना. मग तिने त्वचेच्या रंगाचं अस्त्र बाहेर काढलं आणि बिपाशाला ‘काळी बिल्ली’ असं संबोधलं.

..................................................................................................................................................................

लवकरच प्रकाशित होत आहे...

प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी क्लिक करा - 

https://www.booksnama.com/book/5201/Maay-Leki-Baap-Leki

..................................................................................................................................................................

स्मिता पाटील हिंदी चित्रपटसृष्टीत अत्यंत आत्मविश्वासावं वावरली. या बुद्धिमान आणि  अत्यंत प्रतिभावान अभिनेत्रीला चळवळीची पार्श्वभूमी होती. पण व्यावसायिक सिनेमा असो वा श्याम बेनेगलसारख्या दिग्दर्शकांचे समांतर सिनेमे स्मिताची रंगसफेदी केली जात असे. प्रेक्षक पदद्यावरील सावळ्या वर्णाच्या नायिकेला स्वीकारणार नाहीत, अशी भीती वितरकांना वाटत असते.

पण एडीटीव्ही या इंग्रजी वृत्तवाहिनीनं फेअरनेस क्रीमच्या जाहिराती घेणं अनेक वर्षांपूर्वीच बंद केलं होतं. चित्रपटसृष्टीत नागराज मंजुळेंसारखे वेगळा विचार करणारे लेखक-दिग्दर्शक आले आहेत. ‘सैराट’ची हिरॉईन नायिकेच्या प्रचलित प्रतिमेला धक्का देणारी होती. मेधा पाटकर, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू, नंदिता दास, शबाना आझमी यांसारख्या कर्तबगार स्त्रिया सतत चर्चेत असतात. पण समाजाच्या प्रत्यक्ष व्यवहारात मात्र धाडस दाखवणार्‍या स्त्रियांचा स्वीकार केला जात नाही. रोजच्या जीवनात विषमता सतत पुढे येते राहते.

अमेरिकेतल्या महाकाय कॉपोरेटसना वर्ण आणि वंशवाद आता ‘पोलिटिकली करेक्ट’ राहिला नाही, याची जाणीव वर्णभेदाविरुद्ध सुरू झालेल्या चळवळीने करून दिली. त्या नंतर ‘न्यूट्रोजिना स्कीन व्हायटनिंग लोशन’ आम्ही बंद करत आहोत अशी घोषणा दोन दिवसांपूर्वी  जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीतर्फे करण्यात आली. त्या पाठोपाठ युनिलिव्हरनेही ‘फेअर अँड लव्हली’ या उत्पादनातून ‘फेअरनेस’, ‘व्हायटनिंग’ आणि ‘लायटनिंग’ हे शब्द काढून टाकण्याचा निर्णय जाहीर केला. त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटंलय – ‘त्वचेची काळजी’शी संबंधित उत्पादनं सर्वसमावेशक करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. त्वचा आणि सौंदर्याच्या संकल्पनेतही विविधता असावी असं आम्ही मानतो. म्हणून आम्ही ‘फेअरनेस’, ‘व्हायटनिंग’ आणि ‘लायटनिंग’ हे शब्द काढून टाकत आहोत आणि ‘फेअर अँड लव्हली’ हे ब्रॅंड नेमही बदलणार आहोत. या नवसंवेदनांची झुळूक भारतात पोचली, पण तिचं चळवळीत रूपांतर झालेलं नाही. ‘शादी डॉट कॉम’ या ऑनलाइन लग्न जुळवणार्‍या वेबसाइटने आपल्या संकेत स्थळावरील विवाहेच्छुक मुलींचा ‘गोरेपणा शोधणारा फिल्टर’ बंद करणार  असल्याचं आपल्या प्रासिद्धी पत्रकात म्हटलंय. आता या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि लग्नं जुळवणार्‍या कंपनीनेही ‘गोरेपणा’ हा शब्द आणि संकल्पना न वापरण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारतातील असंख्य स्त्रियांची अपराधगंडातून सुटका व्हायला पाहिजे, पण प्रत्यक्षात तसं होणार नाही याची त्यांना कल्पना आहे.

भारतात काही काळापूर्वी गोरेपणाच्या उत्पादनांवर नव्हे तर जहिरातींवर बंदी घालण्यात आली. ही उत्पादनं उन्हापासून संरक्षण करणारी म्हणून भारतात विकली जातात, गोरेपणा आणणारी  म्हणून नव्हे . स्त्री चळवळींच्या अथक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं आहे.

गोरा रंगच श्रेष्ठ हे कोणी कोणत्या निकषांवर ठरवलं? असे निकष वैश्विक, सार्वत्रिक आणि सार्वकालिक कसे असू शकतात? अनेक वर्षांपूर्वी रेडिओवर ‘गोरी गोरी पान फुलासारखी छान’ हे ग.दि. माडगूळकरांचं गीत नेहमी लागायचं. तेव्हा त्यात काही भ्रामक कल्पना आहेत असं वाटायचं नाही. पुढे ‘गोऱ्या फुलांसारख्या छान’ प्रतिमांचा उगम कोठे आहे, हे उलगडत गेलं.

अमेरिकेतील गोरे लोक वर्णभेदाविरोधात रस्त्यावर आंदोलन करत आहेत. इतिहासातील राज्यकर्ते लेखक, विचारवंत यांच्यावरही धाड आली आहे. अमेरिकेत आफ्रिकन बंधकांना गुलाम बनवून आणणार्‍या राज्यकर्त्यांचे पुतळे पाडले गेले. विन्स्टन चर्चिल यांचाही पुतळा वाचला नाही. ते वर्णद्वेषी असल्याचे पुरावे इतिहासात आहेत. त्यांच्यालेखी भारतीय रानटी आणि पशुसमान आणि आफ्रिकन वंशिय युरोपियांपेक्षा कमी प्रतीचे कमी बुद्धीचे लोक’ होते.

हे सारं घडत असताना मनात एक प्रश्न उभा राहतो. आपल्याकडे दलितांच्या दिवसाढवळ्या हत्या होत असताना जातीवादाविरोधात सवर्ण समाज रस्त्यावर का उतरत नाही? जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येपेक्षाही क्रूर पद्धतीने भोतमांगे कुटुंबीयांना संपवण्यात आलं होतं. आफ्रिकन बंधकांप्रमाणे दलितांवरही शतकानुशतके अत्याचार होत राहिले आहेत. गौरवर्णीय अमेरिकन नागरिकांना जाग आली आहे. सवर्ण समाज कधी जागा होणार?

.............................................................................................................................................

लेखिका अलका गाडगीळ युनिसेफसाठी काम करतात.

alkagadgil@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Wed , 01 July 2020

The author has strongly and clearly made her case against products purporting a change in skin colour from dark to fair. The words associated with the ads for such products which have created create an inferiority complex in the minds of millions over the years. In addition to the bias the general population has against darker skin colour there is also prejudice on the basis of caste which is as sinister. I hope people will take a stand against this.


Sachin Shinde

Tue , 30 June 2020

Khup Chan lekh lihilat. hya lekhacha vichar saglyani karayala hava........


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

एक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘तलवार’ म्हणून वापर करून प्रतिस्पर्ध्यावर वार करत आहे, तर दुसरा आपल्या बचावाकरता त्यांचाच ‘ढाल’ म्हणून उपयोग करत आहे…

डॉ. आंबेडकर काँग्रेसच्या, म. गांधींच्या विरोधात होते, हे सत्य आहे. त्यांनी अनेकदा म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल यांच्यावर सार्वजनिक भाषणांमधून, मुलाखतींतून, आपल्या साप्ताहिकातून आणि ‘काँग्रेस आणि गांधी यांनी अस्पृश्यांसाठी काय केले?’ या आपल्या ग्रंथातून टीका केली. ते गांधींना ‘महात्मा’ मानायलादेखील तयार नव्हते, पण हा त्यांच्या राजकीय डावपेचांचा एक भाग होता. त्यांच्यात वैचारिक आणि राजकीय ‘मतभेद’ जरूर होते, पण.......

सर्वोच्च न्यायालयाचा ‘उपवर्गीकरणा’चा निवाडा सामाजिक न्यायाच्या मूलभूत कल्पनेला अधोरेखित करतो, कारण तो प्रत्येक जातीच्या परस्परांहून भिन्न असलेल्या सामाजिक वास्तवाचा विचार करतो

हा निकाल घटनात्मक उपेक्षित व वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवण्याची खात्री देतो. उप-वर्गीकरणाची ही कल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बंधुता व मैत्री या तत्त्वांशी सुसंगत आहे. त्यात अनुसूचित जातींमधील सहकार्य व परस्पर आदर यांची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. तथापि वर्णव्यवस्था आणि क्रीमी लेअर यांच्यावर केलेले भाष्य, हे या निकालाची व्याप्ती वाढवणारे आहे.......

‘त्या’ निवडणुकीत हिंदुत्ववादी आंबेडकरांचा प्रचार करत होते की, संघाचे लोक त्यांचे ‘पन्नाप्रमुख’ होते? तेही आंबेडकरांच्या विरोधातच होते की!

हिंदुत्ववाद्यांनीही आंबेडकरांविरोधात उमेदवार दिले होते. त्यांच्या पराभवात हिंदुत्ववाद्यांचाही मोठा हात होता. हिंदुत्ववाद्यांनी तेव्हा आंबेडकरांच्या वाटेत अडथळे आणले नसते, तर काँग्रेसविरोधातील मते आंबेडकरांकडे वळली असती. त्यांचा विजय झाला असता, असे स्पष्टपणे म्हणता येईल. पण हे आपण आजच्या संदर्भात म्हणतो आहोत. तेव्हाचे त्या निवडणुकीचे संदर्भ वेगळे होते, वातावरण वेगळे होते आणि राजकीय पर्यावरणही भिन्न होते.......

विनय हर्डीकर एकीकडे, विचारांची खोली व व्याप्ती आणि दुसरीकडे, मनोवेधक, रोचक शैली यांचे संतुलन राखून त्या व्यक्तीच्या सारतत्त्वाचा शोध घेत असतात...

चार मितींत एकसमायावेच्छेदे संचार केल्यामुळे व्यक्तीच्या दृष्टीकोनातून त्यांची स्वतःची उत्क्रांती त्यांना पाहता येते आणि महाराष्ट्राचा-भारताचा विकास आणि अधोगती. विचारसरणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे, विचार-कल्पनांचे महत्त्व न ओळखल्यामुळे व्यक्ती-संस्था-समाज यांत झिरपत जाणारा सुमारपणा, आणि बथ्थडीकरण वाढत शेवटी साऱ्या समाजाची होणारी अधोगती, या महत्त्वाच्या आशयसूत्राचे परिशीलन त्यांना करता येते.......